गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवीन विक्रम करणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरांना आता काही प्रमाणात लगाम लागला आहे. विक्रमी तेजीनंतर दोन्ही धातूंचे भाव बऱ्यापैकी आवाक्यात आल्याने ग्राहकांमध्ये पुन्हा एकदा खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेला आढावा.

सोने, चांदीच्या भावात किती घसरण?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत २९ जानेवारीला २४ कॅरेट सोन्याच्या दराने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ८२ हजार ८२५ रुपयांचा उच्चांक केला होता. नंतरच्या चार दिवसांत तब्बल २६ हजार २६५ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे दोन फेब्रुवारीपर्यंत सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५६ हजार ५६० रुपयांपर्यंत घसरले. दुसरीकडे, चांदीने २९ तारखेला तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो चार लाख ६ हजार ८५० रुपयांचा उच्चांक गाठला होता. नंतरच्या चार दिवसांत तब्बल एक लाख ३१ हजार ८४० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे दोन फेब्रुवारीपर्यंत चांदी जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७५ हजार रुपयांपर्यंत घसरली. गेल्या आठवड्यात सर्वकालीन उच्चांकावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात चार दिवसांत १४ टक्क्यांहून अधिक, तर चांदीच्या दरात ३२ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

दोन्ही धातूंचे दर कशामुळे घसरले?

जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याचा थेट परिणाम सोने आणि चांदीसारख्या कमोडिटीजवर सध्या दिसून येत आहे. डॉलरच्या मजबुतीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन्ही मौल्यवान धातूंवरील दबाव वाढला असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या किमतीत लक्षणीय घसरण नोंदविण्यात आली आहे. त्याचबरोबर, गेल्या काही दिवसांत उच्चांक गाठलेल्या दरांचा फायदा घेत अनेक गुंतवणूकदारांनी नफा वसुलीसाठी विक्रीचा मार्ग स्वीकारल्याने बाजारातील दबाव अधिकच वाढला आहे. या जागतिक घडामोडींचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही स्पष्टपणे जाणवत असून, सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. अर्थसंकल्पानंतर सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या बाजारासाठी अपेक्षित असे कोणतेही ठोस सकारात्मक संकेत न मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक संकेत आणि डॉलरच्या मजबुतीचा एकत्रित परिणाम म्हणून सोने-चांदीच्या किमती आता आवाक्यात आल्या आहेत.

यापुढे दर वाढतील की घटतील?

गेल्या काही आठवड्यांपासून वाढलेल्या किमतींमुळे सोने-चांदीच्या खरेदीपासून दूर राहिलेले ग्राहक आता पुन्हा बाजारात सक्रिय होताना दिसत आहेत. दरात झालेल्या घसरणीमुळे दागिन्यांच्या खरेदीसह गुंतवणुकीच्या उद्देशानेही ग्राहकांचा उत्साह वाढला आहे. विशेषतः लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कमी दराचा फायदा घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी खरेदीस सुरुवात केल्याचे सुवर्ण व्यावसायिकांमधून सांगण्यात येत आहे. त्यांच्या मते, जागतिक बाजारातील चढ-उतार आणि डॉलरच्या हालचालींवर पुढील काळात सोने आणि चांदीचे दर अवलंबून राहणार आहेत. मात्र, सध्याच्या दर घसरणीमुळे बाजारात मागणी वाढण्याची शक्यता असून, अल्पकालीन अस्थिरतेनंतर दर सुधारण्याची अपेक्षा आहे. साधारणपणे मार्चपासून सोने आणि चांदीचा बाजार पुन्हा एकदा तेजीकडे वाटचाल करेल, असाही अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

गुंतवणुकदारांची भूमिका कशी?

सोने आणि चांदीच्या दरांमध्ये अलीकडेच झालेल्या तीव्र घसरणीनंतर बाजारात पुन्हा हालचाली वाढू लागल्या आहेत. दरांमध्ये मोठी घसरण झाली की बाजारातील मोठे खेळाडू आणि संस्थात्मक गुंतवणूकदार संधी शोधत सक्रिय होतात. सुवर्ण बाजारात दर घसरणीनंतर नेमके तेच चित्र पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते, सोने आणि चांदीच्या किमती एकाच टप्प्यात मोठ्या प्रमाणात घसरल्यानंतर दोन्ही धातूंची मागणी पुन्हा एकदा वाढू लागली आहे. दर घसरणीनंतर पुन्हा एकदा सोने-चांदीचे दर स्थिरावण्याचे आणि हळूहळू वरच्या दिशेने जाण्याचे संकेत मिळत आहेत. साधारणपणे, जेव्हा सोने आणि चांदीच्या किमती १५ ते ३० टक्क्यांपर्यंत घसरतात, तेव्हा मोठे ज्वेलर्स तसेच दीर्घकालीन गुंतवणूकदार या धातूंना स्वस्त असल्याचे गृहीत धरून खरेदीकडे वळतात. सध्याच्या परिस्थितीतही हेच धोरण अवलंबले जात असल्याचे सराफा बाजारातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे काय?

सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांशी संबंधित सुरू असलेल्या लकारात्मक वाटाघाटींमुळे जागतिक व्यापारात स्थिरतेचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर अमेरिका आणि इराणसारख्या देशांमधील तणाव कमी झाल्याने गुंतवणूकदारांचा धोका टाळण्याचा कल घटला आहे. परिणामी, अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी कमी होऊन त्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. सामान्यतः जागतिक स्तरावर अस्थिरता वाढली की सोन्याच्या किमतीत तेजी येते; मात्र सध्या जागतिक परिस्थिती तुलनेने स्थिर असल्याचे चित्र असल्याने सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. ही घसरण दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी तसेच दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी संधी असू शकते. तथापि, कोणत्याही गुंतवणुकीचा निर्णय घाईने न घेता परिस्थितीचा अंदाज घेऊनच पुढील पाऊल टाकावे. आगामी काळात सोन्याच्या किमतीतील हालचाली या जागतिक घडामोडी, अमेरिकन डॉलरची दिशा तसेच भारतातील आर्थिक व धोरणात्मक निर्णयांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे सध्याची घसरण संधी असली, तरी बाजारातील बदलत्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवणे गरजेचे ठरणार आहे.

patil.jitendra@expressindia.com