आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) यंदाच्या विश्वचषक स्पर्धेपासून पुरुष आणि महिला दोन्ही गटांतील उपांत्यपूर्व फेरीची पद्धत रद्द केली आहे. त्याऐवजी दोन टप्प्यांच्या गटपद्धतीची सुरुवात करण्यात आली आहे. या बदलामुळे प्रत्येक सामन्याचे महत्त्व वाढणार असून, कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे. ही नवी दोन टप्प्यांची पद्धत किती आव्हानात्मक ठरणार आणि भारतीय संघांना जेतेपदाची कितपत संधी असणार याचा आढावा.

हॉकी महासंघाने नेमका काय बदल केला?

हॉकी विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सहभागी संघांना चार गटांत विभागले जात होते. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघांना बाद फेरी म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळत असे. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम लढती होत असत. मात्र, या वर्षीपासून उपांत्यपूर्व फेरीची पद्धत हद्दपार करून ‘क्रॉसओव्हर पूल’ हा दुसरा टप्पा तयार करण्यात आला आहे. स्पर्धेतील १६ संघांना चार गटांत (ए, बी, सी आणि डी) विभागण्यात येईल. प्रत्येक संघ तीन सामने खेळेल. त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ क्रॉसओव्हर पूलसाठी पात्र ठरतील. यात ‘ए’ आणि ‘डी’ गटातील संघांचा ‘ई’ गट, तर ‘बी’ आणि ‘सी’ गटातील संघांचा ‘एफ’ गट तयार होईल. या टप्प्यात संघ दुसऱ्या गटातून आलेल्या संघांविरुद्ध सामने खेळतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिल्या टप्प्यात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेले संघ मात्र थेट स्पर्धेतून बाद होणार नाहीत. ते नवव्या ते १६व्या स्थानासाठी ‘पूल जी’ आणि ‘पूल एच’मध्ये वर्गीकरणाचे सामने खेळतील.

सातत्यपूर्ण कामगिरीचे महत्त्व वाढणार?

पहिल्या टप्प्यात एकत्र खेळलेल्या आणि दुसऱ्या टप्प्यातही एकत्रित प्रगती करणाऱ्या दोन संघांमधील सामन्याचा निकाल, म्हणजेच गुण आणि गोलसंख्या, दुसऱ्या टप्प्यात जसाच्या तसा ग्राह्य धरला जाईल. म्हणजेच, पहिल्या टप्प्यातील विजयाचे तीन गुण थेट दुसऱ्या टप्प्याच्या गुणतालिकेत जोडले जातील. त्यामुळे एका खराब सामन्यामुळे किंवा खराब दिवसामुळे एखादा बलाढ्य संघ थेट स्पर्धेतून बाहेर पडणार नाही. संपूर्ण स्पर्धेत सातत्य राखणाऱ्या संघालाच पुढे जाण्याची संधी मिळेल. या नव्या पद्धतीमुळे प्रत्येक संघ उपांत्य फेरीपूर्वी किमान सहा सामने खेळेल. त्यामुळे खेळाडूंना आणि चाहत्यांना अधिक हॉकी पाहायला मिळणार आहे.

या पद्धतीची आव्हानात्मक बाजू काय?

पहिल्याच सामन्यापासून प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असेल. पहिल्या टप्प्यात कट्टर प्रतिस्पर्ध्याकडून झालेला पराभव थेट दुसऱ्या टप्प्यातील गुणतालिकेवर परिणाम करेल. त्यामुळे चुकीला वाव राहणार नाही. ही पद्धत जागतिक क्रमवारीत वरच्या स्थानावर असलेल्या बलाढ्य संघांसाठी फायदेशीर ठरू शकते, कारण साखळी सामन्यांमध्ये तुलनेने कमकुवत संघांना उलटफेर करण्याची संधी बाद फेरीच्या तुलनेत कमी मिळू शकते. अनेक तज्ज्ञ आणि प्रशिक्षकांच्या मते, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये असणारा ‘नॉकआउट थरार’ या साखळी पद्धतीमुळे काहीसा कमी होईल, ही या पद्धतीची नकारात्मक बाजू म्हणता येईल. पहिल्या सामन्यापासून लय पकडणे आणि सर्वोत्तम खेळ करणे हेच या नव्या स्वरूपातील संघांसमोरील सर्वांत मोठे आव्हान असेल.

भारतीय संघांसाठी कसे समीकरण असेल?

विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला इंग्लंड, पाकिस्तान आणि वेल्स यांच्यासह ‘डी’ गटात स्थान मिळाले आहे. महिला संघही ‘डी’ गटात असून, त्यांच्यासमोर चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. नव्या पद्धतीचा अभ्यास केला, तर भारताला पहिल्या सामन्यापासून आपल्या खेळात कमालीचे सातत्य आणि अचूकता दाखवावी लागणार आहे. एखादा पराभवही पुढील प्रवासावर परिणाम करणारा ठरणार आहे.

भारतीय संघांना संधी कितपत?

भारतीय पुरुष संघाने २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंगचे अप्रतिम ड्रॅग-फ्लिकिंग आणि हार्दिक सिंह, मनप्रीत सिंह यांसारखे अनुभवी मध्यरक्षक संघात असल्यामुळे भारत कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता राखून आहे. मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांच्या ‘दबाव, आक्रमण आणि सातत्यपूर्ण कामगिरी’ या रणनीतीमुळे भारतीय पुरुष संघाला थेट उपांत्य फेरीत जाण्याची मोठी संधी आहे.

महिला संघात कर्णधार सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली तरुण आणि वेगवान खेळ करू शकणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. चीन आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून गटातील अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवणे भारतासाठी शक्य आहे. मात्र, कामगिरीतील सातत्याचा अभाव ही भारतीय महिला संघांसाठी चिंतेची बाब ठरू शकते. यंदाची विश्वचषक स्पर्धा १५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे संयुक्तपणे रंगणार आहे.

dnyanesh.bhure@expressindia.com