Does eating fruits and vegetables cause lung cancer? बिर्याणी खाल्ल्यानंतर त्यावर कलिंगड खाल्ल्याने मुंबईत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटनाअलीकडेच घडली. प्राथमिक कारण अन्नविषबाधा अर्थात फूड पोयजनिंग असचं समोर आलेलं असलं तरी पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. या घटनेनंतर अन्नाचे चुकीच्या पद्धतीने सेवन, मांसाहारी पदार्थ किती शिजवावे, मांसाहारावर फळ खावी की नाही, किंवा फळ- भाज्यांवर वापरली जाणारी केमिकलयुक्त कीटकनाशकं यांसारखे अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत. त्याच बरोबरीने फळे आणि भाज्या कॅन्सरसारख्या आजारालाही कारणीभूत असल्याचा मुद्दाही एका संशोधनात समोर आला आहे. हे संशोधन एका वैज्ञानिक परिषदेत सादर करण्यात आले होते. यासाठी कमी वयात फुफ्फुसांचा कर्करोग झालेल्या १८७ लोकांचे निरीक्षण करण्यात आले होते. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊ.

वनस्पतीजन्य आहार घेणारे अधिक काळ आणि अधिक निरोगी आयुष्य जगतात, असेच आजपर्यंतच्या बहुतांशी संशोधनात निष्पन्न झाले आहे. फळे आणि भाज्यांचे सेवन करणार्‍यांना हृदयरोग, स्ट्रोक आणि कॅन्सर होण्याचे प्रमाण कमी असते. फुफ्फुसांचा कर्करोगही याला अपवाद नाही. परंतु, फळे आणि भाज्या तरुणांमध्ये फुफ्फुसांचा कॅन्सर वाढवत असल्याच्या नव्या दाव्यामुळे मात्र आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या संशोधनात फुफ्फुसांचा कर्करोग झालेल्या १८७ रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. त्यातील बहुतेकांनी आयुष्यात कधीच धूम्रपानही केलेले नव्हते. त्यांच्या आहारात फळे, भाज्या, धान्य यांवर अधिक भर होता. त्यामुळे त्यांचा आहार आरोग्यदायी असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

संशोधकांनी लोकांच्या रक्ताची किंवा त्यांनी खाल्लेल्या अन्नाची थेट प्रयोगशाळेत चाचणी केलेली नाही. त्याऐवजी, उपलब्ध असलेल्या जुन्या माहितीवरून (सरासरी आकडेवारीवरून) कोणत्या अन्नात किती कीटकनाशकांचा अंश असू शकतो, याचा एक अंदाज बांधला. सामान्यतः फुफ्फुसाचा कर्करोग धूम्रपान करणाऱ्यांना होतो, परंतु, हे संशोधन अशा तरुणांवर करण्यात आले आहे जे धूम्रपान करत नाहीत. म्हणूनचं आपण फळे किंवा भाज्यांसारखे जे ‘आरोग्यदायी’ अन्न खातो, त्यावर फवारलेली कीटकनाशके (Pesticides) या कर्करोगाला कारणीभूत असू शकतात, असा संशय संशोधकांनी व्यक्त केला आहे.

सकस आहार सोडून देणे चुकीचे

या संशोधनाचा अर्थ असा बिलकुल नाही की फळे आणि भाज्या आरोग्यासाठी वाईट आहेत. फळे आणि भाज्या खाणे हे शरीरासाठी नेहमीच फायदेशीर असते. प्रश्न फळे-भाज्यांचा नसून, त्यावर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचा (Pesticides) आहे. संशोधक असे सुचवत आहेत की, केवळ या एका संशोधनाच्या आधारे लोकांनी आपला आहार बदलू नये. फळे खाल्ल्याने कॅन्सर होईल, असा चुकीचा निष्कर्ष काढून सकस आहार सोडून देणे चुकीचे ठरेल. संशोधकांनी अशा लोकांचा अभ्यास केला ज्यांना आधीच कर्करोग झाला आहे. त्यांनी निरोगी लोकांचा गट घेऊन, त्यांना अनेक वर्षे विशिष्ट आहार देऊन मग त्यांना आजार होतो की नाही, हे तपासलेले नाही. म्हणूनच आहारामुळेच कर्करोग झाला असे ठामपणे म्हणता येत नाही, असे तज्ज्ञांना वाटते.

विज्ञानातील कोणत्याही एका छोट्या आणि प्राथमिक संशोधनापेक्षा मोठ्या स्तरावरील जुन्या संशोधनांचे निष्कर्ष अधिक विश्वासार्ह आणि दिलासा देणारे असतात. लाखो लोकांवर अनेक वर्षे केलेल्या मोठ्या अभ्यासांतून हेच वारंवार सिद्ध झाले आहे की, फळे आणि भाज्यांचे भरपूर सेवन करणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो. याउलट, कमी रुग्णसंख्या असलेल्या छोट्या संशोधनांमध्ये संख्यात्मक गोंधळ किंवा योगायोगामुळे चुकीचे निष्कर्ष निघू शकतात; कारण अशा अभ्यासात रुग्णांची जीवनशैली, व्यायाम किंवा राहणीमान यांसारख्या इतर घटकांचा विचार करणे कठीण असते. त्यामुळे, केवळ एका अपूर्ण संशोधनावर आधारून आहार बदलण्यापेक्षा, मोठ्या आणि खात्रीशीर वैज्ञानिक संशोधनांवरून ठरवलेल्या अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अधिक सुरक्षित ठरते.

कीटकनाशकांची समस्या

फळे आणि भाज्यांवरील कीटकनाशकांचा अंश आपल्या प्रकृतीसाठी हानिकारक असतो. हे खरे आहे की जे लोक जास्त फळे-भाज्या खातात, त्यांच्या शरीरात या रसायनांचे काही अंश आढळू शकतात. तसेच, शेतात थेट कीटकनाशके हाताळणाऱ्या मजुरांना आरोग्याचे धोके असतात, यावरून ही रसायने सुरक्षित नाहीत हे स्पष्ट होते. मात्र, याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण रोजच्या आहारात जी फळे किंवा भाज्या खातो, त्यांमुळे सर्वसामान्य लोकांना कर्करोग होतो.

कीटकनाशकांचे मुलांवर किंवा गर्भवती महिलांवर होणारे परिणाम आणि इतर दीर्घकालीन धोके यांवर सध्या वैज्ञानिक चर्चा आणि संशोधन सुरू आहे. पण या चर्चेचा मुख्य उद्देश शेती करण्याच्या पद्धतींत सुधारणा करणे आणि सरकारी नियम कडक करणे हा आहे; लोकांना फळे-भाज्या खाण्यापासून रोखणे हा नाही. जर तुम्हाला कीटकनाशकांबद्दल काळजी वाटत असेल, तर फळे खाणे बंद करण्याऐवजी काही सोपे उपाय करता येतात. फळे आणि भाज्या वाहत्या पाण्याखाली नीट धुवून घेतल्यास त्यावरील बराचसा कचरा आणि रसायने निघून जातात. तसेच, आहारात वैविध्य ठेवल्याने (म्हणजेच रोज वेगवेगळी फळे-भाज्या खाल्ल्याने) तुम्ही कोणत्याही एका विशिष्ट रसायनाच्या संपर्कात सतत येत नाही. थोडक्यात, रसायनांच्या भीतीने फळे सोडण्यापेक्षा ती योग्य प्रकारे धुवून खाणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे.

जर तुमच्या खिशाला परवडत असेल, तर तुम्ही ‘सेंद्रिय’ (Organic) फळे खरेदी करू शकता; पण हा केवळ एक किरकोळ बदल आहे. मूळ आणि सर्वात महत्त्वाचा संदेश हाच आहे की, फळे आणि भाज्यांनी समृद्ध आहार आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असतो. अशा संशोधनांमधून आपण एक महत्त्वाचा धडा घेतला पाहिजे, तो म्हणजे आरोग्याविषयीच्या बातम्यांमधील मोठ्या मथळ्यांना लगेच बळी पडू नये. जेव्हा आपण एखाद्या पदार्थामुळे कर्करोग होतो किंवा एखादा घटक चमत्कारिक असल्याचे वाचतो, तेव्हा तो अभ्यास किती मोठा होता, संशोधकांनी प्रत्यक्ष तपासणी केली होती की केवळ अंदाज बांधला होता आणि हे नवीन निष्कर्ष जुन्या संशोधनाशी सुसंगत आहेत का, हे तपासणे गरजेचे असते. थोडक्यात, बातम्यांमधील खळबळजनक दाव्यांपेक्षा दशकांपासून चालत आलेले वैज्ञानिक पुरावे अधिक महत्त्वाचे आहेत.

तरुण वयातील फुफ्फुसांच्या कर्करोगाबाबतचा हा अभ्यास आपल्याला विचार करायला लावणारा असला, तरी त्यातील त्रुटींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा अभ्यास अतिशय मर्यादित लोकांवर आधारित होता आणि त्यात कीटकनाशकांच्या पातळीचे थेट मोजमाप न करता केवळ अप्रत्यक्ष अंदाज बांधले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, “फळे-भाज्या आरोग्याला घातक ठरू शकतात” हा या अभ्यासाचा सूर आजवरच्या खूप मोठ्या आणि खात्रीशीर वैज्ञानिक संशोधनाच्या पूर्णपणे विरोधात आहे. याचा अर्थ असा नाही की आपण कीटकनाशकांच्या धोक्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे किंवा धूम्रपान न करणाऱ्यांना होणाऱ्या कर्करोगाच्या कारणांचा शोध घेऊ नये. परंतु, एखाद्या परिषदेत मांडल्या गेलेल्या प्राथमिक आणि अपुऱ्या माहितीमुळे, वर्षानुवर्षे आरोग्यासाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या फळे आणि भाज्यांबद्दल मनात भीती निर्माण करणे चुकीचे ठरेल.