History Behind Gauri Avahan: गणेशोत्सवाच्या काळात गणपतीसोबत घरात विराजमान होणाऱ्या गौरीचे रूप संपूर्ण महाराष्ट्रात एकसारखे नसते. कोकणात नदीकाठचे खडे किंवा वनस्पतींच्या रूपात एकच गौरी पूजली जाते, तर देशावर धातू किंवा मातीच्या मुखवट्यांमध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौरींची प्रतिष्ठापना होते. या परंपरेमागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून महाराष्ट्राची लोकस्मृती, भौगोलिक विविधता आणि पिढ्यानपिढ्या जपलेला कुलाचार दडलेला आहे.

लोकधार्मिक परंपरा

गणपतीचे आगमन झाले की, नंतर प्रतीक्षा असते ती गौरीची. घराघरांत तिच्या स्वागतासाठी लगबग सुरू होते. पण महाराष्ट्रात ‘गौरी’ची वेगवेगळी रूप प्रचलित आहेत. काही घरांत ती पार्वती असते. काही ठिकाणी गणपतीची आई तर काही परंपरांत ती महालक्ष्मी मानली जाते. तर काही अभ्यासांमध्ये तिचा संबंध ज्येष्ठा-अलक्ष्मी या प्राचीन देवतारूपाशी जोडला जातो. कुठे तिचा एकच मुखवटा असतो, तर कुठे दोन मुखवटे अर्थात ज्येष्ठा आणि कनिष्ठा. कुठे मूर्ती नसतेच; नदीकाठावरून आणलेले खडे किंवा स्थानिक वनस्पतीच गौरीचे रूप धारण करतात. म्हणजेच गौरी ही एक ठरावीक मूर्ती किंवा एकसंध धार्मिक संकल्पना नसून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या प्रकारे आकाराला आलेली लोकधार्मिक परंपरा आहे. आणि तिच्यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी फरक दिसतो तो कोकण आणि देश या दोन सांस्कृतिक प्रदेशांच्या तुलनेत.

कोकणात एक, देशावर दोन

गौरीव्रताच्या अभ्यासक- संशोधक तनश्री रेडिज यांच्या संशोधनानुसार, कोकणपट्ट्यात अनेक ठिकाणी ज्येष्ठागौरीचे एकच एक रूप पूजले जाते. त्याउलट देशावर म्हणजे महाराष्ट्राच्या पठारी भागात ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशी गौरींच्या दोन्ही रूपांची पूजा करण्याची परंपरा आढळते. देवता तीच, सण तोच, कालखंड तोच; पण देवतांची संख्या बदलते. हा फरक केवळ एखाद्या कुटुंबाच्या आवडीनिवडीचा परिणाम नाही. महाराष्ट्रातील या दोन भौगोलिक प्रदेशांत गौरीव्रताच्या दोन स्वंतत्र पद्धती वेगवेगळ्या विकसित झाल्या आहेत.

Gauri Avahan tradition in Maharashtra | Jyeshtha Kanishtha Gauri pujan vidhi | कोकणातील एक गौरी आणि देशावरील ज्येष्ठा कनिष्ठा गौरी | महाराष्ट्रातील गौरी आवाहनाची पारंपरिक रूपे
गौरीपूजन परंपरा (Image- Loksatta archive)

विश्वकोशातील नोंदी

मराठी विश्वकोशातही भाद्रपदातील गौरीपूजेचा संबंध ज्येष्ठा नक्षत्राशी जोडला असून अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन अशी परंपरा नमूद केली आहे. त्याचबरोबर कुलाचारानुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा नदीतील लहान खडेदेखील गौरी म्हणून पूजले जातात, असे नमूद आहे. म्हणजेच गौरीची एकच एक मूर्ती अशी गौरीची एकच एक परंपरा नाही.

कोकणातील गौरीचा संबंध जलस्रोतांशी

कोकणातील काही परंपरांमध्ये गौरीसाठी नदी, विहीर, तलाव किंवा अन्य जलस्रोतांमधून दोन, पाच किंवा सात खडे आणले जातात. काही ठिकाणी स्थानिक वनस्पती किंवा फुलझाडे गौरीचे प्रतीक ठरतात. काही घरांत चित्र किंवा मुखवटा असतो.

देशावर धातू- मातीचे मुखवटे

देशावर मात्र धातू किंवा मातीचे मुखवटे आणि त्यासोबत शरीराची रचना, वस्त्रे, दागिने आदींची मांडणी करून गौरींची प्रतिष्ठापना केली जाते. ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौरी या ठिकाणी अधिक स्पष्टपणे वेगळ्या रूपात येतात. हा फरक महत्त्वाचा आहे. कारण लोकधर्मात देवतेचे अस्तित्व केवळ ग्रंथातून निश्चित होत नाही; तर समाज तिला कोणत्या वस्तूमधून पाहतो, कोणत्या जागेतून घरात आणतो आणि कोणत्या कथेत तिची ओळख करून देतो, यावरही तिचे रूप ठरते.

पर्यावरण प्रतीकव्यवस्थेत आणि भौतिक परंपरेतून पुढील पिढीकडे

नदीकाठचा खडा गौरी होतो तेव्हा देवत्वाला मानवी हाताने घडविलेल्या मूर्तीची आवश्यकता राहत नाही. एखादी वनस्पती गौरीचे प्रतीक ठरते, तेव्हा स्थानिक पर्यावरणही धार्मिक प्रतीकव्यवस्थेत प्रवेश करते. आणि मुखवटा घरातील जपलेल्या वस्तूंच्या संचाचा भाग होतो तेव्हा परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भौतिक वस्तूमधूनही पोहोचते.

गौरीची कथा बदलते, तेव्हा काय बदलते?

गौरीच्या रूपाइतकाच महत्त्वाचा आणखी एक फरक आहे, तो म्हणजे तिची कथा. गौरीव्रताशी संबंधित ‘व्रतकथा’ मुख्यतः मौखिक परंपरेतून पुढे आली आहे. त्या कोणत्या एका लेखकाने लिहिलेल्या कथा नसून पिढ्यान्‌पिढ्या सांगितल्या गेलेल्या कथा आहेत. त्यामुळे त्यात प्रदेशानुसार बदल होणे स्वाभाविक आहे. कोकणातील एका प्रचलित कथेत गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी केंद्रस्थानी आहेत. एका वृद्ध स्त्रीच्या रूपाने ज्येष्ठागौरी त्यांच्या घरी येते आणि तिच्या स्वागतामुळे घरात समृद्धी येते. या कथेत नदीकाठचे खडे, स्थानिक खाद्यपदार्थ आणि गौरीव्रताची विशिष्ट पद्धत यांचा संबंध जोडण्यात आला आहे.

लोकपरंपरा स्थिर नसते

देशावरच्या कथांमध्ये मात्र ज्येष्ठा- कनिष्ठा या दोन गौरींच्या अस्तित्त्वाशी सुसंगत वेगळे कथानक दिसते. एका कथेत दोन पत्नी असलेला राजा केंद्रस्थानी आहे. म्हणजेच गौरी एकच नाही, म्हणून तिची कथा देखील एकच राहिलेली नाही. यातून एक महत्त्वाची बाब लक्षात येते ती म्हणजे लोकपरंपरा ‘स्थिर’ नसते. ती बदल असते, स्थानिक जीवनाशी जुळवून घेते आणि नंतर त्या बदलालाच परंपरेचा दर्जा मिळतो.

मग ‘ज्येष्ठा’ आणि ‘कनिष्ठा’ नेमक्या कोण?

याच ठिकाणी गौरीच्या परंपरेतील आणखी एक गुंतागुंत समोर येते. ‘गौरी’ हे नाव पार्वतीशी जोडलेले आहे. मराठी विश्वकोशात गौरी हे पार्वतीचे एक नाव असल्याचे नमूद आहे. पण गौरीव्रताच्या प्रादेशिक परंपरांचा अभ्यास करताना ज्येष्ठा या वेगळ्या धार्मिक प्रतिमेचाही संदर्भ येतो. काही परंपरांमध्ये ज्येष्ठा ही अलक्ष्मीशी संबंधित मानली जाते, तर कनिष्ठेला लक्ष्मीशी जोडले जाते. नंतर या दोघी गौरी किंवा महालक्ष्मी म्हणून स्थानिक लोकपरंपरेत रुळलेल्या दिसतात. लोकधर्म अनेक धार्मिक प्रतिमांना कसा एकत्र आणतो, तेच यातून दिसते.
एका परंपरेत ती पार्वती आहे, दुसऱ्यात महालक्ष्मी, तर तिसऱ्या परंपरेत ज्येष्ठा. काही ठिकाणी ती गणपतीची आई, काही ठिकाणी त्याची बहीण किंवा पत्नी अशीही लोकमान्यता आढळते. एकाच देवतेला वेगवेगळ्या नात्यांनी ओळखण्याची ही क्षमता हा लोकधर्माचा महत्त्वाचा गुण आहे.

कोकण आणि देश: फरक फक्त भूगोलाचा नाही

‘कोकणात एक आणि देशावर दोन’ एवढे सांगून हा फरक संपत नाही. कारण भौगोलिक विभागणी आणि सांस्कृतिक विभागणी नेहमी एकरेषीय नसते. समुद्रकिनारा, नद्या, विहिरी, जलस्रोत, स्थानिक वनस्पती आणि विशिष्ट ग्रामीण जीवनपद्धती असलेल्या कोकणात गौरीच्या प्रतीकासाठी खडे, वनस्पती किंवा जलस्रोताशी जोडलेली प्रक्रिया टिकलेली दिसते. देशावर घराच्या मध्यभागी मुखवट्यांची प्रतिष्ठापना, त्यांना वस्त्रे-दागिने चढविणे आणि विस्तृत पूजाविधी यांना अधिक महत्त्व आले. कोकणातील गौरीची परंपरा तेथील स्थानिक भूगोल आणि पर्यावरणाशी थेट जोडलेली दिसते. भौगोलिक प्रदेश, स्थानिक सामाजिक रचना, उपलब्ध सामग्री आणि दीर्घकाळ टिकलेला कुलाचार यांचा परस्पर संबंध या फरकांच्या बाबतीत विचार करताना स्पष्टपणे दिसतो. महाराष्ट्रातील लोकधर्माच्या व्यापक अभ्यासातही कोकण आणि देश या प्रदेशांतील लोकधार्मिक परंपरांच्या सातत्याकडे लक्ष वेधले जाते. पुरातत्त्वीय पुराव्यांपासून आधुनिक लोकश्रद्धांपर्यंत मातृदेवता, नाग आणि अन्य लोकदैवतांच्या परंपरांमध्ये सातत्याचे धागे दिसतात.

गौरी म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक नकाशाच

गौरीकडे फक्त गणपतीनंतर येणारी देवी म्हणून पाहिले तर या परंपरेतील मोठा भाग नजरेआड होतो.
गौरीकडे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशाच्या रूपात पाहिले तर चित्र वेगळे दिसते. कोकणातील खडा, नदीकाठची वनस्पती, देशावरचा धातूचा मुखवटा, ज्येष्ठा-कनिष्ठेची जोडी, वेगवेगळ्या व्रतकथा, घराघरातील कुलाचार आणि देवतेला दिली जाणारी वेगवेगळी नाती, हे सगळे एकाच धार्मिक परंपरेचे अनेक स्थानिक ‘आविष्कार’ आहेत.

गौरीची सांस्कृतिक स्मृती

यातील विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही विविधता परंपरेला कमकुवत करत नाही; तर उलट तिला जिवंत ठेवते.
गौरीची एकच एक अधिकृत प्रतिमा नाही. तिची एकच एक कथाही नाही. तिचे एकच एक नातेही नाही. आणि म्हणूनच तिचे महाराष्ट्रातील अस्तित्व अधिक व्यापक असल्याचे जाणवते. गणपतीचा उत्सव सार्वजनिक झाला, त्याला मोठे दृश्यरूप मिळाले; गौरी मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर घराच्या आतल्या सांस्कृतिक स्मृतीची देवता राहिली आहे. तिच्या रूपात घरचा कुलाचार, आजीने सांगितलेली कथा, पिढ्यान्‌पिढ्या जपलेला मुखवटा, नदीकाठून आणलेला खडा आणि प्रदेशानुसार बदललेली श्रद्धा हे सारे घटक एकत्र येताना दिसतात.

प्रत्येक कुटुंबाची गौरी वेगळी

म्हणून यंदा गौरीसमोर उभे राहिल्यावर एक प्रश्न निश्चितच मनात येणे साहजिक आहे, तो म्हणजे आपल्या घरात आलेली गौरी नेमकी कोण? गणपतीची आई? पार्वती? महालक्ष्मी? ज्येष्ठा? की या सगळ्या ओळखींच्या पलीकडे, अनेक पिढ्यांनी आपल्या घरासाठी घडवून ठेवलेली एक सांस्कृतिक स्मृती? कदाचित गौरीच्या परंपरेचे खरे वैशिष्ट्य याच प्रश्नात दडलेले आहे. एक गौरी एकच एक नाही. कारण महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रदेशाने, प्रत्येक घराने आणि प्रत्येक पिढीने आपापली गौरी वेगळी घडवली आहे!

संदर्भ

  • मराठी विश्वकोश — ‘गौरी’ : ज्येष्ठा नक्षत्र, आवाहन-विसर्जनाची परंपरा आणि धातू, माती किंवा नदीतील खड्यांच्या रूपातील गौरी यांची नोंद.
  • Sahapedia — Tanashree Redij, “Gaurī Vrata: An Introduction” : कोकणातील एक ज्येष्ठा गौरी आणि देशावरील ज्येष्ठा-कनिष्ठा/ महालक्ष्मी परंपरा; कुलाचारातील सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक बदल.
  • Sahapedia — “Rituals of Gaurī Vrata” : कोकणातील खडे, वनस्पती, चित्रे व मुखवटे आणि देशावरील मुखवट्यांची पूजापद्धती.
  • Sahapedia — “Narratives of Gaurī Vrata” : कोकण व देशातील वेगवेगळ्या व्रतकथा आणि मौखिक परंपरेतून त्यांचे झालेले संक्रमण.
  • Nayanjot Lahiri, Oxford Academic — “Some Aspects of Folk Religion in the Konkana and Desh Regions of Maharashtra” : कोकण-देशातील लोकधर्माच्या ऐतिहासिक सातत्याचा पुरातत्त्वीय संदर्भ.