Ghaziabad three Sisters Suicides उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. ‘भारत सिटी सोसायटी’मध्ये तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या तिघींनाही ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती. याच गेममुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे, असे वृत्त ‘न्यूज १८’ने दिले आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा ऑनलाइन टास्कवर आधारित गेम्सकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. तज्ज्ञांच्या मते, हे गेम्स मुलांचे भावनिक शोषण करण्यासाठीच तयार केलेले असतात.
त्यांच्या घरातून मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये ‘कोरियन लव्ह गेम’ असा स्पष्ट उल्लेख असल्याचे, ‘न्यूज १८’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. यामुळे तपास यंत्रणा आणि बाल सुरक्षा तज्ज्ञ आता हे प्लॅटफॉर्म्स कसे काम करतात आणि ते अल्पवयीन मुलांसाठी इतके धोकादायक का आहेत, याचा तपास करत आहेत. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार त्यांनी आई-वडिलांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, “मम्मी आणि पप्पा, सॉरी… आता तुम्हाला समजेल की आमचं या गेमवर किती प्रेम होतं. द कोरियन लव्ह गेम”. ‘कोरियन लव्ह’ गेम काय आहे? ऑनलाईन गेमचा मुलांवर काय परिणाम होतो? इतर धोकादायक गेम कोणकोणते? सविस्तर जाणून घेऊयात…
प्रकरण काय?
बुधवारी पहाटे साधारण २ च्या सुमारास पाखी (१२), प्राची (१४) आणि विशिका (१६) या तीन बहिणींनी एकमेकींचे हात धरले आणि इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारली. सकाळपर्यंत संपूर्ण परिसरात भीती आणि धक्क्याचे वातावरण होते. तपास अधिकाऱ्यांना कुटुंबीयांनी सांगितले की, तिन्ही बहिणी एकमेकींच्या खूप जवळ होत्या. त्या जेवण, अंघोळ किंवा झोपणे अशा सर्व गोष्टी एकत्रच करायच्या. मात्र, कोविड-१९ च्या काळात त्यांच्या वागण्यात बदल झाला.
त्यांनी शाळेत जाणे बंद केले आणि त्या स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागल्या. आपला बराचसा वेळ त्या मोबाईल फोनवर घालवू लागल्या. मुलींच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांना एका ऑनलाइन गेमचे व्यसन लागले होते. त्यांनी गेम डिलीट करण्याचा आणि त्यांचे फोन जप्त करण्याचा प्रयत्न केला होता, पण तोपर्यंत या व्यसनाने त्यांच्यावर पूर्ण ताबा मिळवला होता. या घटनेमुळे ‘कोरियन लव्ह गेम’ बद्दल पुन्हा एकदा गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
‘कोरियन लव्ह’ गेम
‘कोरियन लव्ह’ हा गेम कोरियन पॉप कल्चर (के-पॉप), के-ड्रामा आणि व्हर्च्युअल डेटिंग थिम्सवर आधारित ऑनलाइन टास्क देणारा गेम आहे. हे गेम्स मोबाईल ॲप्स किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे चालतात, जिथे खेळाडू ‘व्हर्च्युअल लव्हर’ किंवा अज्ञात वापरकर्त्यांशी संवाद साधतात. हे अज्ञात लोक कोरियन शैलीत रोमँटिक मेसेज पाठवतात आणि रोजचे काही टास्क देतात. सुरुवातीच्या टप्प्यात ही कामे निरुपद्रवी वाटतात. सुरुवातील सतत चॅटिंग करणे, स्वतःचे फोटो पाठवणे किंवा मेसेज लिहिणे यांसारखे टास्क दिले जातात.
कालांतराने हे टास्क अधिकाधिक वैयक्तिक आणि टोकाचे होत जातात. या गेमच्या काही टास्कमध्ये स्वतःला इजा करून घेण्यास प्रवृत्त केले जाते आणि शेवटचा टास्क मृत्यूशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या गेमची रचना ‘ब्लू व्हेल’ चॅलेंजसारखीच आहे. या गेममध्येही ५० आव्हानात्मक टास्कनंतर शेवटी आत्महत्या करण्यास भाग पाडले जात असे. काही वृत्तांनुसार, ‘कोरियन लव्ह गेम’देखील अशाच टप्प्याटप्प्याने पुढे सरकतो.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणींच्या फोनच्या प्राथमिक तपासणीत लॉकडाऊनच्या काळापासून त्यांना गेमचे दीर्घकालीन व्यसन असल्याचे दिसून आले आहे. या मुली गेमच्या माध्यमातून भावनिकरित्या जोडल्या गेल्या होत्या आणि शेवटचा टास्क पूर्ण करण्याचा भाग म्हणून त्यांनी हे पाऊल एकत्र उचलले असावे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हा गेम इंटरनेटवर सहज कुठेही सापडू शकतो. मुले अनेकदा तो घरी डाऊनलोड करतात आणि अनोळखी व्यक्ती किंवा ‘ऑटोमेटेड चॅटबॉट्स’शी संवाद साधतात. तज्ज्ञांचा इशारा आहे की, हे गेम्स मुलांमध्ये एक प्रकारचे भावनिक अवलंबित्व निर्माण करतात. परिणामी मुलांना आभासी जग आणि वास्तव यातील फरक ओळखणे कठीण होते.
प्रशासनाकडून आता फ्लॅटमधून जप्त केलेल्या उपकरणांचे फॉरेन्सिक विश्लेषण केले जात आहे,
यापूर्वी भारतात ऑनलाइन सट्टा किंवा पैशांच्या गेम्समुळे आत्महत्या झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, मानसशास्त्रज्ञांच्या मते भावनांवर आधारित गेम्स अधिक धोकादायक आहेत कारण ते प्रेम, आपलेपणासारख्या भावनांचा गैरफायदा घेतात. या घटनेनंतर पालकांनी मुलांच्या मोबाईल वापराकडे लक्ष द्यावे, स्क्रीन टाइम मर्यादित ठेवावा आणि त्यांच्या वागण्यातील बदल (उदा. लपून-छपून फोन वापरणे किंवा अचानक अबोला धरणे) याकडे सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
हे गेम्स धोकादायक का आहेत?
१. व्यसनाधीन टास्क: टास्क-आधारित गेम्स एका लूपसारखे काम करतात. ते खेळाडूला सतत गुंतवून ठेवतात. मुलांसाठी हे अधिक घातक ठरते कारण यामुळे त्यांच्या खऱ्या जगाशी असलेल्या संवादावर, अभ्यासावर आणि झोपेवर परिणाम होतो.
२. मानसिक प्रभाव: गाझियाबाद प्रकरणातही मुलींनी शाळा सोडली होती. यातून हे स्पष्ट होते की, हा गेम त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनला होता.
गेम्स कशा प्रकारे फसवतात?
गेम्समध्ये कुठलीही बळजबरी केली जात नाही, तर ‘सायकोलॉजिकल ग्रूमिंग’ (psychological grooming) केले जाते. टास्कची सुरुवात अगदी लहान टास्कने होते, जसे की रात्री उशिरापर्यंत व्हिडिओ पाहणे किंवा सकाळी लवकर उठणे. हळूहळू त्याचे रूपांतर हानिकारक टास्कमध्ये होते. अनेकदा खेळाडूला घरच्यांशी किंवा मित्रांशी बोलण्यास मनाई केली जाते, जेणेकरून मदतीचे सर्व मार्ग बंद होतील. ॲडमिन्स कधीकधी वैयक्तिक माहिती लीक करण्याची किंवा घरच्यांना इजा पोहोचवण्याची धमकी देऊन खेळाडूंना ब्लॅकमेल करतात. जे लोक एकटेपणा किंवा नैराश्याने ग्रासलेले असतात, त्यांना या गेम्समध्ये आपलेपणा वाटू लागतो. गाझियाबादमधील बहिणींनी परीक्षेत नापास झाल्यामुळे लाजेपोटी शाळेत जाणे बंद केले होते, ज्यामुळे त्या या ऑनलाइन जाळ्यात सहज अडकल्या असाव्यात, असा अंदाज बांधला जात आहे.
सुरक्षित कसे राहावे?
- हानिकारक मजकूर शेअर करणारी खाती अनफॉलो किंवा ब्लॉक करा.
- धोकादायक चॅलेंजेसची तक्रार करा.
- सकारात्मक लोकांवर लक्ष केंद्रित करा जे मानसिक आरोग्य किंवा शिक्षणाला प्रोत्साहन देतात.
- संवाद साधा: तुम्हाला त्रास होत असेल, तर विश्वासू व्यक्तीशी (मित्र, कुटुंब, शिक्षक) बोला.
- पालकांनी मुलांशी सायबर बुलिंग आणि ऑनलाइन धोक्यांबद्दल स्पष्टपणे चर्चा करावी.
- स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा, विशेषतः रात्री उशिरा फोन वापरणे टाळा.
कोणते गेम्स वाढवताहेत चिंता?
‘कोरियन लव्ह’ गेम व्यतिरिक्त इतरही काही धोकादायक गेम्सनी यापूर्वी चिंता वाढवली आहे:
- ब्लॅकआउट चॅलेंज : यात शुद्ध हरपेपर्यंत स्वतःचा श्वास रोखून धरला जातो. यामुळे मेंदूला इजा किंवा मृत्यू होऊ शकतो.
- ब्लू व्हेल चॅलेंज : रशियात सुरू झालेला हा गेम आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या ५० टास्कसाठी ओळखला जातो.
- स्पॉननिझम कल्ट ॲक्टिव्हिटी (Roblox-linked): ‘Roblox’ वरील एका गेमने चुकीच्या पद्धतीने मुलांचे ब्रेनवॉशिंग केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

