पुढील वर्षी ११ जून ते १९ जुलैदरम्यान ही स्पर्धा अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे तीन देश संयुक्तपणे आयोजित करत आहेत. या स्पर्धेच्या ९६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच तीन देशांकडे सहयजमानपद आले आहे. तर २००२ मधील जपान/कोरिया स्पर्धेनंतर एकापेक्षा अधिक देश यजमान असतील. या स्पर्धेत ३२ ऐवजी ४८ संघ खेळतील, जोदेखील एक विक्रम ठरतो. वाढीव स्वरूपामुळे ६४ ऐवजी १०४ सामने खेळवले जातील. मेक्सिकोने १९७० आणि १९८६मध्ये स्वतंत्रपणे ही स्पर्धा भरवली होती. तिसऱ्यांदा यजमानपद किंवा सहयजमानपद मिळालेला हा एकमेव देश. अमेरिकेने १९९४मध्ये ही स्पर्धा भरवली होती, तर कॅनडाला प्रथमच यजमानपदाची संधी मिळाली. एकूण १६ शहरांत सामने होतील, ज्यात अमेरिकेच्या ११ शहरांचा, मेक्सिकोच्या तीन आणि कॅनडाच्या दोन शहरांचा समावेश आहे.

स्पर्धेचे स्वरूप काय राहील?

गेल्या काही वर्षांत स्पर्धेतील सहभागी देशांच्या संख्येत भर पडत आहे. फ्रान्स १९९८ मध्ये प्रथमच १६ वरून ३२ संघांचा समावेश झाला. हे ३२ संघ आठ गटांत विभागले जायचे. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ दुसऱ्या फेरीत (राउंड ऑफ सिक्स्टीन) जायचे. या फेरीनंतर उपान्त्यपूर्व फेरी (८ संघ), उपान्त्य फेरी (४ संघ), अंतिम फेरी (२ संघ) अशा रीतीने स्पर्धा पुढे सरकायची. या वेळी मात्र ४८ संघ असल्यामुळे काही बदल होतील. प्रत्येकी चार संघांचे एकूण १२ गट असतील. प्रत्येक गटातील पहिल्या दोन क्रमांकावरील संघ दुसऱ्या फेरीत सरकतील. याशिवाय आठ गटांतील सर्वोत्तम तिसऱ्या स्थानावरील संघही पुढील फेरीत जातील. त्यामुळे २४ अधिक ८ अशा ३२ संघांची नवीन फेरी (राउंड ऑफ थर्टीटू) खेळवली जाईल. पुढे मग राउंड ऑफ सिक्स्टीन, उपान्त्यपूर्व फेरी, उपान्त्य फेरी, अंतिम फेरी असा प्रवास होईल.

आधी कोणती पद्धती ठरली होती?

सुधारित प्रारूपापूर्वी ४८ संघांची प्रत्येकी तीन संघांच्या १६ गटांत विभागणी करण्याचे ठरले होते. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ पुढील फेरीत (राउंड ऑफ थर्टी टू) जाणार होते. पण यात एक अडचण होती. तीनपैकी दोन संघ शेवटचा साखळी सामना खेळले असते आणि त्यांना गरजेनुसार खेळ करता येणार होता. असे सामने पूर्वनियोजित (फिक्स्ड) ठरण्याचा धोका कसा असतो, हे यापूर्वी १९८२ मधील स्पेन विश्वचषक स्पर्धेत दिसून आले होते. त्या वेळी (पश्चिम) जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांनी ठरवून १-० असा निकाल लागेल या पद्धतीने खेळ केला आणि अल्जीरियाला स्पर्धेबाहेर बाहेर काढले. तो सामना आजही विश्वचषकाच्या इतिहासात ‘डिसग्रेस ऑफ गिजॉन’ म्हणून बदनाम आहे. त्यामुळे या पद्धतीवर फुली मारण्यात आली.

यंदा किती संघांचे पदार्पण?

काही चिमुकल्या देशांच्या पदार्पणामुळे ही स्पर्धा सुरू होण्याआधीपासूनच गाजू लागली आहे. यंदा कुरासाओ, केप व्हर्डी, जॉर्डन आणि उझबेकीस्तान या देशांचे विश्वचषक पदार्पण असेल. अजून आंतरखंडीय पात्रता फेऱ्यांमधून ४८पैकी शेवटच्या सहा जागा भरायच्या आहेत. यांतून कॅलेडोनिया आणि सुरीनाम या देशांनाही विश्वचषक स्पर्धेत पदार्पणाची संधी आहे. कुरासाओ हा कॅरिबियम बेटांमधील देश विश्वचषक खेळण्याची संधी मिळालेला सर्वांत लहान देश ठरतो. कुरासाओची लोकसंख्या अवघी दीड लाख आहे. केप व्हर्डी हा सहा लाखांचा देश आहे. याशिवाय सुरीनाम आणि कॅलेडोनिया हे देशही पात्र ठरल्यास, या स्पर्धेतील नवोदितांची संख्या सहा होईल. यापूर्वी २००६मध्ये सहा नवोदित संघ खेळले होते.

‘ग्रुप ऑफ डेथ’चा अभाव?

यापूर्वी २४ आणि ३२ संघ असताना एखाद्या गटात दोनपेक्षा अधिक मातबर संघ यायचे आणि विलक्षण चुरस निर्माण व्हायची. या गटाला ‘ग्रुप ऑफ डेथ’ असे प्रचलित बिरूद चिकटायचेच. या स्पर्धेत मात्र १२ गटांमध्ये बडे संघ विभागले जाणार आहेत. जवळपास कोणत्याच गटात तीन मातबर संघ नाहीत. त्यामुळे चुरस फारशी नसेल, अशी चर्चा आहे. तशात स्पर्धेचा कालावधी प्रदीर्घ असल्यामुळे ती कंटाळवाणी ठरू शकते, अशी भीती विश्लेषक व्यक्त करू लागले आहेत. वाढीव संख्येमुळे प्रत्येक खंडातून अधिक संघ सहभागी होतात. त्यामुळे दर्जात घसरण झाल्याचीही चर्चा आहे.