४ जुलै रोजी, अमेरिका ब्रिटिश साम्राज्याच्या जुलमी कर प्रणालीविरोधात मिळवलेला विजय साजरा करते. या दिवशी, सुमारे अडीच शतकांपूर्वी, ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेल्या उत्तर अमेरिकेतील १३ राज्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित करून ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिके’ची स्थापना केली होती. अमेरिकेतील वसाहतवाद्यांनी स्वतःला इंग्लंडमधील राजसत्तेपासून मुक्त घोषित करण्यासाठी दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचे जागतिक महत्त्व खूप नंतर लक्षात आले. हे महत्त्व पूर्वेकडील वसाहती ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देण्यासाठी आक्रमकपणे प्रयत्न करत होत्या, त्यावेळेस अधिक अधोरेखित झाले. अमेरिकेचा स्वातंत्र्यलढा आणि पूर्वेकडील राष्ट्रवादी मोहिमा अमेरिकेचा स्वातंत्र्यलढा हा पूर्वेकडील ब्रिटिशांच्या इतर वसाहतींमधील राष्ट्रवादी उठावांपेक्षा निश्चितच खूप वेगळा होता. अमेरिकेत ब्रिटिश स्थायिकांनी ब्रिटिश सरकारी अधिकाऱ्यांना विरोध केला होता. दुसरीकडे, भारत किंवा वेस्ट इंडिजसारख्या वसाहतींमध्ये, पाश्चिमात्य राज्यकर्त्यांच्या जुलूमशाहीविरुद्ध स्थानिक लोक एकदिलाने आंदोलन करत होते. परिणामतः अमेरिकन उठावाचे प्रतिध्वनी अनेकदा पूर्वेकडील राष्ट्रवादी मोहिमांच्या लिखाणात आणि भाषणात उमटले. ब्रिटिशांच्या वर्चस्वाचा प्रतिकार करण्यासाठी भारतीयांना आवाहन करताना, महात्मा गांधींनी अनेकदा अमेरिकन क्रांतीचा उल्लेख केला आणि त्यातून प्रेरणा घेतली,असे वारंवार सांगितले. ४ जानेवारी १९३२ रोजी, गांधीजी जेव्हा सक्रियपणे ‘सत्याग्रह’चा प्रचार करत होते, तेव्हा त्यांनी ‘यंग इंडिया’ या त्यांच्या साप्ताहिक जर्नलमध्ये पुढील संदेश लिहिला होता.“Even as America won its independence through suffering, valour and sacrifice, so shall India, in God’s good time achieve her freedom by suffering, sacrifice and non-violence.” (रूपांतर: "जसे अमेरिकेने दुःख, शौर्य आणि बलिदानाद्वारे आपले स्वातंत्र्य मिळवले, त्याचप्रमाणे भारतदेखील दुःख, त्याग आणि अहिंसेद्वारे आपले स्वातंत्र्य मिळवेल.")मार्च १९३० मध्ये, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लादलेल्या मीठावरील कठोर कराचा निषेध करण्यासाठी गांधींनी प्रसिद्ध दांडी यात्रा काढली तेव्हा, ही यात्रा ऐतिहासिक बोस्टन टी पार्टी येथील आनंदोलनाचीच प्रतिकृती होती याकडे दुर्लक्ष करणे कठीण जाते. बोस्टन टी पार्टी १६ नोव्हेंबर १७७३ रोजी, उत्तर अमेरिकन आंदोलक स्वतःला 'सन्स ऑफ लिबर्टी' असे म्हणत होते, त्यांनी बोस्टन टी पार्टी या आंदोलनातून ब्रिटिश साम्राज्याला यशस्वीपणे ढवळून काढले होते. त्यांनी चीनमधून बोस्टनच्या किनाऱ्यावर आणलेला चहा बंदराच्या पाण्यात टाकला होता. या आंदोलनाच्या वेळी त्यांचा पोशाख मूळ अमेरिकन-इंडियन्स सारखा होता, तसेच ते ‘बोस्टन हार्बर अ टी-पॉट टुनाईट’ अशा घोषणा देत होते. हे उत्तर अमेरिकन वसाहतवासी १७७३ साली ब्रिटिश सरकारने लादलेल्या चहा कायद्याच्या विरोधात निर्भयपणे उभे राहिले होते. १७७३ सालच्या चहा कायद्याने चहाच्या व्यापाराची मक्तेदारी इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीला दिली होती. त्याला अमेरिकेतील वसाहतवाद्यांनी वैचारिक आधारावर विरोध केला. सॅम्युअल अॅडम्स हे अमेरिकन क्रांतीच्या सर्वात प्रमुख नेत्यांपैकी एक होते, त्यांनी नमूद केल्याप्रमाणे (British tea monopoly was equal to a tax) “ब्रिटीश चहाची मक्तेदारी, ही कराच्या सारखीच" होती. बोस्टन टी पार्टीमुळे इंग्लंडमधील राजसत्तेला मोठा धक्का बसला. १७७५ साली सुरु झालेला हा संघर्ष १७८३ साला पर्यंत चालला, अखेरीस ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिके’च्या स्वतंत्र निर्मितीमुळे ब्रिटिश राजवटीचा पराभव झाला. बोस्टन टी पार्टीच्या मार्गावरील सॉल्ट मार्च बोस्टन टी पार्टीप्रमाणेच, गांधींच्या सॉल्ट मार्चने- मिठाच्या सत्याग्रहाने ब्रिटिश अधिकाऱ्यांना भारतीय राष्ट्रवादाच्या मागण्या गांभीर्याने घेण्यास प्रवृत्त केले. २४ दिवसांच्या या सत्याग्रहाची सांगता समुद्राच्या खारट पाण्यात झाली, ही घटना ब्रिटीश सरकारच्या मिठावरील मक्तेदारीच्या विरोधात प्रतिकात्मक कृती होती. मिठाच्या मोर्चानंतर लवकरच मोठ्या प्रमाणावर सविनय कायदेभंग चळवळ झाली ज्याने भारतातील ब्रिटिश राज्य मुळासकट हादरले. गांधी-आयर्विन करार अखेरीस त्याच्याच, पुढच्या वर्षी गांधी-आयर्विन करारावर स्वाक्षरी झाली, ही घटना ब्रिटिशांनी भारतावरील नियंत्रण कमी करण्याऱ्या पहिल्या घटनांपैकी एक होती. या करारानंतर दोन दशकांहून ही कमी कालावधीत ब्रिटिशांनी या वसाहती संपत्तीला (भारताला) निरोप दिला. तपशिलानुसार ज्यावेळेस गांधीजी लॉर्ड आयर्विनसोबत ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यासाठी बसले, तेव्हा आयर्विन याने गांधीजींना चहा दिला आणि विचारले, तुम्हाला चहात साखर आवडेल की मलई?. गांधीजींनी या दोन्ही गोष्टी हसत नाकारल्या आणि म्हणाले, ‘आम्हाला बोस्टनच्या प्रसिद्ध चहा पार्टीची आठवण करून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या चहाची चव मिठाबरोबर घेतली पाहिजे’. (हा मूळ लेख इंडियन एक्स्प्रेसच्या संकेत स्थळावर दिनांक ४-७-२०२३ रोजी प्रकाशित झालेला आहे.)