आपल्या देशात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असतानाच फ्रान्समधूनही अशा प्रकारच्या आंदोलनाच्या बातम्या येत आहेत. फरक इतकाच की आपल्याकडील आंदोलने जेन-झींनी हातात घेतली आहेत, तर फ्रान्समधील जेन-अल्फा रस्त्यावर उतरली आहे.
फ्रान्समधील विद्यार्थी निदर्शने का करत आहेत?
पॅरिसच्या काही उपनगरांमध्ये सुरू झालेली विद्यार्थ्यांची निदर्शने गेल्या काही दशकांमध्ये दिसली नव्हती. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील शिक्षणाची स्थिती आणि अस्थिर भवितव्याविषयी चिंता यातून विद्यार्थी संतप्त झाल्याचे मानले जात आहे. सध्या तेथील शालेय विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांची कमतरता, वर्गांमधील विद्यार्थ्यांची गर्दी आणि शाळांमधील कमी दर्जाच्या पायाभूत सुविधा या प्रमुख समस्या आहेत. फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात शाळा बंद झाल्यामुळे या समस्या उद्भवत असल्याचे दिसते. परिणामी अनेक हायस्कूलमध्ये एकेका वर्गात सध्या ४० विद्यार्थी असल्याची तक्रार केली जात आहे. आधी विद्यार्थीसंख्या सामान्यपणे ३०पर्यंत असे. भारतात ही संख्या अगदी सामान्य मानली जात असली तरी कमी लोकसंख्येच्या फ्रान्ससारख्या देशामध्ये हा आकडा खूप मोठा आहे.
अन्य तक्रारी कोणत्या?
फ्रान्समधील हायस्कूलच्या वेळा अतिशय दीर्घ असल्याचे दिसत आहे. काही शाळांचे नियमित कामकाज सकाळी आठ ते संध्याकाळी पाच म्हणजे नऊ तास इतके चालते. इतका वेळ शाळेत घालवण्याची किशोरवयीन विद्यार्थ्यांची क्षमता आाहे का ही बाब विचारात घेतल्याचे दिसत नाही. याशिवाय, शाळांमध्ये पुरेशा वैद्यकीय सोयी नसल्याचा मुद्दा आहे. आपल्याशी भेदभाव होत असल्याचा दावा निम्न आर्थिक परिस्थितीमधील विद्यार्थी करत आहेत.
ही निदर्शने कशी सुरू झाली?
पॅरिसच्या क्रेतेई या उपनगरामध्ये २१ सप्टेंबरला एका हायस्कूलमध्ये शिक्षकांची संख्या वाढवण्याच्या मागणीवरून उत्स्फुर्त निदर्शने सुरू झाली. त्यापूर्वी १७ सप्टेंबरला क्रेतेईमधील सेंट-एक्सपेरी हायस्कूलच्या शिक्षकांनी कमी कर्मचारी संख्या आणि अपुरी संसाधने याविरोधात निदर्शने केली. त्यामध्ये विद्यार्थीही सहभागी झाले. या निदर्शनांचे लोण आधी आजूबाजूच्या परिसरांमध्ये आणि नंतर संपूर्ण फ्रान्समध्ये पसरले. या निदर्शनांचा भडका १० दिवसांनंतर आणखी वाढला. १ ऑक्टोबरला विद्यार्थ्यांनी बंद पुकारला, त्यामध्ये देशातील ३,६०० हायस्कूलपैकी जवळपास ३० टक्के शाळा सहभागी झाल्या. त्यानंतर दर दिवशी वाढत्या संख्येने शाळांमध्ये निदर्शने वाढू लागली. लहान-मोठ्या शहरांमध्ये हजारो वि द्यार्थी रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी त्यांना शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला. एकट्या पॅरिस भागातील १६० हायस्कूल सोमवारी ५ ऑक्टोबरला बंद होती. आकडेवारीत सांगायचे तर त्या भागातील एक तृतीयांश शाळा बंद राहिल्या. तर संपूर्ण देशातील ४०० ते ५०० शाळांवर बंदचा प्रभाव जाणवल्याचे शैक्षणिकमंत्री एडुआर्ड जेफ्रे यांनी मान्य केले, पण हळूहळू शाळा पूर्ववत होत असल्याचा दावाही केला.
निदर्शनांदरम्यान काय घडले?
सोमवारी झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. विद्यार्थ्यांनी शाळा बंद केल्या. कचऱ्याचे डबे पेटवून दिले आणि काही ठिकाणी शाळांचे फर्निचर, दरवाजे आणि खिडक्यांचीही तोडफोड करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ४० शाळांमध्ये या प्रकारच्या घटना घडल्या. त्यामध्ये जवळपास ३० लाख युरोंचे (३२.५ कोटी रुपये) नुकसान झाले. यादरम्यान विद्यार्थ्यांचा पोलिसांशी संघर्ष झाला. विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबरी गोळ्याही चालवल्या. या संघर्षात विद्यार्थ्यांसह हायस्कूलचे ४० मुख्याध्यापक आणि अन्य २५ कर्मचारी जखमी झाले, अशी माहिती शैक्षणिक मंत्रालयाने दिली. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून चार हजार लोकांना अटक करण्यात आली आहे.
ही निदर्शने ऐतिहासिक का मानली जात आहेत?
या निदर्शनांचे स्वरूप आणि व्याप्ती, दोन्ही पाहता, ही देशातील किशोरवयीन मुलांची सर्वात मोठ्या चळवळींपैकी एक ठरू पाहत आहे. येत्या काही काळात हे प्रमाण आणखी वाढलेले पाहायला मिळेल आणि फ्रान्सला एखादी ऐतिहासिक चळवळ पाहायला मिळेल, या संकटावर उपाय करण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतील असा अंदाज एसएनईएस-एफएसयू या फ्रान्समधील शिक्षक संघटनेच्या प्रमुख सोफी व्हेनेटिटे यांनी व्यक्त केला आहे. फ्रान्सचे अधिकारीही यासारख्या निदर्शनांसाठी पुरेशा तयारीत नसल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे.
राजकीय प्रतिसाद कसा?
विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी हिंसाचार खपवून घेणार नाही, ही अपेक्षित भूमिका सरकारने घेतली आहे. तर पोलिसांनी बळाचा अतिरिक्त वापर केल्याचा विद्यार्थी आरोप करत आहेत. फ्रान्समध्ये पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यात अध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. अशा वेळी राजकीय नेत्यांनी या निदर्शनांकडे दुर्लक्ष करणे किंवा निदर्शनांना राजकीय वळण न मिळणे अशक्य होते. शिक्षणमंत्री जेफ्रे यांनी आता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी अभिप्राय उपक्रमाची घोषणा केली आहे. हा विद्यार्थ्यांची नाराजी जाणून घेण्याचा आणि कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. त्याबरोबरच तातडीने शिक्षकभरती सुरू करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे.nima.patil@expressindia.com
