Gen Z Eating Habits Causes Diabetes : लेक्चर संपले की कॉलेजच्या कँटीनमध्ये मित्रांचा ग्रुप जमतो आणि खाण्याच्या टेबलावर मोमोजची प्लेट, बाजूला फ्राइज आणि हातात थंड सॉफ्ट ड्रिंक हा तरुणांमध्ये ट्रेंड बनत आहे. एखादा विद्यार्थी पुढच्या लेक्चरला जातो, तर कोणी सकाळपासून लायब्ररीत बसतो आणि खूप वेळाने नीट जेवतो. दुसरा एखादा विद्यार्थी आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केल्यामुळे दुसऱ्या दिवशी केवळ कॉफीवर दिवस ढकलतो. या सगळ्यात एक गोष्ट मात्र कोणीही लक्षात घेत नाही – ब्लड शुगर.
‘डायबेटीस, तो तर मोठ्या वयात होणारा आजार आहे’ असंच अनेक तरुणांना वाटतं. आपण तरुण आहोत, रोज कॉलेजला जातो, काम करतो, मित्रांसोबत फिरतो; मग आपल्याला डायबेटीसचा धोका कसा असेल? हा विचार स्वाभाविक आहे. ‘पण डायबेटीसकडे पाहण्याचा हा गैरसमज आता बदलण्याची गरज आहे,’ असे चेन्नईतील डॉ. मोहन’स डायबेटीस स्पेशालिटीज सेंटरचे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन सांगतात.
डॉ. व्ही. मोहन म्हणाले, टाइप-२ डायबेटीस केवळ वयस्कर व्यक्तींनाच होतो असं नाही. तरुणांमध्येही त्याचा धोका असू शकतो. आनुवंशिकता, कुटुंबातील डायबेटीसचा इतिहास, शरीराचे वाढलेले वजन, विशेषतः पोटाभोवतीची चरबी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि शरीरातील चयापचयाशी संबंधित इतर घटकही महत्त्वाची भूमिका बजावतात.
एखाद्या दिवशी सकाळचा नाश्ता राहिला किंवा कॉलेज सुटल्यानंतर बर्गर खाल्ला म्हणून लगेच डायबेटीस होत नाही. खरा प्रश्न एका दिवसाच्या खाण्याचा नसून, रोजच्या सवयींचा आहे.
सतत जंक फूड खाणे, शारीरिक हालचाल न करणे, पुरेशी झोप न घेणे अशा सवयी नेहमीच सुरू राहिल्या तर काही तरुणांंमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढू शकतो. सगळ्या प्रकारच्या डायबेटीसची कारणं सारखी नसतात. टाइप-१ डायबेटीस लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्येही होऊ शकतो. हा ऑटोइम्यून आजार आहे. म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करत असते, त्यामुळे डॉ. व्ही. मोहन स्पष्ट करतात की, ‘साखर जास्त खातोय’ किंवा ‘लाइफस्टाइल खराब आहे’ याचा टाइप-१ डायबेटीसशी संबंध नसतो,
म्हणूनच कोणत्या प्रकारचा डायबेटीस आहे, त्यामागची कारणं काय आहेत आणि कोणते घटक धोका वाढवतात, हे तरुणांना सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे, असेही डॉ. व्ही. मोहन स्पष्ट करतात.
कॉलेजचं टाइमटेबल खाण्यापिण्याची सवय बिघडवतंय का?
डॉ. व्ही. मोहन पुढे म्हणाले, सकाळी घरातून नाश्ता न करता निघायचं, एकामागोमाग लेक्चर अटेंड करायची आणि दुपारपर्यंत जेवण पुढे ढकलायचं. मग भूक लागल्यावर कँटीनमध्ये जे पटकन मिळेल ते खायचं, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हीच सवय लागलीय.
हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती तर आणखी वेगळी असते. इन्स्टंट नूडल्स, बिस्किटं, फ्राइड स्नॅक्स, गोड पेय असे खाद्यपदार्थ सहज उपलब्ध असतात, त्यामुळे संतुलित जेवणापेक्षा “जे पटकन मिळेल ते खाऊ” हा पर्याय सोपा वाटतो.
डॉ. व्ही. मोहन यांच्या मते, या सवयी बदलण्यासाठी खूप मोठा डाएट प्लॅन करण्याची गरज नाही. क्लासच्या धावपळीतही काही सहज मिळणाऱ्या गोष्टी जवळ ठेवता येतात. फळ, मूठभर काजू-बदाम, भाजलेले चणे, उकडलेली अंडी, दही, उकडलेल्या कडधान्यांची कोशिंबीर किंवा घरी बनवलेला सँडविच असे पर्याय भूक भागवण्यासोबत खाण्याची सवयही थोडी संतुलित ठेवू शकतात.
डॉ. व्ही. मोहन यांनी छोटा बदल सुचवला आहे. ते म्हणतात, कँटीनमध्ये प्रत्येक वेळी फक्त आवडता पदार्थ निवडण्याऐवजी हेल्दी पदार्थ कसा घेता येईल याकडेही लक्ष द्या. जेवणात प्रोटीन, भाज्या किंवा फायबर असलेले पदार्थ आणि योग्य प्रमाणात भात, पोळी किंवा इतर कार्बोहायड्रेट्स असतील तर आहार अधिक संतुलित राहतो.
पिझ्झा बंद करू नका, फक्त पॅटर्न बदला
डॉ. व्ही. मोहन पुढे सांगतात, डायबेटीसचा धोका कमी करायचा म्हणून पिझ्झा, बर्गर किंवा नूडल्स पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मित्रांसोबत पिझ्झा खाणं, वाढदिवसाला केक खाणं किंवा हॉस्टेलमध्ये मूव्ही पाहताना नूडल्स खाणं हा कॉलेज लाइफचाच भाग आहे. एखादा पदार्थ खाल्ल्यामुळे धोका वाढत नाही, तर तो पदार्थ किती वेळा आणि किती प्रमाणात खाल्ला जातो, यावर रक्तातील साखरेची पातळी अवलंबून असते.
मात्र पिझ्झा, बर्गर, मिठाई, पॅकेज्ड स्नॅक्स आणि मैद्याचे पदार्थ रोज खाल्ले तर नकळत जास्त कॅलरीज घेतल्या जाऊ शकतात. यामुळे वजन वाढण्यासोबतच पुढे मेटाबॉलिक समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो.
गोड पेयांकडे विशेष लक्ष द्यायला हवं. सॉफ्ट ड्रिंक्स, गोड पॅकेज्ड ज्यूस आणि अनेक एनर्जी ड्रिंक्समध्ये अतिरिक्त साखर असू शकते; पण त्यातून पोट फारसं भरत नाही. यापेक्षा पाणी, साखर नसलेली पेये किंवा साधं ताक यांसारखे पर्याय अधिक चांगले ठरू शकतात.
तासन्तास बसून राहणंही ठरू शकते समस्या
डॉ. व्ही. मोहन यांच्या मते, बरेच विद्यार्थी दिवसाच्या शेवटी काही ॲक्टिविटी करतात. पण, दिवसाचा विचार केला तर काही तास लेक्चरमध्ये असणं, त्यानंतर अभ्यासासाठी लॅपटॉपसमोर बसणं आणि संध्याकाळी फोन स्क्रोल करत घालवणं, असा बराच वेळ बसूनच जातो. अधूनमधून व्यायाम करणारे विद्यार्थीही उरलेला बराच वेळ बसून घालवतात, त्यामुळे फक्त व्यायाम करण्यापेक्षा दिवसभरात खूप वेळ बसून राहण्यापेक्षा काही हालचाल करणं गरजेचं आहे. एका लेक्चरनंतर थोडं चालणं, शक्य असेल तेव्हा लिफ्टऐवजी जिने वापरणं, अभ्यास करताना मध्येच उठून चालणं, फोनवर बोलताना फिरणं किंवा जेवणानंतर थोडं चालणं असे छोटे बदलही उपयोगी ठरू शकतात.
जर एखादा विद्यार्थी सध्या फारशी शारीरिक हालचाल करत नसेल तर सुरुवातीपासूनच मोठं टार्गेट ठेवण्याची गरज नाही. आठवड्याला कमीत कमी १५० मिनिटे तरी हलका व्यायाम केला तर फायदेशीर ठरतो. त्यासोबत आठवड्यात किमान दोन दिवस स्नायू मजबूत करणारा व्यायाम करण्याचाही सल्ला दिला जातो. सुरुवात छोटी असली तरी चालते; महत्त्वाचं म्हणजे ती नेहमी करत राहिली पाहिजे.
परीक्षेच्या दिवसांत झोप आणि खाण्याचं चक्र कसं असतं?
डॉ. चॅटर्जी पुढे म्हणाले, परीक्षा जवळ आली की झोप कमी होते, जेवणाच्या वेळा बदलतात आणि कॉफी घेण्याचे प्रमाण वाढते. काही विद्यार्थी तर रात्रभर अभ्यास करण्यासाठी एनर्जी ड्रिंक्सचाही आधार घेतात. या सर्वाची आपल्याला सवय लागते. पण, त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो.
सतत कमी झोप घेतल्याने भूक, हार्मोन्स आणि इन्सुलिनवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे रक्तातील साखरेचा समतोल बिघडू शकतो. झोप पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशी जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स वाढू शकतात आणि व्यायाम करण्याची इच्छाही कमी होऊ शकते,
म्हणून परीक्षा असल्या तरी झोपेची वेळ शक्य तितकी नियमित ठेवणं, योग्य प्रमाणात कॉफी घेणं आणि सलग अनेक तास अभ्यास न करता मधे छोटे ब्रेक घेऊन हालचाली सुरू ठेवणे अधिक चांगलं असतं. अभ्यासाचा ताण असला तरी या छोट्या सवयी पाळणं शक्य आहे, असेही डॉ. चॅटर्जी म्हणतात.
कोणत्या तरुणांनी विशेष काळजी घ्यावी?
प्रत्येक तरुणाने डायबेटीसबाबत चिंता करण्याची गरज नाही. मात्र, कुटुंबात डायबेटीसचा इतिहास, वाढलेलं वजन, हाय बीपी, वाढलेलं कोलेस्ट्रॉल किंवा शारीरिक हालचाल कमी असणं यांसारखे काही घटक असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
रक्तातील साखर वाढली तरी प्रत्येक वेळी त्याची लक्षणं नेहमीच जाणवत नाहीत. काही जणांना वारंवार तहान लागणे, जास्त लघवी होणे, कारण नसताना वजन कमी होणे, थकवा, दृष्टी धूसर होणे किंवा वारंवार संसर्ग होणे अशी लक्षणं दिसू शकतात; तर इतरांमध्ये यापैकी एक किंवा दोन लक्षणे दिसू शकतात.
गरजेनुसार फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज आणि HbA1c यांसारख्या तपासण्या केल्या जाऊ शकतात. मात्र, तरुणांनी सतत चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या रोजच्या सवयींकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे, असे डॉ. चॅटर्जी सुचवतात.
