French Teacher Student Abuse Case : फ्रान्समधील एका शिक्षकाने ८९ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितांमध्ये भारतासह इतर नऊ देशांमधील मुलांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. जॅक लेवुग्ल, असे या आरोपी शिक्षकाचे नाव असून, तो फेब्रुवारी २०२४ पासून पोलिसांच्या ताब्यात आहे. फ्रान्समधील सरकारी अधिवक्ता एटिएन मंटो यांनी हे प्रकरण सार्वजनिक करताना पीडितांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आरोपीकडे सापडलेल्या पेन ड्राइव्हमधील व्हिडीओतून तपास यंत्रणांनी आतापर्यंत ४० पीडितांची ओळख पटवली आहे. हे प्रकरण उघडकीस येताच भारतासह संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला कशी वाचा फुटली? आरोपीच्या पेन ड्राइव्हमध्ये नेमके काय होते? त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

अत्याचाराची घटना नेमकी कधी घडली?

फ्रान्समधील ‘Le Monde’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ७९ वर्षीय आरोपी जॅक लेवुग्ल हा फ्रान्समधील ॲन्सी अल्पाइन शहरातील रहिवासी आहे. प्रगत साहित्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने वयाच्या २१ व्या वर्षी फ्रेंच भाषेचा शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कोणतीही अधिकृत पदवी नसताना आरोपीने १९६७ ते २०२२ दरम्यान जर्मनी, स्वित्झर्लंड, मोरोक्को, नायजर, अल्जेरिया, फिलीपिन्स, भारत, कोलंबिया, फ्रान्स व न्यू कॅलेडोनियासह अनेक देशांमध्ये शिक्षक म्हणून काम केले. त्याशिवाय तो गुहाशास्त्र (स्पेलिओलॉजी – गुहांचा अभ्यास) शिकवणारा प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत होता. या काळात आरोपी जॅकने अनेक अल्पवयीन मुलांसह काही तरुणींवर लैंगिक अत्याचार केले.

आरोपीने अल्पवयीन मुलांना कसे लक्ष्य केले?

सरकारी अधिवक्ता एटिएन मंटो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपी जॅक हा १९६७ ते २०२२ या कालावधीत भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये फिरला. सुरुवातीला त्याने सामाजिक गटात मिसळून शिकवणीचे काम केले. त्यानंतर तो गरीब कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करू लागला. मुलांना शैक्षणिक मदतीच्या बहाण्याने आरोपी त्यांच्या घरी जात होता. त्याच्या मैत्रीपूर्ण व मनमिळाऊ वागणुकीमुळे पीडितांचे कुटुंबीयही त्याचे आनंदाने स्वागत करीत होते. आरोपीने हळूहळू अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. अनेक मुलांसह तरुण मुलींवरही त्याने लैंगिक अत्याचार केले. पीडितांचे वय १३ ते १७ वर्षांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा : तारिक रहमान हिंदूंचे संरक्षण करू शकतील का? बांगलादेशातील अल्पसंख्याकांना कशाची भीती?

प्रकरणाला वाचा कशी फुटली?

आरोपी जॅकने पीडितांबरोबर लैंगिक अत्याचार करतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढले होते. त्याशिवाय काही व्हिडीओंमधून त्याने स्वत:च लैंगिक संबंधाची माहितीही दिली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये जॅक फ्रान्सला परतल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. विशेष बाब म्हणजे जॅकच्या भाच्यानेच पेन ड्राइव्हच्या माध्यमातून हा प्रकार सर्वांसमोर आणला. जॅक आपल्या कुटुंबासह बाहेर फिरायला गेल्यानंतर त्याच्या भाच्याने पेन ड्राइव्ह तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याने तातडीने पोलिसांत धाव घेऊन, तो पेन ड्राइव्ह जमा केला. त्यानंतर पोलिसांनी जॅकला अटक करून, त्याची चौकशी केली. त्यावेळी आरोपीने भारतासह इतर नऊ देशांमधील तब्बल ८९ अल्पवयीन मुलांवर अत्याचार केल्याची कबुली दिली.

भारतातील मुलांवरही लैंगिक अत्याचार

आरोपी जॅक हा भारतात शिकवणीला असताना त्याने १० ते १२ मुलांवर अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. त्याशिवाय रशियामधील किमान १० गरीब विद्यार्थिनींचे जॅकने लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. १९७१ ते १९७५ या कालावधीत अल्जेरियात काम करताना आरोपीने दोन तरुणींवर अनेकदा बलात्कार केला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, जॅकने त्याच्या दोन नातेवाइकांच्या हत्येची कबुलीही दिली आहे. १९७० मध्ये आई कर्करोगाने ग्रस्त असताना जॅकने तिचीही उशीने तोंड दाबून हत्या केली आहे. त्यावेळी आरोपी जॅकचे वय अवघे २८ वर्षे होते. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी स्वतंत्रपणे हत्येचा गुन्हा दाखल करून, तपास सुरू केला आहे.

पीडितांना तक्रार करण्याचे आवाहन

फ्रान्समधील सरकारी अधिवक्ता एटिएन मंटो यांनी हे प्रकरण सार्वजनिक करताना आरोपी जॅकच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. दक्षिण-पूर्व फ्रान्समधील ग्रेनोबल येथे माध्यमांशी संवाद साधताना मंटो म्हणाले की- या प्रकरणात आरोपीचे नाव सार्वजनिक करण्यात आले आहे, जेणेकरून त्याच्या शोषणाला बळी पडलेले पीडित पुढे येऊन तक्रार दाखल करतील. फ्रान्समध्ये सहसा संशयितांची ओळख गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे हा निर्णय काळजीपूर्वक घेतल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही सर्व पीडितांची ओळख पटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहोत. आरोपीकडे सापडलेल्या काही व्हिडीओ आणि फोटोंमधून ८९ पैकी ४० पीडितांची ओळख पटली आहे. लैंगिक अत्याचाराला बळी ठरलेले विद्यार्थी विविध देशांमधील असल्याने आम्ही तेथील सरकारशी संपर्क साधून, त्यांच्या तक्रारी नोंदवून घेत आहोत. अजूनही बऱ्याच पीडितांची ओळख पटवणे बाकी असून,, त्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळेच आम्ही आरोपीचे नाव सार्वजनिक करून त्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांना तक्रार दाखल करण्याचे आवाहन करत आहोत. फ्रान्स सरकारकडून पीडितांची नावे पूर्णपणे गुप्त ठेवली जातील. परंतु, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे मंटो यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : Pulwama Attack : बालाकोट एअर स्ट्राइकने दहशतवादी आजही थरथरतात; ‘ऑपरेशन बंदर’ काय होतं?

डॉक्टरनेही ३०० मुलांवर केले होते अत्याचार

फ्रान्समधील एका डॉक्टरनेही ३०० मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गेल्या वर्षी उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून, ७४ जोएल स्कॉरनेक याला अटक केली होती. आरोपीने १९८९ ते २०१४ या काळात फ्रान्सच्या वेगवेगळ्या नऊ रुग्णालयांत आणि दवाखान्यांमध्ये काम केले होते. याच काळात त्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे- पीडित मुले ही कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त होती. आरोपी पीडितांना गुंगीचे औषध देऊन, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. शुद्ध हरपलेली असल्याने त्यांना आपल्याबरोबर काय घडले याची हे लक्षात येत नसे. अत्याचाराचे हे प्रकरण बाहेर येताच संपूर्ण फ्रान्समध्ये संतापाचा उद्रेक झाला. आरोपीच्या अटकेसाठी मोर्चा काढून, आंदोलने केली गेली होती. २०२५ मध्ये न्यायालयाने आरोपीला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, जी फ्रान्समधील लैंगिक गुन्ह्यांसाठीची सर्वांत कठोर शिक्षा आहे.