गेल्या शतकभर एक गोष्ट जवळजवळ निर्विवाद मानली जात होती, ती म्हणजे प्रत्येक नवी पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा अधिक बुद्धिमान होत जाते. शिक्षण, योग्य पोषण, आरोग्य आणि ज्ञानार्जनाचे उपलब्ध मार्ग यामुळे मानवी मेंदूची क्षमता सातत्याने विस्तारत असल्याचं संशोधनातून सिद्ध झालं होतं. मात्र आता पहिल्यांदाच या समजाला छेद जात असल्याचे संकेत दिसू लागले आहेत आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे जनरेशन झेड अर्थात जेन झी.

एकाग्रता, स्मरणशक्ती, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि एकूणच IQ या निकषांवर जनरेशन झेड ही आपल्या पालकांपेक्षा कमी गुण मिळवणारी पहिली पिढी ठरत असल्याचा दावा अलीकडे अमेरिकेच्या सिनेट समितीसमोर सादर करण्यात आलेल्या एका अहवालात करण्यात आला आहे. हा अहवाल न्यूरोसायंटिस्ट म्हणून कार्यरत असलेले डॉ. जॅरेड कूनी हॉर्वाथ यांनी सादर केला आहे. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या माहिती संचांचा आणि जागतिक प्रवाहांचा अभ्यास करून डॉ. हॉर्वाथ यांनी असा निष्कर्ष मांडला की, १९९७ ते २०१० या काळात जन्मलेली जनरेशन झेड ही पिढी, आपल्या आधीच्या पिढीच्या तुलनेत मोजता येण्याजोगी बौद्धिक घसरण दाखवते.

पण हा निष्कर्ष सरळ, सोपा आणि अंतिम आहे का? की हा बदल मानवी बुद्धिमत्तेच्या स्वरूपात होत असलेल्या मोठ्या संक्रमणाचा भाग आहे? हेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

IQ म्हणजे नेमकं काय मोजलं जातं?

IQ (Intelligence Quotient) ही संकल्पना विसाव्या शतकाच्या सुरुवातीला विकसित झाली. स्मरणशक्ती, तार्किक विचार, भाषा, गणिती क्षमता आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये मोजणं हा तिचा मुख्य उद्देश होता. मात्र आधुनिक मेंदूविज्ञान सांगतं की, ही केवळ बुद्धिमत्तेची एक बाजू आहे. सर्जनशीलता, भावनिक समज, सामाजिक जाणीव, जुळवून घेण्याची क्षमता आणि माहिती वेगाने एकत्र करून नवे अर्थ तयार करण्याची कौशल्ये पारंपरिक IQ चाचण्यांत पुरेशा प्रमाणात प्रतिबिंबित होत नाहीत. म्हणजेच IQ चाचण्या या एकाच बाजूच्या गुणवत्तेची सरासरी दर्शवतात.

फ्लिन प्रभाव: वाढ थांबली का?

गेल्या शतकात ‘फ्लिन प्रभाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवाहानुसार प्रत्येक नव्या पिढीचा सरासरी IQ वाढताना दिसत होता. सुधारलेलं शिक्षण, आरोग्य आणि बौद्धिक उत्तेजन ही त्यामागची प्रमुख कारणं मानली गेली. मात्र १९व्या शतकाच्या उत्तरार्धापासून बौद्धिक नोंदी ठेवणाऱ्या अभ्यासांनुसार, २०१० नंतर काही देशांमध्ये हा प्रवाह उलट दिशेने वळल्याचं दिसतं. विशेषतः लक्ष टिकवून ठेवण्याची क्षमता आणि सखोल वाचनातील घट ही सातत्याने नोंदवली जात आहे.

डिजिटल वातावरणाचा मेंदूवर परिणाम

जनरेशन झेड ही पूर्णपणे डिजिटल वातावरणात वाढलेली पहिली पिढी आहे. स्मार्टफोन, सोशल मीडिया, शॉर्ट-फॉर्म कंटेंट, सतत येणाऱ्या सूचना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता… या सगळ्यांमुळे मेंदूला मिळणाऱ्या उत्तेजनांचं स्वरूप बदललं आहे. मेंदूविज्ञानातील शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे ‘deep focus’ ऐवजी ‘rapid switching’ ही विचारशैली अधिक बळकट होते. म्हणजेच एखाद्या एका विषयावर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करण्याऐवजी, अनेक माहितीस्त्रोतांमध्ये वेगाने फिरण्याची क्षमता वाढते.

स्मरणशक्तीचं बाह्य साधनांकडे हस्तांतरण

आधुनिक संशोधनातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्मरणशक्तीचं बाह्य साधनांकडे हस्तांतरण. नोट्स, सर्च इंजिन्स, क्लाउड स्टोरेज आणि AI साधनांमुळे माहिती लक्षात ठेवणं कमी आणि ती कुठे व कशी सापडेल हे लक्षात ठेवणं अधिक महत्त्वाचं ठरतं आहे. काही अभ्यासक याला बौद्धिक घसरण मानतात. तर काहींच्या मते ही मेंदूच्या संसाधनांची पुनर्रचना आहे, ज्यात स्मरणशक्तीपेक्षा विश्लेषण, नमुना ओळख (pattern recognition) आणि संयोजन (synthesis) यांना प्राधान्य दिलं जातं.

शिक्षण, वाचन आणि PISAचे संकेत

PISAसारख्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मूल्यमापनांमध्ये २०१८ नंतर वाचन आणि गणितातील कामगिरीत घसरण नोंदवली गेली आहे. विशेषतः शाळेच्या वर्गांमध्ये डिजिटल उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाल्यानंतर सखोल वाचनाची सवय कमी झाल्याचं अनेक देशांतील अभ्यास सूचित करतात. सखोल वाचन हे दीर्घकालीन स्मरणशक्ती, भाषिक कौशल्य आणि गुंतागुंतीच्या विचारप्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.

पण ही घसरण म्हणजेच ऱ्हास आहे का?

सर्व संशोधक या निष्कर्षाशी सहमत नाहीत. काही अभ्यासकांचा युक्तिवाद आहे की, जनरेशन झेडची बुद्धिमत्ता वेगळ्या स्वरूपात प्रकट होत आहे. माहिती वेगाने एकत्र करणे, विविध संदर्भांशी जुळवून घेणे, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर आणि नेटवर्क-आधारित विचारशैली ही त्यांची बलस्थानं मानली जातात. त्यामुळे पारंपरिक IQ चाचण्यांमध्ये कमी गुण दिसले, तरी एकूणच बौद्धिक क्षमता कमी झाली आहे असा निष्कर्ष काढणं घाईचं ठरू शकतं.

भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता

समाजशास्त्रीय अभ्यासांतून असं दिसतं की, जनरेशन झेड मानसिक आरोग्य, भावनिक सीमा, समावेशकता आणि आत्मजाणीव या बाबतीत अधिक जागरूक आहे. भावनिक बुद्धिमत्ता ही पारंपरिक IQ चाचण्यांत मोजली जात नसली, तरी आधुनिक कार्यक्षेत्रात ती तितकीच… कदाचित अधिक..महत्त्वाची ठरत आहे.

उत्क्रांती की संक्रमण?

काही संशोधक या संपूर्ण प्रक्रियेकडे जैविक उत्क्रांतीपेक्षा सांस्कृतिक आणि तांत्रिक उत्क्रांती म्हणून पाहतात. मानवाची बौद्धिक क्षमता स्थिर नसून, ती पर्यावरणानुसार बदलत राहते. छापील पुस्तकांपासून डिजिटल स्क्रीनपर्यंत झालेला प्रवास हा मेंदूच्या वापराच्या पद्धतीत मूलभूत बदल घडवतो. त्यामुळे सध्याचा काळ हा घसरणीपेक्षा संक्रमणाचा काळ असण्याची शक्यता अधिक आहे.

मिलेनियल्स विरुद्ध जनरेशन झेड हा वाद केवळ ‘कोण जास्त हुशार?’ या प्रश्नापुरता मर्यादित नाही. तो बुद्धिमत्ता कशी मोजली जाते, कोणत्या कौशल्यांना महत्त्व दिलं जातं आणि बदलत्या जगात बौद्धिक क्षमतांची भूमिका काय आहे, यावर प्रकाश टाकतो. उपलब्ध संशोधन असं सूचित करतं की, काही पारंपरिक बौद्धिक क्षमतांमध्ये घट दिसत असली, तरी त्याच वेळी नव्या प्रकारच्या बुद्धिमत्तेचा उदय होत आहे. कदाचित खरा प्रश्न हा नाही की, बुद्धिमत्ता कमी होत आहे का…तर ती आज नेमकी कशी बदलते आहे हा आहे.