विश्लेषण : ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेसाठी प्रथमच महिला पंचांची नियुक्ती कशी करण्यात आली?

२०२२मध्ये कतार येथे होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी ‘फिफा’ने पंच, सहाय्यक पंच आणि व्हिडिओ सामनाधिकारी यांची घोषणा नुकतीच केली. यावेळी पहिल्यांदाच महिला पंचांचीही नियुक्ती केली आहे.

fifa football world cup 2022
फिफा फुटबॉल विश्वचषकात यंदा पहिल्यांदाच महिला पंचांची निवड! (फोटो – रॉयटर्स)

संदीप कदम

कुठल्याही स्पर्धेचे सामने सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी ही पंचांची असते. २०२२मध्ये कतार येथे होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी ‘फिफा’ने पंच, सहाय्यक पंच आणि व्हिडिओ सामनाधिकारी यांची घोषणा नुकतीच केली. यावेळी पहिल्यांदाच महिला पंचांचीही नियुक्ती केली आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेसाठी पंचांची निवड कशी केली जाते, एकूण महिला पंच किती असतील याचा हा आढावा.

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये किती महिला पंच सहभागी होणार आहेत ?

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी ‘फिफा’च्या पंच समितीने ३६ पंच, ६९ सहाय्यक पंच आणि २४ व्हिडिओ सामनाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. यांची निवड सहा खंडांमधून करण्यात आली आहे. यात पहिल्यांदाच तीन महिला पंच आणि तीन महिला सहाय्यक पंचांना स्थान देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांतील ‘फिफा’च्या स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीवर आधारित ही निवड करण्यात आली आहे.

या महिला पंच कोण आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी काय आहे ?

स्टेफनी फ्रापार्ट (फ्रान्स), सलीमा मुकानसांगा (रवांडा) आणि योशिमी यामाशिता (जपान) या पंच तसेच नेऊझा बॅक (ब्राझील), कॅरेन डियाझ मेडिना (मेक्सिको) आणि कॅथरिन नेस्बिट (अमेरिका) सहाय्यक पंचांच्या भूमिकेत असणार आहेत. फ्रापार्ट यांची डिसेंबर २०२०मध्ये पुरुषांच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये प्रथमच महिला पंच म्हणून नेमणूक झाली होती. यासह एप्रिलमध्ये त्यांनी फ्रेंच चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. आफ्रिकेच्या मुकनसांगा जानेवारीत आफ्रिका कप ऑफ नेशन्स स्पर्धेच्या सामन्यासाठी भूमिका बजावणारी पहिला महिला पंच ठरली. यासह तिने ऑलिम्पिक आणि महिला विश्वचषक स्पर्धेतही सहभाग नोंदवला आहे. यामाशिताचा २०१९मध्ये झालेल्या ‘एएफसी’ चषकासाठीच्या महिला सामनाधिकारी चमूमध्ये समावेश होता. तिने महिला विश्वचषक स्पर्धेतही सहभाग नोंदवला आहे.

महिला पंच नियुक्तीबाबत ‘फिफा’ पंच समितीच्या अध्यक्षांची भूमिका काय आहे?

‘‘स्टेफनी फ्रापार्ट, सलीमा मुकानसांगा, योशिमी यामाशिता, न्यूझा बॅक, कॅरेन डियाझ मेडिना आणि कॅथरीन नेस्बिट या विश्वचषक स्पर्धेत आपली पंचाची भूमिका पार पाडतील. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिला पंच आपल्याला पाहायला मिळतील. पुरुषांच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महिला या पंचांची भूमिका पार पाडत होत्या. आम्ही नेहमीच गुणवत्तेला प्राधान्य देतो,’’ असे ‘फिफा’ पंच समितीचे अध्यक्ष पियर्लुगी कॉलिना यांनी सांगितले. ‘‘महिलांनी सर्वोच्च स्तरावर चांगली कामगिरी केल्यामुळे त्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यास पात्र आहेत आणि तेच महत्त्वाचे आहे,’’ असे कॉलिना यांनी सांगितले.

फुटबॉलमध्ये महिला पंचांच्या सहभागाला कधीपासून सुरुवात झाली?

महिला पंचांचा सहभाग कधीपासून झाला, याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. ऑस्ट्रियाच्या एडिथ क्लिंजर या १९३५ ते १९३८ या काळात पुरुष आणि माहिला फुटबॉलमध्ये पंच म्हणून कार्यरत होत्या, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु ‘फिफा’ने तुर्कस्तानच्या द्राहसन एर्डा (१९६८-१९९७) यांना जगातील पहिल्या महिला फुटबॉल पंच असल्याचे २०१८ मध्ये घोषित केले. एर्डा यांनी तुर्कस्तान आणि जर्मनीमध्ये जवळपास ३० वर्षे पंचाची भूमिका बजावली.

विश्वचषक स्पर्धेसाठी पंचांची नियुक्ती कशी केली जाते ?

विश्वचषक सामन्यांमध्ये नियुक्ती होण्यासाठी पंच पहिल्या श्रेणीतील असणे आवश्यक आहे. सहाय्यक पंच दुसऱ्या श्रेणीतील असू शकतात. प्रत्येक पंचाला अनुभव आणि पात्रतेवर अवलंबून श्रेणी ‘फिफा’कडून देण्यात येते. पहिल्या श्रेणीतील पंच हा किमान २५ वर्षांचा असला पाहिजे आणि त्यांनी विविध चाचण्या उत्तीर्ण केल्या पाहिजेत. पंचांना ४० मीटर धावणे ,७५ मीटर धावणे आणि २ गुणिले १२.५ मीटर रिकव्हरी वॉक अशा विशेष चाचणीद्वारे त्यांची तंदुरुस्ती सिद्ध करणे आवश्यक असते. उच्च दर्जाच्या विश्वचषक सामन्यांमध्ये खेळाचा वेग कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पंचाच्या नियुक्ती प्रक्रियेला तीन वर्षे लागली. ‘फिफा’ पंच कार्यक्रमाद्वारे पंचांची नियुक्ती केली जाते. तंदुरुस्ती चाचण्या अयशस्वी झाल्यास किंवा इतर चाचण्यांमध्ये अयशस्वी ठरलेल्या पंचांची निवड केली जात नाही. स्पर्धेसाठी आणखी एक पंचांचा गट सज्ज असतो. कोणालाही दुखापत झाली किंवा कोणी आजारी पडल्यास या गटातून पंच सहभागी होतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fifa football world cup women referee umpire for the game print exp pmw

Next Story
विश्लेषण: आठ वर्षांमध्ये LPG चे दर १४४ टक्क्यांनी वाढले; भारत कसा बनला जगातील सर्वात महागडा घरगुती गॅस मिळणारा देश?
फोटो गॅलरी