एखादी व्यक्ती नुसती रिकामी बसली असेल आणि आपण त्यांना विचारलं की, “काय रे बाबा काय करतोयस?” त्यावर मराठीत एक गमतीशीर उत्तर आहे – “काही नाही, माशा मारतोय!” पण प्रत्यक्षात पाहिलं तर जिवंत माशीला मारणं सोपं आहे का? हातात कागदाचे भेंडोळं किंवा ‘फ्लाय स्वॉटर’ घेऊन आपण कितीही वेगाने वार करण्याचा प्रयत्न केला तरी माशी एका सेकंदात हुलकावणी देऊन उडून जाते. असं का होतं? आणि नेमका पावसाळ्यातच या माश्यांचा त्रास का वाढतो? या प्रश्नांमागचं वैज्ञानिक उत्तर काय आणि माश्यांना पळवून लावण्यामागचे उपाय समजून घेऊया. 

पावसाळ्यातच माश्यांची संख्या का वाढते?

पावसाळा सुरू झाला की घरभर माश्यांचा वावर वाढतो, या मागची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • हवेतला ओलावा : पावसाळ्यात हवेत प्रचंड दमटपणा असतो. हा हवेतला दमटपणा माश्यांच्या प्रजननासाठी अनुकूल वातावरण असतं. 
  • कचरा कुजणं : घरातील किंवा परिसरातील ओला कचरा, उघड्यावर असलेलं अन्न आणि पावसाळ्यात भाजी (पालापाचोळा) लवकर कुजते. या कुजणाऱ्या पदार्थांवर माश्या आपली अंडी घालतात. 
  • जलद जीवनचक्र : उष्ण आणि दमट वातावरणामुळे माश्यांचा प्रजननाचा वेग प्रचंड वाढतो, त्यामुळे अवघ्या काही दिवसांत हजारो माशा तयार होतात. 

घरात माश्यांची घुटमळ कमी कशी करावी?

आपल्याला माश्यांना मारता येत नसलं तरी त्यांना घरात येण्यापासून थांबवू तर शकतो ना? माश्यांना घरात येण्यापासून कसं थांबवायचं याचे काही सोपे उपाय: 

  • कचरा झाकून ठेवा : ओला कचरा जास्त वेळ ठेवू नका आणि कचऱ्याचा डबा व्यवस्थित झाकून ठेवा. 
  • जेवण झाकून ठेवा : कोणतेही अन्न पदार्थ झाकून ठेवा. बाजारातून आणलेल्या भाज्या ओलसर असतील तर त्या हवेवर वाळवा किंवा पुसून झाकून ठेवा. स्वयंपाकघरात शक्यतो ओटा कोरडा ठेवा, अनेकदा ओट्यावर साचलेल्या पाण्यामुळेसुद्धा माश्यांचा वावर वाढू शकतो. 
  • तीव्र वासाचा परिणाम : जाळलेल्या कापराचा वास शक्यतो कोणत्याही कीटकांना आवडत नाही, त्यामुळे तुम्ही घरात कापूर जाळू शकता (स्वतःसुद्धा जवळून जाळलेल्या कापराचा वास घेऊ नये), अर्धे लिंबू कापून त्यात ३-४ लवंगाच्या पाकळ्या खोचून ठेवू शकता. जिथे अशा तीव्र वासांचे पदार्थ असतात, तिथे माश्या फिरकत नाहीत.
  • डी. आय. वाय. कीटक स्प्रे : जर बाजारातले ते विचित्र वास असलेले कीटकनाशक स्प्रे वापरायचे नसतील तर तुम्ही स्वतः घरी कीटकनाशक स्प्रे बनवू शकता. पुदिन्याची पानं आणि निलगिरीच्या तेलाचे थेंब एका स्प्रे बाटलीत मिसळले की त्यानेही माश्यांचा त्रास सुटेल (इथे तुम्ही पुदिन्याची पानं पाण्यात उकळवून त्यात निलगिरी तेल मिसळलं तर जास्त परिणामकारक ठरेल). 
  • येण्याचा मार्गच बंद करा : दारं आणि खिडक्यांना बारीक जाळी लावली तर माश्या घरात घुसणार नाहीत.

असे अनेक उपाय इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. 

पर्यावरणाची अदृश्य रक्षक! 

जरी आपल्याला माश्या त्रासदायक वाटत असल्या, तरी निसर्गाचा समतोल राखण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मधमाश्यांप्रमाणेच माशासुद्धा पिकं, फळं आणि भाज्यांचं परागीभवन करून त्यांचं उत्पादन वाढवण्यास हातभार लावतात. निसर्गातील कुजलेलं अन्न, मृत वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांचं विघटन करून त्या मातीची सुपीकता वाढवतात. एवढंच नाही तर पिकांना हानी पोहोचवणाऱ्या लहान कीटकांचा खात्मा करून त्या पिकांचं नैसर्गिक रक्षण करतात. तसंच पक्षी, बेडूक आणि सरड्यांसारख्या प्राण्यांसाठी अन्नाचा मुख्य स्त्रोत बनून त्या संपूर्ण अन्नसाखळीचा समतोल टिकवून ठेवतात; म्हणूनच माशा या निसर्गाच्या खऱ्या ‘अदृश्य रक्षक’ आहेत.

रस्त्यावरच्या ठेल्यांवर माश्या का फिरतात?

समजा, तुम्ही मनापासून पाणीपुरी खाण्यात मग्न आहात आणि तेवढ्यात त्या पुरीवर माशी येऊन बसते? 

निसर्गाच्या दृष्टीने माशी कितीही महत्त्वाची असली तरी रस्त्यावरच्या उघड्या अन्नावर बसणाऱ्या माशा थेट गंभीर आजारांना आमंत्रण देतात. पेस्ट कंट्रोल तज्ज्ञांच्या मते, माशी अन्नावर बसणं हे दिसतं तितकं साधं नसून ते अत्यंत घातक ठरू शकतं. 

कीटकशास्त्रज्ञ (Entomologist) आणि तांत्रिक सेवा संचालक डॉ. रॉन हॅरिसन यांचं हे विधान माशी किती घातक असू शकते हे स्पष्ट करतं:

“माशी तुमच्या अन्नावर फक्त एका सेकंदासाठी जरी बसली, तरी तिच्या पायांवर आणि अंगावर हजारो सूक्ष्म केसांमुळे ती घाणेरड्या व कुजलेल्या पदार्थांमधील जंतू तुमच्या अन्नात पसरवू शकते. माशी कॉलरा, टायफॉईड आणि अतिसारासारखे गंभीर संसर्गजन्य आजार पसरवतात; त्यामुळे ज्या अन्नावर माशी बसली आहे ते खाणं टाळावं हाच सर्वांत सुरक्षित मार्ग आहे.”

संशोधनानुसार मुख्य धोके :

  • २०० हून अधिक प्रकारचे धोकादायक जीवाणू : एका सामान्य माशीच्या शरीरावर आणि पायांवर सुमारे २०० पेक्षा जास्त विविध प्रकारचे सूक्ष्म जंतू (Bacteria) असतात. गटार, कचरा आणि प्राण्यांच्या विष्ठेवर बसल्यानंतर हे जंतू तिच्या अंगावरील केसांमध्ये अडकतात.
  • एका सेकंदाचा स्पर्शही घातक : तुम्ही अन्नावर बसलेली माशी लगेच हाकलून लावली तरीही धोका टळत नाही. कारण जंतू अन्नात संक्रमित होण्यासाठी माशीचा केवळ एका सेकंदाचा स्पर्श पुरेसा असतो.
  • रस्त्यावरील अन्नावर होणारा परिणाम : पावसाळ्यात रस्त्यावरील उघडं अन्न, फळं किंवा सरबतावर माश्या वारंवार बसतात; यामुळे रस्त्यावरील अन्नावर सूक्ष्मजंतूंचा संसर्ग सर्वाधिक होतो, ज्यामुळे पोटाचे विकार वेगाने पसरतात.

आपल्याला माशी सहज का मारता येत नाहीत? 

माश्यांच्या विशेष शारीरिक कार्य रचनेमुळे आणि मेंदूच्या कार्यपद्धतीमुळे माश्यांना मारणं कठीण जातं. आता प्रश्न हा आहे की, एवढ्याशा माशीमध्ये असं काय वेगळं चक्र आहे? यावर शास्त्रज्ञांचं संशोधन काय सांगतं जाणून घेऊया :

  • ‘स्लो-मो’मध्ये चालणारं जग : मानवाचा मेंदू एका सेकंदात डोळ्यांद्वारे एकाच वेळी अनेक दृश्य टिपतात. पण तुम्हाला माहिती आहे का, माश्यांमध्ये ही क्षमता माणसांपेक्षा चारपट जास्त असते! त्यामुळे आपली मारण्याची प्रक्रिया आपल्यासाठी काही मिली-सेकंदांची जरी असली, तरी माश्यांच्या नजरेतून ही प्रक्रिया स्लो मोशनमध्ये होत असते, त्यामुळे तिला उडून जाण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. 
  • ३६० अंश दृष्टी : तुम्ही कधी माशीच्या डोळ्यांची रचना पहिली आहे का? आपले डोळे हे आपल्याला आपल्या समोरचं दृश्य दाखवतं. जास्तीत जास्त डोळ्यांच्या बाहुल्या जितक्या कोपऱ्याला वळवू शकतो तितकंच आपले डोळे टिपू शकतात. याउलट माशीच्या डोळ्यांची ठेवण ही तिच्या शरीराच्या दोन बाजूंना असते. याबरोबरच माशीच्या डोळ्यांमध्ये हजारो लहान भिंगं असतात, यामुळे तिला एकाच वेळी मागचं, पुढचं आणि सभोवतालचं ३६० अंशांमधील दृश्य दिसतं, त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की ‘मागून वार करूयात’ तर तुमचे प्रयत्न व्यर्थ गेले असं समजा! 
  • धोक्याची चाहूल आणि काही सेकंदातच उड्डाणाची तयारी : धोक्याची चाहूल लागताच माशीचा मेंदू तात्काळ तिच्या पायांना संदेश पोहोचवतो. ती आपले मागचे पाय अशा कोनात टेकवते की ज्या दिशेने धोका येत आहे, त्याच्या बरोबर उलट्या दिशेला ती झेप घेते. बरं, हे सगळं साधारणतः १०० सेकंदात होतं!

तुम्हाला तो ‘मक्खी’ चित्रपट आठवतोय ना? साध्या माशीला मारण्याच्या प्रयत्नात भल्याभल्यांच्या कसं नाकी नऊ आलं होतं! त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हातात फटका घेऊन माशीचा पाठलाग कराल, तेव्हा हे नक्की आठवा, तुम्ही निसर्गाच्या एका ‘हाय-टेक स्लो-मोशन’ सुपरहिरोशी सामना करत आहात!