पॅरिसमध्ये २४ मेपासून सुरू होणार्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेपूर्वी जगातील आघाडीच्या टेनिसपटूंनी पारितोषिक रकमेवरून आयोजकांना घेरले आहे. रकमेतील वाढ फसवी असून, प्रत्यक्ष महसुलातील खेळाडूंचा वाटा कमी आहे, असे टेनिसपटूंचे म्हणणे आहे.

आघाडीचे टेनिसपटू आयोजकांवर का संतापले?

आर्थिक पारदर्शकता आणि महसूल वाटपावरून निर्माण झालेली दरी हे या संतापाचे मुख्य कारण आहे. नोव्हाक जोकोविच आणि यानिक सिन्नेर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, फ्रेंच टेनिस व्यवस्थापनाने विक्रमी व्यावसायिक यश मिळवले असले, तरी पारितोषिक रकमेतील १० टक्के वाढ ही या वाढीच्या तुलनेत कमी आहे. खेळाडूंचा वाटा २०२४ मधील १५.५ टक्क्यांवरून २०२६ मध्ये प्रत्यक्षात १४.९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

व्यावसायिक टेनिसपटूंच्या संघटनेच्या माध्यमातून हे खेळाडू एकूण महसूलात २२ टक्के वाट्याची मागणी करत आहेत, जेणेकरून तो इतर मोठ्या जागतिक क्रीडा लीगच्या बरोबरीचा असेल. त्याचबरोबर, खेळाडूंचे प्रतिनिधित्व, आरोग्य सुविधा आणि निवृत्तिवेतन अशा मागण्यांकडेही चारही ग्रँडस्लॅम आयोजक दुर्लक्ष करत असल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जर आयोजकांनी या वादाचे निवारण केले नाही, तर कायदेशीर मार्ग निवडण्याचे संकेतही खेळाडूंनी दिले आहेत.

मागण्या मान्य न झाल्यास खेळाडूंची भूमिका काय?

कायदेशीर कारवाईबरोबरच टेनिसपटूंनी संघटनेमार्फत यंदाच्या फ्रेंच स्पर्धेवरच बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी आठवड्याच्या सुरुवातीला एका निवेदनाद्वारे पारितोषिक रकमेत वाढ करूनही त्यांचा वाटा स्पर्धेच्या एकूण महसुलाच्या १५ टक्क्यांच्या खालीच राहण्याची शक्यता वर्तवली आणि त्यानंतर यात वाढ करण्याचा आग्रह धरला होता. टेनिसपटूंच्या संघटनेकडून सलग दोन दिवस वेगवेगळी निवेदने प्रसिद्धीस देण्यात आली.

मात्र, अद्याप फ्रेंच टेनिस आयोजकांकडून त्याला कसलाच प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळे आघाडीची टेनिसपटू अरिना सबालेन्काने थेट स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन टेनिसपटूंना केले आहे. अर्थात, तो अंतिम पर्याय असेल; आमची चर्चा सुरू असून, यावर निश्चित तोडगा निघेल, अशी आशा सबालेन्काने व्यक्त केली आहे. पारितोषिक रकमेच्या वाढीबरोबर सबालेन्काने अन्य आरोपही स्पर्धा संयोजकांवर केले आहेत. त्यामध्ये तिने केलेला लिंगभेदाचा आरोप चर्चेत आला आहे.

ग्रँड स्लॅममध्ये फ्रेंच स्पर्धेचे पारितोषिक कमी?

विम्बल्डन, फ्रेंच, ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन टेनिस स्पर्धा या चार ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत. चारही स्पर्धांमध्ये पुरुष आणि महिला एकेरीतील विजेत्यांना समसमान रकमेची पारितोषिके मिळतात. सन २०२५ चा विचार केल्यास सर्वांत जास्त रक्कम अमेरिकन टेनिस स्पर्धेत (प्रत्येकी पाच दशलक्ष डॉलर्स) दिली गेली. त्या खालोखाल विम्बल्डन (प्रत्येकी ४.१२ दशलक्ष डॉलर्स), फ्रेंच (प्रत्येकी २.९० दशलक्ष डॉलर्स), ऑस्ट्रेलियन (प्रत्येकी २.१५ दशलक्ष डॉलर्स) अशी पारितोषिके दिली गेली.

सबालेन्काचा नेमका आरोप काय?

फ्रेंच स्पर्धेत पुरुषांना अधिक संधी किंवा त्यांच्या सामन्यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे सबालेन्काने म्हटले आहे. ट्युनिशियन टेनिसपटू ओन्स जाबेऊर हिची साथही सबालेन्काला मिळत आहे. या दोघींनी स्पर्धेतील रात्रीच्या मुख्य वेळेतील वेळापत्रकातील फरक पुढे आणला. येथे २०२१ पासून रात्री झालेल्या ४४ पैकी केवळ चार सामन्यांमध्ये महिला टेनिसचा समावेश होता. सामन्याच्या वेळापत्रकावरून, तसेच रात्रीच्या मुख्य वेळी महिला सामन्यांना मिळत नसलेल्या संधीवरून आयोजक समान वागणूक देत नसल्याचे महिला टेनिसपटूंचे म्हणणे असल्यामुळे लिंगभेगदाचा आरोप होत आहेत. संध्याकाळच्या सत्रात महिलांचे अधिक सामने नसल्यामुळे त्यांच्या व्यावसायिक मूल्यावर आणि जागतिक प्रेक्षक संख्येवर थेट परिणाम होत आहे.

अन्य खेळाडूंची भूमिका काय?

चार वेळा फ्रेंच स्पर्धा जिंकणारी इगा श्वीऑटेक हिची भूमिका जरा वेगळी असली, तरी तीदेखील या सगळ्या प्रकाराबद्दल संवेदनशील आहे. स्पर्धेवर बहिष्कार टाकणे ही टोकाची भूमिका होईल, असे श्वीऑटेकचे म्हणणे आहे. प्रशासकीय संस्थांशी योग्य संवाद साधणे महत्त्वाचे असून, खेळाडूंना म्हणणे मांडण्यासाठी वाव मिळावा, असे तिला वाटते. आणखी एक प्रतिभावान टेनिसपटू कोको गॉफ हिने ‘खेळाडूंनी ठरवले, तर ते बहिष्कार टाकू शकतात’ असे म्हटले आहे.

कोको गॉफकडून कोणत्या मुद्द्यांवर भर?

पारितोषिक वाढ आणि महसुलातील घसरण यावरून निर्माण झालेल्या वादात कोको गॉफने जागतिक मानांकनातील पन्नासच्या पुढील खेळाडूंच्या व्यथेकडे लक्ष वेधले आहे. खेळाद्वारे निर्माण होणार्या महसुलात वाढ होत असली, तरी त्याचा फायदा होत नाही. टेनिसपटू अनुभव आणि लौकिक मिळवण्यासाठी खेळत असले, तरी पन्नासच्या पुढील स्थानावरील अनेक खेळाडूंची परिस्थिती हलाखीची आहे. खेळ, खेळाचे साहित्य, प्रशिक्षक आणि साहाय्यकांचे मानधन देताना खेळाडू आर्थिक बोजाखाली ते दबून जातात. ही तफावतदेखील दूर व्हायला हवी, असे गॉफने म्हटले आहे. आयोजकांनी टेनिसपटूंच्या म्हणण्याकडे दुर्लक्षच केल्यास हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

dnyanesh.bhure@expressindia.com