ग्लासगो येथे होणाऱ्या या स्पर्धेतून भारताला सर्वाधिक पदके मिळवून देणारे तब्बल ९ खेळ कमी करण्यात आले आहेत. हा निर्णय प्रामुख्याने आर्थिक बचत, निधीची मर्यादित उपलब्धता आणि पायाभूत सुविधांचा अभाव या कारणांमुळे यजमान देशाने घेतला आहे. याचा फटका सर्वच देशांना कमी अधिक प्रमाणात बसणार आहे, पण सर्वाधिक नुकसान भारताचे होणार आहे. या खेळांच्या यशानेच भारताने २०२२ मधील बर्मिंगहॅम स्पर्धेत ६१ पदके मिळविली होती. यातील ५० टक्के पदके या वगळलेल्या खेळातून आली होती.

राष्ट्रकुल २०२६ स्पर्धेचे नेमके स्वरूप काय?

ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा ही अत्यंत संक्षिप्त स्वरूपाची असणार आहे, ज्यामध्ये केवळ दहा खेळांचा समावेश असेल. यापूर्वी २०२२ च्या बर्मिंगहॅम आवृत्तीत १९ खेळांचा समावेश होता. म्हणजे तब्बल नऊ खेळ वगळण्यात आले आहेत. ग्लासगो स्पर्धेत ॲथलेटिक्स, जलतरण, ट्रॅक सायकलिंग, वेटलिफ्टिंग, ३ बाय ३ बास्केटबॉल, लॉन बॉल्स, नेटबॉल, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, ज्युडो आणि बॉक्सिंग या खेळांचा समावेश आहे. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, स्क्वॉश, टेबल टेनिस, ट्रायथलॉन, कुस्ती, बीच व्हॉलीबॉल आणि रग्बी सेव्हन्स या खेळांना यंदा स्पर्धेतून वगळण्यात आले आहे.

काही खेळांना का वगळले?

वाढता आर्थिक भार हे या सगळ्यामागचे मुख्य कारण आहे. मुळात २०२६ची राष्ट्रकुल स्पर्धा सुरुवातीला ऑस्ट्रेलियात होणार होती. परंतु २०२३ मध्ये म्हणजे तीन वर्षे आधी आयोजनाचा खर्च प्रचंड वाढत असल्याचे कारण देत व्हिक्टोरिया राज्याने यातून माघार घेतली. इतक्या कमी कालावधीत पर्यायी यजमान शोधणे कठीण होते, अखेर स्कॉटलंडचे ग्लासगो शहर यासाठी पुढे आले. तेव्हाच त्यांनी अवघ्या तीन वर्षांचा मर्यादित कालावधी पूर्ण स्वरूपातील भव्य स्पर्धा आयोजित करण्यासाठी आणि त्याचे नियोजन करण्यासाठी पुरेसा नसल्याचे स्पष्ट केले. तसेच खर्चही मोठा असल्यामुळे त्यांनी खेळांची संख्या कमी करण्याची अट टाकली. ती राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने स्वीकारली. यापूर्वी यजमानपद भूषवलेल्या अनेक देशांना स्पर्धेच्या आयोजनातून फारसा आर्थिक परतावा मिळालेला नाही. यामुळेच ऑस्ट्रेलियानंतर हे यजमानपद स्वीकारण्यास इतर देश उत्सुक नव्हते. ग्लासगोने २०१४ मध्ये या स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते, त्यामुळे त्यांच्याकडे दुसऱ्या आवृत्तीसाठी आवश्यक असलेल्या बहुतेक पायाभूत सुविधा आधीपासूनच तयार होत्या. त्यामुळे त्यांनी खेळांची संख्या कमी करून स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले.

आयोजनात आणखी मर्यादा कशा आल्या?

अलीकडच्या काळात बहुराष्ट्रीय सहभाग असलेल्या खेळांचे आयोजन सुलभ राहिलेले नाही. भौगोलिक अडचणींसह आर्थिक समस्या प्रामुख्याने आयोजक देशाला सहन करावी लागते. त्यामुळे ग्लासगोच्या मर्यादित खेळांच्या समावेशासह स्पर्धा घेण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यात आले. मात्र, यामुळे त्यांच्या अडचणी संपल्या नाहीत. स्पर्धेत ७४ देशांचे खेळाडू, प्रशिक्षक, पदाधिकारी येत असतात. या सर्वांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे शिवधनुष्य यजमान देशाला उचलावे लागेल. अशा स्पर्धांच्या वेळी क्रीडा ग्रामची निर्मिती केली जाते. पण, या वेळी तसे काहीच झालेले नाही. खेळाडूंची आणि त्यांच्या सहायकांची व्यवस्था ही परिसरातील विविध हॉटेल्समध्येच करण्यात आली आहे. स्पर्धादेखील केवळ चार केंद्रांवर पार पडणार आहे.

भारताला किती मोठा फटका?

या निर्णयाचा भारताच्या पदक मिळविण्याच्या संधींवर विपरीत परिणाम होणार आहे. गेल्या वेळी बर्मिंगहॅम (२०२२) स्पर्धेत भारताने १६ खेळांमध्ये २१० खेळाडू पाठवले होते आणि ६१ पदके जिंकली होती. त्यापैकी ३० पदके ही यंदा वगळण्यात आलेल्या खेळातील आहेत. यात बॅडमिंटन (६), क्रिकेट (१), हॉकी (२), स्क्वॉश (२), टेबल टेनिस (७) आणि कुस्ती (१२) या खेळांचा समावेश आहे. म्हणजे भारताची एकूण पन्नास टक्के पदके या वगळलेल्या खेळातून आली होती. याशिवाय, ज्या दहा खेळांचा समावेश करण्यात आला आहे, त्या खेळांमधील भारताची कामगिरी संमिश्र राहिली आहे. बॉक्सिंग (७ पदके), ज्युडो (३ पदके) आणि वेटलिफ्टिंग (१० पदके) यामध्ये भारताची घसरण झाली आहे; ऑलिम्पिकमध्ये (२०२४) मीराबाई चानू, लोवलिना बोरगोहेन आणि निखात झरीन यांच्यासारख्या खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली होती. राष्ट्रकुल २०२२ स्पर्धेत आधीच भारताला सर्वाधिक पदके मिळवून देणारे नेमबाजी आणि तिरंदाजी हे खेळ नव्हते. त्यामुळे तेव्हादेखील भारताची पदकसंख्या घटलीच होती. आता तर आणखी खेळ वगळल्यामुळे भारताच्या खात्रीशीर पदकांमध्ये आणखी घट होणार आहे. टेबल टेनिस आणि कुस्ती यांसारख्या खेळांना नक्कीच मोठा फटका बसेल, जिथे भारताने मर्यादित स्पर्धकांमध्ये आपले वर्चस्व राखले होते.

भारताच्या पदकाच्या आशा कोणावर ?

भारताच्या पदकाची संख्या वाढविण्याच्या आशा प्रामुख्याने अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारात राहतील. भालाफेकपटू नीरज चोप्रा हा पदकाच्या शर्यतीत आघाडीवर असेल. या वेळी त्याला पाकिस्तानच्या अर्शद नदीम आणि श्रीलंकेचा उगवता खेळाडू रुमेश थरंगा पाथिरागे यांचे आव्हान असेल. त्याचबरोबर लांब उडीत मुरली शंकर, लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंग, उंच उडीत सर्वेश कुशारे, वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू, विंद्याराणी देवी, ज्ञानेश्वरी यादव, हर्षिंदर कौर, बॉक्सिंगमध्ये लोवलिना बोरगोहेन, जॅस्मिन लम्बोरिया, सचिन सिवच या प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीवर भारताच्या नजरा राहतील. लॉन बॉल्समध्ये बर्मिंगहॅमला भारताने सुवर्णपदक मिळविले होते. त्यामुळे या वेळी त्यांच्याकडून या कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे.