Flydubai Incident Co-Pilot Plan : फ्लायदुबईच्या विमानातील थरारक घटनेला पाच दिवस उलटले आहेत. या थरारक घटनेत विमान एक मिनिटापेक्षाही कमी वेळात १६,६२५ फूट (५,०६७ मीटर) खाली आलं होतं. परंतु, कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसामुळे विमानातील १८२ लोक बचावले. सहवैमानिकाने विमानाचा ताबा घेण्याच्या उद्देशाने स्मित मच्छार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला; पण मच्छार यांनी वेळीच कॉकपिटचा दरवाजा उघडल्याने प्रवासी आणि फ्लाईटमधील क्रूला हल्लेखोर वैमानिकाला रोखता आले, ज्यामुळे एक भीषण दुर्घटना टळली. फ्लाईटमधील हा सहवैमानिक ओमानचा असून, त्याचे नाव हम्माम अल-हम्मामी आहे. सध्या त्याची संयुक्त अरब अमिरातीकडून चौकशी केली जात आहे.
ओमानी सहवैमानिक हम्माम अल-हम्मामी याचा जाणूनबुजून विमान पाडण्याचा हेतू होता, असा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. अल-हम्मामीने चौकशीदरम्यान असे म्हटले की, आपल्याला मृत्यूची भीती वाटत नव्हती. त्याच्या या धक्कादायक जबाबामुळे या प्रकरणाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. अल-हम्मामीचे इतर देशांशी असलेले संबंधही तपासले जात आहेत. ऑस्ट्रेलियानेही या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. अल-हम्मामीने ऑस्ट्रेलियात सुमारे दोन वर्षे विद्यार्थी म्हणून वास्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे.
अल-हम्मामीने कबुलीजबाबात काय म्हटले?
सहवैमानिक अल-हम्मामीच्या चौकशीत या घटनेमागचा त्याचा कथित हेतू आणि विमान पाडण्याचे नियोजन याबाबत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. अल-हम्मामीने जबाबात म्हटले की, त्याने तेल अवीवला जाणाऱ्या विमानांची माहिती आधीच मिळवली होती आणि फ्लायदुबईचे विमान निवडण्यामागेही ठरावीक कारण होते.
चौकशीची माहिती असलेल्या सौदी अधिकाऱ्याच्या हवाल्याने द वॉल स्ट्रीट जर्नलने वृत्त दिले की, अल-हम्मामीला विमान जाणीवपूर्वक पाडायचे होते आणि त्याला मृत्यूची भीती नव्हती. सौदी अरेबिया, यूएई व इस्रायल या तिन्ही देशांनी सहवैमानिकाने विमान पाडण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. त्याचे बाहेरील कोणत्या शक्ती किंवा संस्थांशी संबंध होते का, याचाही तपास सुरू आहे.
अल-हम्मामीने तेल अवीवला कोणती विमानं जातात, याचा आधी अभ्यास केला होता. त्यानंतर त्याने फ्लायदुबईमध्ये नोकरी मिळवली, तो फेब्रुवारीमध्ये नोकरीमध्ये रुजू झाला होता. अल हम्मामीने जबाबात असेही म्हटले की, त्याने अनेक विमान कंपन्यांमध्ये नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला होता आणि फ्लायदुबईमध्ये त्याची निवड होण्यापूर्वीच विमान पाडण्याचा कट आखला होता, असे वृत्त जेरुसलेम पोस्टने दिले आहे.
अल-हम्मामीची योजना नेमकी काय होती?
अल-हम्मामीने चौकशीदरम्यान असेही म्हटले की, बेन गुरियन विमानतळावर विमान धडकवण्याचे त्याचे स्वप्न होते. काही महिन्यांपासून तो या विमानतळावर ये-जा करताना माहिती गोळा करीत होता. जुलैच्या सुमारास त्याने विमान पाडण्याचा कट रचला होता, असे इस्रायली गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने इटलीच्या कोरिएरे डेला सेराने वृत दिले आहे.
सुरुवातीला त्याची इस्रायलमध्येच विमान पाडण्याची योजना होती. मात्र, विमानात त्याचा जवळच्या सहकारी उपस्थित असल्याने त्याने ही योजना पुढे ढकलली. सप्टेंबरच्या अखेरीस त्याने पुन्हा तसा प्रयत्न केला. त्यावेळी तेल अवीवमधील एखाद्या उंच इमारतीवर विमान धडकवण्याचा त्याचा कट होता, असेही कोरिएरे डेला सेराच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
या योजनेनुसार, अल-हम्मामीला आधी भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांना ठार मारायचे होते आणि त्यानंतर विमान तेल अवीवमधील एखाद्या इमारतीवर किंवा विमानतळावर धडकवायचे होते. इस्रायली लढाऊ विमानांना हस्तक्षेप करण्याची संधी मिळण्यापूर्वीच आपण योजनेनुसार विमान खाली पाडू, असा त्याचा विश्वास होता. मात्र, कुऱ्हाडीचा घाव बसला तरीही कॅप्टन मच्छार यांनी प्रतिकार सुरू ठेवला. त्यांच्या धाडसी प्रतिकारामुळे अल-हम्मामीची योजना यशस्वी होऊ शकली नाही.
कोरिएरे डेला सेराने इस्रायली गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने वृत्तात असेही नमूद केले की, योजना फसत असल्याचे लक्षात आल्यानंतर अल-हम्मामीने विमान सौदी अरेबियातील वाळवंटी भागात पाडण्याचा प्रयत्न केला. त्याने ऑटो पायलट बंद करून विमानाचा ताबा घेतला आणि विमान अचानक खाली झुकवले. त्यामुळे विमान एका मिनिटापेक्षाही कमी वेळात सुमारे १६,००० फूट खाली आले. या घटनेत विमानातील प्रवासी आणि क्रू सदस्यांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला होता.
अल-हम्मामीला सुरक्षेसाठी धोका का मानले जातेय?
फ्लायदुबईच्या विमान घटनेच्या तपासात अल-हम्मामीची पूर्वीची नोकरी आणि वैचारिक भूमिकेबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. २९ वर्षीय अल-हम्मामीचे वडील ओमानी आणि आई सीरियन आहे. त्याने सुरुवातीला ओमान एअरमध्ये नोकरी मिळवली होती. मात्र, २०२४ मध्ये त्याच्या कट्टर विचारांमुळे त्याला वैमानिक प्रशिक्षणातून काढून टाकण्यात आले आणि विमान कंपनीत त्याला दुसरी जबाबदारी देण्यात आली.
अल-हम्मामीच्या एक्स प्लॅटफॉर्मवरील पोस्टमधून त्याची वैचारिक कट्टरता उघड झाली, ज्या पोस्ट नंतर डिलीट करण्यात आल्या होत्या. त्याचा महिलांनी नोकरी करण्याला विरोध होता आणि बुरखा घालणाऱ्या महिलांना समर्थन होते, असे पोस्ट्समध्ये दिसून आले. डिसेंबर २०२१ मधील एका पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, बनावट सोशल मीडिया खाते तयार करून सीरियन किंवा लेबनीज असल्याचे भासवत सौदी महिलांशी संपर्क साधला. या महिलांच्या काही वैयक्तिक छायाचित्रांबाबतही त्याने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्याने म्हटले होते की, महिलेने घर सांभाळण्याऐवजी बारिस्ता म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्याला एका मुलीने नकार दिला होता. याच पोस्टमध्ये त्याने आपल्या पत्नीने नोकरी करू नये, असे लिहिले होते. या जुन्या पोस्ट्स आणि २०२४ मधील विमान प्रशिक्षणातून त्याला दूर करण्याचा निर्णय यांमुळे अल-हम्मामीच्या पूर्वीच्या विचारसरणीचाही सध्याच्या तपासात आढावा घेतला जात आहे.
ओमान एअरमधील नोकरीनंतर अल-हम्मामी २०२५ मध्ये मोरोक्कोच्या राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या रॉयल एअर मॅरोकमध्ये दाखल झाला. तिथे त्याने तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र, प्रशिक्षणानंतरही नोकरीसाठी त्याची निवड झाली नाही. त्याची निवड का झाली नाही, याबाबत कंपनीने प्रतिक्रिया दिली नाही.
अल-हम्मामीच्या ऑस्ट्रेलिया कनेक्शनचीही चौकशी
अल-हम्मामी काही काळ ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असल्याचे समोर आल्यानंतर आता तिथल्या यंत्रणांनीही त्याच्या पार्श्वभूमीचा तपास सुरू केला आहे. ४ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियन जॉइंट काउंटर टेररिझम टीमने अल-हम्मामीचे ऑस्ट्रेलियाशी असलेले संबंध तपासले जात असल्याचे सांगितले. या पथकात ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस, व्हिक्टोरिया पोलिस व ऑस्ट्रेलियन सिक्युरिटी इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन (ASIO) यांचा समावेश आहे.
अल-हम्मामीने मेलबर्नमधील एका विद्यापीठात शिक्षण घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी त्याचे नेमके कोणते संबंध तपासले जात आहेत किंवा ऑस्ट्रेलियातील त्याच्या वास्तव्याचा विमान घटनेशी संबंध आहे का, याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
दरम्यान, फायनान्शियल टाइम्सने तपासाशी संबंधित दोन व्यक्तींच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियात असताना अल-हम्मामी काही कट्टर विचारसरणीशी संबंधित मशिदींमध्ये गेला होता आणि काही अतिरेकी संकेतस्थळांवरही तो सक्रिय होता. या दाव्यांचीही सध्याच्या तपासात पडताळणी केली जात आहे.
अल-हम्मामीच्या महिलांविरोधातील पोस्ट
अल-हम्मामीच्या सोशल मीडिया पोस्टचा तपास केल्यानंतर त्याची महिलांविरोधातील कट्टर विचारसरणी समोर आली आहे. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, ब्रिटनमधील बकिंगहॅमशायर न्यू युनिव्हर्सिटीत ऑनलाइन शिक्षण घेत असताना त्याने महिलांविरोधात हिंसेचे समर्थन करणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. एका पोस्टमध्ये त्याने एका महिलेला मारहाण करण्याची थेट धमकी दिली होती. दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने महिलेला ‘मर्यादा समजावून सांगण्यासाठी’ आधीच मारहाण करणे योग्य असल्याचे समर्थन केले. याहून गंभीर बाब म्हणजे पत्नी दुसऱ्या पुरुषाशी बोलताना आढळल्यानंतर तिच्यावर हिंसक हल्ला न करणाऱ्या एका पुरुषाला त्याने ‘भित्रा’ आणि ‘नीच’ म्हटले होते.
तपास यंत्रणा अल-हम्मामी पार्श्वभूमी, सोशल मीडियावरील वर्तन आणि इतर बाबींची कसून चौकशी करत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे विमान सुरक्षेतील संभाव्य त्रुटी आणि वैमानिकांच्या पार्श्वभूमीची तपासणी किती महत्त्वाची आहे, यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
