Gen Z Protest Memes Pop Culture : ‘वन पीस’चा झेंडा, मीम्स, लोकप्रिय गाणी आणि सुपरहिरोंचे मुखवटे आता आंदोलनांची नवी भाषा बनत आहेत. जगभरातली तरुणाई पॉप कल्चरमधल्या प्रतीकांचा वापर करून राजकीय असंतोष कसा व्यक्त करतेय, याचा मागोवा घेणारा हा लेख.

एक टोपी घातलेली कवटी आणि दोन हाडं असं चित्र रेखाटलेला काळा झेंडा. जपानी मंगा आणि ॲनिमे मालिका ‘वन पीस’मधल्या समुद्री चाच्यांचं हे चिन्ह अलीकडे इंडोनेशिया, नेपाळ आणि भारतातल्या आंदोलनांमध्ये दिसू लागलं आहे. काल्पनिक कथेतलं हे प्रतीक प्रत्यक्ष राजकीय असंतोषाचा आवाज बनतंय.

दिल्लीत निवडणूक आयुक्तांविरोधात झालेल्या आंदोलनात विद्यार्थी नेत्या नेहा बोराच्या टी-शर्टवरही हेच चिन्ह दिसलं. घोषणा, फलक आणि पक्षांचे झेंडे यांच्याबरोबर आता एखाद्या ॲनिमे मालिकेतलं पात्रही आंदोलनाचा चेहरा बनू शकतं हे या घटनेने दाखवून दिलं.

जगभरातली तरुणाई आंदोलनांसाठी मीम्स, गाणी, सिनेमांमधली पात्रं, कार्टून, विनोद आणि सोशल मीडियावरच्या ट्रेंड्सचा वापर करतेय, त्यामुळे आंदोलनांची भाषा बदलतेय. जुन्या घोषणा कालबाह्य झाल्या नसल्या, तरी व्यक्त होण्याचे आणखी काही नवे मार्गही तयार झाले आहेत. या बदलामागे पॉप कल्चर आणि डिजिटल जगाचा मोठा वाटा आहे.

‘वन पीस’चा झेंडा आंदोलनात का उतरला?

इचिरो ओडा यांनी १९९७ मध्ये ‘वन पीस’ ही जपानी मंगा मालिका सुरू केली. तिचा नायक मंकी डी. लुफी आणि त्याचे सहकारी समुद्री चाचे असले तरी ते पारंपरिक अर्थाने खलनायक नाहीत. कथेतली सत्ताकेंद्रं ही भ्रष्ट स्वरूपाची आणि दडपशाही करणारी आहेत. त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या या चाच्यांचा झेंडा जगभरातल्या आंदोलनकर्त्या तरुणांना आकर्षित करतोय. ‘लोकसत्ता : बुकमार्क’च्या एका लेखानुसार, या काल्पनिक कथेत त्यांना सत्तेचं केंद्रीकरण, गुलामगिरी, शोषण आणि अन्यायाविरोधातला संघर्ष दिसतो.

‘द हिंदू’च्या बातमीनुसार, या झेंड्याचा वापर इंडोनेशियात २०२३ मध्ये झालेल्या आंदोलनांमध्ये झाला. ऑगस्ट २०२५ मध्ये इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवरही तो चर्चेत आला. सरकारने राष्ट्रध्वज फडकावण्याचं आवाहन केल्यानंतर काही नागरिकांनी घरांवर आणि वाहनांवर ‘वन पीस’चा झेंडा लावला. राष्ट्रवादाच्या घोषणांपेक्षा सामान्य नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष द्या, असा त्यातून संदेश दिला जात होता. नेपाळमधल्या २०२५ च्या आंदोलनातही हे चिन्ह दिसलं.

आंदोलनांमधली घोषणांपलीकडची भाषा

भारतातल्या जेन-झी आंदोलनांमध्ये अशा पॉप कल्चरमधल्या प्रतीकांसोबतच प्रकर्षाने जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे भाषिक बदल. ‘फ्रंटलाईन’च्या वरिष्ठ उपसंपादिका टी. के. राजलक्ष्मी यांनी हा बदल आपल्या लेखात टिपला आहे.

लेखाच्या सुरुवातीलाच त्या ‘वस्तेगुना हुया’ या आंदोलनकाळात तुफान व्हायरल झालेल्या शब्दप्रयोगाचा उल्लेख करतात. जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान एका तरुणीने पोलिसांना उद्देशून ‘वस्तेगुना हुया’ असा शब्दप्रयोग केला. त्याचा नेमका अर्थ पोलिसांना किंवा सोशल मीडियावर तो व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांना कळला नाही; पण त्या तरुणीने पोलिसांच्या अर्थहीन कारवाईला दिलेलं हे उपरोधिक उत्तर होतं. आंदोलनात मारहाण झाल्यानंतरही ती पुन्हा आंदोलनात सहभागी झाली. तिच्या या कृतीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसरला.

या आंदोलनात जुन्या कवितांनाही नवा संदर्भ मिळाल्याचं राजलक्ष्मी नोंदवतात. कवी मंजर भोपाली यांच्या भ्रष्टाचार आणि सत्तेला जाब विचारणाऱ्या कवितेतल्या ओळी नव्या संगीतासह सादर करण्यात आल्या. परीक्षा पेपरफुटी, महिलांवरील अत्याचार, मणिपूरमधला हिंसाचार आणि आंदोलकांना देशविरोधी ठरवण्यासारखे मुद्दे त्यातून मांडले गेले. काही गाणी एआयच्या मदतीने तयार केलेल्या आवाजातही सादर झाली. जुन्या कवितेला आजच्या तरुणांच्या भाषेत आणि संगीताच्या ठेक्यात मांडण्याचा हा प्रयत्न होता.

यातला महत्त्वाचा बदल म्हणजे आंदोलनात सहभागी होण्यासाठी आता त्याच त्या पारंपरिक घोषणा देणं किंवा भाषण करणं हाच एकमेव मार्ग राहिलेला नाही. एखादा व्हिडीओ बनवणं, गाणं तयार करणं, मीम शेअर करणं किंवा एखाद्या लोकप्रिय ट्रेंडचा वापर करणं हेही राजकीय मत व्यक्त करण्याचे मार्ग बनले आहेत. आंदोलनातला सहभाग अधिक वैयक्तिक आणि सर्जनशील झाला आहे.

गाजलेलं गाणं बनलं आंदोलनगीत

गाजलेली गाणी आंदोलनासाठी वापरण्याचं आणखी एक उदाहरण चीनमध्ये दिसलं. २०२२ मध्ये झिरो कोविड धोरणामुळे अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन होता. अन्नधान्याचा तुटवडा आणि वाढत्या किमतींमुळे नागरिकांमध्ये असंतोष होता. त्याच वेळी फसलेल्या सरकारी धोरणांवर टीका करणाऱ्या पोस्ट लगेच हटवल्या जात होत्या.

अशा वेळी काही नागरिकांनी रिकाम्या तांदळाच्या भांड्यांचे आणि फ्रिजचे व्हिडीओ पोस्ट केले. त्याच्या पार्श्वभूमीला ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातलं ‘जिमी जिमी’ हे गाणं होतं. चिनी भाषेतल्या ‘जिए मी’ या शब्दांचा अर्थ ‘मला भात द्या’ असा होतो. या ध्वनीसाम्याचा वापर करून नागरिकांनी सेन्सॉरशिपला चकवा दिला.

या उदाहरणात गाण्याचा मूळ अर्थ किंवा निर्मितीमागचा उद्देश महत्त्वाचा नव्हता. लोकांनी त्याचा वापर आपल्या परिस्थितीशी जोडून केला. पॉप कल्चरची हीच ताकद आहे. एखादं गाणं, पात्र किंवा प्रतीक एका पिढीसाठी मनोरंजन असू शकतं; तर दुसऱ्या संदर्भात ते राजकीय संदेशाचं माध्यम बनू शकतं.

मीम्स म्हणजे केवळ टिंगलटवाळी नाही!

आंदोलनादरम्यान व्हायरल झालेल्या मीम्सकडे केवळ टिंगलटवाळी म्हणून न पाहता ते डिजिटल राजकारणाचे साधन कसे बनतात, हे राजीव परिपूर्णम आणि मिली खन्ना यांच्या ‘फ्रॉम मीम्स टू मोबिलायझेशन: द कॉक्रोच जनता पार्टी एज अ फॉर्म ऑफ डिजिटल पॉलिटिकल पार्टिसिपेशन अमंग इंडियन युथ’ या संशोधनातून स्पष्ट होतं. २०२६ मध्ये तयार झालेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या उपरोधिक मीम अकाऊंटला अवघ्या तीन आठवड्यांत दोन कोटींहून अधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स मिळाले. परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत या पार्टीने पुढे जंतरमंतरवर प्रत्यक्ष आंदोलनही केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं.

पण, ऑनलाइन लोकप्रियता आणि प्रत्यक्ष सहभागात मोठी तफावत असते, असंही या संशोधनात नोंदवलं आहे. लाखो ऑनलाइन फॉलोअर्सच्या तुलनेत मैदानात उतरणाऱ्यांची संख्या कमी होती. असं असलं तरी आंदोलनकाळात अनेकांनी घरबसल्या वेगवेगळे मीम्स तयार करून मैदानात उतरलेल्यांसाठी एकप्रकारे भाषिक रसदच पुरवली होती, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

केनियातल्या २०२४ च्या आर्थिक विधेयकाविरोधातील आंदोलनातही तरुणांनी मीम्स, उपरोध आणि स्थानिक बोलीचा वापर केला. आपल्या ‘मीम्स, मेटाफर अँड मोबिलायझेशन: इनोव्हेटिव्ह लँग्वेज युज इन केनियन जेन-जी प्रोटेस्ट’ या शोधनिबंधासाठी संशोधकांनी या आंदोलनाशी संबंधित व्हायरल पोस्ट, हॅशटॅग, मीम्स, पोस्टर्स आणि व्हिडीओंचा अभ्यास केला आहे. त्यात ‘शेंग’ या स्थानिक मिश्र भाषेचा, शब्दांच्या नव्या अर्थांचा आणि विनोदाचा वापर दिसून आला. या पद्धतीमुळे राजकीय संदेश कमी शब्दांत, सहज समजेल अशा स्वरूपात अधिक वेगाने पसरला.

सुपरहिरो बनतायत आंदोलनांचे चेहरे

बॅटमॅन, स्पायडरमॅन, हल्क आणि आयर्न मॅन ही पात्रं सहसा चित्रपटांच्या पडद्यावर किंवा कॉमिक्समध्ये दिसतात. पण, अलीकडे भारतातल्या विद्यार्थी आंदोलनांमध्येही ही पात्रं पोशाख आणि मुखवट्यांच्या रूपात दिसली. दिल्ली, नागपूर, मुंबई आणि इंदूरमधल्या आंदोलनांमध्ये तरुणांनी सुपरहिरोंचे पोशाख परिधान केल्याची छायाचित्रं ‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केली होती. फ्रान्समधील आंदोलनांमध्येही अशा पात्रांचा वापर झाला.

केवळ मनोरंजनमूल्य हा या पात्रांच्या लोकप्रियतेचा निकष असू शकत नाही, हे या आंदोलनांमधून सिद्ध झालं. बॅटमॅन भ्रष्टाचाराविरोधात लढणारा, स्पायडरमॅन सामान्य तरुण असूनही मोठी जबाबदारी स्वीकारणारा, तर हल्क अन्यायाविरोधात शक्ती वापरणारा म्हणून लोकांच्या परिचयाचा आहे, त्यामुळे त्यांचा मुखवटा घालून आंदोलनात उतरणं म्हणजे एका परिचित दृश्य भाषेतून स्वतःचा मुद्दा मांडणं असं आंदोलनकर्त्या तरुणाईला वाटतं.

सत्तेला आव्हान देण्यासाठी विनोदाचा वापर

आंदोलनात विनोदाचा वापर ही काही पूर्णपणे नवी गोष्ट नाही; पण आज त्याला अधिक ठळक दृश्य स्वरूप मिळालं आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, २०२५ मध्ये अमेरिकेतल्या पोर्टलँडमध्ये झालेल्या आंदोलनांमध्ये आंदोलक बेडकांचे पोशाख घालून रस्त्यावर उतरले होते. हाँगकाँगमधल्या २०१९ च्या आंदोलनातही ‘पेपे द फ्रॉग’ हे कार्टून प्रतिकाराचं प्रतीक बनलं होतं. विशेष म्हणजे, या पात्राचा यापूर्वी उजव्या विचारसरणीच्या काही गटांनी वेगळ्या अर्थाने वापर केला होता. पुढे हाँगकाँगमधल्या आंदोलकांनी त्याला नव्या अर्थाने स्वीकारलं. त्याचबरोबर या आंदोलनांमध्ये ‘विनी द पू’ हे कार्टूनही प्रतिकाराचं प्रतीक म्हणून वापरलं गेलं.

संशोधक या प्रकाराला ‘टॅक्टिकल फ्रिव्होलिटी’ म्हणतात. म्हणजे विनोद, विचित्र पोशाख आणि खेळकर कृतींच्या माध्यमातून सत्तेच्या गंभीर आणि धाकदायक प्रतिमेला आव्हान देणं. अशा कृतींमुळे आंदोलनाकडे लोकांचं लक्ष वेधलं जातं. पोलिसांच्या कठोर कारवाईचं गांभीर्य कमी न करता, उलट त्या कारवाईचा निरर्थकपणा दाखवण्याचं कामही यातून होऊ शकतं.

याचं आणखी एक उदाहरण म्हणजे फ्रान्समधल्या आंदोलनात वापरलेला ‘हार्लेक्विन’चा मुखवटा. इटलीतल्या सोळाव्या शतकातल्या ‘कॉमेडिया डेल आर्ते’ या लोकनाट्यपरंपरेतून आलेलं हे विदूषकाचं पात्र मूळतः श्रीमंत आणि सत्ताधारी व्यक्तींची खिल्ली उडवणारं होतं. ‘लोकसत्ता’च्या एका लेखानुसार, राजाच्या चुकीच्या निर्णयांवर थेट बोलण्याची हिंमत नसलेल्या काळात दरबारी विदूषक विनोद आणि विडंबनातून सत्तेला आरसा दाखवायचा. आज या जुन्या पात्राचा मुखवटा आंदोलनात दिसणं हा लोककलेचा राजकीय वापर कसा बदलत जातो याचा नमुना आहे.

डिजिटल आंदोलन आणि प्रत्यक्ष सहभाग

जेन-झीच्या आंदोलनांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाइन जगातली सीमारेषा पुसट होणं. प्रा. मो. इश्तियाक हुसेन यांनी ‘द रोल ऑफ जनरेशन जी इन मास अपरायझिंग्स इन डेव्हलपिंग कंट्रीज’ या संशोधनात बांगलादेश, नेपाळ, केनिया, म्यानमार व इंडोनेशियातील जेन-झी आंदोलनांचा अभ्यास मांडला आहे. या तरुणाईची डिजिटल कौशल्यं, विकेंद्रित संघटनपद्धती आणि सोशल मीडियासह प्रत्यक्ष रस्त्यावरील कृती यांमुळे ही आंदोलने प्रभावी ठरतात; मात्र सरकारी दडपशाही, इंटरनेट बंदी आणि चुकीच्या माहितीचा प्रसार ही मोठी आव्हाने आहेत, असं ते नोंदवतात.

प्रा. हुसेन यांच्या मते, डिजिटल माध्यमांमुळे आंदोलनाचा संदेश जलद पसरतो; पण पोस्ट व्हायरल झाली म्हणजे राजकीय बदल घडेलच असं नाही. ऑनलाइन पाठिंब्याचे रूपांतर प्रत्यक्ष सहभाग, संघटना व सातत्यपूर्ण दबावात झाले तरच परिणाम दिसतो अन्यथा मुद्दा नव्या ट्रेंडमध्ये मागे पडतो.

आंदोलनांची भाषा बदलली, पण प्रश्न तेच आहेत

जेन-झीच्या आंदोलनांमध्ये दिसणारे मीम्स, ॲनिमेचे झेंडे, सुपरहिरोंचे मुखवटे, विनोदी पोशाख आणि नव्या धाटणीची गाणी यांकडे केवळ तरुणाईची फॅशन म्हणून बघणं योग्य ठरणार नाही. आंदोलनात सहभागी होण्याची आणि स्वतःचं म्हणणं मांडण्याची ही त्यांची उत्स्फूर्त पद्धत आहे. स्वतःची भाषा, स्वतःची दृश्य प्रतीकं आणि स्वतःची डिजिटल व्यासपीठं तयार करण्याची क्षमता या तरुणाईकडे निश्चितच आहे.

या बदलाकडे केवळ जुन्या आणि नव्या पिढीमधला फरक म्हणून पाहणंही योग्य ठरणार नाही. आंदोलनांची भाषा नेहमीच काळानुसार बदलत आली आहे. पूर्वी लोककला, नाटकं, कविता आणि गाणी सत्तेला प्रश्न विचारण्यासाठी वापरली जात होती. आज त्याच परंपरेला मीम्स, ॲनिमे, रील्स आणि डिजिटल संगीताची जोड मिळाली आहे.

माध्यमं बदलली असली तरी अन्याय, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शिक्षण आणि लोकशाहीविषयीचे प्रश्न कायम आहेत. ‘वन पीस’चा काळा झेंडा असो किंवा कॉक्रोचचा मीम, सुपरहिरोचा मुखवटा असो किंवा ‘जिमी जिमी’सारखं गाणं, ही प्रतीकं आंदोलनाची लोकप्रियता वाढवतात. ती लोकांना एकत्र आणू शकतात, असंतोषाला आवाज देऊ शकतात; पण बदल घडवण्यासाठी त्या आवाजाचं संघटित कृतीत रूपांतर होणं गरजेचं आहे. जेन-झीने आंदोलनांची भाषा बदलली आहे; आता त्या भाषेतून प्रत्यक्षात किती बदल घडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.