वैज्ञानिकांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज ते कानपूर या दरम्यान एका भूमिगत नदी प्रवाहाचा शोध लागला आहे. या जमिनीखाली दबलेल्या नदी मार्गाला ‘पॅलिओ चॅनल’ म्हणतात. गंगा आणि यमुनेच्या संगमावरील हा प्राचीन प्रवाह सरस्वती नदीचा आहे का याविषयी अभ्यास सुरू आहे…
पॅलिओ चॅनेल म्हणजे काय?
पॅलिओ चॅनेल म्हणजे पुरातन जलमार्ग किंवा लुप्त जलमार्ग. पॅलिओ या ग्रीक शब्दाचा अर्थ प्राचीन असा होतो. भूतकाळात अस्तित्वात असलेल्या, परंतु हवामानातील बदल, भूगर्भीय हालचाली किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे आता पूर्णपणे कोरड्या झालेल्या किंवा गाडल्या गेलेल्या नद्यांच्या जुन्या मार्गाला पॅलिओ चॅनेल म्हणतात. अनेकदा हे प्राचीन मार्ग जमिनीच्या वरून दिसत नाहीत, कारण त्यावर माती, गाळ किंवा वाळू साचून ते झाकले जातात. उपग्रहांद्वारे किंवा जमिनीखालील संशोधनाद्वारे यांचा शोध घेतला जातो.
प्राचीन नदीपात्र कोठे आढळले?
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीआयएसआर) आणि हैदराबाद येथील नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इस्टिट्यूट या संस्थेच्या वैज्ञानिकांनी प्रगत हवाई भूभौतिक तंत्रज्ञान आणि ड्रिलिंगच्या मदतीने गंगा-यमुना संगम भागात, प्रयागराजजवळ, गंगा आणि यमुना या नद्यांमध्ये एक मोठा प्राचीन नदीमार्ग शोधला आहे. ही पॅलिओ नदी जमिनीपासून सुमारे १० ते १५ मीटर खाली आहे आणि पूर्णपणे गाळाखाली झाकलेली आहे, त्यामुळे वरून तिचा काहीही ठसा दिसत नाही. तिची वैशिष्ट्ये साध्या किंवा वळण बदललेल्या नद्यांपेक्षा वेगळी आहेत.
ही दडलेली नदी सुमारे ४ ते ५ किमी रुंद आहे, म्हणजेच गंगा आणि यमुना इतकीच मोठी. तिच्या मार्गातही वळणे दिसतात, ज्यावरून ती या दोन्ही नद्यांसोबत बराच काळ वाहत होती, असे सूचित होते. सुरुवातीला वैज्ञानिकांनी या नदीचा ४५ किमीचा भाग नकाशावर दाखवला. नंतर ‘नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा’च्या मदतीने हा अभ्यास कानपूरपर्यंत वाढवण्यात आला आणि एकूण लांबी सुमारे २०० किमी असल्याचे आढळले.
ही नदी आणखी पश्चिमेकडे, कदाचित हिमालयाच्या दिशेनेही गेलेली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ही पॅलिओ नदी सध्याच्या संगमापासून सुमारे २५ किमी आधीपर्यंत स्पष्टपणे आढळली आहे. प्रयागराज शहरात मात्र दाट बांधकाम, वीजवाहिन्या आणि इतर सुविधांमुळे हवाई सर्वेक्षण करणे कठीण झाले. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की नद्यांचे प्रवाह कालांतराने बदलत असल्याने नेमका संगमबिंदू ठरवणे कठीण आहे.
नदीचा शोध कशा प्रकारे लागला?
प्रयागराजमधील पॅलिओ नदीचा शोध हेलिकॉप्टर आधारित एअरबॉर्न जिओफिजिकल सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आला. यानंतर सराय अकिल, सिराथू, मंझनपूर, फतेहपूर आणि बलवंत टोला आदी क्षेत्रात खोदकाम (ड्रिलिंग) करण्यात आले. या खोदकामात वैज्ञानिकांना मोठ्या प्रमाणावर वाळूचे ढिग सापडले, जे प्राचीन नदीपात्रातल्या वाळूशी मिळतेजुळते आहेत. यामुळे वैज्ञानिक या निष्कर्षांपर्यंत पोहोचेले की या क्षेत्रात कधीकाळी सक्रिय नदीचा मार्ग होता.
या प्राचीन नदीप्रवाहाचे महत्त्व काय?
शेकडो वर्षांपासून प्रयागराज संगम हे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या तीन नद्यांचा संगम मानले जाते. वरच्या पातळीवर दोनच नद्या दिसतात, पण भारतातील एका प्रमुख संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी आता सांगितले आहे की जमिनीखाली तिसऱ्या, दडलेल्या नदीचा ठोस वैज्ञानिक पुरावा मिळाला आहे. त्यामुळे या जुन्या समजुतीला नव्याने बळ मिळाले आहे. पॅलिओ नद्या म्हणजे पूर्वी पृष्ठभागावर वाहणाऱ्या पण आता गाळाखाली दडलेल्या जुन्या नद्या. या संशोधनातील वैज्ञानिक डॉ. सुभाष चंद्रा यांनी सांगितले की हा शोध वैज्ञानिकदृष्ट्या पक्का आणि प्रत्यक्ष तपासून सिद्ध झालेला आहे.
पॅलिओ नदीमार्गावर विशेष ड्रिलिंग केले असून त्याचे अस्तित्व पूर्णपणे सिद्ध झाले आहे. याबाबत कोणतीही शंका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. चंद्रा म्हणाले की ही मोठी पॅलिओ नदी आहे. तिची रुंदी आणि तळाची पातळी गंगा आणि यमुना नद्यांइतकीच आहे. त्यामुळे ही स्वतंत्र तिसरी नदी आहे, फक्त मार्ग बदललेली जुनी नदी नाही.
धार्मिक समजूत आता वैज्ञानिकदृष्ट्या खरी?
प्राचीन मानवी संस्कृती बहुदा नद्यांच्या काठीच विकसित झाल्या होत्या. त्यामुळे या लुप्त पात्रांचा शोध घेतल्याने जुन्या संस्कृतींचा अभ्यास करणे सोपे जाते. भारतातील पौराणिक सरस्वती नदीचे अस्तित्व शोधण्यासाठी वैज्ञानिक आणि पुरातत्व विभाग याच ‘पॅलिओ चॅनेल्स’चा अभ्यास करत आहेत. प्रयागराज संगमावर गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या तीन नद्यांचा संगम असल्याची श्रद्धा अनेक वर्षांपासून आहे. मात्र प्रत्यक्षात फक्त दोन नद्या दिसत असल्याने सरस्वतीचे अस्तित्व हा वादाचा विषय होता. आता वैज्ञानिकांनी जमिनीखाली पॅलिओ नदी सापडल्याचे सांगितल्यामुळे या श्रद्धेला काही प्रमाणात वैज्ञानिक आधार मिळाल्याचे दिसते. तरीही हीच सरस्वती नदी आहे का, की फक्त आणखी एक प्राचीन नदीमार्ग आहे, हा मुद्दा अजूनही पूर्णपणे निश्चित झालेला नाही.
पाण्याच्या उपलब्धतेवर काय परिणाम?
या नदीत काही प्रमाणात पाणी आहे, तर काही भाग कोरडा आहे. गंगा खोऱ्यातील भूजल पातळी झपाट्याने घटत असताना या पॅलिओ नदीचा शोध महत्त्वाचा ठरतो. ही नदी भूजल साठवणूक आणि वाहतुकीसाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते. जर पावसाचे पाणी या नदीमार्गात साठवले गेले, तर भूजल पातळी वाढू शकते आणि उन्हाळ्यात नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह टिकवून ठेवण्यास मदत होईल. त्यामुळे हा शोध केवळ ऐतिहासिक नव्हे, तर भविष्यातील जलसंकट सोडवण्यासाठीही उपयोगी ठरू शकतो.
manisha.devne@expressindia.com
