नवरा-बायकोमधलं भांडण ही काही फार मोठी गोष्ट नाही. पण, हेच भांडण जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचतं तेव्हा मात्र परिस्थिती गंभीर होते. असंच ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका जोडप्यासोबत घडलं आहे. त्यांच्यातल्या किरकोळ भांडणाला घरगुती हिंसाचार समजून पोलिसांनी कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.
ऑस्ट्रेलियातील एका ४२ वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला जबरदस्त मारहाण केली. त्याच्या मानेवर गुडघा दाबत त्याला मारहाण केल्याने ही व्यक्ती आता रुग्णालयात दाखल आहे. पोलिसांच्या या अमानुष मारहाणीमुळे गौरव कुंडी ही व्यक्ती सध्या कोमात आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण आलं आहे.

कोण आहे गौरव कुंडी, पोलिसांनी त्याला का अटक केली आणि नेमका घटनाक्रम काय आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

कोण आहे गौरव कुंडी, नेमकं काय घडलं?

अॅडलेडच्या पूर्व उपनगरात घडलेल्या या घटनेनंतर ४२ वर्षीय भारतीय वंशाचा गौरव कुंडी हा सध्या रॉयल अॅडलेड रुग्णालयात लाईफ सपोर्टवर आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर आरोप केला आहे की, पोलिसांनी त्याला अटक करताना अधिक बळाचा वापर केला आणि मारहाण केली, यामुळे त्याच्या मेंदूला आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची पत्नी अमृतपाल कौरच्या म्हणण्यानुसार, ही घटना पेनेहॅम रोडवर घडली. त्यांच्यातल्या किरकोळ वादाला घरगुती हिंसाचाराचा प्रकार समजून गस्त घालत असलेल्या एका पोलिस पथकाने त्यांना थांबवले. “मी काहीही चूक केलेली नाही”, असे गौरव वारंवार बोलत असल्याचे एका व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. गौरवच्या पत्नीनेच हा व्हिडीओ काढला आहे.

गौरव आणि अमृतपाल यांना दोन मुलं आहेत. गौरवला मारहाण करत अटक करताना तो जमिनीवर आदळला आणि बेशुद्ध पडला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, २०२० मध्ये अमेरिकेत अटकेदरम्यान जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाला, त्याप्रमाणेच एका पोलिस अधिकाऱ्याने गौरवच्या मानेवर गुडघा ठेवल्याचा दावा त्याच्या पत्नीने केला आहे. एका स्थानिक माध्यमाने प्रकाशित केलेल्या फुटेजमध्ये गौरव जमिनीवर पडल्याचे दिसत आहे आणि त्याची पत्नी पोलिस अधिकाऱ्यांच्या या वागण्याला अन्यायकारक असल्याचे म्हणत आहे.

“एका अधिकाऱ्याने कुंडीच्या मानेवर गुडघा टेकवला तेव्हा रेकॉर्डिंग थांबवले. फक्त १९ सेकंदांचा व्हिडीओ आहे. मी घाबरले होते आणि मी गौरवसोबत जमिनीवर बसले होते”, असे गौरवच्या पत्नीने सांगितले आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये गौरव प्रतिसाद न देता पडलेला दाखवले आहे. “मी वारंवार म्हणत होते की तो बरा नाही, तो बरा नाही, कृपया असे करू नका, फक्त रुग्णवाहिका बोलवा”, असे त्याच्या पत्नीने सांगितले. “डॉक्टर म्हणत आहेत की, त्याच्या मेंदूला खूप दुखापत झाली आहे. मेंदू काही अंशत: काम करत असेल तर कदाचित त्याला शुद्ध येईल किंवा कदाचित शुद्ध येणारही नाही.”

स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे की, गौरव घराबाहेर पडण्यापूर्वी आणि पेनेहॅम रोडवरून चालण्यास सुरुवात करण्यापूर्वी मद्यपान करत होता. फुटेजमध्ये तो जमिनीवर पडलेला दिसतो, कारण त्याची पत्नी जवळ येत आहे.
“मी फक्त बाहेर त्याच्या मागे गेली व त्याला तू इथे काय करत आहेस? चल, घरी परत जाऊया. तू दारू प्यायलेला आहेस, तुझी तब्येत ठीक नाही, आपण घरी जाऊ”, असे मी त्याला सांगत होती. “त्याने मला थोडेसे ढकलले आणि म्हणाला तू बाजूला हो, मी चालू शकतो”, असा आधीचा घटनाक्रम गौरवच्या पत्नीने सांगितला. तिचा असा विश्वास आहे की या किरकोळ धक्क्यानेच गस्तीवर असणाऱ्या पोलिसांचे लक्ष वेधले असावे.

“पोलिसांना वाटले की तो माझ्यावर हल्ला करत आहे आणि रस्त्यावर घरगुती हिंसाचार करत आहे, पण त्यांचा गैरसमज झाला”, असे तिने माध्यमांना सांगितले. “तो दारू प्यायला होता आणि म्हणूनच तो मोठ्याने आवाज करत होता”, असेही तिने सांगितले.

पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

दक्षिण ऑस्ट्रेलियन पोलिस आयुक्त ग्रँट स्टीव्हन्स यांनी गौरव कुंडीच्या अटकेत सहभागी अधिकाऱ्यांचा बचाव केला आहे. त्यांनी माध्यमांना सांगितले की, बॉडीकॅम फुटेजमध्ये त्यांनी त्यांच्या प्रशिक्षणाचे पालन केल्याचे दिसून आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दारू पिऊन घराबाहेर पडल्यानंतर आणि पत्नीशी वाद घातल्यानंतर गौरवने आक्रमकपणे अटकेचा प्रतिकार केला. अधिकाऱ्यांना हा घरगुती हिंसाचाराचा प्रकार असल्याचे वाटत होते. मात्र, गौरवने तो फक्त दारू पिऊन मोठ्याने बोलत होता, हिंसक नव्हता असा वाद घातला. कार्यवाहक सहाय्यक आयुक्त जॉन डीकँडिया म्हणाले की, “तपास सुरू असला तरी सुरुवातीच्या पुराव्यांवरून अधिकाऱ्यांच्या कृतीबद्दल त्यांना काही गैर वाटत नाही.”

दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर पीटर मालिनाउस्कस यांनीही पोलिसांचे समर्थन करत म्हटले की, त्यांचे काम कठीण आहे आणि त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. अटकेमुळे पोलिसांची जबाबदारी आणि अटकेदरम्यान बळाचा वापर यावर नवीन वाद निर्माण झाला आहे. आतापर्यंत कोणतेही आरोप लावण्यात आलेले नाहीत आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूशी तुलना

गौरवची पत्नी अमृतपाल कौरने सांगितलं की, जेव्हा एका अधिकाऱ्याने गौरव कुंडीच्या मानेवर गुडघा ठेवला तेव्हा तिने रेकॉर्डिंग थांबवले. यामुळेच तिने त्याची तुलना २०२० मध्ये अमेरिकेत झालेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या प्रकरणाशी असल्याचे म्हटले.
त्या प्रकरणात अटकेदरम्यान पोलिस अधिकारी डेरेक चौविन यांच्या मानेवर नऊ मिनिटांपेक्षा जास्त काळ गुडघे टेकल्यानंतर ४६ वर्षीय फ्लॉइडचा मृत्यू झाला होता. त्यावेळी जॉर्ज वारंवार म्हणत होते की, “मला श्वास घेता येत नाहीये.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिनिया पोलिसमध्ये फ्लॉइडच्या मृत्यूमुळे संपूर्ण अमेरिका आणि जगभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. वंशवाद आणि पोलिसांच्या क्रूरतेचा अंत करण्याची मागणी करण्यात आली. नंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याला हत्येचा दोषी ठरवण्यात आले. त्याला २२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. अटकेदरम्यान उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांनाही ही घटना थांबवण्यासाठी हस्तक्षेप न केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते.