FIFA World Cup 2022 does depending on neymar cost brazil in pre quarter final against croatia print exp scsg 91 | Loksatta

विश्लेषण: केवळ नेयमारवर अवलंबून राहणे ब्राझीलला महागात पडले? पराभवामागे काय होती कारणे?

नेयमारची विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना केली जाते. त्यामुळे ब्राझीलचा संघ त्याच्यावर अवलंबून असणार हे साहजिकच

विश्लेषण: केवळ नेयमारवर अवलंबून राहणे ब्राझीलला महागात पडले? पराभवामागे काय होती कारणे?
यंदा संभाव्य विजेत्यांच्या यादीत ब्राझीलचे नाव आघाडीवर होते. (फोटो रॉयटर्सवरुन साभार)

-अन्वय सावंत

पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझील फुटबॉल संघाचे दोन दशकांच्या कालावधीनंतर पुन्हा विश्वचषकावर नाव कोरण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. तारांकित खेळाडूंची भरणा असलेल्या ब्राझीलच्या संघाला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाकडून पराभव पत्करावा लागला. विश्वचषकात पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवण्याची प्रथा कायम ठेवताना क्रोएशियाने ब्राझीलवर ४-२ अशी मात केली. त्यामुळे ब्राझीलचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. यंदा संभाव्य विजेत्यांच्या यादीत ब्राझीलचे नाव आघाडीवर होते. त्यांनी साखळी फेरी आणि उपउपांत्यपूर्व फेरीत लौकिकाला साजेशी कामगिरीही केली. मात्र, शिस्तबद्ध आणि प्रशिक्षकांनी आखून दिलेल्या योजनेची अचूक अंमलबजावणी करत खेळ करणाऱ्या क्रोएशियाला नमवण्यात ब्राझीलचा संघ अपयशी ठरला.

क्रोएशियाविरुद्ध ब्राझीलचे पारडे का जड मानले जात होते?

क्रोएशियाच्या संघाने गत विश्वचषकाचे उपविजेतेपद मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत त्यांनी मिळवलेल्या यशाचे तसे आश्चर्य वाटायला नको. मात्र, क्रोएशियाच्या संघाला आपली सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. त्यांचा कर्णधार व तारांकित आघाडीपटू लुका मॉड्रिचलाही अपेक्षित प्रभाव पाडता आलेला नाही. साखळी फेरीत क्रोएशियाला मोरोक्को आणि बेल्जियमविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले होते, तर त्यांनी तुलनेने दुबळ्या कॅनडावर मात केली होती. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत जपानला नमवण्यासाठीही क्रोएशियाला पेनल्टी शूटआऊटपर्यंत वाट पाहावी लागली होती. तर दुसरीकडे ब्राझीलच्या संघाने साखळी फेरीचा अडथळा सहज पार केल्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियावर ४-१ असा मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. ब्राझीलने चार सामन्यांत मिळून आठ गोल केले होते आणि प्रतिस्पर्ध्यांना केवळ एक गोल दिला होता. तसेच त्यांचे सर्वच खेळाडू लयीत होते. त्यामुळे या सामन्यात ब्राझीलचे पारडे जड मानले जात होते.

नियमित आणि अतिरिक्त वेळेतील खेळ कसा झाला?

उपांत्यपूर्व फेरीचा सामना असल्याने दोन्ही संघ झुंजार खेळ करणे अपेक्षित होते आणि तसेच झाले. आक्रमण ही ब्राझीलची ताकद आहे, तर भक्कम बचाव ही क्रोएशियाची. दोन्ही संघांनी आपल्या ताकदींनुसारच खेळ केला. क्रोएशियाने बचावावर आणि प्रतिआक्रमण करण्यावर भर दिला, तर ब्राझीलने चेंडूवर दीर्घकाळ नियंत्रण ठेवताना आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. ब्राझीलच्या खेळाडूंचा कलात्मक खेळ या सामन्यातही दिसून आला. मात्र, क्रोएशियाने शिस्तबद्ध केला. चार बचावपटू आणि तीन मध्यरक्षक अशी संघाची रचना असली, तरी सर्वांनी मिळून ब्राझीलच्या आक्रमणाला रोखण्याचे प्रयत्न केले. यात त्यांना यशही आले. तसेच गोलरक्षक लिव्हाकोव्हिचनेही ब्राझीलचे प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे ९० मिनिटांच्या नियमित वेळेअंती सामन्यात गोलशून्य बरोबरी होती. त्यानंतर ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतील पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत तारांकित आघाडीपटू नेयमारने गोल करत ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. मात्र, सामना संपण्यास तीन मिनिटे शिल्लक असताना ब्रुनो पेटकोव्हिचने क्रोएशियाला १-१ अशी बरोबरी करून दिली. त्यानंतर बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये काय घडले?

विश्वचषक, पेनल्टी शूटआऊट आणि क्रोएशिया हे आता एक समीकरणच बनले आहे. ब्राझीलविरुद्धच्या सामन्यापूर्वी क्रोएशियाने विश्वचषक स्पर्धांमध्ये सर्व तीन पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला होता. त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीतही जपानला पेनल्टी शूटआऊटमध्येच ३-१ असे नमवले होते. क्रोएशियाचा गोलरक्षक डॉमिनिक लिव्हाकोव्हिचने तीन पेनल्टी अडवल्या होत्या. त्यामुळे ब्राझीलला पेनल्टी शूटआऊट जिंकणे आव्हानात्मक ठरणार हे अपेक्षितच होते. क्रोएशियाकडून पहिली पेनल्टी निकोला व्हासिचने यशस्वीरित्या मारली. ब्राझीलकडून रॉड्रिगोने मारलेली पहिली पेनल्टी लिव्हाकोव्हिचने अडवली. यानंतर क्रोएशियाकडून लोव्हरो मायेर, कर्णधार मॉड्रिच आणि मिस्लाव्ह ओरसिच यांनाही पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतरण करण्यात यश आले. ब्राझीलचे कॅसेमिरो आणि पेड्रो हे चेंडू गोलजाळ्यात मारण्यात यशस्वी ठरले. मात्र, अनुभवी मार्क्विनयॉसने मारलेला फटका गोलपोस्टला लागला आणि ब्राझीलचा पराभव झाला.

केवळ नेयमारवर अवलंबून राहणे पडले महागात?

नेयमारची विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना केली जाते. त्यामुळे ब्राझीलचा संघ त्याच्यावर अवलंबून असणार हे साहजिकच आहे. मात्र, केवळ त्याच्याकडे चेंडू देत राहणे आणि तो गोलची संधी निर्माण करेल अशी सतत अपेक्षा करणे, हे ब्राझीलला महागात पडले. आपला पहिलाच विश्वचषक खेळणारे व्हिनिशियस, रिचार्लिसन आणि राफिन्या यांसारखे ब्राझीलचे खेळाडू बाद फेरीत दडपणाखाली दिसले. नेयमारने आपला कलात्मक आणि जादूई खेळ दाखवताना अतिरिक्त वेळेत गोल केला. चेंडू घेऊन तो क्रोएशियाच्या बचावपटूंच्या दिशेने धावला. त्यानंतर त्याने लुकास पाकेटाकडे चेंडू दिला आणि मग पाकेटाने क्रोएशियाच्या बचावाला भेदणारा अप्रतिम पास नेयमारकडे दिला. मग नेयमारने क्रोएशियाचा गोलरक्षक लिव्हाकोव्हिचला चकवत आपल्या उजव्या बाजूने उत्कृष्ट गोल केला. यासह नेयमारने ब्राझीलकडून सर्वाधिक गोलच्या पेलेंच्या विक्रमाशी बरोबरीही केली. मात्र, त्याने या सामन्यादरम्यान काही संधी दवडल्या. याचा अखेरीस ब्राझीलला फटका बसला.

प्रशिक्षक टिटे यांच्याकडूनही चुका?

प्रशिक्षक टिटे यांनी साखळी फेरीत ब्राझीलच्या संघातील सर्वच खेळाडूंना सामने खेळण्याची संधी दिली होती. मात्र, आपल्या सर्वोत्तम अंतिम ११मध्ये कोणते खेळाडू असणार याची त्यांना कल्पना होती. त्यांनी क्रोएशियाविरुद्ध सुरुवातीला अपेक्षित संघ खेळवला. मात्र, उत्तरार्धात त्यांनी काही चकित करणारे निर्णय घेतले. त्यांनी ५६व्या मिनिटाला राफिन्याच्या जागी ॲन्टोनी आणि ६४व्या मिनिटाला व्हिनिशियसच्या जागी रॉड्रिगोला मैदानावर उतरवले. परंतु बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या दोघांनाही प्रभाव पाडता आला नाही. तसेच ब्रुनो गमेरेशसारख्या आक्रमक मध्यरक्षकाचा पर्याय असतानाही अतिरिक्त वेळेत टिटे यांनी पाकेटाच्या जागी बचावात्मक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या फ्रेडला मैदानावर पाठवले. फ्रेड चांगली कामगिरी करू शकला नाही. ब्राझीलने हा सामना गमावल्यानंतर टिटे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारताना प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 14:29 IST
Next Story
विश्लेषण : सुपर हिरोजपेक्षा ‘अवतार’ का ठरतो सरस? जेम्स कॅमेरुन यांचा ‘मॅजिकल टच’ कसा ठरतो यशाचा हिट फॉर्म्युला?