Smartphone Social Media Algorithms: मोबाइल वाजतो, स्क्रीनवर एक नोटिफिकेशन येते.
आपण त्यावर क्लिक् करतो आणि नकळत आपल्यालाही माहीत नसलेल्या एका प्रयोगाचा भाग होतो…
हा प्रयोग कोणत्याही प्रयोगशाळेत सुरू नाहीए. तिथे पांढरा अॅप्रन नाही, टेस्टट्युब्सही नाहीत.
तो प्रयोग सुरू असतो थेट तुमच्या- माझ्या खिशामध्ये असलेल्या स्मार्टफोनमध्ये! तोही दिवसातून शेकडो वेळा! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या प्रयोगासाठी आपली परवानगीही कधीच घेतलेली नसते.

स्मार्टफोन ही सतत सक्रिय यंत्रणाच…

आपल्याला वाटते की, स्मार्टफोन म्हणजे माहिती मिळवण्याचे, संवाद साधण्याचे साधन आहे.
पण प्रत्यक्षात ती एक सतत सक्रिय यंत्रणा आहे, ही यंत्रणा तुमचे लक्ष (अटेंशन) वेधते, सवयी बदलते आणि निर्णय हळूहळू बदलण्यास भाग पाडते.

कुठंवर स्क्रोल, कुठे लाईक?

तुम्ही सोशल मीडियावर एखाद्या पोस्टवर किती वेळ थांबलात, कुठवर स्क्रोल केलंय, कुठे ‘लाईक’ केलं… हे सगळे डेटा म्हणून साठवले जाते.
या डेटावर आधारित अल्गोरिदम सतत तपासत असतात… :
“वापरकर्त्याला अधिक वेळ या अॅपवर कसं ठेवता येईल?”

तंत्रज्ञान कंपन्या याला engagement optimization म्हणतात.
वर्तनशास्त्रज्ञ मात्र याला मानवी वर्तन नव्याने घडवणे (conditioning) असे म्हणते.

Smarthphone-changing-human-behaviour
स्मार्टफोन बदलतोय, मानवी वर्तन

अब्जावधी वापरकर्त्यांवर सूक्ष्म प्रयोग

मानसशास्त्रीय प्रयोग सहसा काहीशे किंवा काही हजार लोकांवर होतात.
पण स्मार्टफोन अॅप्सवर चालणारे प्रयोग कोट्यवधीच नव्हे तर अब्जावधी वापरकर्त्यांवर एकाच वेळी होतात. २०१४ मध्ये फेसबुकने (आताचे Meta) मान्य केले की, त्यांनी वापरकर्त्यांच्या न्यूज फीडमधील मजकूर बदलून त्यांच्या भावनांवर त्यांने फरक पडतो का, याचा प्रयोग केला होता.
सकारात्मक किंवा नकारात्मक पोस्ट कमी-जास्त करून वापरकर्त्यांच्या मनःस्थितीत बदल घडवून आणता येतो, हे त्या अभ्यासातून स्पष्ट झाले.
त्या प्रयोगावर टीकाही झाली. पण एक महत्त्वाची गोष्ट मात्र उघडकीस आली; ती म्हणजे, तो काही अपवाद नव्हता, तर ती एक रोजची एक नियमित घडणारी प्रक्रिया होती. आजही सोशल मीडिया, व्हिडिओ अॅप्स, अगदी फिटनेस अॅप्ससुद्धा सतत असे प्रयोग करत असतात.

डोपामिनचा सापळा

  • या प्रयोगांचा पाया आहे, मानवी मेंदूची reward system.
  • तुमच्या पोस्टला कधी लाईक येईल, कधी कमेंट येईल किंवा कधी नोटिफिकेशन येईल, हे माहीत नसते. ते अनिश्चित असते.
  • हीच अनिश्चितता मेंदूती डोपामिनचा स्राव वाढवते.
  • जसं जुगारात होतं, अगदी तस्संच.

परिणाम? – फोन वारंवार हाती घेऊन काही आलंय का हे पाहण्याची (चेक करण्याची) सवय.

  • या विषयातील अभ्यासक सांगतात की, सततच्या नोटिफिकेशन्समुळे
  • लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते
  • कामात वारंवार खंड पडतो
  • चिंता आणि अस्वस्थता वाढते
  • इतकंच नाही तर फोन बंद असतानाही फक्त फोन जवळ असणं ही कृती वा वर्तनसुद्धा मेंदूची कार्यक्षमता कमी करू शकतं.

अल्गोरिदम पटकन शिकतात, मशिन लर्निग

  • अल्गोरिदम पटकन शिकतात, मशिन वेगात शिकतं
  • तुम्ही संतापजनक, भीतीदायक किंवा वादग्रस्त मजकुरावर जास्त प्रतिक्रिया देत असाल,
  • तर तसाच मजकूर तुम्हाला अधिक दाखवला जातो.
  • कंपन्यांचा हेतू तुम्हाला चिडवण्याचा नसतो.
  • पण भावनिक प्रतिक्रिया म्हणजे जास्त engagement आणि engagement म्हणजे नफा, हे कंपन्यांचे गणित असते.

याचाच परिणाम…

  • समाजातील ध्रुवीकरण वाढतं
  • चुकीची माहिती वेगात पसरते
  • संस्थांवरील विश्वास कमी होतो

तुमचं फीड हा खरं तर वैयक्तिक असतं, पण त्याच्याकडे तुमच्या वर्तनाचा आरसा म्हणून पाहिले जाते.

नैतिक प्रश्न?

  • शैक्षणिक संशोधनात मानवी विषयांवर प्रयोग करताना स्पष्ट संमती आवश्यक असते.
  • मात्र तंत्रज्ञानाच्या जगात हे नियम लागू होत नाहीत.“Terms and Conditions” स्वीकारल्या म्हणजे संमती दिली, असा कंपन्यांचा दावा असतो.
  • पण बहुतेक वापरकर्त्यांना हे कळतच नाही की,
  • त्यांच्या भावना, लक्ष (अटेंशन) आणि निर्णयांवर प्रयोग सुरू आहेत.

अनेक टेक डिझायनर्सनी मान्य केले आहे की, अनेक फीचर्स तयार करताना त्यांच्या मानसिक परिणामांचा फारसा विचारच झालेला नसतो.

यातून सुटका शक्य आहे का?

  • पूर्णपणे नाही. पण मर्यादा घालता येतात.
  • गरज नसलेली सोशल मीडिया नोटिफिकेशन्स बंद करणे
  • अल्गोरिदमिक फीडऐवजी chronological फीड वापरणे
  • अॅप्सचा वापर आवश्यकतेएवढाच करणे
  • स्क्रीन grayscale मोडवर ठेवणे
  • यामुळे डोपामिनचा सापळा काही अंशी कमकुवत होतो.

दरम्यान, युरोपसह अनेक देशांमध्ये अल्गोरिदम पारदर्शकतेवर आता चर्चा सुरू झाली आहे.

शेवटचा प्रश्न…

हा प्रश्न स्मार्टफोनचा नाही.
तो आहे मानवी मानसशास्त्र आणि अटेंशनसाठी सुरू असलेल्या स्पर्धेचा. इतक्या सूक्ष्म पद्धतीने, इतक्या लोकांच्या मानसिकतेवर परिणाम करण्याची क्षमता आजवरच्या मानवी इतिहासात कधीच कुणी मिळवलेली नव्हती. प्रश्न हा नाही की, हा प्रयोग चालू आहे की नाही.
खरा प्रश्न आहे तो म्हणजे, आपण हा प्रयोग किती दूर जाऊ देणार आहोत?

  • संदर्भः
    Kramer, A. D. I., Guillory, J. E., & Hancock, J. T. (2014). Experimental evidence of massive-scale emotional contagion through social networks. Proceedings of the National Academy of Sciences.
  • Eyal, N. (2014). Hooked: How to Build Habit-Forming Products. Penguin.
  • Alter, A. (2017). Irresistible: The Rise of Addictive Technology and the Business of Keeping Us Hooked. Penguin Press.
  • Ward, A. F., Duke, K., Gneezy, A., & Bos, M. W. (2017). Brain Drain: The Mere Presence of One’s Own Smartphone Reduces Available Cognitive Capacity. Journal of the Association for Consumer Research.
  • Zuboff, S. (2019). The Age of Surveillance Capitalism. PublicAffairs.
  • Center for Humane Technology – Research and policy briefs on persuasive technology.