प्रेयसीला ५०० हून अधिक पुरुषांबरोबर लैंगिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करणाऱ्या एका विकृत प्रियकराला फ्रान्सच्या न्यायालयाने २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. गिलॉम बुची असे आरोपीचे नाव असून त्याच्या कृत्यामुळे संपूर्ण फ्रान्समध्ये संतापाची लाट उसळली. आरोपीने पीडितेला स्वत:चे मूत्र पिण्यास आणि सार्वजनिक शौचालये चाटण्यासही भाग पाडल्याचे समोर आले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पीडितेने तिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराचा पाढाच न्यायालयासमोर वाचला.
लॅटिटिया आर असे लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या ४२ वर्षीय महिलेचे नाव आहे. पीडितेला चार अपत्ये असून आरोपी गिलॉम हा तिचा पूर्वश्रमीचा प्रियकर असल्याचे समोर आले आहे. आरोपीने लैंगिक खेळाच्या नावाखाली आपल्यावर हळूहळू नियंत्रण मिळवले आणि त्यानंतर वेश्याव्यवसायात ढकलले, असे पीडितेने न्यायालयात सांगितले आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायाधीशांनी आरोपी गिलॉम याच्या कृत्याला अत्यंत क्रूर आणि अमानली असे संबोधत त्याला २५ वर्षांच्या कठोर कारवासाची शिक्षा सुनाली आहे. या घटनेमुळे युरोपमधील महिलांच्या सुरक्षिततेचा आणि मानवी तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पीडित महिलेच्या वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यानुसार, आरोपी गिलॉम हा ऑनलाईन माध्यमातून अनोळखी पुरुषांशी संपर्क साधायचा आणि त्यांना आपल्या प्रेयसीबरोबर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्यासाठी घरी बोलावून घेत होता. लैंगिक क्रूरतेचा हा कळस २०१५ पासून २०२२ पर्यंत म्हणजेच तब्बल ७ वर्षे सुरू होता.
फ्रेंचच्या एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गिलॉम याने पीडितेचा गळा दाबणे, चटके देणे आणि प्राण्यांबरोबर लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडणे यांसारखे अत्यंत घृणास्पद गुन्हे मान्य केले. मात्र, तरीही निर्लज्जपणाचा कळस गाठत त्याने न्यायालयात मोठा दावा केला. प्रेयसीच्या संमतीनेच आपण हा लैंगिक विकृतीचा खेळ केल्याचे आरोपीने न्यायालयासमोर सांगितले. मात्र, सरकारी वकिलांनी त्याचा हा दावा खोडून काढत न्यायालयात पुरावे सादर केले. त्यामध्ये पीडित महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला ठार मारण्याची धमकी दिल्याचे स्पष्ट झाले. आरोपीकडून टाकला जाणारा दबाव आणि भीतीपोटीच पीडितेने हे विकृत कृत्य सहन केल्याचे या पुराव्यांमधून सिद्ध झाले. न्यायालयासमोर आपल्या वेदना मांडताना लॅटिटिया म्हणाली की, लैंगिक अत्याचाराचा हा कोणताही खेळ नव्हता, तर तो केवळ एक अमानुष हिंसाचार होता. गिलॉमच्या कृत्याला कंटाळून मी अनेकदा घर सोडून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने माझे खासगी व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळेच भीतीपोटी आजवर मी त्याचे क्रूर अत्याचार सहन केले.
गिलॉम हा मला दररोज एका नवीन पुरुषाबरोबर लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. त्यासाठी संबंधित व्यक्तींकडून तो मोठी किंमत घेत होता. नशेत असलेले पुरुष माझ्या शरीराचे लचके तोडायचे आणि या सर्व गोष्टीच्या मला खूपच वेदना होत होत्या. कधीकधी दोन-तीन पुरुष आळीपाळीने माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचे आणि त्यातून मला अनेकदा गर्भधारणाही झाली, पण गिलॉमने माझा गर्भपात घडवून आणला, असेही पीडितेने न्यायालयात सांगितले. द न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, लैंगिक छळाच्या या भयानक मालिकेची सुरुवात २०१५ मधील ख्रिसमसच्या आदल्या दिवसांपासून झाली. त्या रात्री आरोपी गिलॉमने पीडितेला महामार्गावरील एका सर्व्हिस स्टेशनवर अनोळखी पुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. धक्कादायक बाब म्हणजे, अनोळखी व्यक्ती पीडितेवर अत्याचार करत असताना आरोपी त्याला आणखीनच उत्तेजना देण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेनंतर त्याने आणखीनच पीडितेचा छळ करण्यास सुरुवात केली आणि तो इतर पुरुषांबरोबर संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकत होता. २०१७ मध्ये पीडितेने एका मुलीला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीने तिला एका ट्रकचालकाबरोबर लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पीडितेची चारपैकी किती मुले या संबंधातून जन्माला आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तब्बल ७ वर्षे सहन केलेल्या अमानुष छळामुळे लॅटिटियासी आज गंभीर दिव्यांगत्वाचा सामना करत आहे. तिने न्यायालयात सांगितले की, आरोपी गिलॉमने तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलले होते. इतक्यावरच न थांबता त्याने पीडितेला शरीरसंबंध ठेवलेल्या पुरुषांची यादीही तयार करण्यास भाग पाडले होते. “४८७ पुरुषांनंतर मी यादी तयार करणे थांबवले. मला असे वाटायचे की माझे आतल्या आत मरण होत आहे. माझ्यावर लादण्यात आलेल्या प्रत्येक घृणास्पद कृत्याबरोबर माझ्या शरीराचा आणि मनाचा एक भाग कायमचा तुटला,” असे पीडितेने न्यायालयात सांगितले. यादरम्यान आरोपी गिलॉमने या प्रकरणाची सुनावणी बंद दाराआड व्हावी, अशी मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने पीडितेला विचारले असता तिने जाहीर सुनावणीचा पर्याय निवडला. सरकारी वकिलांनी आरोपी गिलॉमला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली होती. हा व्यक्ती तुरुंगाबाहेर आल्यास तो इतर कोणत्याही महिलेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो, असा युक्तिवाद त्यांनी केला. सर्व पुरावे आणि साक्ष तपासल्यानंतर न्यायालयाने अखेर गिलॉमला २५ वर्षांच्या तुरुंगवासाची कठोर शिक्षा सुनावली. तसेच, या शिक्षेचा किमान दोन-तृतीयांश काळ पूर्ण केल्याशिवाय तो पॅरोलवर (तात्पुरता जमीन) सुटकेसाठी पात्र ठरणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णयही न्यायालयाने दिला.
