गोव्यात रेल्वेत किंग कोब्रा आढळल्याच्या घटना केवळ थरारक नाहीत, तर त्या विकास आणि पर्यावरण यांच्यातील ताण अधोरेखित करणाऱ्या आहेत. गोव्यामध्ये २००२ ते २०२४ या कालावधीत रेल्वेत किंग कोब्रा आढळल्याच्या ४७ घटनांचा आढावा ‘बायोट्रॉपिका’मध्ये प्रसिद्ध झाला. त्यापैकी पाच घटना रेल्वेमार्गाजवळील असल्याने ‘रेल्वे-वन्यजीव संबंध’ हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे.
अधिवास संकुचित झाला आहे का?
पश्चिम घाटातील दाट, ओलसर जंगल आणि नदीकाठ हा राजनाग अर्थात किंग कोब्राचा नैसर्गिक अधिवास आहे. किंग कोब्रा हा विषारी सर्पांमध्ये जगात सर्वांत मोठा. मात्र, गेल्या दोन दशकात पायाभूत सुविधा, दुहेरीकरण, मालवाहतुकीतील वाढ आणि शहरीकरणामुळे जंगल तुकड्यातुकड्यांमध्ये विभागले गेले. जंगलाच्या मधून जाणारे रेल्वे मार्ग हे केवळ रेल्वेमार्ग न राहता यामुळे त्या परिसरातील प्राण्यांचा अधिवास विभागला जातो. सापांसारख्या प्रजातीसाठी त्यांच्या अधिवासाचे विभाजन हे गंभीर परिणाम घडवून आणणारे आहे. कारण यामुळे सापाची भक्ष्यसाखळी विस्कळीत होते. त्यांचा अधिवास खंडित झाल्यामुळे प्रजननासाठी आवश्यक असणारा परिसर कमी होतो आणि त्यांच्या स्थलांतराचे मार्ग बंद होतात. उंदीर वा इतर भक्ष्यांचा पाठलाग करताना साप मालगाडीत प्रवेश करू शकतो. उन्हापासून बचावासाठी तो मालगाड्यांच्या डब्याखाली आसरा घेतो किंवा भक्ष्याच्या शोधात रेल्वेगाडीतदेखील चढताे. रेल्वे समोर गेल्यानंतर तो अनोळखी आणि प्रतिकूल भागात उतरतो. अशा वेळी त्यांच्या अपघाती मृत्यूची शक्यता अधिक असते.
रेल्वे ‘हाय-स्पीड शॉर्टकट’ बनतो आहे का?
एका अभ्यासात रेल्वे मार्गांना वन्यजीवांसाठी ‘हाय-स्पीड शॉर्टकट’ असे म्हटले गेले आहे. रस्त्यांवर ते वाहनांखाली चिरडले जाण्याचा धोका असतो. रेल्वेतदेखील हा धोका असतो. मात्र, तुलनेने साप डब्यात चढल्यानंतर तो दुसऱ्या प्रदेशात जिवंत पोहोचण्याची शक्यताही अधिक असते. मात्र, हा प्रवास सुरक्षित नाही. कारण जिथे रेल्वेगाडी थांबते, तेथील वातावरण कोरडे, खुले व त्याठिकाणी मानवी वस्ती असते. अशा ठिकाणी त्याच्या जगण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे ‘अनाहूत स्थलांतर’ ही नवी पर्यावरणीय समस्या समोर येते. प्रजाती वाचली तरी तिचा परिसंस्थेशी असलेला सुसंवाद तुटतो.
भीतीपायी सर्पनाशाची शक्यता?
२०१७ मध्ये वन्यजीव कार्यकर्ते दिकांश परमार यांनी रेल्वेतून किंग कोब्रा सुरक्षित बाहेर काढल्याची घटना चर्चेत आली. २०१९ आणि २०२३ मधील अशाच घटनांची छायाचित्रे आणि चित्रफितींनीसुद्धा लोकांचे लक्ष वेधले. मोबाइल फोन आणि समाज माध्यमांमुळे अशा घटनांची नोंद वाढली आहे. मात्र, त्याचवेळी भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप मानला जातो. त्याचा दंश जीवघेणा असतो. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण होणे साहजिक आहे. मात्र, भीतीपोटी स्थानिकांकडून सापांना मारण्याच्या घटना घडल्यास आधीच असुरक्षित असलेल्या प्रजातीस आणखी धोका निर्माण होतो.
प्रशासकीय समन्वयाचा अभाव
किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप मानला जातो. त्याचे विष तीव्र असून दंश जीवघेणा ठरू शकतो. मात्र, भीतीपोटी स्थानिकांकडून सापांना मारले जाण्याची शक्यता वाढते. वनक्षेत्र आकुंचन पावत असताना आणि रेल्वेमार्ग विस्तारत असताना मानव-वन्यजीव संघर्षाची नवी रूपे समोर येत आहेत. रेल्वे प्रकल्पांच्या पर्यावरणीय परिणाम मूल्यांकनात वन्यजीवांच्या हालचालींचा पुरेसा अभ्यास होतो का, संवेदनशील भागांत निरीक्षण, मालगाड्यांची तपासणी आणि वनविभागाशी तत्काळ संपर्काची व्यवस्था आहे का, जंगल तुकड्यातुकड्यात विभाग नये म्हणून हरित पूल, भूयारी मार्ग यांसारख्या उपाययोजना राबवल्या जातात का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. वन विभाग, रेल्वे प्रशासन आणि स्थानिक सर्पमित्र यांच्यात प्रभावी समन्वय नसेल, तर अशा घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पश्चिम घाटासाठी धोक्याची घंटा?
गोव्यातील घटना अपवाद नाहीत, त्या संपूर्ण पश्चिम घाटासाठी धोक्याची घंटा आहेत. विकास आणि जैवविविधता यांच्यातील संतुलन बिघडल्यास त्याचे परिणाम केवळ वन्यजीवांपुरते मर्यादित राहत नाहीत. तर मानवी जीवनालाही त्याचा फटका बसतो. रेल्वे हा आधुनिकतेचा वेग दर्शवणारा प्रतीक आहे. मात्र, त्या वेगाने जर जंगलांची शांतता भंग केली, तर संघर्ष अटळ ठरेल. प्रश्न केवळ सापांचा नाही तर तो विकासाच्या ‘मॉडेल’चा आहे. अधिवासांचे रक्षण, पर्यावरणीय नियोजन आणि जनजागृती यांवर भर न दिल्यास सापांची हा रेल्वे प्रवास भविष्यात अधिक धोकादायक ठरू शकतो.
विकासाच्या रुळांवरून धावणाऱ्या गाड्यांना थांबवणे शक्य नाही. मात्र, त्या रुळांलगतचे जंगल जपणे नक्कीच शक्य आहे आणि तेच काळाची गरज आहे. हे धोके टाळण्यासाठी रेल्वेमार्गांजवळ नियमित निरीक्षण, मालगाड्यांची तपासणी, संवेदनशील भागांमध्ये जनजागृती आवश्यक आहे.rakhi.chavhan@expressindia.com
