भारतासह एकूण जगभरातच कर्करोगाचे (कॅन्सर) प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कर्करोग प्राणघातक आजार आहे. कर्करोगापासून बचावासाठी वेळेत निदान आणि उपचार आवश्यक असतात. आता कर्करोगाविषयीची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, जनरेशन एक्स (Gen X) आणि मिलेनियल्स पिढीला अनेक प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. यात आतडी, स्तन, स्वादुपिंड या कर्करोगाचे प्रमाण अधिक सामान्य आहे. जनरेशन एक्स आणि मिलेनियल्स पिढीला कर्करोगाचा सर्वाधिक धोका असण्याचे नेमके कारण काय? या अभ्यासात नक्की काय सांगण्यात आले? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

१७ प्रकारच्या कर्करोगाचा धोका?

या नवीन अभ्यासात यूएस कॅन्सर रेजिस्ट्रीमधून गोळा करण्यात आलेल्या जवळपास २४ दशलक्ष कर्करोग रुग्णांच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांच्या गटाने कर्करोगाचा प्रकार, लिंग आणि जन्माच्या गटानुसार या डेटाची क्रमवारी लावली. ३४ सर्वात सामान्यपणे उद्भवणाऱ्या कर्करोगांच्या दरांचे विश्लेषण करून (ज्यामध्ये दोन दशकांत किमान दोन लाख प्रकरणे होती) किती लोकांना कर्करोग होत आहे? केव्हा आणि का होत आहे? याविषयाचाही अभ्यास संशोधकांनी केला आहे.

हेही वाचा : ‘मुलांना जन्म देण्याऐवजी पाळीव प्राणी बरे’; ‘या’ देशात वाढतोय पाळीव प्राण्यांचा ट्रेंड, कारण काय?

यात धक्कादायक म्हणजे, विश्लेषण केलेल्या तरुण गटांमध्ये १७ प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. उदाहरणार्थ, १९९० मध्ये जन्मलेल्या लोकांना १९५५ मध्ये जन्मलेल्या लोकांपेक्षा लहान आतडे, थायरॉईड, किडनी आणि स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याची शक्यता दोन ते तीन पटीने जास्त आहे. त्यांना असेही आढळून आले की, अलीकडे जन्मलेल्या लोकांना लहान वयात कर्करोग होत आहे. सर्व वयोगटातील आणि सर्व कर्करोगांमध्ये, ३० वर्षांखालील मुलांमध्ये स्वादुपिंड आणि लहान आतड्याच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे.

जीवनशैलीतील बदल

जनरेशन एक्स आणि मिलेनियल्स पिढीला त्यांच्या पालकांच्या आणि आजी-आजोबांच्या पिढ्यांपेक्षा विशिष्ट प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका आहे. त्यासाठी बहुधा बदलती जीवनशैली कारणीभूत आहे. चुकीचा आहार आणि तरुणांमधील बदलत्या वर्तनामुळेही हे प्रमाण वाढत आहे. आतड्याचा आणि स्तनाचा कर्करोग यांसारखे १७ पैकी १० कर्करोग लठ्ठपणाशी संबंधित आहेत. अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये सध्या लठ्ठपणाचे जणू संकट आले आहे. या देशांतील लठ्ठपणाचा दर हा दरवर्षी वाढत आहे. बालपणात किंवा प्रौढावस्थेतील लठ्ठपणामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो, हे स्पष्ट करणारे अनेक पुरावे आहेत. लठ्ठपणासाठी आणि नवनवीन उद्भवणार्‍या आजारांसाठी आणखी एक महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे, तो म्हणजे प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या वापरामध्ये वाढ.

चुकीचा आहार आणि तरुणांमधील बदलत्या वर्तनामुळेही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

मद्यपानाचे प्रमाण वाढल्यामुळे यकृत आणि अन्ननलिकेचा कर्करोग

विशेषत: मिलेनियल्स पिढीतील महिलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण वाढल्यामुळे यकृत आणि अन्ननलिका कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे, अभ्यासातील लेखकांनी स्पष्ट केले आहे. पुरुषांमध्ये कपोसी सारकोमा (त्वचेच्या कर्करोगाचा प्रकार) आणि गुदद्वाराचा कर्करोग, या एचआयव्ही संसर्गाशी संबंधित दोन कर्करोगांचे प्रमाण अधिक आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यासाठी ओळखला जाणारा लैंगिक संक्रमित विषाणू ‘ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’देखील गुदद्वाराच्या कर्करोगाच्या वाढीचे कारण असू शकते. असा अंदाज आहे की, गुदद्वाराचे ९० टक्के कर्करोग एचपीव्ही संसर्गामुळे होतात.

विशेष म्हणजे, या अभ्यासामध्ये असे दिसून आले की, १९९० मध्ये जन्माला आलेल्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले. कारण, त्यांना एचपीव्ही विरुद्ध लस देण्यात आली होती. जेव्हा एचपीव्ही लस प्रथम आणली गेली तेव्हा ती फक्त मुलींनाच पुरवली गेली; याचा अर्थ असा की, या पिढीतील तरुण पुरुषांना कोणतेही संरक्षण दिले गेलेले नाही. संशोधकांना कर्करोगाच्या दरांमध्ये अनेक बदल आढळले, त्यासाठी जीवनशैलीतील पिढ्यानपिढ्या झालेले बदल कारणीभूत आहेत. संशोधकांनी नमूद केले आहे की, कर्करोगाची कारणे समजून घेण्यासाठी अधिक संशोधनाची आणि अभ्यासाची गरज आहे. कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस का वाढत आहे, याचे मुख्य कारण जाणून घेतल्याशिवाय त्यासाठी योग्य पावले उचलणेही शक्य नाही.

हेही वाचा : सुनीता विल्यम्स २०२५ पर्यंत अंतराळातच राहणार? कारण काय? अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासाची योजना काय?

काही कर्करोगाचे प्रमाण तरुणांमध्ये कमी

या अभ्यासातील एक चांगली बाब म्हणजे, तरुण पिढ्यांमध्ये काही कर्करोग प्रत्यक्षात कमी होत असल्याचे दिसून आले आहे. तरुण पिढीतील फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या प्रमाणात घट दिसून आली आहे. १९९० मध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये हा रोग होण्याची शक्यता पाच पट कमी आहे. मेलेनोमा (त्वचेच्या कर्करोगाचा प्रकार) मध्येही अशीच प्रगती दिसून आली आहे. डॉक्टरांच्या महितीनुसार, कर्करोगाचे निदान वेळेत झाले, तर उपचार करणे शक्य आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार असे आहेत की, त्यातून उपचाराद्वारे सहज बाहेर पडता येऊ शकते. कर्करोगासाठी जागरूकताही तितकीच महत्त्वाची आहे आणि तरुण पिढीला आपल्या जीवनशैलीत बदल करणेही गरजेचे आहे, जेणेकरून कर्करोगाचा धोका कमी होऊ शकेल.