Flydubai Horror Satish Machchhar : दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात बुधवारी ३० सप्टेंबरला अत्यंत थरारक घटना घडली. ओमानी सहवैमानिकाने विमान पाडण्याच्या उद्देशाने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. पण, या संकटसमयी मच्छार यांनी प्रसंगावधान राखत कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडला. पण, या घटनेमुळे विमानाच्या कॉकपिटची सुरक्षा आणि विमानातील शेवटच्या क्षणी निर्माण होणाऱ्या धोक्यांचा प्रश्न समोर आला आहे. विमान हवेत असताना कॉकपिट हे सर्वाधिक सुरक्षित ठेवले जाणारे ठिकाण मानले जाते. मात्र, बुधवारी विमानाच्या कॉकपिटमध्येच धक्कादायक घटना घडली. विमानाची उंची काही वेळात मोठ्या प्रमाणात खाली आली आणि परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती.

अशा परिस्थितीत कॅप्टन मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडल्याने प्रवासी सतर्क झाले आणि त्यांनी आत जाऊन हल्लेखोराला रोखल्याचे वृत्त आहे. या विमानाचे सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. मात्र, या घटनेमुळे एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला; कॉकपिटमध्ये उपस्थित असलेला पायलटच धोकादायी ठरत आहे, अशावेळी एअरलाइन आणि सुरक्षा यंत्रणा अशा परिस्थितीचा सामना कसा करतात?

अमेरिकेतील विमान सुरक्षा व्यवस्थेचा ४० वर्षांचा अनुभव असलेले सुरक्षा तज्ज्ञ जेफ प्राइस यांनी फर्स्ट पोस्टला सांगितले की, ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेसह जगभरातील विमान कंपन्यांनी कॉकपिटच्या सुरक्षेसाठी नियम आणि सुरक्षा उपायांमध्ये मोठे बदल केले.

२००१ च्या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी चार प्रवासी विमानांच्या कॉकपिटमध्ये प्रवेश केला होता. त्यापैकी तीन विमाने ठरवलेल्या लक्ष्यांवर पाडण्यात आली, तर चौथ्या विमानातील प्रवाशांनी अपहरणकर्त्यांचा सामना केला. या सर्व गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर विमानाच्या कॉकपिटमध्ये बाहेरून कोणीही सहज प्रवेश करू नये, यासाठी जगभरातील विमान सुरक्षा व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले. मात्र, विमानातीलच एखादी व्यक्ती सुरक्षा व्यवस्थेसाठी धोका ठरल्यास, म्हणजेच ‘अंतर्गत धोका’ निर्माण झाल्यास त्याला रोखणे हे आजही विमान सुरक्षेसमोरील आव्हान आहे.

वैमानिक आणि क्रूच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी

अमेरिकेत सर्व वैमानिक आणि फ्लाइट अटेंडंटची नियुक्ती करण्यापूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी आणि सुरक्षा धोक्यांचे मूल्यांकन केले जाते. संबंधित व्यक्तीवर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे का किंवा ती व्यक्ती विमान सुरक्षेसाठी संभाव्य धोका ठरू शकते का, याची तपासणी केली जाते
९/११ च्या हल्ल्यांपूर्वी वैमानिक आणि केबिन क्रूच्या बाबतीत प्रामुख्याने त्यांच्या आधीच्या नोकरीचा अनुभव आणि रोजगाराची माहिती तपासली जात होती. मात्र, ९/११ च्या घटनेनंतर पूर्व सुरक्षा तपासणी अधिक कठोर करण्यात आली.

क्रू सदस्यांची ओळख पडताळणी

अमेरिकेत वैमानिक आणि इतर फ्लाइट क्रूची नियुक्ती करताना त्यांच्या वैयक्तिक ओळखीची पडताळणी केली जाते. विमानतळावर प्रवेश करताना क्रू सदस्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असते, त्यामुळे त्यांना प्रवाशांप्रमाणे नेहमीच्या सुरक्षा तपासणीतून जावे लागत नाही. मात्र, अमेरिकेच्या वाहतूक सुरक्षा प्रशासन (Transportation Security Administration) कडून त्यांची अचानक शारीरिक तपासणी केली जाऊ शकते.

मात्र, विमानातील क्रू सदस्यानेच गंभीर गुन्हा करण्याचा प्रयत्न केला, तर सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण होते. अचानक होणाऱ्या तपासणीमुळे क्रू सदस्याने विमानात शस्त्र बाळगण्यावर नियमांचा धाक नक्कीच राहतो; मात्र त्यातून एखाद्या क्रू सदस्याने दहशतवादी कृत्य करण्याचा निश्चय केला तर धोका पूर्णपणे टाळणे शक्य होत नाही.

याचे उदाहरण २०१५ मध्ये समोर आले. जर्मनविंग्सच्या विमानातील सहवैमानिकाने कॅप्टन कॉकपिटबाहेर गेल्यानंतर दरवाजा आतून लॉक केला आणि विमान फ्रेंच आल्प्समध्ये कोसळवले, त्यामुळे विमान सुरक्षा यंत्रणांना बाहेरून निर्माण होणारा धोका रोखण्यासोबतच, विमानातीलच अधिकृत व्यक्तीकडून निर्माण होणाऱ्या धोक्याचाही विचार करावा लागतो.

काही वैमानिकांना शस्त्र बाळगण्याची परवानगी

अमेरिकेत काही वैमानिकांना फेडरल फ्लाईट डेक ऑफिसर (FFDO) कार्यक्रमांतर्गत विमानाच्या कॉकपिटमध्ये शस्त्र बाळगण्याची परवानगी आहे. हा कार्यक्रम २००२ च्या होमलँड सुरक्षा कायद्यांतर्गत सुरू करण्यात आला. त्यानुसार, विमानावर गुन्हेगारी हल्ला किंवा विमान अपहरणाचा प्रयत्न झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी वैमानिकाला शस्त्राचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

९/११ पूर्वी अशी व्यवस्था नव्हती. त्यावेळी वैमानिक आणि फ्लाइट अटेंडंटची प्रवाशांप्रमाणे सुरक्षा तपासणी केली जात नव्हती आणि कॉकपिटच्या सुरक्षेसाठी फेडरल फ्लाईट डेक ऑफिसर कार्यक्रमही अस्तित्वात नव्हता. कार्यक्रम अस्तित्वात आल्यानंतर त्यात सहभागी होण्यासाठी पायलटला नियमित प्रशिक्षण घ्यावे लागते. तसेच, दर दोन वर्षांनी शस्त्र हाताळणीची पात्रता पुन्हा सिद्ध करावी लागते आणि वैद्यकीय प्रमाणपत्राचीही आवश्यकता असते.

सुरक्षा प्रशिक्षणातही बदल

अमेरिकेच्या सध्याच्या सुरक्षा नियमांनुसार फ्लाइट क्रू आणि केबिन क्रूला नियमित सुरक्षा प्रशिक्षण घ्यावे लागते. यात आत्मसंरक्षण कसे करावे आणि विमान अपहरणाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना कसा करायचा, याचे प्रशिक्षण दिले जाते.

९/११ पूर्वीच्या प्रशिक्षणापेक्षा आताची पद्धत वेगळी आहे. त्यावेळी विमान अपहरण करणाऱ्यांच्या मागण्या मान्य करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यावर अधिक भर होता. आता प्रशिक्षणात सक्रिय प्रतिकार आणि कॉकपिटचे संरक्षण यावर अधिक भर दिला जातो.

कॉकपिटचा दरवाजा अधिक सुरक्षित

९/११ पूर्वी विमानांच्या कॉकपिटचे दरवाजे तुलनेने कमकुवत होते. या हल्ल्यानंतर कॉकपिटच्या दरवाजांची रचना अधिक मजबूत करण्यात आली, जेणेकरून बाहेरून कोणी जबरदस्तीने आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला रोखता येईल. फ्लायदुबईच्या FZ1073 विमानाच्या घटनेत जखमी कॅप्टनने कॉकपिटचा दरवाजा उघडल्यामुळे काही प्रवाशांना आत जाता आले आणि त्यांनी हल्ला करणाऱ्या सहवैमानिकाला रोखल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेत नव्या विमानांच्या रचनेत कॉकपिटचा मुख्य दरवाजा उघडला असतानाही त्यामागे आणखी एक सुरक्षा अडथळा ठेवणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, हल्लेखोर आधीच कॉकपिटमध्ये पोहोचला असेल तर या उपायाचा फारसा उपयोग होत नाही. कारण विमान सुरक्षा व्यवस्थेतील बहुतांश उपाय हे प्रवाशांना कॉकपिटमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. मात्र, कॉकपिटमध्ये अधिकृतपणे प्रवेश असलेल्या वैमानिकाकडूनच धोका निर्माण झाल्यास परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते.

अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत, मात्र त्या तुलनेने दुर्मीळ आहेत, त्यामुळे वैमानिकाकडून विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी प्रत्येक परिस्थितीवर पूर्णपणे मात करणारी सुरक्षा व्यवस्था अद्याप तयार झालेली नाही. कॉकपिटमध्ये अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी ठेवला तरी एका टप्प्यावर त्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा लागतो. अखेरीस विमान चालवण्याची जबाबदारी ज्या व्यक्तींवर आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे हा विमान सुरक्षेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.