१५ ऑगस्ट रोजी देशभर ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सर्वत्र ध्वजारोहण होईल. राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यासंबंधी लागू होणारे कायदे, प्रथा आणि संकेत याबद्दल केवळ नागरिकांमध्येच नव्हे, तर शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्येही जनजागृतीचा अभाव दिसून येतो. त्यामुळे अनावधाने राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याचे प्रकार घडतात. ते टाळणे अत्यावश्यक आहे.
‘भारताची ध्वज संहिता २००२’मध्ये कोणत्या बाबी अंतर्भूत आहेत ?
राष्ट्रध्वज हा भारतीयांच्या आशा-आकांक्षा, राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाबद्दल सार्वत्रिक स्नेह, आदर आणि निष्ठा कायम असते. राष्ट्रध्वज प्रदर्शित करणे हे प्रतीक आणि नावे (अयोग्य वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० (१९५० चा क्रमांक १२) आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक अधिनियम, १९७१ (१९७१ चा क्रमांक ६९) यांच्या तरतुदींनुसार नियंत्रित केले जाते. भारतीय ध्वज संहिता, २००२मध्ये सर्व संबंधितांच्या मार्गदर्शनासाठी आणि फायद्यासाठी असे सर्व कायदे, संकेत, प्रथा आणि सूचना एकत्र आणल्या आहेत. भारतीय ध्वज संहिता, २००२, ही तीन भागांमध्ये विभागली गेली. संहितेच्या भाग १ मध्ये राष्ट्रध्वजाचे सामान्य वर्णन, भाग २ हा सार्वजनिक, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था आदींच्या सदस्यांद्वारे राष्ट्रध्वज प्रदर्शित करणे आणि संहितेचा भाग ३ हा केंद्र आणि राज्य सरकारे तसेच त्यांच्या संघटनांद्वारे राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यासंबंधी आहे. २६ जानेवारी २००२पासून भारताची ध्वज संहिता, २००२ अंमलात आली आहे.
राष्ट्रध्वजाची रंगसंगती कशी असावी?
संहितेनुसार, राष्ट्रध्वज हा समान रुंदीच्या तीन आयताकृती पट्ट्या किंवा उपपट्ट्यांनी बनलेला एक तिरंगी ध्वज असावा. सर्वात वरच्या पट्टीचा रंग भारतीय केशरी, सर्वात खालच्या पट्टीचा रंग भारतीय हिरवा व मधली पट्टी पांढरी असावी. मध्यभागी गडद निळ्या रंगात २४ समान अंतरावर आऱ्यांसह अशोकचक्राची रचना असेल. भारताचा राष्ट्रध्वज हा हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या लोकर, सुती, रेशमी खादीच्या कापडापासून बनवलेला असणे गरजेचे आहे. राष्ट्रध्वज आयताकृती आकारातील ध्वजाची लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर ३:२ असे असणे आवश्यक असते. कायद्याच्या अनुसूचीमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाचा प्रतीक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
ध्वजारोहण कोण करू शकतो व त्याचे नियम काय?
प्रतीके आणि नावे (अयोग्य वापरास प्रतिबंध) कायदा, १९५०मध्ये नमूद केलेल्या तरतुदींशिवाय, सामान्य नागरिक, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था आदींकडून राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेला आणि सन्मानाला साजेसे, औपचारिक किंवा इतर सर्व दिवशी राष्ट्रध्वज फडकवू किंवा प्रदर्शित करू शकतात. राष्ट्रध्वज फडकवतांना सन्मानाचे स्थान असावे आणि राष्ट्रध्वज स्पष्टपणे दिसावा. खराब झालेला किंवा विस्कटलेला ध्वज प्रदर्शित करू नये. ध्वज एकाच स्तंभाच्या टोकावर फडकवावा. १५ ऑगस्ट रोजी ध्वज खाली बांधलेला असतो, तो दोरीने वर खेचून फडकवला जातो. इतर कोणत्याही ध्वजासोबत एकाच वेळी फडकवला जाऊ नये. राष्ट्रध्वजापेक्षा उंच, वर किंवा त्याच्या बाजूला दुसरा कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये तसेच ज्या ध्वजस्तंभावरून ध्वज फडकवला जातो, त्यावर किंवा त्याच्या वर इतर कोणतीही वस्तू ठेवू नये. महत्त्वाच्या राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि क्रीडा प्रसंगी जनतेद्वारे कागदाचा ध्वज फडकवला जाऊ शकतो. कागदी ध्वज कार्यक्रमानंतर जमिनीवर टाकू नये. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जावा. ध्वजाबद्दल आदर निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्था शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवला जाणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ काय सांगतो ?
राष्ट्रध्वजाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करता येत नाही. कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला सलामी देण्यासाठी ध्वज खाली झुकवता येणार नाही. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी भारतीय राष्ट्रध्वज किंवा त्याच्या भागाचा कोणत्याही प्रकारे अवमान करता येत नाही. ध्वजाला जमिनीला किंवा पाण्याला स्पर्श होऊ देऊ नये. ध्वजाचा वापर कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा किंवा गणवेशाचा भाग म्हणून करता येणार नाही. ध्वजावर अक्षरलेखन करता येत नाही. ध्वजाचा अवमान झाल्याचे आढळल्यास तीन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड, अन्यथा दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे.
राज्य शासनाच्या सूचना कोणत्या?
राज्यात मंत्रालय, सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका मुख्यालयात, ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात येते. मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. या दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ वा. या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घ्यावे यासह विविध सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
prabodh.deshpande@expressindia.com
