प्रादेशिक विमान कंपन्या बंद पडत असताना प्रादेशिक विमान कंपनी फ्लाय ९१ ने ४० नवीन एटीआर ७२-६०० विमानांसाठी सुमारे १ अब्ज अमेरिकी डॉलरचा (अंदाजे ८,३०० कोटी रुपये) ऐतिहासिक करार केला आहे. प्रादेशिक विमान कंपनीद्वारे जागतिक स्तरावर एटीआर कंपनीला मिळालेली ही आजवरची सर्वात मोठी ऑर्डर आहे.
‘फ्लाय ९१’ विमान कंपनीचा सध्याचा विस्तार
‘फ्लाय ९१’ ही गोव्यातील रायबंदर येथे मुख्यालय असलेली व भारतातील लहान (द्विस्तरीय व त्रिस्तरीय) शहरांना जोडणारी एक प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. ही विमान कंपनी गोवा, हैदराबाद, बंगळुरू, कोची यांसारख्या मोठ्या शहरांसह महाराष्ट्रातील पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, जळगाव व लक्षद्वीपमधील अगात्ती यासारख्या प्रादेशिक ठिकाणांना जोडते. सुमारे अडीच वर्षांपूर्वी कामकाज सुरू केलेल्या फ्लाय ९१ विमान कंपनीच्या ताफ्यात सध्या सहा विमाने असून ती एका आठवड्यात सुमारे २८० उड्डाणे करते. कंपनीचे हवाई जाळे १२ शहरांमध्ये पसरलेले आहे.
फ्लाय ९१च्या ऑर्डरची वैशिष्ट्ये
फ्लाय ९१ने दिलेल्या नवीन विमानांची डिलिव्हरी २०२७च्या अखेरीस सुरू होईल आणि २०३२ पर्यंत सर्व ४० विमाने ताफ्यात दाखल होतील. या करारामुळे फ्लाय ९१चा ताफा आगामी वर्षांत ६०हून अधिक विमानांपर्यंत पोहोचेल. सध्या कंपनीकडे ६ विमाने आहेत. लहान आणि दुय्यम (Tier 2 आणि Tier 3) शहरांना जोडणे आणि देशांतर्गत प्रादेशिक हवाई दळणवळण मजबूत करणे हा यामागचा उद्देश आहे. हा करार भारताच्या ‘उडान’ योजनेला अधिक प्रोत्साहन देणारा ठरणारा आहे. तसेच यामुळे छोट्या प्रादेशिक विमान कंपन्यांना पुन्हा भरारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
एटीआर विमान का
भारतात अशी १०० विमानतळे आहेत जिथे एअरबस ए३२० आणि बोईंग ७३७ सारखी मोठी विमाने जाऊ शकत नाहीत. एटीआर-७२ विमान त्या मार्गांसाठी आणि कंपनीच्या खर्चाच्या मॉडेलसाठी अगदी योग्य आहे. एटीआर ७२- ६०० विमानात ७० ते ७८ प्रवासी बसू शकतात. यामुळे लहान शहरात हवाई सेवा सुरू करण्यास मदत होणार आहे. या विमानाची पल्ला गाठण्याची क्षमता सुमारे १,५००-१,६५० किमी आहे.
इंडिगो देशातील सर्वात मोठी ऑपरेटर
भारताची सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो सध्या भारतातील सर्वात मोठी ‘एटीआर ऑपरेटर’ असून, तिच्या प्रादेशिक दळणवळणासाठी तिच्याकडे ४४ टर्बोप्रॉप विमानांचा कार्यरत ताफा आहे. सरकारी मालकीची अलायन्स एअरही ‘एटीआर’ विमाने चालवते.
‘मोकळे आकाश’ धोरण
भारतात प्रवासी विमान वाहतूक सेवाही ‘खाजाउ’ (खासगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरण) धोरण १९९१ मध्ये अस्तित्वात येईपर्यंत १०० टक्के सरकारी मालकीची होती. ‘एअर इंडिया’ सरकारी मालकीच्या कंपनीचे विमाने परदेशात जात, तर ‘एअर इंडिया’ची उपकंपनी असलेल्या ‘इंडियन एअरलाईन्स’ची विमाने देशांतर्गत सेवा पुरवत असत. कालांतराने ‘इंडियन एअरलाईन्स’चे ‘एअर इंडिया’त विलीनीकरण झाले. ‘खाजाउ’ धोरणानंतर भारतात ‘मोकळे आकाश’ धोरण स्वीकारले गेले. या धोरणामुळे ‘मोदीलुफ्त’, ‘एनईपीसी’, ‘जेट एअरवेज’, ‘सहारा एअलाईन्स’, ‘हमानिया एअरवेज’, ‘ईस्ट अॅण्ड वेस्ट एअरलाईन्स’ अशा अनेक कंपन्या अस्तित्वात आल्या, पण आता यातील एकही कंपनी अस्तित्वात नाही. या कंपन्यांपैकी ‘जेट एअरवेज’ ही कंपनी जास्त वर्षे कार्यरत राहिली आणि अशा रितीने भारत सरकारचे ‘मोकळे आकाश’ धोरण फसले.
सरकारचा प्रयत्न
भारतीय विमान वाहतूक बाजारपेठेत बहुतेक मोठ्या विमान कंपन्यांनी नॅरो-बॉडी जेट विमानांच्या संचालनावर लक्ष केंद्रित केल्यामुळे प्रादेशिक क्षेत्रात फारसा रस दिसून आलेला नाही. गेल्या काही वर्षांत भारतातील अनेक प्रादेशिक विमान कंपन्या मागे पडल्या आहेत. तरी सरकार उडान सारख्या उपक्रमांद्वारे प्रादेशिक हवाई संपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
भारत वेगाने वाढणारी बाजारपेठ
भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी विमान वाहतूक बाजारपेठ असून, येथे लहान सीप्लेनपासून ते जंबो जेटपर्यंत सर्व आकारांच्या विमानांसाठी वाव आहे. देशात केवळ १८० आसनी किंवा मोठी विमाने किंवा ए३८० विमाने असणे पुरेसे नाही. यशस्वी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी खरोखरच सुरु करायची असेल तर १८० आसनी आणि त्याहून अधिक क्षमतेच्या विमानांबरोबरच ९० आसनी, ८० आसनी, ४० आसनी, १९ आसनी, ९ आसनी विमाने, सीप्लेन्स आणि हेलिकॉप्टर्सचीही आवश्यकता आहे.
एटीआर फायद्याचे
एटीआर ही एक फ्रँको-इटालियन प्रादेशिक विमान उत्पादक कंपनी असून, ती एअरबस आणि लिओनार्डो यांचा संयुक्त उपक्रम आहे. ९० पेक्षा कमी आसनक्षमतेच्या बाजारपेठेत, एटीआरची विमाने जागतिक स्तरावर सर्वात लोकप्रिय प्रादेशिक विमाने मानली जातात. एटीआरचा दावा आहे की, त्यांची टर्बोप्रॉप विमाने जेट विमानांपेक्षा लहान आणि प्रादेशिक मार्गांसाठी लक्षणीयरीत्या अधिक इंधन-कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहेत.
surekha.chopade@expressindia.com
