Historical timeline of Ganesha Idol Iconography History: गणपती असे म्हटले की हत्तीचे डोके, लंबोदर, चार हात, हातात मोदक आणि पायाशी बसलेला मूषक अशीच प्रतिमा आपल्या नजरेसमोर येते. घरगुती गणपती असो वा सार्वजनिक मंडपातील भव्य मूर्ती, गणपतीच्या या प्रतिमेतील काही घटक हे त्या मूर्तीचे अविभाज्य भागच ठरलेले दिसतात, त्याशिवाय गणेशमूर्तीची कल्पनाच करता येत नाही. उदाहरणार्थ, मोदक किंवा मूषक याशिवाय गणेशमूर्ती असूच शकत नाही, अशी भाविकांची धारणा आहे.गेल्या दीड हजार वर्षांच्या प्रवासात लोकधारणा, पुराणकथा आणि भारतीय शिल्पपरंपरेतून गणेशमूर्तीचे स्वरूप बदलत गेले आहे.

दोन हातांचा गणपती

सध्याची गणरायाची प्रतिमा ही अवघ्या काही वर्षांत तयार झालेली नाही, तर ती अनेक वर्षानुवर्षांची प्रक्रिया आहे. साधारणपणे गेल्या दीड हजार वर्षांत या प्रतिमेमध्ये अनेक बदल झालेले दिसतात. सुरुवातीच्या प्रतिमांमध्ये गणेशाचे स्वरूप तुलनेने साधे होते, म्हणजेच सुरुवातीचा गणपती हा मानवाप्रमाणेच दोन हातांचा होता. नंतर त्याला अधिक हात (खासकरून चार हात), अनेक आयुधे, मोदकपात्र, वाहन म्हणून आलेला मूषक, नागाचे यज्ञोपवीत, तुटलेला दात आणि नृत्यमुद्रा असे घटक एक एक करत प्रतिमेमध्ये समाविष्ट होत गेले. आज आपण ओळखतो तो गणपती हा दीर्घकाळ विकसित होत गेलेल्या धार्मिक कल्पना, मूर्तिशास्त्रीय नियम आणि स्थानिक कलापरंपरांचा एकत्रित असा परिणाम आहे.

हत्तीचे डोके आणि लंबोदर

गणेशाच्या प्रतिमेच्या मुळाशी असलेली काही वैशिष्ट्ये अत्यंत जुनी आहेत. ब्रिटिश म्युझियमने २०२५ मध्ये आयोजित केलेल्या Ancient India: Living Traditions प्रदर्शनातील नोंदीनुसार, गणेशाच्या प्रतिमेतील हत्तीचे डोके आणि मोठे पोट यांचा संबंध यक्षपरंपरेशी जोडलेले आहे, असे अभ्यासकांनी म्हटले आहे. यक्ष हे प्राचीन भारतीय धार्मिक कल्पनेतील निसर्ग, संपत्ती आणि समृद्धीशी संबंधित शक्तिमान लोकदेवता होते. त्यांच्या प्रतिमांमध्ये ते ठेंगणे, मोठे आणि गोलाकार पोट असलेले अशी वैशिष्ट्ये आढळतात.

मेट म्युझियममधील गणेशमूर्ती (Image- Dancing Ganesha – India, Madhya Pradesh – Kalacuri dynasty – The Metropolitan Museum of Art)

हत्तीमुख असलेला गण किंवा यक्ष

याच पार्श्वभूमीवर गणेशाच्या आरंभीच्या प्रतिमांकडे पाहिले तर त्या आजच्या देव्हाऱ्यातील गणपतीपेक्षा वेगळ्या दिसतात. सुरुवातीच्या प्रतिमांमध्ये तो स्वतंत्र, पूर्ण विकसित देवतेच्या स्वरूपात नसून हत्तीमुख असलेला गण किंवा यक्षसदृश आकृती म्हणून दिसतो. अमरावती कलेतील हत्तीमुख असलेला यक्ष किंवा गणाच्या प्रतिमांचा उल्लेख या संदर्भात केला जातो. मात्र हत्तीमुख असलेली प्रत्येक आकृती गणपती नसते. प्राचीन शिल्पकृतींच्या संदर्भात त्यांची ओळख पटविण्यासाठी तिचे स्थान, संदर्भ आणि इतर लक्षणेही पाहावी लागतात.

गुप्तकाळ: गणपतीला स्वतंत्र ओळख मिळाली

भारतीय इतिहासामध्ये गुप्तकाळ हा सुवर्णकाळ मानला जातो. याच गुप्तकाळात (साधारण इ.स. चौथे ते सहावे शतक) गणेशाच्या प्रतिमेला स्वतंत्र देवतेचा परिचय प्राप्त झाला, असे इतिहासकार मानतात. याच काळात भारतीय शिल्पकलेत अनेक देवतांच्या प्रतिमा अधिक निश्चित मूर्तिशास्त्रीय स्वरूपात येऊ लागल्या. गणेशही त्याला अपवाद नव्हता. विद्वानांच्या मते विकसित गणेशप्रतिमा गुप्तकाळात स्पष्टपणे दिसू लागते.

प्राचीन गणपती वेगळा होता

मथुरेतील साधारण इ.स. ३५०–४०० कालखंडातील गणेशप्रतिमेचा उल्लेख ब्रिटिश म्युझियमच्या कॅटलॉगमध्ये आहे. या प्रतिमेत गणेशाच्या हातात मिठाईचे पात्र दिसते. मात्र पुढील शतकांतील प्रतिमांप्रमाणे सर्वच वैशिष्ट्ये त्यात एकत्रित दिसत नाहीत. याचाच अर्थ आजचा गणपती आणि प्राचीन गणपती हा सारखाच नव्हता.

मग मोदक कधी आला?

इथे एक महत्त्वाचा फरक समजून घ्यावा लागतो. तो म्हणजे, मिठाई किंवा गोड पदार्थाचे पात्र गणेशाच्या आरंभीच्या विकसित प्रतिमांमध्ये दिसते; पण आज आपण ज्याला ‘मोदक’ म्हणून ओळखतो, तो अनेक प्रतिमांमध्ये तसाच दिसत नाही. मूर्तिशास्त्राच्या काही ग्रंथांमध्ये मात्र गणेशाच्या हातातील मोदक किंवा गोड पदार्थाचे वर्णन स्पष्टपणे येते. विष्णूधर्मोत्तर पुराण आणि इतर मूर्तिशास्त्रीय परंपरांमध्ये गणेशाच्या हातातील गोड मिठाई, अंकुश, पाश, दात, कमळ आदींचा स्पष्ट उल्लेख सापडतो.

ओडिशातील मूर्तीमध्ये मूषक

गणेशाच्या प्रतिमेत नंतरच्या कालखंडात मिठाईचे पात्र कायमस्वरूपी पाहायला मिळते. बाराव्या शतकातील ओडिशातील ब्रिटिश म्युझियममध्ये असलेल्या ओडिशातील १० व्या शतकातील मूर्तीमध्ये गणपती सोंडेने मिठाईच्या पात्रातील गोड पदार्थ खाताना दिसतो. त्याच मूर्तीच्या पायाशी त्याचे वाहन असलेला उंदीर किंवा मूषकही स्पष्टपणे पाहायला मिळतो. म्हणजेच मोदक हा तेव्हा गणपतीला आवडणारा पदार्थ म्हणून फारसा लोकप्रिय नव्हता. मात्र मध्ययुगाच्या मध्यावर म्हणजेच १०-११ व्या शतकात मोदकही गणरायाच्या प्रतिमाशास्त्र किंवा मूर्तीशास्त्रामध्ये एक अविभाज्य भाग झालेला दिसतो.

मूषक कुठून आला?

आज गणपतीच्या पायाशी मूषक नसेल तर मूर्ती अपूर्ण वाटते. पण ही प्रतिमाही कालांतराने दृढ झालेली दिसते.
ब्रिटिश म्युझियमने केलेल्या गणरायाच्या अभ्यासामध्ये गणेशाचे वाहन म्हणून रॅट किंवा माऊस अर्थात उंदीर किंवा मूषक याबाबत अर्थपूर्ण सांस्कृतिक संबंधही नोंदविण्यात आला असून तो संबंध कृषिप्रधान समाजाशी जोडलेला आहे. उंदीर हा शेतकऱ्यांसाठी उपद्रवकारक प्राणी आहे; तर गणपती हा विघ्न आणणारा आणि दूर करणाराही देव आहे. त्यामुळे त्याचे वाहन म्हणून उंदराची निवड प्रतीकात्मक अर्थानेही झालेली दिसते, असे अभ्यासकांना वाटते. मध्य युगापूर्वीच्या गणेशप्रतिमांमध्ये मूषक सर्वत्र आढळत नाही. मूषकाविना गणेशाची प्रतिमा हीच त्यापूर्वीची रूढ पद्धत होती, असे दिसते.

दोन हातांचा गणपती चार हातांचा कसा झाला?

सध्या सर्वत्र चार हातांची गणेश प्रतिमाच सर्वत्र पाहायला मिळते. मात्र प्राचीन काळात गणपतीची प्रतिमा ही केवळ दोन हातांचीच दिसते. मामल्लपुरम आणि कांचीपुरम येथील आरंभीच्या पल्लव शिल्पांमध्ये गणपती दोन हातांचा, लंबोदर आणि हत्तीमुख असलेला गण म्हणून दिसतो. नंतरच्या कालखंडात मात्र कांचीपुरममधील मंदिरांमध्ये गणेशाला स्वतंत्र देवतेचे स्थान मिळालेले दिसते आणि त्याचे रूप हळुहळू चार हातांचे झालेले दिसते. त्याच्या हातात पाश, अंकुश, दंड यांसारखी आयुधे येतात; यात काही प्रतिमांमध्ये मोदकही दिसतो. याच कालखंडात गणपती केवळ मंदिराच्या अलंकरणातील एक गण न राहता स्वतंत्र देवता म्हणून प्रतिष्ठापित झालेला दिसतो.

आठ, दहा, बारा हातांचा गणपती

गणेशाची प्रतिमा चार हातांवरच न थांबता गणरायाचे हातही अनेक पटींनी वाढत गेलेले दिसतात. दहाव्या शतकातील मध्य प्रदेशातील नृत्यगणेशाची प्रतिमा सध्या मेट्रोपॉलिटन म्युझियममध्ये आहे. या मूर्तीला दहा हात आहेत. हातात मिठाईचे पात्र, तुटलेला दात, जपमाळ, शस्त्रे आणि नाग पाहायला मिळतो. नृत्यगणेशाची प्रतिमा साधारणपणे आठव्या शतकापासून मंदिरपरंपरेत पाहायला मिळते. अभ्यासकांच्या मते, गणपतीच्या मूर्तीतील हातांची संख्या वाढणे हा काही केवळ कलात्मक प्रयोग नव्हता. तर गणपतीचा प्रत्येक अतिरिक्त हात हा एखाद्या शक्तीचे, आयुधाचे किंवा धार्मिक संकल्पनेचे दृश्य रूपांतर होते.

पोटाभोवतीचा नाग आणि तुटलेला दात

सध्याच्या गणपतीच्या प्रतिमेत नाग आणि तुटलेला दात हा आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी दिसतात. काळानुसार गणपतीच्या प्रतिमेत साप किंवा नाग हा यज्ञोपवीत म्हणूनही दाखवला जाऊ लागला. ब्रिटिश म्युझियममध्ये असलेल्या बाराव्या शतकातील ओडिशाच्या मूर्तीमध्ये नागाचे यज्ञोपवीत गणरायाने धारण केलेले दिसते. त्याच मूर्तीत गणरायाच्या एका हातात तुटलेला दातही दिसतो.

गणरायाचे वेगळे प्रतिमाशास्त्र

हत्तीचे मस्तक किंवा डोके, लंबोदर, चार किंवा अधिक हात, तुटलेला दात, पाश-अंकुश, मिठाई किंवा मोदक, नाग आणि मूषक ही प्रतीकचिन्हे एकत्र आली आणि त्यातून गणरायाचे एक वेगळे प्रतिमाशास्त्र किंवा मूर्तीशास्त्र (iconographic vocabulary) तयार झालेले दिसते.

दीड हजार वर्षांचा गणरायाच्या प्रतिमेचा प्रवास

गणरायाचा गेल्या दीड हजार वर्षांतील प्रवास हा केवळ शिल्पकला किंवा प्रतिमाशास्त्राच्याच बाबतीत झालेला नाही तर याच कालखंडात तो यक्ष किंवा हत्तीमुख असलेल्या गणापासून ते मंदिरातील स्वतंत्र देवतेपर्यंत पोहोचलेला दिसतो. ब्रिटिश म्युझियमच्या अभ्यासातही गणेशाच्या आरंभीच्या यक्षसदृश वैशिष्ट्यांपासून पुढे तो शुभारंभ करण्यापूर्वी पूजन करावयाचा देव असा प्रवास अधोरेखित झालेला दिसतो. म्हणूनच आजचा गणपती हा कोणत्याही एका काळातील कलाकाराची निर्मिती नाही. तर तो भारतीय उपखंडातील सुमारे दीड हजार वर्षांच्या धार्मिक कल्पना, लोकविश्वास, पुराणकथा, मंदिरसंस्कृती आणि शिल्पपरंपरेने घडवलेला एक ‘दृश्य इतिहास’ आहे.

संदर्भ

  • British Museum, Ancient India: Living Traditions – Large Print Guide, 2025 — गणेशाच्या यक्षपरंपरेशी संबंधित वैशिष्ट्ये, मथुरा (इ.स. 350–400) प्रतिमा, मिठाईचे पात्र आणि मूषक वाहन यासंबंधी माहिती.
  • British Museum Collection, Figure of Ganeśa, Odisha, 12th century — चार हात, मोदकपात्र, तुटलेला दात, नाग-यज्ञोपवीत आणि मूषक.
  • The Metropolitan Museum of Art, Dancing Ganesha, Madhya Pradesh, 10th century — दहाहाती नृत्यरत गणेश आणि विकसित मूर्तिशास्त्र.
  • Archaeological Survey of India (ASI) — बुचेश्वर मंदिर, कर्नाटक येथील बाराव्या शतकातील होयसळ शैलीतील चतुर्भुज गणेश; दंत, अंकुश, पुष्प आणि मोदकपात्र.
  • Smarthistory / British Museum, The Making and Worship of Ganesha Statues in Maharashtra — गणेशाच्या प्रतिमा, महाराष्ट्रातील गणेशपूजा आणि मूर्तिपरंपरा.
  • Nalini Kanta Bhattasali, Iconography of Buddhist and Brahmanical Sculptures — विविध गणेशप्रतिमांमधील मोदक, मूषक आणि आयुधांचे वर्णन.
  • Meena Devadatta Jeste, Arts in the Puranas — गणेशाच्या मूर्तिशास्त्रीय स्वरूपाचे पुराणांतील वर्णन आणि गुप्तोत्तर काळातील प्रतिमाविकास.
  • Pallava Period Study, Other Gods and Goddesses — मामल्लपुरम व कांचीपुरममधील आरंभीच्या दोन हातांच्या आणि पुढील चार हातांच्या गणेशप्रतिमांचा अभ्यास.