कधी कधी आयुष्यातील काही प्रसंगांमुळे मन उदास होते, कामाचा ताण असतो, काहीतरी बिनसलेलं असतं, त्यामुळे मन उदास होतं. अशा वेळी चेहऱ्यावर चिंतेचे भाव असतात, अशा क्षणी चेहऱ्यावर साधं हसू आणण्यासाठी स्वत:ला भाग पाडावं लागतं. पण, त्यामुळे आपल्याला आतून प्रसन्न वाटू शकतं का? म्हणजे आनंदी नसतानाही आधी चेहऱ्यावर हसू आणलं, तर मनही हलकं होऊ शकतं का? याबद्दल विज्ञान काय सांगतं हेच आपण जाणून घेणार आहोत.

मानसशास्त्रज्ञांच्या मते, याचं उत्तर काही अंशी होकारार्थी आहे. हसण्यामुळे केवळ समोरच्या व्यक्तीशी संवाद साधणं सोपं होत नाही, तर स्वतःलाही बरं वाटू शकतं. चेहऱ्यावरील हावभाव आणि मनातील भावना यांचा एकमेकांवर परिणाम होतो, असं सांगणाऱ्या ‘फेशियल फीडबॅक हायपोथिसिस’ म्हणजेच ‘चेहऱ्यावरील प्रतिक्रियेच्या गृहितकावर संशोधन करण्यात आलं आहे.

स्टॅनफर्ड विद्यापीठातील मानसशास्त्राच्या प्राध्यापिका व ‘कल्चर अँड इमोशन लॅब’च्या प्रमुख जीन त्साई यांनी या संशोधनाचा संदर्भ दिला आहे. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात झालेल्या एका अभ्यासात कार्टूनची एक चित्रफीत दाखवून सहभागी व्यक्तींना ओठांमध्ये पेन्सिल धरून हसण्यास किंवा रागावण्यास सांगण्यात आले. ही चित्रफीत पाहताना हसरा चेहरा केलेल्या काही व्यक्तींना त्या चित्रफितीतील दृश्य अधिक विनोदी वाटले आणि त्यांना आनंदही झाल्याचे आढळून आले.

मग आता प्रयोगशाळेतील या अभ्यासाचा रोजच्या आयुष्याशी काय संबंध, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच? याबाबत जीन त्साई सांगतात की, वर्गात विद्यार्थ्यांसमोर हा प्रयोग करून पाहिला असता, त्याचा सकारात्मक परिणाम जाणवला. हसण्यामुळे विद्यार्थी अधिक निवांत असल्याचे पाहायला मिळाले. त्या विद्यार्थ्यांनी वर्गातील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि ते शिकण्यासाठी उत्सुक असल्याचे आढळून आले. मात्र, एखादी व्यक्ती जेव्हा एकटी असताना हसण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिच्यात एखादी आठवण जागी होत असावी आणि त्यामुळे तिचं मन प्रसन्न होत असावं, असं त्साई यांचं मत आहे.

दक्षिण कॅलिफोर्नियातील ऑरेंज काउंटी ॲकॅडमी ऑफ सायन्सेस अँड आर्ट्सच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आलं की, हसण्यामुळे मुलांचे भावनिक स्वास्थ्य सुधारण्यास, तणाव कमी होण्यास आणि विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. म्हणजेच चेहऱ्यावरचं हसू केवळ आनंद व्यक्त करण्याचं माध्यम नसून, आजूबाजूचं वातावरण आणि मनःस्थिती बदलण्याचाही तो एक मार्ग ठरू शकतो.

हसण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे

हसण्याने आपल्यातील तणाव आणि चिंता काही प्रमाणात दूर होऊ शकते. लॉस एंजेलिसमधील क्लिनिकल आणि फॉरेन्सिक न्यूरोसायकॉलॉजिस्ट, तसेच पेपरडाइन विद्यापीठातील प्राध्यापिका डॉ. जुडी हो यांनी नैराश्य किंवा चिंतेने ग्रासलेल्या काही व्यक्तींना हसण्याचा सराव करण्यास सांगितले. त्यांच्या मते, कठीण भावनिक परिस्थिती हाताळण्यासाठी एक उपाय म्हणून हसण्याचा उपयोग करता येतो. अर्थात, यामुळे सर्व समस्या सुटतील किंवा हा एकमेव उपचार आहे, असे नाही. उलट, मानसिक ताणाचा सामना करण्यासाठी उपलब्ध असलेल्या इतर उपायांसोबत थोडा हसण्याचा प्रयोग केला, तर मन:स्थिती सुधारू शकते.

हसण्यामुळे शरीरातील तणावाशी संबंधित प्रक्रियांवरही परिणाम होऊ शकतो. डॉ. जुडी यांच्या मते, हसल्याने शरीरात स्रवणाऱ्या कॉर्टिसोल या हार्मोनच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. शरीरातील तणाव आणि मनःस्थिती नियंत्रित ठेवण्यात हा हार्मोन महत्वाची भूमिका बजावतो. त्याशिवाय हसण्यामुळे मेंदूमधील सकारात्मक भावना निर्माण करणाऱ्या रसायनांच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो. एंडॉर्फिन, डोपामाइन व सेरोटोनिन या रसायनांचा आपल्या भावनांवर परिणाम होत असतो. त्यामुळे हसण्यामुळे केवळ चेहऱ्यावरील हावभाव बदलत नाहीत, तर मनःस्थिती आणि शरीराच्या तणावाला प्रतिसाद देण्याच्या प्रक्रियेशी हसण्याचा संबंध असू शकतो.

डॉ. जुडी यांनी नमूद केले की, तणावपूर्ण परिस्थितीत काम करताना चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या व्यक्तींच्या हृदयाचे ठोके काम संपल्यानंतर पूर्ववत झाल्याचे आढळले. परंतु तणावाच्या स्थितीत चेहऱ्यावर कोणतेही भाव नसलेल्या व्यक्तींमध्ये ही सुधारणा कमी प्रमाणात आढळली. हसण्यामुळे शरीरातील तणावाची काही लक्षणंही कमी होऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं.

म्हणजेच आधी मन आनंदी झालं, तरच चेहऱ्यावर हसू येतं, असं नाही. उलट, हसण्याची कृती वारंवार केली, तर मनःस्थिती हाताळण्यास मदत होऊ शकते. तणावाच्या स्थितीत सुरुवातीला केवळ चेहऱ्यावरील हास्य ठेवण्यापासून सुरू झालेली ही कृती हळूहळू भावनिक आधार देण्यास मदत करू शकते. डॉ. जुडी सांगतात की, भावनिक आधारासाठी हसणे हा मध्यस्थीचा मार्ग ठरू शकतो.

हास्याचे मूल्य काय?

हास्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक संस्कृतीत सारखा नसतो. स्टॅनफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक जीन त्साई यांच्या संशोधनानुसार, अमेरिकन संस्कृतीत नेहमी आनंदी राहण्याला आणि नकारात्मक भावना टाळण्याला अधिक महत्त्व दिलं जातं. त्याउलट पूर्व आशियाई संस्कृतीत आनंद आणि दुःख या दोन्ही भावनांमध्ये समतोल राखण्यावर भर असतो. त्यामुळे अतिआनंदी किंवा अतिदुःखी असण्यापेक्षा भावनिक संतुलन राखणं महत्त्वाचं मानलं जातं.

त्साई यांच्या आणखी एका अभ्यासात अमेरिकन आणि पूर्व आशियाई लोकांना सौम्य हसू आणि मोठ्या हास्याचे फोटो दाखवण्यात आले. त्यांना या चेहऱ्यांवरून व्यक्ती किती विश्वासार्ह आणि आपुलकीची वाटते, हे विचारण्यात आलं. काही अमेरिकन लोकांना मोठं हसू अधिक मैत्रीपूर्ण वाटलं; मात्र काही पूर्व आशियाई लोकांनी हे हावभाव भावनिकदृष्ट्या अस्थिर किंवा अविश्वसनीय असल्याचं नमूद केलं. म्हणजेच हसण्याचा अर्थ केवळ चेहऱ्यावरील हावभावांवर ठरत नाही, तर तो संस्कृतीनुसारही बदलतो. त्यामुळे जबरदस्तीनं हसल्यानं मनःस्थिती तर सुधारू शकते; पण हसण्याचा अर्थ आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकासाठी सारखा असेलच, असं नाही.