अन्वय सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक वाद, टीका-टिप्पणींनंतर कतार येथे अखेर फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवसांच्या सामन्यांमध्ये अपेक्षित निकाल नोंदवले गेले. इक्वेडोर, इंग्लंड आणि नेदरलँड्स या संघांनी स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्यानंतर स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी लिओनेल मेसीच्या अर्जेंटिना संघापुढे आशियाई संघ सौदी अरेबियाचे आव्हान होते. जेतेपदासाठी दावेदार अर्जेंटिनाचा संघ या सामन्यात मोठा विजय मिळवणे सर्वांना अपेक्षित होते. परंतु सौदीने यंदाच्या स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल नोंदवताना अर्जेंटिनावर २-१ अशी मात केली. ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धांमध्ये एखाद्या तुलनेने दुबळ्या संघाकडून बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला पराभूत व्हावे लागण्याची ही पहिलीच वेळ नव्हती.

उत्तर कोरिया १-० इटली (१९६६)

जागतिक फुटबॉलमध्ये इटलीचा कायमच दरारा होता. मात्र, १९६६च्या विश्वचषकात उत्तर कोरियाने इटलीला पराभवाचा धक्का दिला होता. मध्यरक्षक जिआकोमो बुल्गारेलीला सामन्यादरम्यान दुखापत झाली. त्या वेळी विश्वचषक फुटबॉल स्पर्धांमध्ये बदली खेळाडूला परवानगी नसल्याने इटलीला १० खेळाडूंनिशी खेळावे लागले. त्यामुळे इटलीचा खेळ खालावला. पाक डू इकने गोल करत उत्तर कोरियाला आघाडी मिळवून दिली, जी त्यांनी अखेरपर्यंत राखत तत्कालीन दोन वेळच्या विश्वविजेत्या इटलीला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.

पश्चिम जर्मनी ३-२ हंगेरी (१९५४)

१९५४च्या विश्वचषकात विजेतेपदासाठी स्वित्झर्लंड आणि हंगेरी या संघांना प्रबळ दावेदार मानले जात होते. हंगेरीने साखळी टप्प्यात दक्षिण कोरियाला ९-० आणि पश्चिम जर्मनीला ८-३ अशा मोठ्या फरकाने पराभूत करत आपले मनसुबे स्पष्ट केले होते. मात्र, अंतिम सामन्यात हंगेरीपुढे पुन्हा पश्चिम जर्मनीचे आव्हान होते. या सामन्यात अर्थात हंगेरीचे पारडे जड मानले जात होते आणि त्यांनी पहिल्या १० मिनिटांतच दोन गोल करत सामन्यावर पकड मिळवली. मात्र, पश्चिम जर्मनीने दमदार पुनरागमन करत सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर ८४व्या मिनिटाला हेल्मट रानने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल करत पश्चिम जर्मनीला धक्कादायक विजय मिळवून दिला. या विजयाला क्रीडाविश्वात आजही ‘मिरॅकल ऑफ बर्न’ असे संबोधले जाते.

विश्लेषण: फ्रान्सच्या बाबतीत ‘विजेत्यांना लागलेल्या अभिशापाच्या’ इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?

अमेरिका १-० इंग्लंड (१९५०)

दुसऱ्या महायुद्धामुळे १२ वर्षे फुटबॉल विश्वचषक स्पर्धा झाली नव्हती. युरोपातील परिस्थिती बिकट असल्याने ब्राझीलने १९५०च्या ‘फिफा’ विश्वचषकाचे यजमानपद भूषवले. या स्पर्धेच्या जेतेपदासाठी इंग्लंडचे नाव आघाडीवर होते. दुसरीकडे अमेरिकेच्या संघात व्यावसायिक फुटबॉलपटूंची संख्या फारशी नव्हती. त्यांच्या संघात विद्यार्थी, शिक्षक, चालक आणि छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांचाही समावेश होता. त्यामुळे साखळी फेरीत हे संघ आमनेसामने आले, त्या वेळी इंग्लंडचा संघ विजय मिळवेल असे अपेक्षित होते. मात्र, अमेरिकेने इंग्लंडला १-० असा पराभवाचा धक्का दिला. मूळचा हैती देशाचा नागरिक असलेल्या जो गाएट्जेन्सने अमेरिकेसाठी निर्णायक गोल केला होता.

कॅमेरून १-० अर्जेंटिना (१९९०)

इटली येथे झालेल्या १९९०च्या विश्वचषकात सलामीच्या लढतीत त्यावेळी गतविजेत्या अर्जेंटिनापुढे आफ्रिकन संघ कॅमेरूनचे आव्हान होते. डिएगो मॅराडोना यांचा समावेश असलेल्या अर्जेंटिनाला या सामन्यात सर्वोत्तम खेळ करता आला नाही आणि तुलनेने दुबळ्या कॅमेरूनने १-० अशी बाजी मारताना धमाल उडवून दिली. ६७व्या मिनिटाला ओमाम-बियिकने कॅमेरूनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अर्जेंटिनाला सामन्यात पुनरागमन करता आले नाही. मात्र, या धक्क्यातून सावरत अर्जेंटिनाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

फ्रान्स ०-१ सेनेगल (२००२)

दक्षिण कोरिया आणि जपानने संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या २००२च्या विश्वचषकात गतविजेत्या फ्रान्सच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, सलामीच्याच लढतीत फ्रान्सला स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या सेनेगलने ०-१ अशा फरकाने पराभूत केले होते. तारांकित मध्यरक्षक झिनेदिन झिदानविना खेळणाऱ्या फ्रान्ससाठी हा धक्का इतका मोठा ठरला की, त्यांना साखळी फेरीचाही अडथळा ओलांडता आला नाही. त्यांनी तीनपैकी दोन सामने गमावले आणि एक सामना बरोबरीत सुटला.

दक्षिण कोरिया २-१ इटली (२००२)

इटलीने १६व्या मिनिटालाच आघाडी घाऊन बाद फेरीच्या या सामन्यात विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. परंतु यजमान प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर दक्षिण कोरियाने जिद्दीने खेळ केला. ८८व्या मिनिटाला बरोबरी साधल्यामुळे त्यांचा हुरूप वाढला. १० खेळाडूंनिशी खेळणाऱ्या इटलीकडून चुका होऊ लागल्या. त्याचा फायदा उठवत सामना संपण्या काही सेकंद उरलेले असताना दक्षिण कोरियाने गोल करून एक अविस्मरणीय विजय नोंदवला. त्याच्या पुढील सामन्यात स्पेनवर पेनल्टी शुटआउटवर सरशी करून दक्षिण कोरिया उपान्त्य फेरीपर्यंत गेले.

विश्लेषण: ‘लिपस्टिक’, ‘अंडरवेअर’, ‘नेलपॉलिश’.. फॅशन नव्हे, आर्थिक मंदीचे निर्देशक; अर्थतज्ज्ञांनीही केलंय मान्य!

दक्षिण कोरिया २-० जर्मनी (२०१८)

रशिया येथे झालेला २०१८चा ‘फिफा’ विश्वचषक गतविजेत्या जर्मनीसाठी निराशाजनक ठरला होता. मेक्सिकोविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर जर्मनीने स्वीडनवर २-१ असा विजय मिळवला होता. बाद फेरी गाठण्यासाठी जर्मनीने अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण कोरियाला नमवणे गरजेचे होते. मात्र, ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत किम यंग-ग्वॉन आणि सॉन ह्युंग मिन यांनी गोल करत दक्षिण कोरियाला सामना २-० असा जिंकवून दिला. त्यामुळे १९३८नंतर प्रथमच जर्मनीचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.

अन्य काही धक्कादायक निकाल :

अमेरिका २-० मेक्सिको (२००२), अल्जीरिया २-१ पश्चिम जर्मनी (१९८२), पूर्व जर्मनी १-० पश्चिम जर्मनी (१९७४).

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa football worldcup 2022 saudi arabia beats argentina messi shocking results print exp pmw
First published on: 23-11-2022 at 14:00 IST