-ज्ञानेश भुरे

कतार विश्वचषक स्पर्धेला सनसनाटी सुरुवात झाली. संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या अर्जेंटिनाला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ठराविक अंतराने फुटबॉल विश्वातील दिग्गजांच्या पराभवाचा धक्का पचवत स्पर्धा अंतिम सामन्यापर्यंत आली. अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगला. सामन्याच्या नियोजित वेळेत ठराविक वेळेपर्यंत म्हणजे ८०व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिनाने सामना एकतर्फी केला होता. पण, ९७ सेकंदातील फ्रान्सच्या दोन गोलांनी सामना बरोबरीत आला. अतिरिक्त वेळेत पुन्हा अर्जेंटिनाची आघाडी आणि नंतर बरोबरी. यामुळे अर्जेंटिनाच्या एका वेळच्या एकतर्फी वर्चस्वानंतरही सामन्याने श्वास रोखून धरायला लावला. आजपर्यंतच्या विश्वचषक स्पर्धांतील सर्वांत रोमांचकारी सामना म्हणून हा गणला जाईल. नेमकी काय रोमांचकता या सामन्यात अनुभवयाला मिळाली, त्या विषयी….

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने

कतार २०२२ विश्वचषक स्पर्धेतील रोमांचकपणा कसा दिसून आला?

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची सुरुवात अर्जेंटिनाच्या पराभवाने जेवढी सनसनाटी झाली, तेवढाच स्पर्धेचा रोमांचक शेवट अर्जेंटिना आणि फ्रान्स संघांच्या साक्षीने झाला. एकीकडे युरोपियनांची प्राधान्याने डावपेचात्मक आणि दुसरीकडे दक्षिण अमेरिकनांची आक्रमक शैली असा हा सामना रंगला. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून अर्जेंटिनाने केलेली आक्रमणे आणि त्याला सुरुवातीस चाचपडत आणि नंतर निर्धाराने उत्तर देणारे फ्रान्सचे खेळाडू यामुळे सामना एकतर्फी वाटत असला, तरी ती वादळापूर्वीची शांतता होती अशी भीती खरी ठरली. सर्वांत महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे अर्जेंटिनाचा प्रत्येक खेळाडू हा जिंकण्याच्याच निर्धाराने खेळताना दिसत होता. फ्रान्सच्या खेळाडूंची देहबोली मात्र थकल्यासारखी वाटत होती. त्यांच्या खेळात स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून दिसणारा ताजेपणा कमी झाला होता. कदाचित त्यांच्या काही खेळाडूंना झालेल्या विषाणूजन्य आजाराचा हा परिणाम असावा. चेंडूचा ताबा मिळाला की छोटे छोटे पास करत त्यावर वर्चस्व मिळविणाऱ्या फ्रान्सला त्यातच अपयश येत होते. यानंतरही फ्रान्सच्या खेळाडूंनी सामन्याच्या अखेरच्या मिनिटापर्यंत टिकून राहण्याचा जो काही प्रयत्न केला तो संयम त्यांचे श्रेष्ठत्त्व दाखविणाराच होता. त्यामुळेच कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना हा अर्जेंटिनाच्या निर्विवाद वर्चस्वानंतरही आजपर्यंतचा सर्वांत रोमांचकारी सामना ठरला.

अर्जेंटिनाचे सामन्यावर पूर्ण वर्चस्व राहिले का?

कारकिर्दीतला अखेरचा सामना खेळणाऱ्या मेसीला विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करायचे होते, अर्जेंटिनाला आपला विश्वचषक विजेतेपदाचा दुष्काळ संपवायचा होता. मुख्य म्हणजे मेसीला विजयी भेट द्यायची होती. यामुळे अर्जेंटिनाचा प्रत्येक खेळाडू केवळ विजय आणि विजय या एकाच निर्धाराने खेळताना दिसत होता. सामन्याला सुरुवात झाल्यापासून त्यांनी खेळाची सूत्रे आपल्या हातात ठेवली होती. साखळी फेरीत पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाकडून हरल्यानंतर अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी जो काही खेळ केला त्याला तोड नव्हती. तसा खेळ अर्जेंटिनाने केला, तर त्यांना कोणी अडवू शकणार नव्हते याची ती साक्ष होती. झालेदेखील तसेच. किंबहुना त्यापेक्षा सरस खेळ अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी अंतिम सामन्यात केला. पहिल्या मिनिटापासून चेंडूचा ताबा, चेंडूवरील नियंत्रण आणि पासेस अशा सर्वच आघाड्यांवर अर्जेंटिनाचा खेळ सरस ठरत होता. चुंबकाने जसे लोखंडाला खेचून घ्यावे तसे अर्जेंटिनाच्या खेळाडूंचे पाय चेंडूला खेचून घेत होते. लांब पल्ल्याचे पास देण्याचे त्यांचे धाडस हे त्यांच्या अंगभूत शैलीचे अचूक प्रदर्शन करत होते. सामन्यातील नियोजित वेळ आणि अतिरिक्त वेळेतील उत्तरार्ध अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी फ्रान्स चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. 

अंतिम सामन्यात फ्रान्सचा खेळ कसा झाला?

अर्जेंटिना आपल्या दक्षिण अमेरिकन शैलीचा पाठपुरावा करत होते, तेथेच फ्रान्स युरोपियन शैलीची कास सोडायला तयार नव्हते. फ्रान्सच्या खेळाडूंच्या खेळात जोश नव्हता. कुठे तरी मरगळलेपणा दिसून येत होता. कदाचित यामुळेच फ्रान्सला पूर्वार्धातील निम्मा खेळ झाल्यापासून खेळाडूंमध्ये बदल करावा लागला. तरीही फ्रान्सच्या खेळाडूंनी संयम सोडला नव्हता. किलियन एम्बापे हा त्यांचा प्रमुख खेळाडू मैदानात अखेरपर्यंत टिकून होता. त्याच्या मनात काही वेगळेच चालू होते. एम्बापेच्या खेळातील धार कमी झाली होती. पण, त्याने आशा सोडली नव्हती. एका संधीची वाट तो बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसत होते. ती मिळाल्यावर एम्बापेने पेनल्टीवर पहिला गोल केला. या एका गोलने फ्रान्स खेळाडूंच्या देहबोलीत असा काही बदल केला की ८०व्या मिनिटापर्यंत सामन्यात कुठेच न दिसणारी फ्रान्सची ताकद अचानक उफाळून आली. ती इतक्या जोरात उसळली की पहिला गोल अर्जेंटिनाचे खेळाडू आणि चाहते विसरत नाही तो एम्बापेने दुसरा गोलही डागला होता. लक्षात घ्या या दोन गोलमधील अंतर फक्त ९७ सेकंदाचे होते. डोळ्याचे पाते लवते ना लवते तो…इकडचे जग तिकडे होते याचा अनुभव या प्रसंगाने घेतला. अनपेक्षित अशा गोल बरोबरीनंतर अर्जेंटिनाचे खेळाडू गांगरुन गेले आणि फ्रान्सने आक्रमणाची धार वाढवली. नियोजित वेळेनंतर अतिरिक्त वेळेतील पहिल्या सत्रापर्यंत फ्रान्सचे वर्चस्व निश्चित राहिले यात शंकाच नाही. 

सामन्याचा नेमका निर्णायक क्षण कोणता म्हणता येईल?

विश्वचषकाचा अंतिम सामना निश्चितपणे युरोप आणि दक्षिण अमेरिका या फुटबॉलमधील दोन महासत्तांमधील मैदानावरील वर्चस्वाची लढाई होती. हा सामना होता स्वप्नपूर्ती आणि साम्राज्यशाहीच्या ध्यासाचा. त्यामुळेच सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून याचा थरार पहायला मिळणार याची खात्री होती. अर्थात, अर्जेंटिनाने सुरुवातीपासून धडाधड आक्रमण करून आपले मनसुबे स्पष्ट केले होते. पहिल्या अर्ध्या तासातच दोन गोल करून आणि नंतर तेच वर्चस्व कायम राखून अर्जेंटिनाने सामना एकतर्फीच केला होता. मात्र, संधीची वाट पाहण्याचा फ्रान्सचा संयमही महत्त्वाचा होता. अर्जेंटिनाच्या ओटामेंडीकडून एक चूक झाली. त्याने मुसंडी मारणाऱ्या फ्रान्सच्या खेळाडूस गोलकक्षात पाडले. पंचांनी पेनल्टी दिली आणि या एका गोलने फ्रान्सचा आत्मविश्वास उंचावला. या गोलचा विसर पडत नाही तोच एम्बापेने केलेल्या दुसऱ्या गोलने सामना बरोबरीत आणला. सामना संपत आल्यामुळे एकीककडे अर्जेंटिनाचे चाहते विजयाच्या जल्लोषाची तयारी करत असतानाच अनपेक्षित सामना बरोबरीत आल्यामुळे सगळे आवाक् झाले. सामन्याला येथे कलाटणी मिळाली यात शंका नाही. पण, पुढे जाऊन अर्जेंटिनाला मेसीने मिडास टचचा अनुभव देत पुन्हा आघाडीवर नेले. पुन्हा अर्जेंटिनाच्या जल्लोषाला सुरुवात झाली. तेव्हा सामन्याचे फासे पु्न्हा पालटले. एम्बापेची एक किक गोलकक्षाच्या जवळ अर्जेंटिना खेळाडूच्या हाताला लागली आणि पंचांनी पेनल्टी दिली. एम्बापेने ही संधीदेखील साधली. सामना पुन्हा बरोबरीत आला. हा सामन्यातील दुसरा निर्णायक क्षण. त्यानंतर शूट-आऊट मध्ये अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझने राखलेली एकाग्रता आणि ऐन वेळी फ्रान्सच्या युवा खेळाडूंनी घेतलेले दडपण अंतिम सामन्यातील खरे निर्णायक क्षण ठरले. 

अर्जेंटिनासाठी डी मारियाचा समावेश किती महत्त्वपूर्ण ठरला?

गेले एक दशक म्हटले तरी चालेल, मेसीप्रमाणे डी मारिया अर्जेंटिनासाठी तारणहार ठरत होता. मधल्या कालावधीत सर्गिओ अॅग्युएरो आणि हिग्युएनची साथ मेसीला मिळत होती. पण, मैदानात मेसीला डी मारियाकडून जी साथ मिळत होती, त्याला तोड नव्हती. डाव्या बगलेतून चेंडू घेऊन सुसाट सुटणारा मारिया पुढे मेसीसाठी गोल करण्याची संधी निर्माण करायचा. चेंडूंचे ड्रिबलिंग त्याचा लौकिक सिद्ध करणारे असते. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत अर्जेंटिनाचे प्रशिक्षक स्कलोनींनी मारियाला खेळवले नाही. प्रशिक्षकांचे नियोजन काय होते ते माहीत नाही. त्यांनी अंतिम फेरीत डी मारिया हे अस्त्र बाहेर काढले आणि त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. आपल्या सफाईदार खेळाने त्याने फ्रान्सच्या बचावपटूस चकवा देत गोलपोस्टमध्ये मुसंडी मारली. त्याला आव्हान देताना फ्रान्सच्या खेळाडूकडून चूक झाली आणि पंचांनी पेनल्टी दिली. त्यानंतर मेसीने सुरू केलेली चाल मॅक अॅलिस्टरने तेवढ्याच क्षमतेने पुढे नेली. त्यांची मुसंडी अशी काही होती की तोदेखील गोल करू शकत होता. त्या वेळी फ्रान्सचे बचावपटू आणि गोलरक्षक त्याच्याकडे लक्ष देऊन होते. हे त्यानेही हेरले आणि डावीकडे डी मारियाकडे चेंडू दिला. डी मारियाने चेंडूला गोलजाळीची दिशा देत गोल करत अर्जेंटिनाची आघाडी वाढवली. त्यानंतर त्याला बदलेपर्यंत डी मारियाने आपल्या खेळाने निश्चितपणे फ्रान्सच्या खेळाडूंमध्ये धडकी भरवली होती. 

फ्रान्सचे खेळाडूंच्या खेळावर कशामुळे मर्यादा पडल्या?

महत्त्वाच्या सामन्यापूर्वी फ्रान्स संघ आजारी झाला. उपांत्य फेरीत फ्रान्सला तीन प्रमुख खेळाडूंसह खेळावे लागले, तर अंतिम सामन्यापूर्वी दोन खेळाडू विषाणू संसर्गाने आजारी झाले. रॅबिओ, कोनाटे, उपमेकानो, कोमन हे खेळाडू कॅमल फ्लूने आजारी पडले. त्यांना विलगीकरणात राहावे लागल्याने सरावही करता आला नाही. या सगळ्याचा निश्चितपणे फ्रान्सच्या शारीरिक क्षमतेवर आणि मनोबलावर परिणाम झाला.