देवदत्त पोखरकर
Ghatasthapana Navratri Meaning: भारतीय संस्कृतीचं थोरपण तिच्या पाच सहस्रकी कालखंडात नसून तिने जपलेल्या विचारतत्त्वात आणि माणूस-निसर्गात साधलेल्या अपूर्व अनुबंधात दडलेलं आहे. नवरात्रीच्या प्रारंभी केली जाणारी घटस्थापना ही या नात्याची जिवंत प्रचिती देते. भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव हे निव्वळ धार्मिक विधी नाहीत. त्यामागे निसर्ग, ऋतूचक्र, त्याआधारे केली जाणारी शेती आणि मानवी जीवनाशी जोडलेले अनेक अर्थ दडलेले आहेत. नवरात्रीच्या प्रारंभी केली जाणारी घटस्थापना हे याचं अतिशय सुंदर उदाहरण आहे. मातीचा घट, त्यातलं पाणी, त्यावर ठेवलेला नारळ, आंब्याची पानं, विड्याची पानं आणि त्याचबरोबर मातीमध्ये पेरली जाणारी विविध प्रकारची धान्यं या सर्व घटकांमधून भारतीय कृषिसंस्कृती आणि निसर्गाशी असलेलं अतूट नातं प्रतिबिंबित होताना दिसत असतं.
घटस्थापनेमध्ये वापरला जाणारा घट हा धार्मिक परंपरेचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. भारतीय परंपरेत घटाला मांगल्य, सुखसमृद्धी आणि जीवनाचं प्रतीक मानलं जातं. घटामध्ये प्रामुख्यानं पाणी भरलं जातं. वनस्पतींच्या जीवनासाठी पाणी अत्यावश्यक असल्यामुळे घटातलं जलतत्त्व आणि त्याच वेळी मातीत पेरलेल्या बियांचं अंकुरणं यांच्यात एक सुंदर प्रतीकात्मक संबंध दिसतो. बीजाला ओलावा मिळाल्यावर त्यातली सुप्त जीवनप्रक्रिया सक्रिय होते आणि काही दिवसांत हिरवे अंकुर बाहेर येतात. एकप्रकारे घटस्थापनेत जल आणि जीवन यांचा संबंध प्रत्यक्ष अनुभवता येतो.
आंब्याची पानंच का ?
कलशाच्या मुखावर आंब्याची पानं ठेवण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. हे दृश्य मन सुखावणारं असतं, मांगल्याची नांदी असतं. आपल्याकडे आंब्याच्या पानाशिवाय कोणत्याही धार्मिक कार्यास जणू पूर्णत्व येतच नाही. आंब्याचं शास्त्रीय नाव Mangifera indica आहे. हा Anacardiaceae कुलातला अत्यंत मोलाचा भारतीय वृक्ष आहे. भारतीय संस्कृतीत आंबा केवळ फळझाड म्हणून नव्हे, तर समृद्धी, फलनशीलता आणि मंगल भावनेशी जोडलेला वृक्ष आहे.अर्थातच पूजाअर्चा, इतर धार्मिक विधी आणि विविध शुभकार्यात आंब्याच्या पानांचा वापर आवर्जून केला जातो.
कलशावर नारळ ठेवण्याचीही आपल्याकडे पूर्वापार प्रथा आहे. नारळ हा भारतीय कृषिसंस्कृतीचं मोल वाढवणारा घटक आहे. त्याचं धार्मिक आणि सामाजिक जीवनात मोठं स्थान आहे. नारळाला अनेक ठिकाणी ‘श्रीफळ’ म्हणजेच शुभ आणि पवित्र फळ मानलं जातं. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात नारळ अर्पण करून किंवा वाढवून (फोडून) करण्याची प्रथा महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांत आढळते. दक्षिणेतल्या किनारपट्टीच्या राज्यांमध्ये तर नारळ हा संपूर्ण जीवन व्यापणारा कल्पवृक्ष आहे. माणसाच्या जन्मापासून ते अंतापर्यंतच्या प्रत्येक पायरीवर नारळाचं झाड अविभाज्य घटक म्हणून स्थान मिळवून आहे.
नारळासोबतच काही समूहांमध्ये विड्याची पानंही घटस्थापनेच्या पूजाविधीत वापरली जातात.
विड्याचं शास्त्रीय नाव Piper betle आहे . ही Piperaceae म्हणजे मिरी कुलातील वेल आहे. विड्याचं पान आकारानं हृदयाकृती, हिरवंगार आणि सुगंधी असतं. भारतीय संस्कृतीमध्ये विड्याच्या पानाला धार्मिक विधी, पूजा, मंगलकार्य आणि पारंपरिक सामाजिक व्यवहारात अनन्यसाधारण स्थान आहे. सुपारीसोबत विड्याचं पान देण्याची प्रथा अनेक भागांत आजही प्रचलित आहे. त्यामुळे घटस्थापनेत विड्याचं पान हे केवळ पूजेतलं एक साहित्य नसून भारतीय वनस्पती संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच पूजेची तयारी करताना, न विसरता विड्याची पानं आणा बरं, हा निरोप यजमानांना आवर्जून दिला जातो.

धान्य आहे मोलाचं
घटस्थापनेतील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे, मातीमध्ये पेरलं जाणारं विविध प्रकारचं बियाणं. त्या पेरल्या जाणाऱ्या धान्यांमध्ये प्रदेशाची, कुटुंबाची परंपरा आणि स्थानिक प्रथा यानुसार फरक आढळतो. त्यामुळे सर्व ठिकाणी एकच धान्य पेरलं जातं असंही नाही. महाराष्ट्रातील काही ठिकाणी गहू, जव, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, उडीद आणि इतर धान्यं किंवा कडधान्यं वापरली जातात. वनस्पतिशास्त्रीयदृष्ट्या मूग, हरभरा आणि उडीद ही धान्यं नाहीत, कडधान्यं आहेत; मात्र धार्मिक आणि लोकपरंपरेत ‘धान्य’ हा शब्द अनेकदा व्यापक अर्थाने वापरला जातो.
गहू (Triticum aestivum) हे जगातल्या प्रमुख अन्नधान्यांपैकी एक आहे. Poaceae म्हणजे गवत कुलातील या वनस्पतीचं बी मानवी आहारातलं महत्त्वाचं अन्न आहे. योग्य ओलावा मिळाल्यावर गव्हाचं बी अंकुरतं आणि त्यातून अरुंद हिरवी पानं बाहेर येतात. घटस्थापनेत गव्हाचे अंकुर वाढताना पाहणं म्हणजे एका महत्त्वाच्या अन्नपिकाच्या जीवनचक्राची सुरुवात प्रत्यक्ष अनुभवण्यासारखं आहे.
जव (Hordeum vulgare) हे देखील Poaceae कुलातल्या प्राचीन पिकांपैकी एक आहे. भारतीय आणि इतर अनेक प्राचीन कृषिसंस्कृतींमध्ये त्याचं महत्त्व आढळतं. प्राचीन काळापासून अन्नसंस्कृतीचा घटक असलेल्या जवाचं बी योग्य ओलावा मिळाल्यावर जलद गतीनं अंकुरतं. निसर्गाची ही किमयाच जणू. नवरात्रातील अंकुरणाच्या परंपरेत काही प्रदेशांत जवाचा वापर केला जातो; मात्र त्याचा वापर सर्व ठिकाणी समान आहे, असं म्हणता येत नाही.
ज्वारी-बाजरी कशाची आठवण देते ?
ज्वारी (Sorghum bicolor) महाराष्ट्राच्या कृषीसंस्कृतीला विशेष जवळची आहे. कोरडवाहू शेतीत कमी पाण्यातही उत्पादन देण्याची क्षमता असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत ज्वारीला खूप महत्त्व आहे. बाजरी (Cenchrus americanus) हेही कोरड्या आणि उष्ण प्रदेशातलं महत्त्वाचं धान्यपीक आहे. कमी पाऊस असलेल्या भागात हे पीक शेतकऱ्यांना आधार देत आलं आहे. त्यामुळे घटस्थापनेत उपयोगात येणारे ज्वारी-बाजरीचे अंकुर महाराष्ट्राच्या पारंपरिक नि चिवट कृषिजीवनाची आठवण करून देत असतात.
मका (Zea mays) हे Poaceae कुलातलं आणखी एक महत्त्वाचं पीक आहे. मक्याचं बी तुलनेनं मोठं असल्यामुळे त्याचं अंकुरण सहज नजरेत येतं. सुरुवातीच्या वाढीसाठी बीजामध्ये साठवलेल्या अन्नाचा उपयोग होतो आणि नंतर हिरवी पानं प्रकाशसंश्लेषणाच्या माध्यमातून वनस्पतीसाठी अन्न तयार करू लागतात.
कडधान्यं कशाची जाणीव करून देतात ?
काही ठिकाणी मूग (Vigna radiata), हरभरा (Cicer arietinum) आणि उडीद (Vigna mungo) यांसारख्या कडधान्यांचाही घटस्थापना करताना वापर केला जातो. ही Fabaceae म्हणजे शिंबावंत कुलातली पिकं आहेत. भारतीय आहारात प्रथिनांचा महत्त्वाचा स्रोत म्हणून त्यांना विशेष स्थान आहे. या कुलातल्या अनेक वनस्पतींच्या मुळांशी सहजीवी सूक्ष्मजीवांचा संबंध असतो. Rhizobium सारख्या जीवाणूंशी संबंधित मुळांवरील गाठी नत्रचक्रात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे ही कडधान्यं आपल्याला अन्नाबरोबरच मातीच्या सुपीकतेशी संबंधित नैसर्गिक प्रक्रियेचीही आठवण करून देतात.
घटस्थापनेतील या बियांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं अंकुरणं. बीजाला योग्य ओलावा मिळाल्यानंतर ते पाणी शोषून घेतं आणि त्यातील जैव-रासायनिक प्रक्रिया सक्रिय होतात. भ्रूणाची वाढ सुरू होते. सर्वसाधारणपणे मूलांकुर प्रथम बाहेर पडतो आणि जमिनीत खाली वाढतो. त्यानंतर खोडाचा भाग वरच्या दिशेने वाढत जाऊन पानं विकसित होतात. पानं हिरवी झाल्यानंतर प्रकाशसंश्लेषण सुरू होतं आणि वनस्पती स्वतःसाठी अन्न तयार करण्यास सक्षम होते.
धार्मिक कार्याकडून विज्ञानाकडे
म्हणूनच घटस्थापनेतल्या अंकुरांकडे ‘जिवंत प्रयोगशाळा’ म्हणूनही पाहता येतं. या दिवसांत मुलांनी दररोज अंकुरांची वाढ पाहिली तर त्यांना बीज, मूळ, खोड, पाने, अंकुरण आणि प्रकाशसंश्लेषण यांची प्राथमिक माहिती प्रत्यक्ष निरीक्षणातून मिळू शकते. धार्मिक परंपरेतून विज्ञानात डोकावण्याची ही एक सुंदर संधी असते. घटस्थापनेत मांडलेले घट, पाणी, माती, विड्याची पानं, आंब्याची पानं, नारळ आणि विविध बियाणं या सर्वांकडे एकत्रितपणे पाहिले तर भारतीय कृषिसंस्कृतीचं एक छोटेसं चित्र- मिनिएचरच म्हणा ना, आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. जलाशिवाय बीज अंकुरत नाही, मातीशिवाय त्याला आधार मिळत नाही आणि प्रकाशाशिवाय वनस्पतीचं पुढील जीवनचक्र पूर्ण होत नाही. या परस्परसंबंधांची जाणीव आजच्या पर्यावरणीय संकटाच्या काळात अधिक महत्त्वाची आहे.
घटस्थापनेचा खरा संदेश म्हणूनच केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नाही. एका छोट्याशा बीजात भविष्यातलं अन्न, वनस्पती, शेती आणि जीवनाची शक्यता दडलेली असते. घटातलं पाणी आपल्याला जलाचं महत्त्व सांगतं, मातीत रुजलेलं बीज अन्ननिर्मितीची आठवण करून देतं, विड्याची आणि आंब्याची पानं आपल्या वनस्पतीपरंपरेशी जोडतात आणि काही दिवसांत उगवणारा हिरवा अंकुर जीवनसातत्याचं दर्शन घडवतो. घटस्थापना ही माती, जल, बीज आणि जीवन यांना एकत्र आणणारी भारतीय संस्कृतीची जिवंत परंपरा आहे. देवीसमोर उगवणारा प्रत्येक हिरवा अंकुर आपल्याला एकच संदेश देतो. तो म्हणजे, माती जपा, पाणी जपा, बीज जपा आणि निसर्ग जपा; कारण याच घटकांमध्ये आपलं उज्ज्वल भवितव्य दडलेलं आहे.
