देशात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र करोना साथ कमी झालेली असली तरी आता इन्फ्लुएंझा विषाणूचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. यामुळेच केंद्र सरकारने मागील आठवड्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत इन्फ्लुएंझा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी, तसेच सध्या देशात विषाणूच्या प्रादुर्भावाची स्थिती काय आहे, आरोग्य विभागातर्फे काय खबरदारी घेण्यात येत आहे आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर इन्फ्लुएंझा (फ्लू) व्हायरसचा प्रादुर्भाव, फ्लूची प्रकरणे वाढण्याची कारणे कोणती आहेत याविषयी जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत एकूण ३०३८ जणांना फ्लूची लागण

गेल्या काही दिवसांपासून फ्लूच्या संसर्गात वाढ होत आहेत. एकट्या जानेवारी महिन्यात फ्लूमुळे एकूण नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ९ मार्चपर्यंत फ्लूचा संसर्ग झालेले एकूण ३०३८ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षभरात हीच संख्या १३ हजार २०२ एवढी होती. सरकारी आकडेवारीनुसार देशात फ्लूबाधितांची संख्या ३०३८ दाखवली जात असली तरी, प्रत्यक्षात हा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे. कारण अनेक रुग्ण इन्फ्लुएंझाची चाचणी करून घेत नाहीत, ते केवळ स्थानिक डॉक्टरकडे जाऊन उपचार करतात. तसेच अनेक रुग्ण आरोग्य विभागाकडे फ्लू झाल्याची नोंदही करत नाहीत.

हेही वाचा >> विश्लेषण : दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद संपुष्टात येऊन ३१ वर्षे पूर्ण; वर्णभेद कसा नष्ट झाला?

फ्लू संसर्गाची कारणे काय आहेत?

वर्षभरात विशिष्ट कालावधीत फ्लूचा संसर्ग वाढल्याचे निरीक्षण आहे. दरवर्षी जानेवारी ते मार्च तसेच पावसाळ्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत फ्लूबाधित रुग्णांचे प्रमाण वाढते. बदलत्या हवामानामुळे इन्फ्लुएंझा व्हायरसचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो. सध्या फक्त इन्फ्लुएंझा व्हायरसच नव्हे तर कोविड-१९ आणि अॅडेनोव्हायरसचाही प्रादुर्भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

फ्लूची लक्षणे काय? हा आजार कोणाला होऊ शकतो?

करोनाप्रमाणेच फ्लूबाधित रुग्णामध्ये ताप, खोकला, सर्दी अशा प्रकारची लक्षणे दिसतात. मात्र ही लक्षणे कायम राहिली तर न्यूमोनिया, श्वसनास त्रास होणे आदी आजार उद्भवू शकतात. नवजात मुले, वृद्ध नागरिक, हृदयविकार, मधुमेह, किडनीचे आजार असलेले नागरिक, गरोदर महिला तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरिकांना फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. मागील वर्षी इन्फ्लुएंझा विषाणू संसर्गामुळे एकूण ४१० रुग्णांचा मृत्यू झाला होता. यातील बहुतांश मृत्यू हे इन्फ्लुएंझाच्या एच-१ एन-१ या उपप्रकाराच्या संसर्गामुळे झाले होते.

हेही वाचा >> विश्लेषण : जागतिक बँक संकटात असताना तुमचे पैसे किती सुरक्षित?

एच-३ ए-२ हा इन्फ्लुएंझा विषाणूचा नवा उपप्रकार आहे का ?

इन्फ्लुएंझा विषाणूच्या एच-३ ए-२ उपप्रकारामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एच-३ ए-२ हा नवा उपप्रकार आहे का? असे विचारले जात आहे. मात्र हा इन्फ्लुएंझा विषाणूचा नवा उपप्रकार नाही. एच-१ एन-१ उपप्रकाराप्रमाणेच एच-३ एन-२ हा उपप्रकारही जुनाच आहे. एच-१ एन-१ उपप्रकार २००९ साली साथरोगास कारणीभूत ठरला होता. तर एच-३ एन-२ उपप्रकारामुळे १९६८ साली फ्लूची साथ आली होती. त्यामुळे सध्या चर्चा होत असलेला एच-३ एन-२ हा उपप्रकार नव्याने आला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मिळालेल्या माहितीनुसार इन्फ्लुएंझा विषाणूचा उपप्रकार भारतात पहिल्यांदा १९९६ साली आढळला होता. तेव्हापासून भारतात त्याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : वाढत्या हेलिकॉप्टर अपघातांची कारणे काय?

इन्फ्लुएन्झा विषाणूचे प्रामुख्याने ए आणि बी असे दोन उपप्रकार आहेत. इन्फ्लुएन्झा ए उपप्रकारात आणखी एच-१ एन-१ आणि एच-३ एन-२ असे दोन उपप्रकार आहेत. तर इन्फ्लुएंझा बी उपप्रकाराचेही व्हिक्टोरिया (Victoria)आणि यामागाटा (Yamagata) असे दोन प्रकार आहेत. इन्फ्लुएंझा ए हा उपप्रकार जास्त घातक ठरू शकतो. या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूदेखील ओढवतो.

लसीमध्ये सातत्याने बदल का केला जातो?

इन्फ्लुएंझा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लशी उपलब्ध आहेत. मात्र या लशींमध्ये दरवर्षी विशिष्ट बदल करावे लागतात. इन्फ्लुएंझा विषाणू प्रत्येकवेळी स्वत:च्या रचनेत बदल करतो. म्हणूनच लशींमध्येही त्याप्रमाणे बदल करावा लागतो. आयसीएमआरकडून नमुन्यांचा वर्षभर अभ्यास केला जातो. फ्लूबाधित रुग्णांमधील बदलावर लक्ष ठेवले जाते. त्यानंतर विषाणूने स्वत:मध्ये केलेल्या बदलानुसार लशींमध्येही बदल केला जातो.

हेही वाचा >> विश्लेषण : ॲरिस्टॉटल ते २१ वे शतक : कांद्याचा रोचक प्रवास

फ्लूसंसर्ग रोखण्यासाठी काय खबरदारी घ्यावी?

इन्फ्लुएंझा हा अर्थात संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे इन्फ्लुएंझाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात येणे टाळायला हवे. इन्फ्लुएंझाबाधित रुग्ण खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर विषाणू हवेत पसरतात. परिणामी अन्य लोकांनाही संसर्ग होतो. फ्लू झालेल्या रुग्णाच्या थुंकीत इन्फ्लुएंझाचे विषाणू असतात. इन्फ्लुएंझाचा संसर्ग रोखण्यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. शिंकताना, खोकताना नाकाला आणि तोंडाला रुमाल लावणे गरजेचे आहे. सतत हात धुतले पाहिजेत. आजारी, अशक्त वाटत असेल तर घरीच थांबणे जास्त चांगले. या काळात पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. गर्दीच्या ठिकाणी जायचे असेल तर मास्क वापरावा.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flu cases increase in india what is influenza virus detail information of h3n2 prd
First published on: 17-03-2023 at 20:07 IST