दुबई येथून इस्रायलच्या तेल अवीव शहराकडे निघालेल्या प्लायदुबई कंपनीच्या विमानात बुधवारी एक थरारक प्रसंग घडला. अवघ्या दोन मिनिटातच हे विमान तब्बल १७००० फूट उंचीवरून अचानक खाली आले. त्याचवेळी विमानात हायजॅकचा अलर्ट जारी झाल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. सुमारे ८० मिनिटांच्या थरारानंतर हे विमान सौदी अरेबियातील तबूक शहरात सुरक्षित उतरवण्यात आले. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्या धाडसामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारतीय वैमानिकाचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ‘९/११’ सारखी भीषण दुर्घटना टळली, असे ते म्हणाले. यादरम्यान विमान हवेत असताना नेमके काय घडले? वैमानिक स्मित मच्छार यांनी संभाव्य दुर्घटना कशी टाळली आणि १८० जणांचे प्राण कसे वाचवले? त्याविषयी…
फ्लायदुबईच्या विमानात नेमके काय घडले?
‘Flightradar24’ या फ्लाईट ट्रॅकिंग संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ‘फ्लायदुबई’ कंपनीचे FZ1703 हे विमान बुधवारी दुबईहून तेल अवीवच्या दिशेने निघाले होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी साडेतीनच्या सुमारास या विमानाने धावपट्टीवरून उड्डाण भरले. या विमानातून जवळपास १८० प्रवासी प्रवास करत होते. यादरम्यान ३४ हजार फूट उंचीवर असलेले विमान अचानक १७ हजार फुटांपेक्षा खाली आले. विमानाचा तोल जाऊ लागताच प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर ओमानच्या त्यांच्याच सहवैमानिकाने चाकूहल्ला केल्याने हा प्रकार घडला होता. या थरारक प्रसंगाबाबत विमानातील एका प्रवाशाने इस्रायलच्या ‘चॅनल १२’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्हाला कॉकपिटमधून आरडाओरड आणि हाणामारीचा आवाज ऐकू येत होता. त्याचवेळी विमान पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाऊन हवेत गोल फिरू लागले होते. त्यानंतर काही क्षणातच विमानाचे अपहरण झाल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आणि प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.
इस्रायलच्या पंतप्रधानांनी घटनेबाबत काय सांगितले?
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, विमान इस्रायलजवळ पोहोचत असतानाच वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर ओमानच्या सहवैमानिकाने चाकूने गंभीर हल्ला केला होता. मात्र जखमी असूनही त्यांनी सहवैमानिकाला विमानाचा ताबा घेऊ दिला नाही. तो सहवैमानिक प्रवाशांसह संपूर्ण विमान क्रॅश करण्याच्या प्रयत्नात होता. याबाबत माझे विमानातील एका इस्रायली प्रवाशाशी बोलणे झाले आहे. त्याने मला सांगितले की, विमान हवेत गरगर फिरत वेगाने खाली कोसळत होते. त्याचवेळी वैमानिक स्मित यांनी कसाबसा कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर विमानातील एका कर्मचाऱ्याने आणि प्रवाशाने कॉकपिटमध्ये प्रवेश करून त्या हल्लेखोर वैमानिकाला पकडले. विमानातील प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, स्मित मच्छार यांनी धाडस दाखवले नसते, तर ‘९/११’ सारखी भीषण दुर्घटना घडली असती. मात्र, गंभीर जखमी असतानाही भारतीय वैमानिकाने विमानावर पुन्हा ताबा मिळवला आणि सुरक्षित लँडिग करून जवळपास १८० प्रवाशांचे प्राण वाचवले.
मोदी, ट्रम्प यांच्याकडून भारतीय वैमानिकाचे कौतुक
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मच्छार यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. सहवैमानिकाचा प्रतिकार करून विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये यांना मच्छार हिरो असे संबोधले आहे. “कॅप्टन स्मित मच्छार हे एक हिरो आहेत. अत्यंत गंभीर धोक्याचा सामना करताना आणि स्वतः गंभीर जखमी असूनही, त्यांनी असीम धैर्य आणि इतरांचे प्राण वाचवण्याचा अटळ निर्धार दाखवून दिला. त्यांच्या या शौर्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले आणि एक मोठी दुर्घटना टळली. भारताला कॅप्टन मच्छार यांचा अभिमान आहे. ते लवकर बरे व्हावेत, त्यांना नव्याने बळ मिळावे आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी मी प्रार्थना करत आहे,” असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मच्छार यांच्या धाडसाचे कौतुक करत आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. ते म्हणाले की, त्या वैमानिकाने आपल्या सहवैमानिकाचा चाकू हल्ला परतवून लावला. कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि मदतीसाठी हाक मारली. त्यामुळे विमान जाणूनबुजून पाडण्याचा कथित प्रयत्न हाणून पाडण्यास मदत झाली. याबाबत आपण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली आहे, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
वैमानिक स्मित मच्छार नेमके आहे तरी कोण?
तबूक विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग झाल्यानंतर वैमानिक स्मित मच्छार यांनी सौदी अरेबियातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी रियाधमधील भारतीय दूतावासाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. सध्या दुबईत वास्तव्यास असलेल्या स्मित मच्छार यांना व्यावसायिक विमान उड्डाणाचा जवळपास १३ वर्षांहून अधिक अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी भारतातील ‘स्पाइसजेट’ या विमान कंपनीत ‘लाइन ट्रेनिंग कॅप्टन’ म्हणून सेवा बजावली आहे. तरुण वैमानिकांना मार्गदर्शन करणे आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणे यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये मच्छार यांनी पायलट होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना सल्ला दिला होता. एखाद्या विशिष्ट एअरलाइनमध्ये नोकरी मिळवणे, विशिष्ट विमान उडवणे आणि समाजमाध्यमांवर आपली प्रतिमा तयार करण्यापेक्षा विमान वाहतूक क्षेत्रातील कौशल्ये विकसित करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले होते.
घटनेची सौदी अरेबियाकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू
या थरारक घटनेनंतर काही तासांतच विमानातील १७४ प्रवासी इस्रायलमध्ये सुखरूप पोहोचले. सुरुवातीला काही प्रवाशांनी फ्लायदुबईच्या दुसऱ्या विमानात बसण्यास नकार दिला होता. या विमान कंपनीने प्रवास करण्याची भीती वाटत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. मात्र, दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आणि सौदी अधिकाऱ्यांनी इस्रायलने पाठवलेल्या विशेष विमानाला परवानगी नाकारल्याने अखेर प्रवाशांनी त्याच विमानाने प्रवास करण्यास सहमती दर्शवली. यादरम्यान सौदी अरेबियातील प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून पुरावे गोळा करण्यासाठी संबंधित तपास यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे. या चौकशीत इस्रायलही सहभागी होणार असल्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले आहे. या घटनेत इराणचा सहभाग असल्याचा तुम्हाला संशय आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सध्या याबाबत सांगणे सध्या खूप घाईचे ठरेल. कारण, हल्ला करणारा सहवैमानिक हा ओमानचा आहे. या घटनेची चौकशी होईपर्यंत फ्लायदुबईने इस्रायलला जाणारी आणि इस्रायलहून येणारी सर्व विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली आहे. आम्ही इस्रायलमधील अधिकारी आणि विमानतळ प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
