Flydubai Attack Israel Security Lapses : गेल्या आठवड्यातील फ्लायदुबई विमानातील धक्कादायक घटनेमुळे केवळ स्मित मच्छार यांच्या शौर्याची सर्वत्र चर्चा होत आहे, पण घटनेत विमान सुरक्षेतील त्रुटीही तितक्याच गंभीर आहेत. दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाइट FZ1073 च्या कॉकपिटमध्ये सहवैमानिकानेच कॅप्टनवर हल्ला केल्याने विमान दुर्घटनेच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. सुरुवातीला हा संभाव्य दहशतवादी हल्ला असल्याची चर्चा झाली; या घटनेमुळे विमानातील सुरक्षा व्यवस्थेसोबतच इस्रायल, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या तीन देशांच्या पातळीवरील सुरक्षेतील त्रुटींची मालिकाच समोर आली आहे. संबंधित यंत्रणांकडे सहवैमानिक हमाम अल-हमामीला कॉकपिटजवळ पोहोचण्यापासून रोखण्याची संधी होती, मात्र त्या संधींचा वेळीच वापर झाला नाही.
अखेर विमान हवेत असताना अल-हम्मामीने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यामुळे विमानाचा ताबा सुटून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती, त्यामुळे या घटनेकडे आता केवळ एका विमानातील हल्ला म्हणून पाहिले जात नाही; विमानाच्या कॉकपिटपर्यंत हल्लेखोर पोहोचलाच कसा आणि सुरक्षा पातळीवर कोणती चूक झाली याची चर्चा सुरू झाली आहे.
ओमान एअरने हमाम अल-हम्मामीला उड्डाण करण्यापासून का रोखले होते?
या घटनेतील सर्वांत महत्त्वाचा दुवा हमाम अल-हम्मामीच्या भूतकाळात सापडतो. २९ वर्षीय अल-हमामीचे वडील ओमानी, तर आई सीरियन नागरिक आहे. तो दुबईत राहत असला तरी सीरियातील प्रदीर्घ यादवी युद्धाच्या काळात तो वारंवार सीरियाला जात होता. या काळात तिथे इस्लामी बंडखोर बशर अल-असद यांच्या सत्ताधाऱ्यांविरोधात लढत होते. फ्लायदुबई प्रकरणाच्या चौकशीतून असे समोर आले आहे की, सीरियातील वास्तव्यादरम्यान अल-हमामी कट्टर विचारसरणीकडे आकर्षित झाला होता.
अल-हम्मामीने पुढे ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतले आणि २०१८ मध्ये ओमान एअर कंपनीमध्ये रुजू झाला. २०२२ पर्यंत तो वैमानिकही झाला. मात्र, २०२४ मध्ये त्याच्या कट्टर विचारांबाबत गंभीर चिंता निर्माण झाली. तो कट्टर विचारसरणी संबंधित काही संकेतस्थळे पाहत असल्याचे आढळल्यानंतर ओमान एअरने त्याला उड्डाण करण्यापासून रोखले. त्याला कट्टरतावादातून बाहेर काढण्यासाठीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले गेले आणि त्यानंतर वैमानिक म्हणून काम देण्याऐवजी त्याच्यावर प्रशासकीय जबाबदारी सोपवण्यात आली.
मात्र, यानंतरही हम्मामीचा विमान क्षेत्राशी संबंध पूर्णपणे तुटला नाही. २०२५ मध्ये ओमान एअर सोडल्यानंतर त्याने मोरोक्कोच्या राष्ट्रीय विमान कंपनी रॉयल एअर मॅरोकमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याची निवड झाली नाही. अखेर फेब्रुवारी २०२६ मध्ये तो दुबईची प्रमुख विमान कंपनी एमिरेट्सच्या मालकीच्या फ्लायदुबईमध्ये वैमानिक म्हणून रुजू झाला. म्हणजेच ज्या व्यक्तीला यापूर्वी कट्टर विचारांमुळे विमान उडवण्यापासून रोखण्यात आले होते, तो काही काळाने पुन्हा कॉकपिटपर्यंत पोहोचला.
UAE मध्ये ही माहिती पोहोचलीच नाही?
हम्मामीला ओमान एअरने उड्डाणापासून रोखले असले तरी त्यानंतरच्या त्याच्या नोकरीच्या प्रक्रियेत कोणताच अडथळा आला नाही. गतवर्षीपासून फ्लायदुबई वैमानिकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वेगाने भरती करत होती. २०२५ मध्ये कंपनीने वैमानिक प्रशिक्षणाचा स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला असून, तिचे स्वतःचे फ्लाइट ट्रेनिंग सेंटरही आहे.
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रातील परवाना व्यवस्था मात्र प्रत्येक देशाच्या नियमांनुसार वेगळी असते. द वॉल स्ट्रीट जर्नलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ओमानने हम्मामीचा परवाना रद्द केला असता तर त्याच्याबाबतची माहिती UAE सह इतर आखाती देशांपर्यंत पोहोचली असती. मात्र, अल हमामीबाबत वादग्रस्त माहिती समोर असूनही ओमानने त्याचा वैमानिक परवाना कायम ठेवला आणि त्यामुळे ही माहिती इतर देशांच्या यंत्रणांपर्यंत पोहोचलीच नाही.
फ्लायदुबईमध्ये भरती करताना हम्मामीच्या पूर्वीच्या विमानसेवेचा अनुभव तपासण्यासाठी ओमानशी संपर्क साधण्यात आला नव्हता, अशी कंपनीतील सूत्रांची माहिती आहे. त्याची केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात आली होती; त्यानंतर हमामीला तेल अवीवच्या संवेदनशील मार्गावर उड्डाण करण्याची जबाबदारी देण्यात आली आणि या मार्गावर त्याने याआधी अनेक उड्डाणेही केली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने त्यावर भाष्य करणार नसल्याचे फ्लायदुबईने सांगितले.
इस्रायलची सुरक्षा यंत्रणा फ्लायदुबईच्या घटनेला का रोखू शकली नाही?
इस्रायलला अल-हम्मामीबद्दल आधीच माहिती का मिळाली नाही? हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कारण परदेशी विमानांच्या प्रवासी आणि क्रूची माहिती आधीच इस्रायली सरकारपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था देशात आहे. २०२३ मध्ये लागू झालेल्या कायद्यानुसार, इस्रायलमध्ये येणाऱ्या परदेशी विमान कंपन्यांना प्रवासी आणि क्रूची यादी आगाऊ द्यावी लागते. दहशतवादी धोका ओळखणे आणि रोखणे हा या व्यवस्थेमागचा प्रमुख उद्देश आहे. टॅक्स अथॉरिटीकडे यासंबंधीचा स्वतंत्र डेटाबेस तयार करण्याची जबाबदारी असते.
यातील नोंदी तपासण्याचा अधिकार वाहतूक मंत्रालयासह शिन बेट आणि मोसादसारख्या सुरक्षा संस्थांना देण्यात आला आहे. इस्रायलमध्ये देशांतर्गत विमान कंपन्यांची सुरक्षा तपासणी शिन बेटकडे असते, तर परदेशी विमान कंपन्यांच्या विमानातील वैमानिक आणि क्रूची पार्श्वभूमी तपासण्याची जबाबदारी वाहतूक मंत्रालयाची आहे. त्यासाठी हे कर्मचारी इस्रायलच्या मित्र देशांमधून आले आहेत का हेही तपासले जाते.
मात्र, या संपूर्ण यंत्रणेतील सर्वात मोठी अडचण म्हणजे संबंधित मंत्रालयालाच या सुविधेची माहिती नव्हती. इस्त्रायलच्या परिवहन मंत्रालयाने म्हटले की, विमानामधील धोके रोखण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही गुप्तचर यंत्रणा नव्हती. परदेशी विमान कंपन्यांनाच त्यांच्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आणि राष्ट्रीयत्व तपासणे बंधनकारक होते. या प्रकरणात फ्लायदुबईनेही पायलटची माहिती तपासण्याचे लेखी मान्य केले होते.
फ्लायदुबईचे विमान FZ1073 मधील हमामीचा प्रवेश रोखण्याची शेवटची संधी इस्रायलमध्येच होती. ओमानचे इस्रायलशी राजनैतिक संबंध नसल्याने अशा देशांच्या वैमानिकांना इस्रायलमध्ये उड्डाण करण्यास परवानगी नाही, त्यामुळे केवळ त्याच्या राष्ट्रीयत्वाच्या आधारेही त्याला रोखता आले असते. मात्र, त्याने यापूर्वी अनेकदा तेल अवीवला उड्डाण केले होते.
दरम्यान, द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, मे २०२४ मधील इस्रायलच्या नियंत्रक महासंचालकांच्या गोपनीय अहवालात परिवहन मंत्रालय परदेशी विमानांच्या सुरक्षेवर योग्य देखरेख ठेवण्यात अपयशी ठरल्याचे नमूद करण्यात आले होते. मनुष्यबळ आणि निधीची कमतरताही यामागचे कारण होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जोखीम लक्षात घेऊन इस्रायली विमान कंपन्यांच्या दुबई ते तेल अवीव उड्डाण करणाऱ्या विमानांची कठोर तपासणी केली जात असताना, या मार्गावर फ्लायदुबईसाठी मार्ग मोकळाच ठेवण्यात आला.
ऑक्टोबर ७ च्या वर्धापनदिनाआधी, निवडणुकीच्या तोंडावर घटना
७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हमास आणि इतर पॅलेस्टिनी गटांच्या हल्ल्याला तीन वर्षे पू्र्ण होत असताना फ्लायदुबई विमानात ही थरारक घटना घडली. त्यातच २७ ऑक्टोबरला इस्रायलमध्ये संसदीय निवडणूक होणार आहेत, त्यामुळे या घटनेने देशातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत.
पंतप्रधान बिन्यामिन नेतेन्याहू यांच्या कार्यालयाने राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख शमुएल बेन एझरा यांना परदेशी विमानांच्या सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी स्वतंत्र तपास अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांनी या निर्णयावर टीका केली. या घटनेमागील सुरक्षेतील “अपयशांची साखळी” मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकली असती असा दावा त्यांनी केला. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या चौकशीपासून नेतान्याहू दूर राहिल्याचा आरोप करत, “आता पुन्हा तेच होत आहे,” अशी टीकाही लॅपिड यांनी केली.
