वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण गेल्या वीस लाख वर्षांतील सर्वाधिक आहे. परिणामी पृथ्वीवर ऊर्जा असंतुलन होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने आपल्या ताज्या अहवालात या ऊर्जा असंतुलनाविषयीचा इशारा दिला आहे…

ऊर्जा असंतुलनाविषयी हवामान संघटनेचा अहवाल

पृथ्वीवरील तापमानाचा शास्त्रीय लेखाजोखा मांडायला जेव्हापासून सुरुवात झाली आहे, तेव्हापासून आतापर्यंतची आकडेवारी पाहता सध्या हवामानाचे असंतुलन सर्वात वाईट स्थितीत आहे. हरितगृह वायूंच्या घनतेमुळे पृथ्वीवरील उष्णता किंवा ऊर्जेचे संतुलन ढासळत आहे. वातावरण, महासागर अधिकाधिक उष्ण होत आहेत, हिमनद्या अधिक वेगाने वितळत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने हवामानाच्या या स्थितीवर आपल्या ताज्या अहवालात या ऊर्जा असंतुलनाविषयीचा इशारा दिला आहे. या अहवालानुसार, गेल्या काही दशकांमध्ये हवामानातील बदल वेगाने आणि व्यापक स्तरावर होत आहेत आणि याचे परिणाम पुढील शेकडो वर्षे पृथ्वीवर होणार आहेत. १८५० पासून आतापर्यंतच्या नोंदींमध्ये २०१५ ते २०२५ ही आतापर्यंतची सर्वाधिक उष्ण ११ वर्षे असल्याची नोंद झाली आहे. २०२५ मधील जागतिक सरासरी तापमान हे हे औद्योगिक क्रांतीपूर्व काळापेक्षा (म्हणजे जेव्हा माणसांनी मोठ्या प्रमाणात इंधन जाळणे सुरू केले नव्हते तेव्हाच्या काळापेक्षा) सुमारे १.४३ अंश सेल्सिअसने जास्त होते. मागील वर्षी हवामानाची ला निना स्थिती सक्रीय होती, त्यामुळे थंडी अधिक होती. त्यामुळे गेल्यावर्षी त्याआधीच्या २०२४ या वर्षापेक्षा तापमान कमी होते. २०२४ मध्ये एल निनो स्थितीमुळे तापमान अधिक होते. तरीही २०२५ हे आतापर्यंतच्या सर्वाधिक तीन उष्ण वर्षांपैकी होते. तापमान वाढीचा वेग आता वाढत आहे, अशी चिंता जागतिक हवामान संघटनेने व्यक्त केली आहे. या अहवालात त्यांनी या हवामान बदलाच्या वेगाचे अनेक पुरावे दिले आहेत. पृथ्वीचे हवामान इतिहासात कधी नव्हते इतके असंतुलित झाले आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या हवामान संघटनेने दिला आहे.

हवामान असंतुलित होण्याचे कारण काय?

जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार, पृथ्वी ज्या प्रमाणात उष्णता (ऊर्जा) घेत आहे, त्यापेक्षा खूप कमी उष्णता बाहेर सोडते आहे. यामागे कार्बन डायऑक्साइडसारख्या उष्णता वाढवणाऱ्या वायूंचे उत्सर्जन कारणीभूत आहे. म्हणजे पृथ्वीवरील उष्णतेचे एक विशिष्ट संतुलन असणे आवश्यक आहे. जेवढी ऊर्जा सूर्याकडून पृथ्वीच्या वातावरणात येते, तेवढेच प्रमाण पृथ्वीवरून बाहेर टाकल्या जाणाऱ्या ऊर्जेचे हवे. पण ही स्थिती आता नाही. पृथ्वीच्या वातावरणातील थरांमध्ये असलेले हरितगृह वायू याला कारणीभूत आहेत. कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रेट ऑक्साइड यासारख्या वायूंचे वातावरणातील प्रमाण सातत्याने वाढत आहे. परिणामी वातावरणातील थरात या वायूंची घनता वाढल्याने उष्णता बाहेर फेकण्यात अडथळा निर्माण होतो. या विक्रमी ‘ऊर्जा असंतुलनामुळे’ गेल्या वर्षी समुद्राचे तापमान खूप वाढले आणि पृथ्वीवरील बर्फाचे वितळत राहिले.

या अहवालावर तज्ज्ञांचे म्हणणे काय?

शास्त्रज्ञांना भीती आहे की एल निनोच्या नैसर्गिक उष्णतेचा टप्पा यावर्षी सुरू झाला, तर तापमानाचे नवे विक्रम होऊ शकतात. शास्त्रज्ञ अजूनही या वाढत्या उष्णतेमागील नेमके कारण शोधत असले, तरी कार्बन डायऑक्साइडसारखे हरितगृह वायू (ग्रीनहाऊस गॅसेस) हे मुख्य कारण असल्याबद्दल त्यांना शंका नाही. १९६० च्या दशकापासून ऊर्जेच्या असंतुलनाच्या नोंदी ठेवणे सुरू झाले आहे. गेल्या काही वर्षांत हे असंतुलन वाढत चालले आहे आणि २०२५ ला ते विक्रमी टप्प्यावर पोहोचले. कारण २०२४ मध्ये हरितगृह वायूंची घनता विक्रमी स्तरावर होती, अशी माहिती जागतिक हवामान संघटनेचे वैज्ञानिक अधिकारी जॉन केनेडी यांनी दिली. या अहवालावर प्रतिक्रिया देताना संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटेनिओ गुटेरस यांनी पुन्हा एकदा देशांना जीवाश्म इंधन (फॉसिल फ्युएल) सोडून अक्षय्य ऊर्जेकडे वळण्याचे आवाहन केले. यामुळे हवामान, ऊर्जा आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल, असे त्यांनी सांगितले. “पृथ्वीला तिच्या मर्यादेपलीकडे ढकलले जात आहे. हवामानाचे सर्व संकेत धोक्याचा इशारा देत आहेत,” असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले.

उष्णतेच्या असंतुलनामुळे काय परिणाम?

जागतिक हवामान संघटनेने अहवालात अशी माहिती दिली आहे की वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वीस लाख वर्षांतील सर्वाधिक आहे. याला जीवाश्म इंधन जाळण्यासारख्या मानवी क्रियाच कारणीभूत आहेत. या ज्वलनामुळे तयार होणाऱ्या हरितगृह वायूंमुळे अडकलेली उष्णता वातावरण, जमीन आणि बर्फ वितळवते. २०२४-२५ मध्ये जगातील हिमनद्या (ग्लेशियर्स) सर्वात वाईट पाच वर्षांपैकी एका स्थितीत होत्या. तसेच, २०२५ मध्ये दोन्ही ध्रुवांवरील समुद्री बर्फ विक्रमी नीचांकी पातळीवर होता. पृथ्वीतील ९० टक्क्यांपेक्षा जास्त अतिरिक्त उष्णता समुद्रात साठते. त्यामुळे समुद्री जीवांना त्यामुळे धोका निर्माण होतो, वादळे अधिक तीव्र होतात आणि समुद्राची पातळी वाढते. गेल्या वर्षी समुद्रपृष्णावरील दोन किलोमीटर भागातील उष्णता विक्रमी पातळीवर पोहोचली. गेल्या २० वर्षांत समुद्र गरम होण्याचा वेग विसाव्या शतकाच्या शेवटच्या काळाच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की वाढते तापमान तीव्र हवामान घटनांना कारणीभूत ठरत आहे आणि डेंग्यूसारख्या आजारांचा प्रसार वाढवत आहे. उष्ण हवामान आणि अधूनमधून येणारा पाऊस यामुळे डासांची पैदास वाढते. उष्ण आणि दमट हवामानात डासांचे आयुष्य वाढते आणि ते वेगाने पुनरुत्पादन करतात. शिवाय कडक उन्हामुळे लोक पाणी साठवून ठेवतात, ज्यामुळे डासांना अंडी घालण्यासाठी अनुकूल जागा मिळते. अमेरिकेच्या नैर्ऋत्य भागात सध्या विक्रमी उष्णतेची लाट आली आहे. तिथे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले आहे. हे प्रमाण सरासरीहून तब्बल १० ते १५ अंश सेल्सिअसने अधिक आहे.

या वर्षी एल निनो स्थिती सक्रिय झाली तर..?

संशोधक आता पॅसिफिक महासागरावर लक्ष ठेवून आहेत, कारण अंदाजानुसार २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत एल निनो स्थिती पुन्हा सक्रिय होऊ शकते. जर तसे झाले तर मानवी कारणांमुळे आधीच वाढलेल्या तापमानावर आणखी भर पडून २०२७ मध्ये नवीन विक्रम होऊ शकतात.

manisha.devne@expressindia.com