एखाद्या ठिकाणी मोठी आग लागली की कसे आगीच्या धुराचे मोठे लोळ उठतात, हे आपल्याला ठाऊक आहे. पण कल्पना करूया की हे लोळ पुढे ढग होऊन कित्येक किलोमीटरपर्यंत पसरले तर काय भीषण परिस्थिती निर्माण होईल. सध्या फ्रान्स हा देश या संकटातून जात आहे. या ढगांना काय म्हणतात, त्यांचा परिणाम काय होतो?… जाणून घेऊ…
अग्निमेघ म्हणजे काय?
फ्रान्स आणि स्पेनमध्ये अलीकडील काळातील सर्वात भीषण वणव्यांशी झुंज सुरू असताना, तज्ज्ञांनी आणखी एका अभूतपूर्व धोक्याचा इशारा दिला आहे. हा धोका म्हणजे पायरोक्युम्युलोनिंबस किंवा ‘फायर क्लाउड’चा म्हणजेच अग्निमेघ. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, पायरोक्युम्युलोनिंबस हा जंगलातील भीषण आगीमुळे तयार होणारा प्रचंड वादळी ढग आहे. उष्णता, कोरडे हवामान आणि वेगवान वारे यांचा संगम झाल्यास जंगलातील आग वेगाने पसरते. मात्र, काही अतिभयंकर आगी इतक्या तीव्र असतात की त्या स्वतःची हवामान प्रणाली तयार करतात. पायरोक्युम्युलोनिंबस किंवा आगीमुळे तयार होणारे वादळी ढग हे त्याचे सर्वात गंभीर उदाहरण आहे.
हे ढग कसे तयार होतात?
सामान्यपणे ढग तयार होण्यासाठी उबदार, ओलसर हवा वर जाते. मात्र पायरोक्युम्युलोनिंबस तयार होण्यामागचे कारण असते जंगलातील प्रचंड आग. जंगलात मोठ्या प्रमाणावर आग लागते. आगीमुळे आसपासची हवा प्रचंड तापते. ही अतिउष्ण हवा धूर, राख आणि वाफ घेऊन वेगाने अनेक किलोमीटर उंच जाते. वर गेल्यावर हवा थंड होते आणि त्यातील वाफेचे सूक्ष्म थेंब किंवा बर्फकण तयार होतात. त्यातून प्रचंड उंच, काळसर क्युम्युलोनिंबससारखा ढग तयार होतो. त्यालाच पायरोक्युम्युलोनिंबस म्हणतात. या ढगांमधून विजा चमकू शकतात आणि जोरदार वारेही निर्माण होऊ शकतात.
हे ढग किती उंच असू शकतात? त्यांचे परिणाम काय होतात?
हे ढग साधारण १० ते १६ किलोमीटर, तर काही वेळा २० किलोमीटरपेक्षाही अधिक उंचीपर्यंत जाऊ शकतात. म्हणजेच ते वातावरणाच्या वरच्या स्तरापर्यंत पोहोचू शकतात. हे ढग फक्त धूर तयार करत नाहीत, तर ते स्वतःच हवामान बदलू शकतात. विजांचा कडकडाट होऊ शकतो. कोरडी वीज पडून नवीन जंगलांना आग लागू शकते. ताशी १०० किमीपेक्षा अधिक वेगाचे वारे निर्माण होऊ शकतात. धूर आणि राख हजारो किलोमीटर दूरपर्यंत पसरू शकते. काही वेळा अग्निभोवरे (Fire Whirls) तयार होतात. पायरोक्युम्युलोनिंबस ढग धूर आणि सूक्ष्म कण वातावरणाच्या अतिउंच थरांमध्ये पोहोचवतात. हे कण अनेक आठवडे किंवा महिन्यांपर्यंत तिथे राहू शकतात. त्यामुळे सूर्यप्रकाशावर परिणाम होतो. हवेच्या गुणवत्तेत मोठी घट होते. काही भागांतील तापमान आणि हवामानावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो.
आग अत्यंत तीव्र असेल तर काय होते?
जर जंगलातील आग अत्यंत मोठी आणि तीव्र असेल, तर तिच्या धुराच्या लोटातून १० ते १५ किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचणारा आणि वातावरणाच्या समतापमंडळात (स्ट्रटोस्फीअर) प्रवेश करणारा पायरोक्युम्युलोनिंबस ढग तयार होऊ शकतो. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा या ढगांना ‘ढगांमधील अग्नी उगळणारा ड्रॅगन’ असे संबोधते. न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील वणवा संशोधन गटाचे प्राध्यापक रिक मॅक्रे म्हणतात, “हा आगीच्या धुराच्या लोटात तयार होणारा पूर्ण विकसित वादळी ढग असतो. तो सुमारे १० हजार घन किलोमीटर वातावरण व्यापू शकतो. त्यामुळे त्याचा परिणामही मोठा असतो.”
कोणत्या ठिकाणी हे ढग जास्त दिसतात?
ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिकेतील कॅलिफोर्निया, रशियातील सायबेरिया येथे पायरोक्युम्युलोनिंबस ढग तयार होतात. हवामान बदलामुळे उष्णता आणि दुष्काळ वाढत असल्याने अशा ढगांच्या घटना वाढत असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे.
सामान्य ढग आणि अग्निमेघ यातील फरक काय?
सामान्य ढग उष्ण व ओलसर हवेमुळे तयार होतो तर क्युम्युलोनिंबस जंगलातील प्रचंड आगीमुळे तयार होतो. सामान्य ढग पाऊस, वादळ निर्माण करतो तर क्युम्युलोनिंबस धूर, राख, वीज आणि तीव्र वारे निर्माण करू शकतो.
अग्निशमन दलासाठी किती गंभीर स्थिती?
हे ढग तयार झाल्यावर ते अशा प्रकारचे वारे निर्माण करतात की, त्यामुळे खाली पेटलेली आग आणखी वेगाने पसरते. काही वेळा या ढगांमधून विजाही पडतात. त्या विजांमुळे दूरवरच्या भागातही नवीन वणवे सुरू होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, या ढगांमुळे निर्माण होणारे वेगवान आणि अनिश्चित वारे आगीचा मार्ग सतत बदलत राहतात. त्यामुळे आग विझवणाऱ्या अग्निशमन दलासाठी परिस्थिती अधिक धोकादायक बनते. युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्सचे सहयोगी प्राध्यापक रिक मॅक्रे यांच्या मते, “फायर क्लाउड दिसणे म्हणजे आग अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचल्याचा स्पष्ट संकेत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा निर्णय योग्य असल्याचेही ते दर्शवते.”
अग्निमेघांचे प्रमाण का वाढत आहे?
ऑस्ट्रेलियामध्ये या शतकाच्या सुरुवातीपासून असे अग्निमेघ दिसू लागले असून, त्यांचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. २०२२ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील भीषण वणव्यादरम्यानही असे ढग तयार झाले होते. मात्र, फ्रान्ससाठी ही घटना पूर्णपणे नवी असू शकते. तज्ज्ञांच्या मते, फ्रान्समधले आगीच्या लोळाने तयार झालेले ढग अग्निमेघच आहेत, याला दुजोरा मिळाल्यास फ्रान्समध्ये प्रथमच पायरोक्युम्युलोनिंबस ढगाची नोंद होईल. मॅक्रे म्हणतात, “फ्रान्सला प्रथमच ‘पायरोसीबी’ (पायरोक्युम्युलोनिंबस) या संकल्पनेचा गंभीरपणे विचार करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी असे ढग तयार झाले होते की नाही, हा मुख्य मुद्दा नाही. यापुढील काही दिवसांत असे ढग पुन्हा तयार होण्याची शक्यता किती आहे, हा खरा प्रश्न आहे.”
ढग आताच अधिक का दिसू लागले आहेत?
हवामान बदलामुळे जगभरातील वणवे अधिक तीव्र होत आहेत. त्याचबरोबर पायरोक्युम्युलोनिंबस ढग तयार होण्यासाठी पोषक परिस्थितीही वाढत आहे. मॅक्रे म्हणतात, “हे केवळ तापमान वाढण्यापुरते मर्यादित नाही. हा हवामान बदलाचा व्यापक परिणाम आहे. वातावरणातील बदल, पृष्ठभागावरील हवामानातील बदल आणि अनेक घटक यासाठी कारणीभूत आहेत.” हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, भविष्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. युरोपमधील वणवे पर्यटनाच्या हंगामात लागले आहेत. मे महिन्यापासून पुरेसा पाऊस न पडल्याने जंगलातील वनस्पती पूर्णपणे कोरड्या झाल्या आहेत. त्यातच सलग उष्णतेच्या लाटांमुळे आग अधिक भीषण झाली आहे. हवामान विभागाने अलीकडेच फ्रान्समध्ये आणखी एका उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, काही भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
manisha.devne@expressindia.com
