Global Passport Index 2026 India Passport Ranking Explained: एखाद्या देशाच्या पारपत्राची आंतरराष्ट्रीय ताकद किती आहे हे फक्त ते पारपत्र तुम्हाला किती देशांमध्ये विना-व्हिसा (Visa-Free) फिरण्याची परवानगी देते यावरून ठरत असेल का? तर तसे मुळीच नाही. २०२६ च्या ‘ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स’ (GPI) नुसार, आता पारपत्राचे महत्त्व केवळ पर्यटनापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते पारपत्र त्या देशातील गुंतवणुकीच्या संधी आणि राहणीमानाचा दर्जादेखील दर्शवते.

ग्लोबल सिटीझन सोल्यूशन्सने (Global Citizen Solutions) जाहीर केलेल्या या जागतिक क्रमवारीत भारताला २०० देशांपैकी १२५ वे स्थान मिळाले आहे.

हा निर्देशांक कसा ठरवला जातो?

हा निर्देशांक इतर नेहमीच्या पारपत्र रँकिंगपेक्षा वेगळा आहे. त्यात केवळ फिरण्याचे स्वातंत्र्य न पाहता, १४ वेगवेगळ्या निर्देशकांच्या आधारे तीन प्रमुख घटकांना महत्त्व दिले जाते:

  • फिरण्याचे स्वातंत्र्य: तुम्ही किती देशांत सहज प्रवास करू शकता.
  • गुंतवणुकीच्या संधी: त्या देशाची आर्थिक ताकद आणि व्यावसायिक संधी.
  • राहणीमानाचा दर्जा: तिथे राहणाऱ्या लोकांचे जीवनमान, आरोग्य आणि शाश्वत विकास.

त्यासाठी जागतिक बँक (World Bank) आणि जागतिक आर्थिक मंच (WEF) यांसारख्या नामांकित संस्थांच्या डेटाचा वापर केला जातो.

भारताची कामगिरी:

या अहवालात भारताबाबत एक संमिश्र एक संमिश्र चित्र समोर आले. भारताची एकूण रँक १२५ असली तरी वेगवेगळ्या घटकांमध्ये हा आलेख बदलतो.

  • प्रवास स्वातंत्र्य: या बाबतीत भारत १३५ व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच जागतिक स्तरावर भारतीयांना अजूनही मुक्त प्रवासासाठी मर्यादित वाव आहे.
  • राहणीमानाचा दर्जा: इथे भारताने थोडी चांगली कामगिरी करत ११८ वे स्थान पटकावले आहे.

हेनले पासपोर्ट इंडेक्स (जुलै २०२६):

फक्त प्रवासावर आधारित असणाऱ्या ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स’च्या अहवालानुसार भारताची घसरण होऊन तो ८० व्या स्थानावर पोहोचला आहे. सध्या भारतीय पारपत्रधारकांना ५६ देशांमध्ये व्हिसामुक्त किंवा ‘व्हिसा-ऑन-अराइव्हल’ प्रवेश मिळतो. त्यामध्ये प्रामुख्याने आशिया, आफ्रिका, कॅरेबियन आणि पॅसिफिक देशांचा समावेश आहे. अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमध्ये जाण्यासाठी भारतीयांना अजूनही आधी व्हिसा काढावाच लागतो.

जगातील टॉप १० पारपत्र:

स्वीडनला अव्वल दर्जावर का?

स्वीडनने तिन्ही आघाड्यांवर (प्रवास, गुंतवणूक व राहणीमान) उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हा देश गुंतवणुकीत नवव्या आणि राहणीमानात जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यामुळे त्यांचे पारपत्र क्रमांक १ वर आहे. तसेच, पाचव्या स्थानावरील डेन्मार्कचा राहणीमानाचा दर्जा उत्तम आहे; तर नेदरलँड्स हा देश प्रवास आणि गुंतवणुकीत पुढे आहे.

आजच्या काळात पारपत्राचे मूल्य केवळ देशाच्या सीमा ओलांडण्यापुरते राहिलेले नाही. तो देश आता व्यक्तीला परदेशात राहणे, काम करणे, गुंतवणूक करणे आणि एक सुरक्षित आयुष्य जगणे या दृष्टीने संधी देण्याच्या बाबतीत एक प्रतीक असा देश ठरला आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करताना आपल्या पारपत्राचे जागतिक मूल्य वाढवण्यासाठी अजून बरीच मजल मारायची आहे, हेच या अहवालातून स्पष्ट होते.