प्रत्येक घरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. बाप्पाला घरी आणण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहे. गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी भक्त सज्ज झाले आहेत. हा उत्सव देशातील सर्वांत लोकप्रिय उत्सवांपैकी एक आहे. गणपती हिंदू धर्मातील सर्वांत लोकप्रिय देवतांपैकी एक आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे भारत वगळता इतर अनेक देशांमध्ये गणपतीची पूजा केली जाते. भारताप्रमाणेच थायलंडमध्येही गणेश चतुर्थी साजरी केली जाते. इतर पूर्व आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपांत गणपतीची पूजा केली जाते. डाउन टू अर्थच्या (डीटीएच) वृत्तानुसार, गणपतीने तिबेट ते चीन आणि नंतर जपान, असा प्रवास केला होता. परदेशांत गणपतीची कोणकोणत्या स्वरूपांत पूजा केली जाते? गणपती या देशांमध्ये कसा पोहोचला? याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थायलंड

थाई बौद्धांमध्ये गणपतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इसवी सन ५५० ते ६०० च्या सुमारास थायलंडमध्ये गणपतीची शिल्पे उदयास आली, असे वृत्त ‘द प्रिंट’ने दिले आहे. थायलंडमध्ये गणपतीला ‘फिरा फिकानेट’ म्हणून संबोधले जाते आणि यशाचे प्रतीक व सर्व अडथळे दूर करणारा देवता, असे मानले जाते. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंवा लग्नाच्या आणि इतर शुभकार्याप्रसंगी त्याची पूजा केली जाते. थाई कला आणि स्थापत्य कलेमध्येही गणपतीचा प्रभाव दिसून येतो. गणपतीचे मंदिर आणि मूर्ती देशभरात आढळतात.

थायलंडमध्ये गणपतीला ‘फिरा फिकानेट’ म्हणून संबोधले जाते. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : शिवरायांच्या शिल्पकृतीत कपाळावरील जखमेच्या खुणेने नवा वाद; पुतळ्यावर खूण दाखवण्याचे कारण काय?

कंबोडिया

आग्नेय आशियामध्ये गणपतीची पूजा केली जाते. परंतु, या प्रदेशात त्याचे आगमन कधी झाले, हे अस्पष्ट आहे. भारतीय आणि आग्नेय आशियाई कलेचे प्राध्यापक रॉबर्ट एल. ब्राउन यांच्या मतानुसार, आग्नेय आशियातील गणपतीचे शिलालेख आणि प्रतिमा पाचव्या व सहाव्या शतकातील आहेत. कंबोडियामध्ये मानल्या जाणार्‍या प्रमुख देवतांमध्ये गणपतीही आहे. सातव्या शतकापासून मंदिरांमध्ये त्याची पूजा केली गेली. ‘द प्रिंट’नुसार कंबोडियातील नागरिक गणपतीमध्ये मोक्ष आणि अंतिम मुक्ती देण्याची शक्ती आहे, असे मानतात.

तिबेट

तिबेटमध्ये गणपतीची बौद्ध देवता म्हणून पूजा केली जाते. या देशात त्यांची महारक्त गणपती, वज्र विनायक यांसारखी वेगवेगळी रूपे आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, भारतीय बौद्ध धर्मगुरू अतीश दीपंकर सृजन आणि गयाधर यांनी ११ व्या शतकात तिबेटी बौद्ध धर्माला या देवतेची ओळख करून दिली. गणपतीच्या जन्माशी संबंधित १७ व्या शतकातील आख्यायिका सांगते की, ते गंगा आणि शिव यांचे पुत्र आहेत. परंतु, शिवाची दुसरी पत्नी उमाच्या शापामुळे बालगणेशाला आपले डोके गमवावे लागले. त्यानंतर त्याला हत्तीचे डोके जोडले गेले, अशी ही मूळ कथा आहे.

तिबेटमध्ये, गणपतीची बौद्ध देवता म्हणून पूजा केली जाते. (छायाचित्र-विकीमीडिया कॉमन्स)

तिबेटी पौराणिक कथादेखील गणेशाचा संबंध लामा धर्माच्या जन्माशी जोडते. लामा हा बौद्ध धर्माचा प्रकार आहे, जो तिबेट आणि मंगोलियामध्ये उद्भवला. तिबेटी बौद्ध व्याख्यानांमध्ये धर्माचा रक्षणकर्ता, वाईटाचा नाश करणारा व अडथळे दूर करणारा, अशी गणपतीची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यात हत्तीशी संबंधित वैशिष्ट्ये सांगितली गेली आहेत. बेल्जियन अभियंता व जपानी शास्त्रज्ञ लोडे रोसेल्स यांनी तिबेट, चीन व जपानमध्ये गणपतीवर संशोधन केले आहे.

चीन, अफगाणिस्तान

‘द प्रिंट’नुसार चीनमध्ये गणपतीची ‘हुआक्सी तियान’ या रूपाची पूजा केली जाते. सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास कोरलेली एक लोकप्रिय गणेशमूर्ती अफगाणिस्तानच्या काबूलजवळ गर्देझमध्ये आहे. या ठिकाणाला गर्देझ गणेश म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी बुद्धी आणि समृद्धीची देवता म्हणून गणपतीची पूजा केली जाते.

जपान

‘डीटीई’च्या वृत्तानुसार बौद्ध धर्माबरोबरच गणपती भारतातून तिबेट आणि चीनमधून जपानपर्यंत पोहोचला. जपानमध्ये गणपतीला ‘कांगितेन’, असे संबोधले जाते. जपानमध्ये कांगितेन जपानी बौद्ध धर्माशी संबंधित आहे. व्यापारी, अभिनेते व गीशा यांच्याद्वारे त्यांचा विशेष आदर केला जातो. जपानमध्ये गणपतीचे अद्वितीय असे जुळे स्वरूप पाहायला मिळते; ज्यामध्ये नर आणि मादी आकृत्यांचा समावेश आहे. हे चित्रण ‘एम्ब्रेसिंग कांगितेन’ म्हणून लोकप्रिय आहे. “जपानी कांगितेनमध्ये हत्तीच्या सौम्य आणि मजबूत स्वभावावर भर देण्यात आला आहे. गजशिर असलेले नर आणि मादी प्रणयात एकमेकांना मिठी मारत असल्याचे यात दर्शविले गेले आहे. त्यांना रेशमी पांढऱ्या किंवा हलक्या गुलाबी त्वचेसह चित्रित करण्यात आले आहे. गणपतीचे हे रूप ताकदवान, सामर्थ्यवान व संपन्न असल्याचे मानले जाते,” असे लोडे रोसेल्स यांनी ‘डीटीई’ला सांगितले आहे. जपानमध्ये गणपतीची इतर रूपेही आहेत. त्यातील एका रूपात चतुर्भुज गणेशाच्या हातात मुळा आणि गोड पदार्थ दाखविले आहेत, असे ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : पुतिन विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अटक वॉरंट; मंगोलियाच्या कृत्याने वेधलं जगाचं लक्ष; नक्की काय घडलं?

इंडोनेशिया

इंडोनेशियातील जावा बेटावर राजा कृतनगराद्वारे अडथळे दूर करणारी देवता म्हणून गणपतीची पूजा केली जात असे. ‘द प्रिंट’च्या वृत्तानुसार, १४ व्या व १५ व्या शतकात येथे विकसित झालेल्या बौद्ध आणि शैव धर्माची देवता म्हणून गणपतीची पूजा केली जाते. जावामध्ये गणपतीचे आणखी एक रूप आढळते. पूर्व जावा येथील टेंगर सेमेरू नॅशनल पार्कमधील माउंट ब्रोमो येथे ज्वालामुखीच्या टोकावर ७०० वर्षे जुनी गणपतीची मूर्ती विराजमान आहे. ब्रह्मदेवाच्या नावावर असलेले माउंट ब्रोमो हे इंडोनेशियातील १२० सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. स्थानिकांचा असा विश्वास आहे की, ही मूर्ती त्यांचे सक्रिय ज्वालामुखीपासून संरक्षण करते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi thailand to japan how ganesha reached other countries rac
Show comments