-गौरव मुठे 

भांडवली बाजाराबाबत सध्या परदेशी गुंतवणूकदार सावध बनले असून, ते मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेत असल्याचे दिसत आहे. विद्यमान २०२२ सालात भांडवली बाजारातील त्यांची विक्री ही खरेदीपेक्षा जास्त राहिलेली आहे. सरलेल्या वर्षात ऑक्टोबरमध्ये ‘सेन्सेक्स’ने ६२,२४५.४३ अंशांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठल्यानंतर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भांडवली बाजारात नफावसुलीला प्राधान्य देत मोठा निधी काढून घेतला आहे.

सात वर्षांतली गुंतवणूक पैसा सात महिन्यांत माघारी का?

नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२१ पासून परदेशी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत भांडवली बाजारातून २.५ लाख कोटी रुपयांचा निधी काढून घेतला आहे. इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणावर समभाग विक्री प्रथमच झालेली आहे. याच गुंतवणूकदारांनी २०१४ ते २०२० दरम्यान भांडवली बाजारात २.२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर २०१० ते २०२० दरम्यान ही गुंतवणूक ४.४ लाख कोटी रुपयांची होती. एफपीआयच्या भांडवली बाजारातील योगदानामध्ये निम्म्याहून अधिक घट झाली आहे. सरलेल्या मे महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी ४४,००० कोटी मूल्याचे समभाग विकले आहेत. मार्च २०२० नंतर सर्वाधिक समभाग विक्री झालेला हा महिना ठरला. तर सलग आठव्या महिन्यात त्यांच्या एकूण समभाग खरेदीच्या मूल्यापेक्षा विक्री केलेल्या समभागांचे मूल्य अधिक राहिले आहे. यामुळे शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांची पीछेहाट होत उच्चांकी पातळीपासून सुमारे ७,००० अंशांपेक्षा अधिक घट झाली आहे आणि परिणामी कंपन्यांच्या बाजार भांडवलात देखील घट झाली आहे.

परदेशी गुंतवणुकीस चालना देणारे घटक कोणते?

अर्थव्यवस्थेचा वेग वाढला की , भांडवली बाजारातदेखील उत्साहाचे वातावरण असल्याने गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा खुणावू लागतो. एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारात वर्ष २००२ मध्ये केवळ ३,६८२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तिचे मूल्य २०१० मध्ये म्हणजे अवघ्या आठ वर्षांत १.७९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. यावरून त्या काळात झालेला अर्थव्यवस्थेचा विस्तार लक्षात येईल. या दरम्यान २००८ मध्ये आलेल्या मंदीसदृश वातावरणात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली तुफान समभाग विक्रीदेखील सगळ्यांनी अनुभवली. या आर्थिक संकटातून बाहेर पडल्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी पुन्हा देशांतर्गत भांडवली बाजारात दोन लाख कोटींहून अधिक गुंतवणूक केली. याचप्रमाणे परदेशी गुंतवणूकदारांनी देशात करोनाला सुरुवात झाल्यानंतर एकट्या मार्च २०२० मध्ये भारतीय शेअर बाजारातून १.१८ लाख कोटी रुपये काढून घेतले. कारण या काळात देशभर वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले. या काळात, म्हणजे फेब्रुवारी २०२० मध्ये ४२,२७० अशांवर व्यवहार करत असलेला सेन्सेक्स २०२० मार्चमध्ये पडझड होत २५,६३० पातळीवर आला.

परदेशी गुंतवणूकदारांचा ओढा निश्चितच रोख्यांकडे वळला. कारण केंद्र सरकारकडून रोख्यांवर देण्यात येणारे व्याजदर आणि प्रत्यक्ष बाजारातील व्याजदर यातील तफावत होती. यामुळे अधिक परताव्याच्या लाभामुळे भांडवली बाजारकडून रोखे बाजाराकडे गुंतवणूक कल वाढला.

मग आता समभाग विक्रीचा सपाटा का?

एकट्या मे २०२० मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी ४४,००० कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले आहेत. मार्च २०२० आणि १९९३ नंतर एक महिन्यात झालेली ही सर्वांत मोठी समभाग विक्री आहे.

करोनाच्या उद्रेकानंतर भारतीय अर्थव्यवस्था सावरली मात्र काही क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसल्याने समन्यायी सुधारणा होऊ शकली नाही. शिवाय करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कित्येकांची उपजीविका आणि जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तर करोनाचा नवा अवतार ओमायक्रॉनच्या आगमनाने अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा अस्थिर झाला. मात्र लाट ओसरल्यावर अर्थव्यवस्थेने पुन्हा गती पकडल्याने वस्तू आणि सेवांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. परिणामी पुरवठ्याच्या बाजूने टंचाई निर्माण झाली. त्यात चालू वर्षात रशियाने युक्रेनवर हल्ला करून जगाला आर्थिक महामंदीच्या उंबरठ्यावर आणले. जगभरात वस्तूंची कमतरता निर्माण झाल्याने वस्तू आणि सेवांच्या किमती महागल्या. देशांतर्गत पातळीवर महागाई दर रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या सहनशील पातळीच्या पुढे पोहोचला. सलग चौथ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या सहा टक्क्यांच्या सहनशील पातळीपेक्षा हा दर अधिक राहिला आहे. सरलेल्या मे महिन्यात तर तो ७.८ टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाईने उद्योगधंद्यांचे कंबरडे मोडले. या प्रत्येक घटकामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेविषयी विश्वास घटत आहे. यातूनच ते गुंतवणूक काढून घेत आहेत. दुसरीकडे महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरातील प्रमुख देशांच्या बँकांनी व्याजदरात वाढ करण्यात सुरुवात केली. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने तर मुख्य व्याजाचा दर मार्चमधील ० ते ०.२५ टक्क्यांवरून मे महिन्यात ०.७५ ते १ टक्क्यांवर नेला.

परदेशी गुंतवणूकदारांच्या या विक्रीचा परिणाम काय?

जेव्हा परदेशी गुंतवणूकदार समभाग विक्री करतात त्यावेळी तो निधी त्यांच्या स्वदेशात परत पाठवतात. त्याचा स्थानिक चलनाला फटका बसतो. डॉलरला मागणी वाढल्याने रुपयाचे मूल्य घसरते. एकूणच बाजारात रुपयाचा पुरवठा वाढला की, त्याचे मूल्य कमी व्हायला सुरुवात होते.

नवप्रगत अर्थव्यवस्थांना अधिक फटका कसा?

भारतासह सर्वच उभरत्या अर्थव्यवस्था असणाऱ्या बाजारपेठांमध्ये वाढलेली महागाई, रशिया-युक्रेन युद्ध आणि उत्तरोत्तर बिकट बनत असलेली भू-राजकीय परिस्थिती आणि देशांतर्गत समभागांचे महागडे मूल्यांकन यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना या बाजारपेठा अनाकर्षक ठरत असल्याने समभाग विक्री राहिली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी भारताबरोबरच तैवान आणि दक्षिण कोरियासारख्या नवप्रगत अर्थव्यवस्था असणाऱ्या बाजारांतूनही निधी काढून घेतला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी २०२२ मध्ये आतापर्यंत तैवानमधून २८ अब्ज डॉलर तर दक्षिण कोरियामधून १२.८ अब्ज डॉलर काढून घेतले आहेत.

तरी बाजारात खूप मोठी घसरण कशी नाही?

एकीकडे परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा सुरू असल्यामुळे स्वस्त झालेले समभाग देशांतर्गत गुंतवणूकदारांनी खरेदी करून भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांना भरघोस इंधन पुरवले आणि त्यांना सरलेल्या आर्थिक वर्षात विक्रमी पातळीवर नेऊन ठेवले. देशी गुंतवणूकदारांच्या उत्साहाची ही दौड दोन कारणांमुळे होती. एक म्हणजे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये दरमहा ठरावीक रकमेची गुंतवणूक करण्याच्या ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ची अंगवळणी पडलेली स्वागतार्ह सवय. दुसरे कारण म्हणजे करोनाच्या काळात बहुतांश लोकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्याने आणि उत्पन्नाचे आणखी एक साधन म्हणून लोक भांडवली बाजाराकडे वळले. शिवाय या काळात झिरोधा, अपस्टॉक्स, ग्रोसारख्या नगण्य दलाली आकारणाऱ्या आणि तंत्रज्ञानसुलभ समभाग खरेदी विक्रीचे पर्याय उपलब्ध करून दिल्याने वित्तीय बाजारांशी निगडित बचत साधनांकडे नवगुंतवणूकदारांचा कल झुकू लागला. देशी गुंतवणूकदारांच्या त्या फेसाळत्या उत्साहापुढे मंदावणारा विकास दर, करोनामुळे कंपन्यांच्या नफ्याचे गोठलेले प्रमाण यांसारखे घटक निदान भांडवली बाजारातल्या निर्देशांकांपुरते तरी फिके पडले.