देशांतर्गत आघाडीवर सर्व काही आशावादी वातावरण असताना जागतिक घडामोडींनी देशांतर्गत गुंतवणूकदारांना चिंताक्रांत केले आहे. परिणामी सरलेल्या पाच सत्रात सेन्सेक्स २ टक्क्यांहून म्हणजेच २,२०० अंशांहून अधिक कोसळला आहे. त्यामागची नेमकी कारणे काय आहेत, ते जाणून घेऊया.

शेअर बाजार का घसरत आहे?

परदेशी भांडवलाचे बहिर्गमन, भू-राजकीय तणाव आणि तिसऱ्या तिमाहीच्या निकालांपूर्वीची सावधगिरी यांसारख्या सततच्या चिंतांमुळे गुंतवणूकदार जोखीम असलेल्या गुंतवणुकीपासून दूर राहिल्याने, मुख्यतः सेन्सेक्स आणि निफ्टी ५० या प्रमुख निर्देशांकांमध्ये सलग पाचव्या सत्रात घसरण झाली. मात्र नव्याने चिंतेचे कारण म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध विधेयक मांडले असून, ज्यामुळे रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्के शुल्क लादले जाऊ शकते. जरी हे विधेयक अद्याप मंजूर केलेले नसले तरी, ते पुढील आठवड्यात मतदानासाठी आणले जाऊ शकते. शिवाय अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय ट्रम्प यांच्या ‘लिबरेशन डे’ शुल्कावर लवकरच आदेश देण्याची शक्यता आहे. जर न्यायालयाने ट्रम्प यांच्या विरोधात निकाल दिला, तर बाजारासाठी तो मोठा दिलासा ठरेल. तथापि, त्यांच्या बाजूने आलेला निकाल बाजारातील भावनांना आणखी धक्का देऊ शकतो, कारण यामुळे त्यांना अधिक आक्रमक आयात शुल्क योजना राबवण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी भीती आहे. याच भीतीपोटी जगभरातील भांडवली बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू असून गुंतवणूकदार नफावसुलीला प्राधान्य देत आहेत. अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी सांगितले की, या कायद्यामुळे चीन, भारत आणि ब्राझीलसारख्या देशांवर रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे थांबवण्यासाठी दबाव आणण्यात ट्रम्प यांना मोठे सामर्थ्य प्राप्त होईल.

जीडीपी वाढीचा प्रभावी अंदाज दुर्लक्षित?

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी ७.४ टक्के वेगाने अर्थव्यवस्थेची दौड सुरू राहील, असा दिवसापूर्वी व्यक्त केलेला आशावादी अंदाजही शेअर बाजारात उत्साह निर्माण करू शकला नाही आणि सलग पाचव्या दिवशी सुरू राहिलेल्या घसरणीने ‘सेन्सेक्स’ पाच सत्रात एकूण २२०० अंशांहून गडगडला. परिणामी गुंतवणूकदारांना ९ लाख कोटी रुपयांच्या नुकसानीची झळ सोसावी लागली. भांडवली बाजारातील मोठ्या घसरणीतून, गुंतवणूकदारांनी देशांतर्गत सकारात्मक घडामोडींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. भू-राजकारण आणि जागतिक अनिश्चिततेने भांडवली बाजारात दीर्घकालीन जोखीम टाळण्याच्या वृत्तीची छाया पसरली असल्याचे चित्र आहे.

तिसऱ्या तिमाहीच्या निकालांपूर्वी सावधगिरी?

देशांतर्गत पातळीवर, गुंतवणूकदार कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीच्या घोषणांची वाट पाहत आहेत. भांडवली बाजारातील दिग्गज कंपन्या येत्या आठवड्यात तिमाही आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. यापैकी आयटी क्षेत्रातील बड्या कंपन्या टीसीएस आणि एचसीएल टेक १२ जानेवारी रोजी त्यांचे तिमाही निकाल सादर करतील. अनेक तिमाहींच्या कमकुवत कामगिरीनंतर, भांडवली बाजार तज्ज्ञ तिसऱ्या तिमाहीपासून कमाईत सुधारणा होण्याची अपेक्षा करत आहेत. मात्र, कंपन्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही, तर ते बाजारासाठी एक मोठा नकारात्मक संकेत असेल आणि त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार पाठ फिरवून भांडवलाचे निर्गमन वाढवू शकतो.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा

परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय) गेल्या वर्षी जुलैपासूनभारतीय भांडवली बाजारात समभाग विक्री करत आहेत. जानेवारी महिन्यात ८ तारखेपर्यंत, त्यांनी कॅश सेगमेंटमध्ये ८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे समभाग विकले आहेत. २०२५ मध्ये बाजाराला मिळालेल्या माफक परताव्यामागे परदेशी भांडवलाचे निर्गमन हे प्रमुख कारण होते. जर हा कल बदलला नाही, तर २०२६ मध्येही देशांतर्गत बाजारातील वाढ माफकच राहील, अशी भीती तज्ज्ञांना वाटते आहे.

भारत-अमेरिका व्यापार करार अनिश्चितता

भारत-अमेरिका व्यापार करारावरील कायम असलेल्या अनिश्चिततेमुळेही बाजारातील घसरणीला हातभार लागत आहे. अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करार अंतिम करणाऱ्या पहिल्या देशांमध्ये भारताचा समावेश होईल, या आशेच्या विरुद्ध, अनेक वाटाघाटींच्या फेऱ्यांनंतरही दोन्ही देशांना करार पूर्ण करण्यात अपयश आले आहे. भारत-अमेरिका व्यापार कराराला होणारा विलंब बाजाराच्या भावनांवर परिणाम करू शकतो, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले आहे. सध्या, अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या भारतीय वस्तूंवर आधीच ५० टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जात आहे, ज्यापैकी सुमारे निम्मे शुल्क रशियाकडून आयात केल्या जाणाऱ्या खनिज तेलाशी निगडित आहे.

व्हेनेझुएला गोंधळ, इतरही घटक कारणीभूत

व्हेनेझुएलातील घटना जागतिक स्तरावर एक प्रमुख केंद्रबिंदू राहिल्या आहेत, त्यांचा तात्काळ परिणाम मोठ्या प्रमाणात कमॉडिटी बाजारपेठांवर जाणवला आहे. अचानक आलेल्या राजकीय धक्क्यामुळे भू-राजकीय जोखमींमध्ये भर पडली आहे, विशेषतः व्हेनेझुएलाच्या प्रचंड तेल साठ्यामुळे, जागतिक ऊर्जा बाजारपेठांवर संभाव्य परिणामांबद्दल चिंता निर्माण झाली आहे. याबरोबरच जागतिक पातळीवर वाढती भू-राजकीय अनिश्चितता, खनिज तेलाच्या किमतीतील अस्थिरता आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी हे घटक देखील बाजाराच्या घसरणीला कारणीभूत ठरत आहेत.

gaurav.muthe@expressindia.com