भारतात लवकरच हायड्रोजन रेल्वे धावणार आहे. भारतातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ जुलै रोजी उद्घाटन करणार आहे. हरयाणातील जींद येथे या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली जाणार आहे. भारतीय रेल्वेने हरित तंत्रज्ञानात (ग्रीन टेक्नॉलॉजी) गाठलेला हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या तंत्रज्ञानाचा वापर खूपच कमी देशांमध्ये केला जातो.
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही रेल्वे जगातील सर्वात लांब (आठ पॅसेंजर कार्स आणि दोन ड्रायव्हिंग पॉवर कार्स) आणि सर्वात शक्तिशाली (२४०० किलोवॅट) ‘हायड्रोजन ट्रेनसेट्स’ रेल्वेंपैकी एक आहे. या रेल्वेला आठ डबे तर दोन इंजिन असणार आहेत.
भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे जींद ते सोनीपत दरम्यान धावणार आहे. या रेल्वेचा सर्वाधिक वेग ७५ किमी प्रति तास इतका असणार आहे. तसेच किमान ६८२ प्रवासी या रेल्वेतून प्रवास करू शकतील. एका दिवसात या रेल्वेच्या दोन वेळा राउंड ट्रिप्स होणार आहेत. एकूण ३५६ किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे करेल. तर त्यासाठी ३०० किलो हायड्रोजनचा वापर केला जाणार आहे.
हायड्रोजन अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. हायड्रोजनचा वापर करताना अत्यंत उच्च दाबाने वाहतूक करावी लागते. हायड्रोजनचा वापर रेल्वेत कसा केला जातो, हायड्रोजनवरील रेल्वे कशा धावतात, याबाबत जाणून घेऊ.
जगात कोणत्या देशांकडे हायड्रोजन रेल्वे?
बर्लिन येथे झालेल्या प्रदर्शनात हायड्रोजनवर चालणारी रेल्वे पहिल्यांदा फ्रान्समधील ‘अलस्टोम’ (Alstom) या कंपनीने २०१६ मध्ये सादर केली होती. अलस्टोम ही फ्रान्समधील रेल्वे व रेल्वेशी संबंधित उत्पादन करणारी अग्रेसर कंपनी आहे. या प्रदर्शनाच्या दोन वर्षांनंतर या कंपनीने जर्मनीत दोन डब्यांची हायड्रोजन रेल्वे लाँच केली होती. तिचे नाव ‘कोराडिया आयलिंट’ (Coradia iLint) असे होते. ही रेल्वे हायड्रोजन इंधनावर धावणारी जगातील पहिली प्रवासी रेल्वे ठरली.

जर्मनीनंतर, जपान, चीन आणि अमेरिका या देशांनीही त्यांची स्वत:ची हायड्रोजनवर धावणारी रेल्वे लाँच केली. मोठ्या प्रमाणात प्रवाशांना प्रवास करता यावा तसेच माल वाहून नेता यावा यासाठी या तंत्रज्ञानात सातत्याने विकास होत आहे. त्यामुळे सध्या जगात खूपच थोड्या देशांकडे हायड्रोजनवर धावणारी रेल्वे आहे. तसेच ज्या देशांत ही रेल्वे धावते ती खूपच कमी अंतरादरम्यान धावते.
हायड्रोजन रेल्वे नेमकं कशी धावते? त्यातील तंत्रज्ञान नेमकं काय आहे?
सामान्य इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनला धावण्यासाठी लागणारी वीज ओव्हरहेड (रूळाच्या वरती असलेल्या तारा) तारांमधून मिळते. हायड्रोजन रेल्वेला याची गरज नसते. या रेल्वे हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र करून ‘ट्रॅक्टिव्ह’ वीज निर्माण करण्याच्या सुत्रावर धावतात. भारतात धावणाऱ्या हायड्रोजन रेल्वेमध्ये दोन इंजिन असतील. त्यांमध्ये प्रत्येकी चार इंटीग्रेटेड पॉवर पॅकचे चार संच असतील. या पॅकमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल्स (इंधन घट) आणि लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरीचा समावेश असेल.
हायड्रोजन फ्यूएल सेल रेल्वेमध्ये उच्च दाबावर साठवलेला हायड्रोजन (४४० किलो) आणि बाहेरील हवेतील ऑक्सिजन शोषून घेईल, आणि नंतर विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी ते एकत्र करेल.

एक पॉवर पॅक ३०० किलोवॅट विद्युत ऊर्जा निर्माण करेल. या ३०० किलोवॅट विद्युत ऊर्जेपैकी ११५ किलोवॅट फ्यूएल सेलकडून आणि १८५ किलोवॅट ऊर्जा लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरीकडून मिळेल. असे एका इंजिनमधील चार पॉवर पॅक एकूण १२०० किलोवॅट शक्ती प्रदान करतील.
ट्रेनमध्ये दोन पॉवर कार (दोन इंजिन) असल्याने, निर्माण होणारी एकूण शक्ती दुप्पट होऊन २४०० किलोवॅट (३२०० हॉर्सपॉवर) होईल. ही शक्ती अशाच प्रकारे कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या सामान्य ‘इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट’ (EMU) किंवा ‘डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट’ (DEMU) रेल्वेद्वारे निर्माण होणाऱ्या शक्तीसारखीच आहे.
उत्तर रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही ट्रेन मूळची जुन्या ‘डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट’ रेक्समधील डिझेल इंजिन काढून त्या जागी शून्य-उत्सर्जन (zero-emission) हायड्रोजन-इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टम बसवून तयार करण्यात आली आहे.
अधिकाऱ्याने हायड्रोजन सेल आणि बॅटरीच्या पॉवर पॅकच्या कार्यपद्धतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “फ्यूएल सेल स्थिर (constant) पॉवर आउटपुट देते, म्हणजेच रेल्वेच्या बदलत्या पॉवरच्या गरजेनुसार त्यात चढ-उतार होत नाही. जेव्हा रेल्वे सुरू होते, तेव्हा ती सुरुवातीला फ्यूएल सेलकडून पॉवर घेते. या टप्प्यावर रेल्वेची पॉवरची गरज कमी असल्याने, फ्यूएल सेलची उर्वरित जादा वीज रेल्वेमधील बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरली जाते. जसा रेल्वेचा वेग वाढतो आणि तिची पॉवरची गरज वाढते, तशी बॅटरी फ्यूएल सेलच्या सोबतीने अतिरिक्त पॉवर देण्यासाठी सुरू होते. जेव्हा रेल्वेची पॉवरची गरज कमी होते, विशेषतः जेव्हा रेल्वे स्टेशनच्या जवळ येत असते, तेव्हा बॅटरीची पॉवर खंडित होते (cuts off) आणि फ्यूएल सेलची अतिरिक्त ऊर्जा पुन्हा बॅटरी चार्ज करू लागते. अशा प्रकारे, एक पूर्ण प्रवास (सर्किट) पूर्ण केल्यानंतर, प्रवासाच्या शेवटी बॅटरी जवळपास ८० टक्के चार्ज झालेली असते”, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हायड्रोजन रेल्वेतील महत्त्वाचा भाग म्हणजे फ्युएल सेल आहे. कॅनडातील ‘बलार्ड’ (Ballard) या कंपनीकडून हे फ्युएल सेल्स आयात केले जातात. ही कंपनी फ्युएल सेल्स उत्पादनातील तज्ज्ञ आहे.
आणखी हायड्रोजन रेल्वे सुरू करण्याची घोषणा का नाही?
हायड्रोजन रेल्वेचा प्रकल्प १३६ कोटींचा असून तो २०२०-२१ मध्ये भारतीय उत्तर रेल्वेकडून हाती घेण्यात आला होता. त्याचे काम एप्रिल २०२२ मध्ये सुरू झाले. या कामाचे कंत्रात हैदराबाद स्थित मेधा कंपनीला देण्यात आले. ही कंपनी भारतीय रेल्वेला ‘प्रोपल्जन इक्विपमेंट’ पुरवते. हायड्रोजन रेल्वेच्या सर्व चाचण्या पार पाडण्यात आल्या आहेत. २२ मे रोजी रेल्वे मंत्रालयाने या रेल्वेला मंजूरी दिली. दरम्यान, भारतीय रेल्वेने या व्यतिरिक्त दुसरा कोणताही हायड्रोजन रेल्वे प्रकल्प सुरू करण्याची घोषणा अद्याप केलेली नाही. १७ जुलै रोजी सुरू होणारी पहिली हायड्रोजन रेल्वे कशाप्रकारे काम करते, हे पाहूनच देशात आणखी हायड्रोजन रेल्वे वाढवायच्या आहेत की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे.
