Form 6 Dyanesh Kumar Controversy : मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Form 6 मध्ये बदल नेमका कोणी केला? या प्रश्नावर आता सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवले आहे. विशेष म्हणजे Form 6 मधील कोणत्याही बदलांना आपण मंजुरी दिलेली नाही, असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले आहे, त्यामुळे या फॉर्ममध्ये बदल झाला असेल तर तो नेमका कधी, कशाच्या आधारे आणि कोणी केला याची माहिती आता न्यायालय तपासणार आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेसाठी ‘सुधारित’ फॉर्म ६ वापरण्यात आल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या नोंदी तपासून Form 6 मध्ये प्रत्यक्षात काय बदल करण्यात आला आणि त्यासाठी कोण जबाबदार होते, याची माहिती मागवली आहे.
२६ सप्टेंबरला निवडणूक आयोगाने Form 6 संदर्भात महत्त्वाचे निवेदन जारी केले होते. नियमितपणे वापरला जाणारा Form 6 आणि एसआयआरसाठी वापरण्यात आलेला Form 6 आणि यामध्ये फरक असेल असे आयोगाने स्पष्ट केले होते. पण, एसआयआरची प्रक्रिया सुरू नसताना मतदार नोंदणी नियम १९६० नुसार मूळ Form 6 च वापरला जाणार असल्याचे आयोगाने म्हटले; तर एसआयआरसाठी Form 6 शी जोडलेली अतिरिक्त घोषणा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याचेही आयोगाने नमूद केले होते.
निवडणूक आयोगाने केलेल्या याच बदलांबाबत दी इंडियन एक्स्प्रेसने केलेल्या शोधपत्रकारितेतून धक्कादायक माहिती समोर आली. २३ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयांवर दोन निवडणूक आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले होते. मतदार यादीत नवीन नावांची नोंद करणे, काही मतदारांची नावे वगळणे आणि आयोगाच्या निर्णयांबाबत इतर आयुक्तांना अंधारात ठेवणे अशा मुद्द्यांवर हे आक्षेप नोंदवण्यात आले होते.
दी इंडियन एक्स्प्रेसने जुलै महिन्यापासून निवडणूक आयोगातील कारभाराचा मागोवा घेतला. ECI च्या ECINet पोर्टलवरील ऑनलाइन Form 6 मध्ये अर्जदाराला स्वतःचे, आई-वडिलांचे किंवा आजी-आजोबांचे नाव यापूर्वीच्या एसआयआरच्या मतदार यादीत होते का, असा प्रश्न विचारला जात असल्याचे या वृत्तातून समोर आले होते. विशेष म्हणजे, या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय अर्ज सबमिट करता येत नव्हता.
यानंतर २३ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या वृत्तातून आणखी एक बाब समोर आली. निवडणूक आयुक्त विवेक जोशी यांनी १६ मे रोजी नोंदवलेल्या टिप्पणीत Form 6 मध्ये बदल करण्यासाठी मतदार नोंदणी नियम, १९६० मध्ये दुरुस्ती केल्याशिवाय फॉर्ममध्ये बदल करता येणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यांचे सहकारी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू यांनीही १९ मे रोजी या भूमिकेला सहमती दर्शवली होती. मात्र, त्यानंतरही आयोगाच्या पोर्टलवरील Form 6 मध्ये हा बदल करण्यात आला, असे दी इंडियन एक्स्प्रेसने वृत्तात नमूद केले होते.
“बदल केला तरी कोणी?” हा प्रश्न सुनावणीत केंद्रस्थानी आला. याचिकाकर्ते शैलेंद्र मणी त्रिपाठी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी दिल्लीतील एसआयआर प्रक्रियेचे उदाहरण न्यायालयासमोर मांडले. त्यांच्या म्हणण्यानुसार, नव्या Form 6 मध्ये दोन अतिरिक्त अटी जोडण्यात आल्या होत्या. हे फॉर्म वितरितही करण्यात आले आणि त्याच बदललेल्या फॉर्मच्या आधारे याचिकाकर्त्यालाही नोटीस बजावण्यात आली. मात्र, नियमानुसार Form 6 मध्ये अशा प्रकारे बदल करता येत नाहीत असा युक्तिवाद त्यांनी केला.
यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. “बदललेला Form 6 आम्ही मंजूर केलेला नाही,” असे न्यायालयाने म्हटले. तसेच, आयोगाच्या मूळ नोंदी न्यायालयासमोर आल्यानंतर “नेमका काय बदल झाला आणि तो कोणी केला?” हे तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच मुद्द्यावर पाटणा येथील रहिवासी राकेश कुमार सिंह यांनीही स्वतंत्र याचिका दाखल केली असून, Form 6 मधील बदलासंदर्भातील निवडणूक आयोगाच्या मूळ नोंदी न्यायालयात मागवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर शैलेंद्र मणी त्रिपाठी यांच्या याचिकेत दी इंडियन एक्स्प्रेसच्या तपासाचा दाखला देण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या कामकाजात गंभीर घटनात्मक उल्लंघन आणि बेकायदेशीर कृत्य समोर आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय न्यायिक चौकशी आयोग किंवा विशेष तपास पथक नेमावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
याचिकेत केवळ Form 6 मधील बदलावरच आक्षेप घेण्यात आलेला नाही, तर मतदार यादी तयार करण्याच्या आणि त्यातील बदल हाताळण्याच्या संपूर्ण प्रक्रियेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, वैधानिक Form 6 मध्ये एकतर्फी बदल करणे, तसेच कायद्याने स्थानिक पातळीवरील निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना (ERO) दिलेले वैधानिक अधिकार काढून घेऊन मतदार यादी व्यवस्थापनाचे अधिकार दिल्लीतील ECI च्या माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या महासंचालकांकडे (DG-IT) केंद्रीकृत करणे, हे त्यापैकी प्रमुख आक्षेप आहेत.
याचिकेत सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यतादेखील मांडण्यात आली. पश्चिम बंगालमधील मतदार यादीबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ७०० न्यायिक अधिकाऱ्यांनी पुनर्स्थापित केलेल्या नागरिकांची नावे पुन्हा वगळण्यासाठी, निवडणूक आयोगाच्या नावाने १६.१० लाखांहून अधिक अपील दाखल करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या अपीलांबाबत निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्त किंवा पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांना माहिती आणि अधिकार देण्यात आले नव्हते, तसेच त्यांची मंजुरीही घेण्यात आली नाही, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.
याचिकाकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत आणखी काही गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. Form 6 मध्ये एकतर्फी बदल करण्यासोबतच, मतदार यादी व्यवस्थापनाचे अधिकार स्थानिक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडून काढून ते दिल्लीतील DG-IT कडे केंद्रीकृत केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागल्याचा मुद्दाही मांडण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये ७०० न्यायिक अधिकाऱ्यांनी पुन्हा मतदार यादीत समाविष्ट केलेल्या नागरिकांची नावे वगळण्यासाठी ECI च्या नावाने १६.१० लाखांहून अधिक अपील दाखल केल्याचाही दावा आहे.
याचिकेनुसार, जुलै २०२६ मध्ये ECINet पोर्टलवर Form 6 मध्ये डिजिटल पद्धतीने बदल करण्यात आला. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू यांनी १३ ऑगस्टला हा बदल “अनधिकृत आणि बेकायदेशीर” असल्याचे नोंदवून तो तातडीने मागे घेण्यास सांगितले होते, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही बदललेला फॉर्म पोर्टलवर उपलब्ध राहिल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मे महिन्यात बिहार SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाने विशेष पुनरीक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया ठरवण्याचा आयोगाला अधिकार असल्याचे मान्य केले होते; मात्र हा अधिकार मनमानी पद्धतीने वापरता येणार नाही असेही स्पष्ट केले होते. आता बदललेल्या Form 6ला मंजुरी दिलेली नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याने, हा बदल नेमका कोणी आणि कोणत्या अधिकाराने केला याचा तपशील आयोगाच्या मूळ नोंदींमधून समोर येण्याची शक्यता आहे.
नोकरशाहीकडून अधिकारांचे केंद्रीकरण, देखरेख यंत्रणेत हस्तक्षेप आणि आयोगाच्या बहुसदस्यीय निर्णय प्रक्रियेला बगल दिल्याचे आरोप याचिकेत करण्यात आले आहेत. याचिकेत असाही दावा करण्यात आला की, आयोगातील बहुमताच्या भूमिकेला डावलून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी DG-IT च्या सहकार्याने जुलै २०२६ मध्ये ECINet पोर्टलवरील Form 6 मध्ये डिजिटल पद्धतीने बदल केला.
द इंडियन एक्स्प्रेसच्या शोधपत्रकारितेचा हवाला देत याचिकेत पुढे म्हटले आहे की, १३ ऑगस्ट २०२६ रोजी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू यांनी हा बदल “अनधिकृत आणि बेकायदेशीर” असल्याचे नोंदवले होते. या बदलामुळे पात्र तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांना विनाकारण त्रास होत असल्याचेही त्यांनी नमूद करून फॉर्म तातडीने मागे घेण्याचे आदेश दिल्याची नोंद आहे. मात्र, त्यानंतरही बदललेला फॉर्म पोर्टलवर उपलब्ध राहिल्याचे याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, बिहारमधील एसआयआरला मंजुरी देताना मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने Form 6 संदर्भात महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली होती. एसआयआरच्या गरजेनुसार आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया ठरवण्याचा आयोगाला मर्यादित अधिकार असल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते. मात्र, हा अधिकार मनमानी पद्धतीने वापरता येणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते, त्यामुळे आता बदललेल्या Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा बदल नेमका कोणी, कोणत्या अधिकाराने आणि कोणत्या प्रक्रियेद्वारे केला, असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
