Comprehensive guide on Gold Investment strategies and tips: बाजारपेठेतील गुंतवणुकीचे कल बदलत असले, तरी सोन्याचे मूल्य जागतिक स्तरावर शाश्वत मानले जाते. सोन्यात गुंतवणूक करणे हा केवळ परंपरेचा भाग नसून तो एक आर्थिक सुरक्षिततेचा भक्कम आधार आहे. बाजारपेठेतील गुंतवणुकीचा कल आणि त्यावर मिळणाऱ्या परताव्याचे दर सतत बदलत असतात. परंतु अगदी जागतिक बाजारपेठेत सुद्धा, काही अनिवार्य कारणांमुळे सोन्याच्या भावात काही काळासाठी घसरण झाली तरी ते पुनः वधारतात आणि बहुतेक वेळेस आधीच्या भावापेक्षा सुद्धा अधिक उंचीवर जातात. त्यामुळेच जागतिक बाजारपेठेत कोणतेही नवे-जुने कल आले, तरीही सोन्याचे भाव सातत्याने वाढत राहतात. म्हणूनच बाजारपेठेतील सोन्याचं मूल्य शाश्वत मानलं जातं आणि सोन्यामधील गुंतवणूक काळाच्या कसोटीवर योग्य ठरणारी, सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे काही प्रमुख मार्ग आहेत :
- १.सोन्याची प्रत्यक्ष खरेदी आणि साठवण
- २. डिजिटल गोल्ड म्हणजे सोन्याची ऑनलाईन खरेदी
- ३. गोल्ड म्युच्युअल फंडस्
- ४. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (गोल्ड ETF)
- ५. सोव्हेर्जींअन गोल्ड बॉण्ड्स म्हणजे सोव्हर्जीअन सुवर्ण रोखे
१. सोन्याची प्रत्यक्ष खरेदी आणि साठवण
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात लोकप्रिय आणि पारंपरिक मार्ग म्हणजे सोन्याचे दागिने विकत घेणे. आपल्या देशामध्ये सोन्याच्या दागिन्यांना गुंतवणुकीपेक्षा, त्याही पलीकडे जाणारं भावनिक मूल्य आहे. कौटुंबिक समारंभात, विशेषतः लग्नांमध्ये, आपल्याला शक्य होईल तितके सोन्याचे दागिने खरेदी करणं ही आपली परंपरा आहे. त्या दागिन्यांना आपण आर्थिक पुंजी किंवा गुंतवणूक म्हणून न पाहता त्याला ‘स्त्रीधन’ म्हणत, आपल्या आर्थिक संपन्नतेमध्ये त्यांना सन्मानाचं स्थान देतो.

मानसिक व भावनिक तयारी नसते
स्त्रीधन कालांतराने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवलं जातं. मधल्या काळामध्ये सोन्याचं मूल्य वाढलेलं असतं. त्यामुळे त्या स्त्रीधनात केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावासुद्धा वाढलेला असतो. परंतु सोन्याचं मूल्य कितीही वाढलेलं असलं आणि त्या स्त्रीधनाची विक्री करून, कितीही अधिक परतावा मिळणार असला तरीही, ते सोनं विकायची आपली मानासिक आणि भावनिक तयारी नसते. सर्वसामान्यत: गरज असलेले पैसे उभे करायचे सर्व मार्ग संपतात, तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून घरातल्या सोन्याची विक्री केली जाते.
सोनं गहाण ठेवण्यापेक्षा विक्रीच अधिक फायद्याची
सोन्याबद्दलची आपल्या भारतीयांची भावना लक्षात घेऊन अनेक बँका आणि बऱ्याच खाजगी कंपन्या आपल्या जवळचं सोनं गहाण ठेऊन घेतात आणि त्यावर कर्ज देतात. त्यासंबंधी वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं दाखवणाऱ्या योजना जाहीर करतात. त्यांच्या आकर्षक जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमातून दाखवत राहतात. पण वस्तुनिष्ठ विचार करता सोनं गहाण ठेवून त्यावर कर्ज काढणं व त्याचं मुद्दल आणि त्यावर बँक आकारत असलेलं व्याज फेडणं यापेक्षा, ते सोन विकून त्यातून पैसे उभे करणं, दीर्घकाळाचा विचार करता , कितीतरी अधिक फायद्याचं ठरतं. बँकांकडे किंवा अन्यत्र गहाण ठेवलेलं सोन सोडवून पुनः परत आणणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी असते. बहुतेक लोकांना व्याजाचे पहिले काही हप्ते भरल्यावर उर्वरित हप्ते भरणं शक्य होत नाही. परिणामी सोनं बँकेला कायमच विकावं लागत व तो पर्यंत भरलेल्या व्याजाची रक्कम फुकट जाते.
भावनिक नव्हे गुंतवणूकच
त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी सोन्याची नाणी किंवा बिस्किट्स या स्वरूपात सोन्याची खरेदी करावी. यामुळे त्या सोन्याशी फारशी भावनिक गुंतवणूक न होता केवळ गुंतवणुकीचं एक साधन या दृष्टीने सोन्या कडे पाहता येत. जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा किंवा सोन्याचे भाव चढे असतील त्या वेळी ती नाणी किंवा बिस्किट्स विकून त्यातून उत्तम परतावा मिळवता येतो.
घडणावळ टाळा
दागिने खरेदी करताना त्यांच्या घडणावळीवर लक्षणीय रक्कम खर्च करावी लागते . दागिन्यांची विक्री करताना फक्त सोन्याचा भाव बघून आपल्या दागिन्यांची किंमत ठरवली जाते. त्या घडणावळीसाठी झालेला खर्च जमेत धरला जात नाही. त्या मुळे दागिन्यांवर मिळणार परतावा सुद्धा काही प्रमाणात कमी होतो. या उलट सोन्याची नाणी किंवा बिस्किट खरेदी करताना घडणावळीसारखा खर्च करण्याची गरज नसते. त्यामुळे त्यांची विक्री करताना सुद्धा परताव्याचं प्रमाण जास्त असतं.
सोन्याचे दागिने किंवा नाणी वा बिस्कीट यांची खरेदी करताना दोन गोष्टींचा विचार प्रामुख्याने करावा लागतो :
१. खरेदी करत असलेल्या सोन्याची शुद्धता :
कॅरेटचे प्रकार
आपण खरेदी करत असलेलं सोन शुद्ध असेल याची खात्री असावी लागते. आपण खरेदी करत असलेल्या सोन्याची दुकानदार सांगत असलेली शुद्धता ही सत्य आणि योग्य आहे, याची खात्री करून घ्यावी लागते. सोन्यामध्ये २४, २२, १८ आणि १४ कॅरेटचे सोने हे प्रमुख प्रकार असतात.
कॅरेटनुसार शुद्धता लक्षात घ्या
दागिन्यांसाठी २४ कॅरेटचे सोने काहीसे ठिसूळ ठरते म्हणून त्यासाठी २२ किंवा १८ कॅरेटचे सोने वापरले जाते. या मध्ये २२ कॅरेटच्या सोन्याची शुद्धता जवळपास ९२ टक्के असते तर त्या तुलनेत १८ कॅरेटच्या सोन्याची शुद्धता ७५ टक्के व १४ कॅरेटच्या सोन्याची शुद्धता ५८.५ टक्के इतकी कमी असते. त्यामुळे दुकानदार २२ कॅरेटच्या सोन्याचे पैसे घेऊन कमी कॅरेटचे सोने देत नाही याची खात्री करून घावी .
सोनेखरेदीचे जीएसटीसह अधिकृत बिल टाळू नका
सोने खरेदी करताना दुकानदाराकडून अधिकृत बिल घ्यावे. त्यामध्ये आपण खरेदी केलेल्या सोन्याचे कॅरेट, वजन , घडणावळीचा खर्च व त्यावरील विक्री कर म्हणजे GST याचा स्पष्ट उल्लेख असावा. आपण रोख रक्कम देऊन सोने खरेदी केले तरीही दुकानदार कडून पक्के बिल घ्यावे. काही दुकानदार GST वाचवण्यासाठी कच्चं बिलं घेण्यास सुचवतात. GST मध्ये वाचवलेले पैसे पुढील काळामध्ये नुकसानकारक ठरू शकतात.
ज्वेलरचा हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक तपासा
भारतामध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ही संस्था सोन्याची शुद्धता सांगणारे हॉलमार्किंग करते. यामध्ये सोन्यावर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सचा त्रिकोणी लोगो असतो. सोन्याच्या शुद्धतेनुसार एक क्रमांक लिहिलेला असतो . उदा. २२ कॅरेट साठी ९१६ किंवा १८ कॅरेट ७५० इत्यादी. भारतात सोन्यावर असे हॉलमार्किंग असणे अनिवार्य आहे. तसेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने प्रत्येक अधिकृत ज्वेलर ला सहा अंकी ‘हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक’ दिला आहे. ज्वेलरकडून खरेदी करण्यापूर्वी आपण त्याचा क्रमांक ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या केअर अॅपमध्ये तपासून पाहू शकतो .
विश्वासातले सराफ आणि मानसिक सुरक्षितता
इतकी काळजी घेतली तरीही नव्या दुकानदाराकडून योग्य गुणवत्तेचे सोने मिळेलच, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे बहुसंख्य ग्राहक आपल्या विश्वासातल्या सराफांकडूनच सोने खरेदी करतात. त्यामुळेच महाराष्ट्रातील ग्राहकांच्या अनेक पिढ्या सोने खरेदी साठी पु. ना. गाडगीळ, वामन हरी पेठे यांच्यासारख्या सराफांकडेच जातात. अनेक सराफ नव्या, तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी दागिन्यांची डिझाइन्स बाजारात आणतात, आपल्या पारंपरिक पेढ्याना आधुनिक रूप देत त्यांचं ‘शो रूम’ मध्ये रूपांतर करतात. सराफांची पिढी बदलते, ग्राहकांची पिढी बदलते पण त्यांच नातं तेच राहत कारण ग्राहकांचा आपल्या सराफावर विश्वास असतो आणि सराफ आपली विश्वासार्हता जपत असतात. त्यामुळे सोने खरेदी करताना आपल्या नेहमीच्या किंवा माहितीच्या सराफाकडूनच सोने खरेदी करावी. त्यामुळे योग्य गुणवत्तेच्या सोन्याबरोबरच मानसिक सुरक्षितता सुद्धा मिळते.
२. खरेदी केलेल्या सोन्याचा सुरक्षित सांभाळ
खरेदी केलेलं सोनं सुरक्षितपणे सांभाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागते. सोन्याची विक्री करणं त्यामानाने सोपं असतं आणि त्यातून ताबडतोब रोख पैसे मिळतात. त्यामुळे सोनं ही रस्त्यावर स्त्रियांच्या गळ्यातल्या साखळ्या आणि मंगळसूत्र चोरणाऱ्या भुरट्या चोरांपासून सशस्त्र दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांपर्यंत सर्वांच्याच आवडीची बाब आहे. त्याचबरोबर कित्येक वेळा घरात येणारे प्लम्बर किंवा इलेक्ट्रिशियन सारखे कर्मचारी किंवा अगदी घरातील नोकर – चाकर यांच्यापासून सुद्धा सोनं सुरक्षित ठेवावं लागतं.
सोन्याचा विमा उतरवा
फक्त रोजच्या वापरातील दागिने घरात व ते सुद्धा एखाद्या सुरक्षित कपाटात किंवा तिजोरीत ठेवावेत. या तिजोरीला डिजिटल लॉक असेल तर ती अधिक सुरक्षित आणि वापरायला सहज होते. सोनं अधिक असेल तर बँकेत लॉकर घेऊन सोनं तिथे ठेवणं अधिक चांगलं. लॉकरसाठी भाडं द्यावं लागलं तरी त्यामुळे चोरीचा धोका कमी होतो व सोन्याची सुरक्षितता वाढते. आपल्या जवळच्या सगळ्या सोन्याचा विमा उतरवावा. बँन्केत लॉकर मध्ये ठेवलेल्या सोन्याचा स्वतंत्र विमा उतरवणे फायद्याचे असते.
सोन्याची सर्वाधिक चोरी कौटुंबिक समारंभात
आपण खरेदी केलेल्या सोन्याची सर्व बिलं व हॉलमार्क तपशीलसुद्धा जपून ठेवावा. या सर्वांचे फोटो काढून त्यांचे डिजिटल रेकॉर्ड्स काढून ठेवणे गरजेचे आहे. आपल्या जवळच्या सोन्याची माहिती आपल्या अत्यंत विश्वासातील व्यक्तींशिवाय इतर कुणालाही देऊ नये. लग्न आणि तत्सम समारंभांमध्ये सोन्याचे दागिने घालणे हा आपल्या समारंभाचा पारंपरिक आणि महत्वाचा भाग आहे. कित्येक वेळा असा समारंभ दुसऱ्या गावात असतो. मग आपण बऱ्याचवेळा आपले दागिने घेऊन त्या समारंभाला जातो. परंतु प्रवासत सोने बरोबर नेणे जोखिमेचे असते. त्यातून सोन्याची चोरी होऊ शकतेच पण त्याचबरोबर आपल्या जीवालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा लग्नसमारंभात दागिने घालण्याचा मोह आवरावा किंवा कमीतकमी दागिने घालावेत . सोन्याच्या चोऱ्यांची सर्वात जास्त प्रकरणं कौटुंबिक समारंभात किंवा प्रवासात घडली आहेत तेव्हा अशा वेळी योग्य ती काळजी घ्यावी.
सोन्यामधील गुंतवणूक अधिक सुरक्षित करण्यासाठी आता काही नवे पर्याय उपलब्ध होत आहेत.
सोन्यामधील गुंतवणूक ही पारंपरिक चौकटींच्या पिढीपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाने आणलेल्या परिवर्तनाच्या नव्या पिढीपर्यंत सर्वच पिढ्यांची अत्यंत विश्वसनीय गुंतवणूक ठरली आहे !
पुढील भागात आधुनिक तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या सोन्यामधील गुंतवणुकीच्या नवनवीन पर्यायांविषयी सविस्तर चर्चा करू या.
