Foldable Smartphone Split Keyboard: सध्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ तांत्रिक विकासावर भर दिला जात नाही, तर ते यंत्र दिसायला किती ‘एस्थेटिक’ व प्रतिष्ठेचं प्रतीक बनलं आहे. त्याचबरोबर ते यंत्र हाताळण्यासाठी किती सोईस्कर आहे याला महत्त्व दिलं जातं. सध्या फोल्डेबल फोन्सचा मोठा बोलबाला सुरू आहे. लोकांना याचं आकर्षण यासाठी आहे की, खिशातून काढलेला नेहमीच्या आकाराचा फोन उघडला की, एका क्षणात त्याचा ७ ते ८ इंचांचा टॅबलेट बनतो. हे पाहायला जितकं आकर्षक वाटतं, तितकंच ते आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. मात्र, जेव्हा या आधुनिक यंत्रावर मेसेजेस किंवा इमेल्स टंकित करण्याची पाळी येते तेव्हा खरी पंचाईत होते.
नेहमीच्या सात इंचांच्या मोबाईलवर आपण मजकूर दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने झटपट टंकित करू शकतो. मात्र, फोल्डेबल मोबाईलच्या मोठ्या स्क्रीनवर अंगठे मध्यभागापर्यंत पोहोचवणे कठीण जाते, ज्यामुळे वापरकर्त्याच्या टंकनाचा वेग मंदावतो. या समस्येवर उपाय म्हणून सॅमसंग आणि हुवावेसारख्या दिग्गज कंपन्यांनी एका शक्कल लढवली. त्यांनी स्क्रीनवरील संपूर्ण QWERTY कीबोर्ड मधोमध कापून, त्याचे दोन भाग केले. अर्धा कीबोर्ड डाव्या हाताच्या अंगठ्यापाशी आणि दुसरा उरलेला अर्धा भाग उजव्या हातापाशी; तर मधोमध मोकळी जागा सोडली. या रचनेला तांत्रिक भाषेत स्प्लिट कीबोर्ड, असं म्हटलं जातं.
ही संकल्पना मूळ समस्येवर तोडगा वाटत असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सखोल वैज्ञानिक संशोधनानं ही संकल्पना नाकारली आहे. दोन भागांत विभागलेल्या या कीबोर्डमुळे टंकनाचा वेग वाढण्याऐवजी लक्षणीयरीत्या मंदावतो आणि बहुतांश वापरकर्ते या रचनेमुळे वैतागतात – असा निष्कर्ष या अभ्यासातून समोर आला आहे.
संशोधन काय सांगतं?
चीनमधील ‘ह्युनान विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ डिझाईन’मधील संशोधक मेंग्या दाई (Mengya Dai), निंग्यी लियांग, ली डू, ची चेन आणि प्राध्यापक डॉ. जून झांग (Dr. Jun Zhang) यांच्या नेतृत्त्वाखालील गटानं हा अभ्यास केला. मिलान (इटली) येथे पार पडलेल्या नामांकित ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सोसायटीज ऑफ डिझाईन रिसर्च’ (IASDR २०२३) परिषदेत हा शोधनिबंध सादर करण्यात आला.
स्मार्टफोनच्या विश्वात फोल्डेबल फोन हे सामान्य मोबाईल आणि टॅबलेट या दोहोंचा मिलाफ असलेलं एक अनोखं उपकरण आहे. या संशोधनाचा मुख्य हेतू असा आहे की, टॅबलेटवर वापरले जाणारे स्प्लिट कीबोर्ड तंत्र फोल्डेबल स्मार्टफोनवर कितपत यशस्वी ठरतं हे पडताळून पाहणं. या अभ्यासासाठी संशोधकांनी सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या दोन प्रमुख फोल्डेबल स्मार्टफोन्सची निवड केली:
- सॅमसंग गॅलॅक्सी झेड फोल्ड २ : ७.५ इंचाची स्क्रीन.
- हुवावे मेट एक्स २ : ८ इंचाची स्क्रीन.
या संशोधनाच्या चाचणीसाठी अशा लोकांची गरज होती, ज्यांना रोज स्मार्टफोनवर टंकन करण्याचा सराव होता. त्यामुळे असा सराव असलेले एकूण १६ अनुभवी लोक सहभागी झाले. अधिप्रमाणित निकाल मिळवण्यासाठी चाचणीदरम्यान ऑटो-करेक्ट आणि शब्द सुचवणारी प्रेडिक्शन यंत्रणा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. वापरकर्त्यांना साधी वाक्यं, अंक, विरामचिन्हं आणि विशेष चिन्हं असलेली गुंतागुंतीची वाक्यं टंकित करण्यासाठी देण्यात आली.
चाचणीत काय समोर आलं?
या संशोधनाचं प्राथमिक अनुमान असं होतं की, हे स्प्लिट कीबोर्ड तंत्र फोल्डेबल स्मार्टफोन वापरकर्त्यांना सोईचं असावं. मात्र, चाचणीतून समोर आलेल्या निकालांमधून हे प्राथमिक अनुमान पूर्णपणे चुकीचं असल्याचं स्पष्ट झालं.
- वेगात घट: टंकनाचा वेग कमी झाला आहे की नाही हे शोधून काढण्यासाठी आधी सामान्य कीबोर्डवर टंकन करताना काय वेग असतो हे शोधण्यात आलं. सॅमसंगच्या स्मार्ट फोनवर टंकनाचा वेग ९.१२ शब्द प्रतिमिनीट इतका नोंदवला गेला. मात्र, त्याच फोनवर स्प्लिट कीबोर्ड वापरताना हा वेग घसरून ८.१० शब्दांवर आला. एका वाक्यासाठी लागणारा सरासरी वेळ २३.८ सेकंदांवरून थेट २६.६ सेकंदांवर पोहोचला.
- ८०% वापरकर्त्यांचा नकार : चाचणीनंतर जेव्हा वापरकर्त्यांना या नवीन तंत्राबद्दल त्यांचं मत विचारण्यात आलं तेव्हा हुवावे स्मार्टफोनवर ७५%, तर सॅमसंग स्मार्टफोनवर ८१% वापरकर्त्यांनी स्प्लिट कीबोर्ड वापरण्याm पूर्णपणे नकार दिला. कीबोर्डचे दोन भाग करून वापरण्यापेक्षा आम्हाला अखंड कीबोर्ड अधिक सोईचा वाटतो, असं बहुतांश वापरकर्त्यांनी सांगितलं.
- किरकोळ फायदा : स्प्लिट कीबोर्डच्या वापरामध्ये एक फायदा असा झाला की, वाक्यांमध्ये टंकनाच्या चुकांचं प्रमाण किंचित कमी झालं. मात्र, स्मार्टफोनवर टंकन करण्याचा मूळ उद्देश हा तिथला वेग असल्या कारणानं त्यात झालेली घट पाहता, हा फायदा कमी महत्त्वाचा ठरला.

स्प्लिट कीबोर्ड तंत्र अपयशी का ठरलं?
‘या’ संशोधनाच्या विश्लेषणातून समोर आलेली ३ मुख्य कारणं :
डोळ्यांची लय तुटणं (visual disruption)
आपण जेव्हा स्मार्टफोनवर टंकन करत असतो तेव्हा आपल्या डोळ्यांचं लक्ष कीबोर्डच्या मध्यभागी अधिक प्रमाणात केंद्रित असतं. स्प्लिट कीबोर्डच्या तंत्रामध्ये स्क्रीनच्या अगदी मध्यभागी मोठी पांढरी मोकळी जागा तयार होते आणि शब्द तुटून, त्यातील अक्षरं स्क्रीनच्या दोन्ही टोकांना फेकली जातात. त्यामुळे वाक्याचा अर्थ लावताना नेमक्या शब्दांतील अक्षरं शोधण्यासाठी वापरकर्त्यांना डोळ्यांची हालचाल अधिक प्रमाणात करावी लागते, ज्यामुळे डोळ्यांच्या नसांवर ताण येतो आणि त्याचा विपरीत परिणाम टंकनाचा वेग कमी होण्यावर होतो.
G आणि H चं कोडं
सामान्य कीबोर्ड टंकन करत असताना सवयीप्रमाणे उजव्या हाताचा अंगठा डाव्या बाजूच्या मधल्या अक्षरांपर्यंत (उदा. G, T, V) सहज पोहोचत असतो. मात्र, कीबोर्डचे दोन भाग करताना कंपन्यांचा मोठा गोंधळ उडाला. सॅमसंगने ‘G’ हे अक्षर डाव्या बाजूच्या कीबोर्डमध्ये टाकलं, ज्यामुळे उजव्या हातानं सराईतपणे टंकन करणाऱ्या वापरकर्त्यांची बोटं स्क्रीनच्या डाव्या बाजूला पोहोचत नव्हती. त्यावर उपाय म्हणून हुवावेनं डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूंना दोन ‘G’ अक्षरं दिली; मात्र त्यामुळे “नेमकं कोणत्या हातानं टंकन करायचं?” असा मानसिक संभ्रम निर्माण झाला.
बोटांच्या स्नायूंवर ताण
कीबोर्ड दोन भागांत विभागला गेल्यामुळे दोन्ही भागांमधली बटणं आकारानं लहान झाली आणि दोन्ही ठिकाणी अक्षरांची गर्दी वाढली. त्याचबरोबर दोन्ही भाग स्क्रीनच्या कडेला चिकटून दिसायचे, ज्यामुळे हातात फोन पकडून कोपऱ्यातील अक्षर वापरण्यासाठी अंगठे जास्त वाकवायला लागतात, ज्यामुळे बोटांच्या स्नायूंवर ताण येतो.
माणसाला लागलेली सवय : मसाल्याचा डबा
आता आपल्या मनात अशी शंका येणं स्वाभाविक आहे की, जरी कीबोर्डची रचना बदलली तरी त्याचा एकदा का सराव झाला की, अडचण येण्याचा प्रश्नच उरत नाही. मात्र, जरी माणसात अनुकूलन क्षमता प्रचंड असली तरी अशा अनेक गोष्टी असतात, एखाद्या गोष्टीची जेव्हा आपल्याला सवय झालेली असते तेव्हा ती सवय सोडणं कठीण जातं उदाहरण द्यायचं झालं, तर स्वयंपाकघरातल्या मसाल्यांचा डबा बघा. आता जरी काही घरांमध्ये त्या डब्याचा आकार आणि खणांची संख्या बदलली असली तरी आजही बहुतांश घरांमध्ये पूर्वीचा मसाल्यांचा डबा प्रसिद्ध आहे. त्या डब्याची रचना ठरलेली असते, त्यात मोजून ७ खण असतात. शक्यतो मधल्या खणात हळद, लगोलग उजव्या बाजूच्या खणांमध्ये मोहरी, जिरं व हिंग उरलेल्या ३ खणांमध्ये मिरची पावडर, काश्मिरी मिरची पावडर आणि एक अधिकचा कुठलाही मसाला. घरातल्या गृहिणीचा हात मसाल्याच्या डब्यावर इतका सरावलेला असतो की, ती न पाहताही योग्य त्या खणातून पाहिजे तोच मसाला अचूक प्रमाणात जेवणात टाकते. मात्र, जर या खणांचा क्रम बदलला, तर तिची पंचाईत होईल. कारण- तिला त्या मूळ क्रमाची सवय लागलेली असते.
आपल्या बोटांचंही तसंच आहे. दीडशे वर्षांपासून QWERTY कीबोर्डवरील अक्षरांची जागा आपल्या डोक्यात आणि स्नायूंमध्ये अगदी ‘फिट’ बसली आहे. केवळ स्क्रीनचा आकार बदलला म्हणून दशकानुदशकांची सवय एका क्षणात मोडीत काढली जाऊ शकत नाही.
फोल्डेबल स्क्रीन्स हे स्मार्टफोनच्या जगाचे भविष्य असले तरी स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांनी त्यातल्या सॉफ्टवेअरची रचना करताना मानवी सवयी, दृष्टीचे नियम आणि बायोमेकॅनिक्स या बाबींचा विचार करणंही अनिवार्य आहे.
संशोधकांनी यावर असा सल्ला दिला आहे की, कीबोर्डचे दोन भाग करण्यापेक्षा असं काहीतरी तयार करण्यात यावं, ज्यामुळे कीबोर्डचा अखंड आकार कायम राहील आणि त्यातील बटणं बोटांच्या नैसर्गिक वर्तुळात कशी आणता येतील, यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
