फुटबॉलची सर्वोच्च संघटना ‘फिफा’ने यंदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा विस्तार करत त्यात ४८ संघांना सहभागी करून घेतले. या विस्ताराला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फान्टिनो यांनी २०३० मधील स्पर्धा आणखी विस्तारित करून ६४ संघांची करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत आणखी एक मोठा आणि नाट्यमय बदल पाहायला मिळू शकतो. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे सुरू असलेली स्पर्धा संपण्यापूर्वीच ही नवी घडामोड समोर आली आहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यास, हा स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार ठरेल आणि जागतिक फुटबॉलचे चित्र लक्षणीयरीत्या बदलू शकते.
६४ संघांच्या विश्वचषकाची चर्चा का?
विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक फुटबॉल खेळणाऱ्या देशाला पात्रता मिळवण्याची आणि खेळाच्या या सर्वोच्च मंचावर स्पर्धा करण्याची संधी मिळावी, हा या प्रस्तावामागील मुख्य विचार आहे. या विश्वचषक स्पर्धेनंतर संबंधित समित्यांमध्ये या मुद्द्यावर निश्चितपणे चर्चा होईल. “जेव्हा तुम्ही विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करता, तेव्हा ती संपूर्ण जगासाठी असणे महत्त्वाचे असते. ती केवळ युरोप आणि दक्षिण अमेरिकेपुरती मर्यादित न राहता जगातील प्रत्येक देशाला विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न पाहता आले पाहिजे,” असे जियानी इन्फान्टिनो यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, संधींचा विस्तार केल्यास जगभरातील फुटबॉलचा दर्जा उंचावू शकतो. लहान देशांच्या संघांचाही दर्जा सुधारला असून जागतिक स्तरावर खेळाची गुणवत्ता वाढत आहे. अशा वेळी या संघांना सहभागाची संधी दिली नाही, तर त्यांना आणखी प्रगती करण्याचे प्रोत्साहनही मिळणार नाही.
६४ संघांचा प्रस्ताव कसा?
विश्वचषक स्पर्धेच्या विस्ताराला सर्वप्रथम मार्च २०२५मध्ये गती मिळाली. त्यावेळी दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघाने (कॉन्मेबॉल) २०३० ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धा ६४ संघांची करण्याचा प्रस्ताव मांडला. २०३० मधील स्पर्धा ही विश्वचषकाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केली जाणार आहे. ‘फिफा’ने अद्याप या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नसली, तरी इन्फान्टिनो यांच्या ताज्या वक्तव्यावरून सध्या सुरू असलेली २०२६ विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर या कल्पनेवर अधिकृतपणे चर्चा होण्याची शक्यता स्पष्ट होते. याची वेळही महत्त्वाची आहे, कारण हीच स्पर्धा यंदा प्रथमच ३२ ऐवजी ४८ संघांसह खेळवली जात आहे.
या विस्तारानंतर काय बदलेल?
विश्वचषक स्पर्धेचा आणखी विस्तार करून ६४ संघांचा सहभाग निश्चित झाल्यास स्पर्धेचा आकार मोठ्या प्रमाणात वाढेल. १९९८ ते २०२२ या कालावधीत ३२ संघांच्या स्वरूपात एकूण ६४ सामने खेळवले जात होते. त्यानंतर २०२६ मधील ४८ संघांच्या विस्तारित स्पर्धेत १०४ सामने खेळवले जात आहेत. आता ६४ संघांच्या संभाव्य विस्तारामुळे ही संख्या थेट १२८ सामन्यांपर्यंत पोहोचू शकते. ही संख्या ३२ संघांच्या जुन्या स्वरूपातील सामन्यांच्या तुलनेत दुप्पट असेल. अशा विस्तारामुळे नवोदित फुटबॉल राष्ट्रांसाठी पात्रतेच्या अधिक संधी उपलब्ध होतील. मात्र, त्याचवेळी सामन्यांचे वेळापत्रक, खेळाडूंवरील अतिरिक्त ताण, प्रसारण करार आणि स्पर्धेची एकूणच चुरस यांबाबत प्रश्नही उपस्थित होऊ शकतात.
फुटबॉल जगतात फूट?
जागतिक फुटबॉलमधील सर्वच जण या विस्ताराच्या बाजूने नाहीत. युरोपियन फुटबॉल महासंघाचे (युएफा) अध्यक्ष ॲलेक्झांडर सेफेरिन आणि मध्य व उत्तर अमेरिका महासंघाचे (कॉन्काकॅफ) अध्यक्ष व्हिक्टर मोंटाग्लियानी यांनी यापूर्वीच या प्रस्तावाबाबत शंका व्यक्त केली होती. “पुरुषांचा विश्वचषक ६४ संघांपर्यंत वाढवणे हे स्पर्धेसाठी आणि राष्ट्रीय संघ, क्लब स्पर्धा, देशांतर्गत लीग तसेच खेळाडू अशा संपूर्ण फुटबॉल परिसंस्थेसाठी योग्य पाऊल ठरणार नाही. इतक्या मोठ्या विस्ताराची ही कल्पना अयोग्य आहे,” असे त्यांचे मत आहे. त्यांच्या मते, मोठ्या स्पर्धेमुळे खेळाडूंवर, देशांतर्गत लीगवर आणि आधीच व्यग्र असलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या वेळापत्रकावर अतिरिक्त ताण पडू शकतो. त्याचबरोबर पात्रता फेरीचे महत्त्वही कमी होऊ शकते, असा एक मतप्रवाह पुढे येत आहे.
पुढे काय होणार?
‘फिफा’ने विश्वचषक स्पर्धा ६४ संघांपर्यंत वाढवण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. सध्या केवळ प्रस्ताव समोर आला आहे. सुरू असलेल्या स्पर्धेनंतर ‘फिफा’च्या संबंधित समित्यांकडून या प्रस्तावाची सखोल तपासणी केली जाईल. कोणत्याही संभाव्य विस्ताराची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्याला अधिकृत मंजुरी आवश्यक असेल. ‘फिफा’ने हा प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यास, २०३० चा विश्वचषक हा या बदलासाठी सर्वाधिक संभाव्य टप्पा ठरू शकतो.
