Gold rivers in India सोनं हे संपत्ती, स्थिरता व समृद्धीचे सर्वांत विश्वासार्ह आणि सुरक्षित प्रतीक असल्याचे मानले जाते. सोन्याला जगातील सर्वांत महागड्या धातूंमध्ये गणले जाते. शतकानुशतके मानवी इतिहासात त्याचे महत्त्वाचे स्थान आहे, कारण जगभरात आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोने देशांसाठी विश्वासार्ह मालमत्ता राहिली आहे. सोन्याच्या दराने आता एक लाखांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. एक आश्चर्यकारक बाब म्हणजे जगात अशा काही नद्या आहेत, ज्यांमधून चक्क सोने वाहते. त्यात भारताचाही समावेश आहे.
या नद्यांमधील वाळूत खरोखरच सोन्याचे अंश आढळतात. सोशल मीडियावर सोन्याची चाळणी करणाऱ्या लोकांचे काही व्हिडीओ खूप व्हायरल झाले आहेत. या क्लिपमध्ये एक व्यक्ती नदीची वाळू पाण्याने धुऊन सोन्याचे काही छोटे कण काढताना दिसत आहे. हे दिसायला सोपे आणि मोहक वाटू शकते, पण त्या एका कणामागे तासनतासाचा संयम आणि कठोर शारीरिक श्रम दडलेले आहेत. भारतासह जगातील या नद्यांविषयी जाणून घेऊयात…
भारतातून वाहणारी सोन्याची नदी
भारतातील नद्या कोट्यवधी लोकांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या पिण्यासाठी, शेतीसाठी आणि अनेक घरगुती गरजांसाठी पाणी पुरवतात. गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, तुंगा आणि हेमावती यांसारख्या प्रसिद्ध नद्या शेती आणि दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक आहेत. प्रत्येक नदीची स्वतःची कथा, महत्त्व आणि नैसर्गिक सौंदर्य आहे. पण, यात सुवर्णरेखा नदी वेगळी आहे. ती तिच्या प्रवाहाबरोबर सोने वाहून नेते असे मानले जाते. सुवर्णरेखा नदी तिच्या नैसर्गिक सोन्याच्या साठ्यासाठी ओळखली जाते. येथील आदिवासी समाज अजूनही नदीच्या वाळूतून सोने वेगळे करण्यासाठी पारंपरिक पद्धती वापरतात.
झारखंडची राजधानी रांचीच्या दक्षिणेकडील छोटा नागपूर पठारापासून वाहणारी ही नदी सुमारे ४०० किलोमीटर वाहत जाते आणि पश्चिम बंगाल, ओडिशातून प्रवास करून शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते. अनेक भारतीय भाषांमध्ये सुवर्णरेखाचा अर्थ ‘सोन्याची रेषा’ होतो. अनेक वर्षांपासून रांचीजवळ असलेल्या पिस्का या नदीकाठच्या गावात सोन्याचे उत्खनन केले जात आहे, याच ठिकाणी नदीचे उगमस्थान आहे. अशी आख्यायिका आहे की, आजही नदीच्या पात्रात सोन्याचे अंश आढळू शकतात आणि अनेक लोक नदीच्या वालुकामय पात्र आणि किनाऱ्यांवर सोन्याचे कण शोधत राहतात.
सुवर्णरेखा नदीला रवींद्रनाथ टागोर आणि बिभूतिभूषण बंदोपाध्याय यांनी त्यांच्या अनेक साहित्यकृतींमध्ये अमर केले आहे. आज ही नदी एका जलविद्युत प्रकल्पाव्यतिरिक्त, शहरी पाणीपुरवठा आणि उद्योगांसाठी एक स्रोत म्हणून काम करते. नदीच्या किनाऱ्यांवर अनेक खाण आणि खनिज प्रक्रिया उद्योग आहेत. खरं तर, देशातील सर्वात जास्त तांब्याचे साठे याच नदीच्या खालच्या भागात, ओडिशामधील मयूरभंज आणि सिंहभूम जिल्ह्यांमध्ये आहेत.
भारतातील सोने वाहणारी दुसरी नदी म्हणजे अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी नदी. या नदीच्या वाळूमध्येही सोन्याचे कण आढळतात. येथील आदिवासी लोक आजही जुन्या पारंपरिक पद्धतीने वाळूतून सोने वेगळे करतात. त्यांच्यासाठी हे केवळ एक नैसर्गिक संसाधन नाही, तर उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. भूगर्भशास्त्रज्ञांकडे यासाठी वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे. ते म्हणतात की, नदी खनिजांनी समृद्ध असलेल्या भागातून वाहते. जेव्हा पाणी या खडकांना घासते, तेव्हा हळू हळू सोन्याचे छोटे कण बाहेर पडतात. हे कण मग नदीच्या प्रवाहाबरोबर पुढे जातात.
इतर देशातील नद्या
या नद्या केवळ भारतापुरती मर्यादित नाहीत. १९ व्या शतकात अमेरिकेतील मिसुरी नदीत सोन्याच्या बातमीने मोठ्या ‘गोल्ड रश’ला सुरुवात झाली. हजारो लोकांनी आपली घरे सोडली आणि नदीकिनारी प्रवास केला. काहींना सोने सापडले आणि ते रातोरात श्रीमंत झाले. मॉन्टाना राज्यातही बिग होल नदीत सोन्याचे मोठे साठे सापडले, ज्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय जोडला गेला.
१९ व्या शतकाच्या शेवटी कॅनडामधील क्लॉन्डाइक नदीत सोन्याचा शोध लागल्याने जगभर खळबळ माजली. लोक सर्व बाजूंनी तिथे धावले. काहींना सोने मिळाले, पण बहुतेक जण निराशेने परतले. नदीच्या वाळूतून सोने काढणे हे ऑनलाइन दिसते तितके सोपे अजिबात नाही. यासाठी प्रचंड संयम, वाळू वारंवार धुणे आणि गाळणे (Filtering), तसेच त्यासाठी जवळपास अदृश्य कण वेगळे करण्याचे विशेष कौशल्य लागते.
भारतात नव्याने आढळल्या सोन्याच्या खाणी
‘एसबीआय रिसर्च’च्या ‘Coming Of (a Turbulent) Age : The Great Global Gold Rush’ या शीर्षकाच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये ओडिशा, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशमध्ये सोन्याच्या नवीन खाणींचा शोध लागला आहे. ओडिशातील देवगढ, केओंझर व मयूरभंज या विविध जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या नवीन खाणी सापडल्या आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने (GSI) या ठिकाणी अंदाजे १,६८५ किलो सोने शोधून काढले आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे सापडलेल्या सोन्याचा साठा लाखो टन असण्याचा अंदाज आहे.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI)ने नुकत्याच पूर्ण केलेल्या सर्वेक्षणामध्ये मेहगावान प्रदेशात अंदाजे १०० हेक्टरवर पसरलेला सोन्याचा साठा आढळून आला आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात भारतातील पहिली मोठी खासगी सोन्याची खाण दरवर्षी ७५० किलो सोन्याचे उत्पादन करेल अशी अपेक्षा आहे. सध्या भारत दरवर्षी सुमारे १,००० टन सोन्याची आयात करतो. या पार्श्वभूमीवर ही घडामोड अत्यंत महत्त्वाची आहे, कारण देश सोन्याचा सर्वांत मोठा आयातदार आहे.
