अमेरिकेतील फ्लोरिडाच्या वाहतूक व्यवस्थेत खासगी विमानसेवा महत्त्वाची भूमिका बजावते. राज्यातील शेकडो सार्वजनिक आणि खासगी विमानतळांच्या माध्यमातून बड्या व्यावसायिकांचा प्रवास तसेच स्थानिक पर्यटनाला यातून मोठी चालना मिळते. भौगोलिकदृष्ट्या फ्लोरिडा हे कॅरेबियन बेटे आणि लॅटिन अमेरिकेत जाण्यासाठीचे प्रमुख प्रवेशद्वार असल्याने या भागात विमानांची मोठी वर्दळ असते. मात्र, हवाई वाहतुकीचे मोठे प्रमाण आणि फ्लोरिडातील अनिश्चित व वादळी हवामान यांमुळे या राज्यात विमान अपघातांच्या घटनाही घडतात. रविवारी (१ नोव्हेंबर) फ्लोरिडातील ग्रीनएकर्स परिसरातील एका निवासी वस्तीत खासगी विमान कोसळले. या दुर्घटनेत किमान नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. या पार्श्वभूमीवर हा अपघात नेमका कसा घडला? विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वीच्या शेवटच्या क्षणांत काय घडले? वैमानिकाचा अखेरचा संदेश काय होता? त्याविषयीचा हा आढावा…
विमान कोसळण्यापूर्वी कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं?
अमेरिकन वृत्तावाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान तब्बल ३५ हजार फुटांवर होते. त्याचवेळी वैमानिकांनी हवेतील जोरदार हालचाली आणि विमानावर बर्फ साचत असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण कक्षाला दिली. तसेच अधिक स्थिर हवामानाच्या शोधात विमान आणखी दोन हजार फूट उंचीवर नेण्याची परवानगी मागितली. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील संभाषणाच्या ध्वनिमुद्रणातून अपघाताच्या शेवटच्या काही मिनिटांत हवामान अधिकच बिघडल्याचे स्पष्ट होते. विमानाला जोरदार हादरे बसत होते आणि त्यावर बर्फ साचत होता, असे या घटनेतून दिसून येते. विमान कोसळण्यापूर्वी वैमानिक आपत्कालीन परिस्थितीचा सामना करत असल्याचेही ध्वनिमुद्रणातून समोर आले. परिस्थिती अधिक गंभीर होत असताना कॉकपिटमधील वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष यांच्यातील संभाषणाची नोंद करण्यात आली आहे. आम्ही हजारो फूट उंचीवरून अचानक खाली येत आहोत… मेडे, मेडे! विमानाचा खाली येण्याचा वेग दर मिनिटाला १० हजार फूट आहे, असे वैमानिकाने सांगितले.
“अरे देवा! आता आपल्याकडे वेळच उरलेला नाही”
शेवटच्या संभाषणावरून विमानावरील नियंत्रण पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याकडे फारसा वेळ शिल्लक नसल्याची जाणीव वैमानिकांना झाली होती, असे दिसते. त्यानंतर काही क्षणांतच परिस्थिती आणखी गंभीर झाली. आम्ही अतिवेगाने खाली येत आहोत… आमचा उतरण्याचा वेग दर मिनिटाला २० हजार फूट आहे, असे वैमानिकाने सांगितले. त्यानंतर विमानातील एका महिला कर्मचाऱ्याचा घाबरलेला आवाजही ध्वनिमुद्रणात ऐकू आला. “अरे देवा! आता आपल्याकडे वेळच उरलेला नाही, असे ती ओरडताना ऐकू येते. विमान वेगाने खाली कोसळत असताना हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी वैमानिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. नोव्हेंबर टू ब्राव्हो डेल्टा, मी तुमच्याशी संपर्कात आहे. मला सांगा, काय परिस्थिती आहे? असे एका नियंत्रकाने विचारले. त्यावर विमानातील वैमानिकाने उत्तर दिले की, विमानाचा खाली येण्याचा वेग दर मिनिटाला २२ हजार फूटांपेक्षा अधिक झाला आहे. विमान ६० अंशांच्या कोनात एका बाजूला झुकले आहे… आम्ही नियंत्रणाबाहेर जात आहोत. विमानातून आलेल्या शेवटच्या संदेशांपैकी हा एक संदेश होता.
विमानाचा खाली येण्याचा वेग कसा वाढत गेला?
विमानाला गंभीर अडचणींचा सामना करावा लागत असताना वैमानिकांनी ‘मेडे’ हा आपत्कालीन संदेश दिला होता. अधिकृत माहितीनुसार, सुरुवातीला वैमानिकाने विमानावर साचणाऱ्या बर्फाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. विमानावर हलक्या स्वरूपाचा पारदर्शक बर्फ साचत आहे. ही परिस्थिती हाताळण्याजोगी आहे. तसेच, हवेतील मध्यम स्वरूपाचे हादरे जाणवत असल्याचे त्यांनी कळवले होते. हवेतील हादरे कमी जाणवतील अशा उंचीवर जाण्यासाठी वैमानिकांनी आणखी दोन हजार फूट उंचीवर जाण्याची परवानगी मागितली होती. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, विमानाच्या उड्डाणावर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणेतील माहितीवरून विमान त्यानंतर सुमारे ४१ हजार फूट उंचीपर्यंत गेले आणि मग वेगाने खाली येऊ लागले. विमानाचा खाली येण्याचा वेग सुरुवातीला दर मिनिटाला १० हजार फूट होता. त्यानंतर तो २० हजार फूट झाला आणि पुढे ३० हजार फुटांपेक्षाही अधिक झाला. ‘फ्लाइटरडार२४’च्या आकडेवारीनुसार, एका टप्प्यावर विमानाचा खाली येण्याचा वेग दर मिनिटाला ३२ हजार फूटांपेक्षा अधिक नोंदवण्यात आला.
लिअरजेट विमान नेमक्या कोणत्या भागात कोसळले?
अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारी सुमारे १२ वाजून ५० मिनिटांनी हे विमान फ्लोरिडातील पाम बीच काउंटीच्या ग्रीनएकर्स परिसरात कोसळले. विमान वेगाने जमिनीवर आदळताच मोठा स्फोट होऊन आगीचा प्रचंड भडका उडाला. त्यावेळी रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांनी या अपघाताचे व्हिडीओ चित्रित केले. विमान आदळल्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता. घटनास्थळी विमानाचे तुकडे, जळालेले अवशेष आणि काँक्रीटचे तुकडे सर्वत्र विखुरले होते. फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांनी या दुर्घटनेचे वर्णन ‘भीषण’ असे केले. एखादे क्षेपणास्त्र खाली कोसळावे असे हे दृश्य होते. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की त्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा पडला, असे ते म्हणाले. या अपघातानंतर क्रेस्टहेवन बुलेव्हार्ड ते १० व्या अॅव्हेन्यू नॉर्थदरम्यानचा मिलिटरी ट्रेल रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हा रस्ता पुन्हा सुरू होण्यासाठी किमान ३० दिवस लागू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, पाम बीच काउंटी अग्निशमन आणि बचाव विभागाने या घटनेला ‘मोठ्या प्रमाणावरील जीवितहानीची आपत्ती’ घोषित केले. त्यानंतर आपत्कालीन बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
अपघातग्रस्त विमानातील नऊ प्रवासी कोण होते?
‘लिअरजेट ६०’ या खासगी विमानातून एकूण नऊ जण प्रवास करत होते. अमेरिकेचे परिवहन मंत्री सीन डफी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मृतांची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच, विमानातील नऊ जणांपैकी किती जण प्रवासी होते आणि किती जण विमानाचे कर्मचारी होते, याबाबतही अधिकाऱ्यांनी स्पष्ट माहितीही देण्यात आलेली नाही. ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते जिम रेनॉल्ड्स यांनी हे खासगी विमान असल्याची पुष्टी केली. मात्र, विमानातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींबाबत तातडीने अधिक माहिती देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या विमानाची नोंदणी ‘N722BD’ या क्रमांकाने करण्यात आल्याचे वृत्त आहे.
विमान अपघाताच्या कारणांचा तपास सुरू
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) या अमेरिकेतील दोन प्रमुख संस्थांनी विमान अपघाताच्या तपासाला सुरुवात केली आहे. तपास यंत्रणांकडून विमानाचे अवशेष, उड्डाणासंबंधीची माहिती, विमानाच्या देखभालीचा इतिहास, अपघातावेळची हवामानस्थिती तसेच वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष यांच्यात झालेले संभाषण यांची माहिती गोळा केली जात आहे. विमानावर बर्फ साचल्याची नोंद, हवेतील मध्यम स्वरूपाचे हादरे आणि विमानाचा वेग मर्यादेपेक्षा अधिक झाल्याचा इशारा, या बाबींचाही तपासात प्रामुख्याने विचार केला जाणार आहे. अपघाताच्या सुमारास दक्षिण फ्लोरिडातील काही भागांत वादळी पाऊस आणि मुसळधार पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय हवामान सेवेने या परिसरासाठी पूरस्थितीचा इशारा जारी केला होता. मात्र, खराब हवामान, विमानावर साचलेला बर्फ, तांत्रिक बिघाड किंवा अन्य कोणत्या कारणामुळे वैमानिकांचे विमानावरील नियंत्रण सुटले हे अद्याप अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले नाही.
