France Fridge Cyber Attack : फ्रान्समध्ये हादरवणारी घटना घडली आहे. फ्रान्समधील सुपरमार्केटच्या फ्रिजवर सायबर हल्ले झाले आहेत. हॅकर्सनी फ्रिज आणि रेफ्रिजरेशन (शीतकरण) यंत्रणेवर ताबा मिळवत फ्रिजचे तापमान वाढवले. यामुळे यंत्रणेत बिघाड होऊन अन्नपदार्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी आगीच्या घटनाही घडल्या आहेत. या सायबर हल्ल्यांचा फ्रान्समधील अनेक सुपरमार्केटला फटका बसला असून फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
या हल्ल्यात हॅकर्सनी थेट सुपरमार्केटमधील यंत्रणांवर ताबा मिळवला. अशा प्रकारच्या असामान्य हल्ल्यांमुळे मोबाईल, संगणक किंवा इंटरनेटशी जोडलेल्या उपकरणांपलीकडेही धोका निर्माण झाला आहे.
सायबर हल्ला नेमका कसा झाला?
मोठ्या अन्नविक्री साखळ्यांनी सोमवारी, १२ ऑक्टोबरला अचानक त्यांच्या फ्रिज आणि फ्रिजरमध्ये बिघाड झाल्याची तक्रार केली. त्यानंतर पॅरिसच्या सरकारी वकिलांच्या कार्यालयाने स्पष्ट केले की, अन्नविक्री कंपन्यांमधील इंटरनेटशी जोडलेल्या फ्रिजवर मोठा सायबर हल्ला झाला आहे.
वृत्तानुसार, हॅकर्सने नियोजितपणे शीतकरण यंत्रणांचा ताबा घेत फोर्स्ड डीफ्रॉस्टिंग हे फिचर सुरू केलं. या प्रक्रियेमुळे फ्रिजमधील बर्फ वितळवला जातो. मात्र, हल्लेखोरांनी या यंत्रणेचा गैरवापर करून तापमान वाढवलं. काही फ्रिज आणि फ्रिजरमधील तापमान तर तब्बल ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचं वृत्त आहे. जे सहा तास त्याच पातळीवर ठेवण्यात आले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्न खराब झाले.
या हल्ल्याचा सुपरमार्केट चालकांना मोठा धक्का बसला आहे. फ्रिज आणि फ्रिजरमधील तापमान वाढल्याने तिथे ठेवलेले ताजे किंवा गोठवलेले अन्न काहीच मिनिटांत खराब झाले, ज्यामुळे सुपरमार्केट्सना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. इंटरमार्शे या सुपरमार्केट साखळीची मूळ कंपनी असलेल्या लेस मूस्केटेअरने माहिती दिली की, त्यांच्या सुमारे १५० स्टोअरवर या हल्ल्यांचा परिणाम झाला. ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी कंपनीने बाधित अन्नपदार्थ फेकून दिले.
सुपरमार्केट साखळ्यांमधील अनेक कंपन्यांना याचा फटका बसला. कोऑपरेटिव्ह यू च्या १०० हून अधिक स्टोअर्सवर या हल्ल्याचा परिणाम झाला. मोनोप्रिक्सच्या स्टोअरमधील कामकाजातही अडथळे आले, तर ‘इंटरमार्शे’ आणि त्यांच्या ‘नेट्टो’ या ब्रँडच्या १८० दुकानांनादेखील याचा फटका बसला. या संपूर्ण प्रकरणामुळे कंपन्यांचं नेमकं किती आर्थिक नुकसान झालं, याची नेमकी आकडेवारी समोर आलेली नाही.
इंटरमार्शेचे मुख्य कार्यकारी अधिकारी थियरी कोटियार्ड यांनी फ्रान्समधील बीएफएम टीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, या एका दिवसाच्या हल्ल्यामुळे देशभरातील सुपरमार्केट कंपन्यांना कोट्यवधी युरोंचं नुकसान होऊ शकतं.
हॅकर्सने फ्रिजचं तापमान कसं वाढवलं?
सुपरमार्केटमधील शीतकरण यंत्रणा केंद्रीकृत नियंत्रण डिजिटल प्रणालीद्वारे चालवली जाते. या प्रणालीमुळे कर्मचारी आणि देखभाल करणाऱ्या तंत्रज्ञांना एकाच ठिकाणाहून वेगवेगळ्या फ्रिजचं तापमान तपासता येतं. तसंच, थंडावा टिकवण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया नियंत्रित करणं आणि उपकरणांमधील बिघाड दूर करण्यासाठी दूरूनच त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य होतं. या सायबर हल्ल्यात डिजिटल यंत्रणांमधील सुरक्षेतील त्रुटींचा फायदा घेतला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
मोठ्या सुपरमार्केटमध्ये अनेक फ्रिज आणि फ्रिजरचं व्यवस्थापन एकाच ठिकाणाहून करता यावं, यासाठी ही रिमोट कंट्रोल यंत्रणा उपयुक्त ठरते. मात्र, या यंत्रणांना पुरेसं सुरक्षा कवच नसेल किंवा त्यांचं सॉफ्टवेअर जुनं असेल तर हॅकर्सना त्यात शिरकाव करण्याची संधी मिळू शकते. फ्रान्समधील हल्ल्यातही हॅकर्सनी फ्रिजच्या नियंत्रण यंत्रणेत फेरफार केल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी फ्रिजमधील बर्फ वितळवण्यासाठी वापरले जाणारे डीफ्रॉस्ट ऑप्शन अचानक सुरू केले, ज्यामुळे फ्रिजमधील तापमान वाढलं आणि अन्नपदार्थ खराब झाले.
शीतकरण यंत्रणा तयार करणाऱ्या डॅनफॉस कंपनीने सांगितलं की, ज्या शीतकरण यंत्रणांवर हल्ले झाले, त्यात सॉफ्टवेअरची जुनी आवृत्ती वापरली जात होती. डॅनफॉसने त्यांच्या ग्राहक कंपन्यांना अद्ययावत सॉफ्टवेअर उपलब्ध असलेल्या यंत्रणेचा वापर करण्याचा आणि जुन्या तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा अपडेट करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, या सायबर हल्ल्याचा तपास अद्याप सुरू आहे. हा हल्ला नेमका कोणी केला, याबाबत तपास यंत्रणांनी कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
फ्रान्समधील कोणत्या सुपरमार्केट्स साखळींना फटका?
कोऑपरेटिव्ह यू, इंटरमार्शे, नेट्टो, मोनोपिक्स या कंपन्यांसह ई. लेक्लर्क आणि ऑशान यांसारख्या फ्रान्समधील अन्य रिटेल साखळ्यांनाही फटका बसल्याचे वृत्त समोर आले आहे. हल्ल्यामुळे या कंपन्यांसमोर खराब झालेला अन्नसाठा हटवणं, नुकसान झालेल्या उपकरणांची दुरुस्ती करणं आणि फ्रिज-फ्रिजरची यंत्रणा पुन्हा सुरळीत सुरू करणं अशी आव्हानं उभी राहिली. कंपन्यांना बाधित अन्नपदार्थांची तपासणी होईपर्यंत आपल्या काही स्टोअर्समधील फ्रिजचे विभाग बंद ठेवावे लागले किंवा त्यातील अन्नपदार्थ हटवण्याची वेळ आली, ज्यामुळे ग्राहकांना काही ठिकाणी रिकामे किंवा बंद केलेले रेफ्रिजरेटर दिसून आले.
अन्नपदार्थांची सुरक्षा यंत्रणा
सुपरमार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवलेले अनेक अन्नपदार्थ ठराविक तापमानात साठवून ठेवणं आवश्यक असतं. मांस, मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि गोठवलेले अन्नपदार्थ ठेवलेल्या शीतकरण यंत्रणेतील बिघाडामुळे तापमान मर्यादेपलीकडे वाढू शकते आणि ज्यामुळे अन्न खराब होऊ शकतात.
अशा वेळी फ्रिज पुन्हा सुरू केला तरी त्यातील अन्नपदार्थ लगेच पूर्वस्थितीत येत नाहीत. यासाठी तापमान वाढलेल्या फ्रिजमधील अन्नपदार्थांची तपासणी करून ते वापरण्यायोग्य आहेत की नाही हे ठरवणं आवश्यक असतं. फ्रान्समधील या हल्ल्यामुळे अन्नपदार्थांचं नुकसान तर झालंच, शिवाय काही ठिकाणी आगीच्या घटना घडल्याचेही वृत्त आहे. मात्र, या आगी नेमक्या कशामुळे लागल्या, यासंबंधी कोणतीही माहिती समोर आली नाही.
हा सायबर हल्ला केवळ फ्रान्सपुरता मर्यादित आहे का?
फ्रान्सबाहेरील देशांमध्ये असे हल्ले झालेत का, हे जाणून घेण्यासाठी फ्रान्स अधिकारी इतर देशांशी समन्वय साधत आहेत. मात्र, या हल्ल्याचा इतर देशांशी काही संबंध आहे का आणि त्याची व्याप्ती किती मोठी आहे, हे सुरुवातीला समोर आलेले नाही. फ्रान्समधील इतर व्यवसायांमध्येही अशाच प्रकारच्या सायबर हल्ल्याचा धोका आहे का याची तपासणी अधिकारी करत आहेत, त्यामुळे या घटनेचा परिणाम केवळ सुपरमार्केटपुरता मर्यादित आहे की इंटरनेटशी जोडलेल्या इतर व्यावसायिक यंत्रणांनाही अशा प्रकारचा धोका आहे, याचा तपास सुरू आहे.
