Gold Mutual Fund Investment Guide: Top-performing funds and taxation policy in India.
सोन्यामधील गुंतवणुकीसंबंधी या पूर्वीच्या लेखात आपण गोल्ड म्युच्युअल फंडांची कार्यपद्धती, त्यात गुंतवणूक करण्याचे फायदे आणि जोखीम यांचा सविस्तर विचार केला. या लेखामध्ये आपण भारतातील प्रभावी आणि विशेष लोकप्रिय गोल्ड म्युच्युअल फंडांसंबंधी सविस्तर चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सुरक्षित आणि अधिक परतावा देणारी गुंतवणूक करता येईल.
१. भारतातील प्रभावी आणि लोकप्रिय गोल्ड म्युच्यअल फंड्स :
आपल्या देशात सध्या आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल रेग्युलर गोल्ड सेविंग्ज डायरेक्ट ग्रोथ , टाटा गोल्ड डायरेक्ट ग्रोथ, एचडीएफसी गोल्ड फंड, मोतीलाल ओसवाल गोल्ड अँड सिल्वर पॅसिव्ह डायरेक्ट ग्रोथ , ऍक्सिस गोल्ड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ, कोटक गोल्ड फंड, एसबीआय गोल्ड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ या सारखे काही गोल्ड म्युच्युअल फंड्स लोकप्रिय आहेत. सोन्यामध्ये गुंतवणूक करून त्यामधून जास्तीत जास्त परतवा मिळवणे हा या सर्व म्युच्युअल फंड्सचा सामान उद्देश असतो.
गोल्ड म्युच्युअल फंड इटीएफशी संलग्न
हे सर्व फंड्स प्रामुख्याने गोल्ड इटीएफमध्ये गुंतवणूक करतात. मात्र बहुतेक म्युच्युअल फंड स्वतःच्या इटीएफशी संलग्न असतात आणि ते प्रामुख्याने त्याच इ.टी.एफ. मध्ये गुंतवणूक करतात. उदाहरणार्थ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल गोल्ड सेव्हिंग्ज डायरेक्ट ग्रोथ फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल गोल्ड इटीएफमध्ये गुंतवणूक करतो तर ऍक्सिस गोल्ड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ फंड ऍक्सिस गोल्ड इटीएफ मध्ये गुंतवणूक करतो. एसबीआय गोल्ड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ हा म्युच्युअल फंड एसबीआय इटीएफमध्ये गुंतवणूक करतो आणि त्याच बरोबर बँकेकडे कर्जाचं तारण म्हणून आलेल्या सोन्यामध्ये सुद्धा काही रक्कम गुंतवून त्यापासून परतावा मिळवतो.

वेगवेगळा परतावा
प्रत्येक गोल्ड म्युच्युअल फंड त्याच्या गुंतवणूकदारांना वेगवेगळा परतवा देतो. हा परतावा, बऱ्याचवेळा , गुंतवणूकदाराने केलेल्या गुंतवणुकीच्या कालावधी वर अवलंबून असतो. सोन्याच्या भावातल्या चढउतारांबरोबरच, त्या गोल्ड म्युच्युअल फंडाची कार्यक्षमता आणि त्यांनी घेतलेले गुंतवणुकीचे निर्णय यांचा सुद्धा मोठा प्रभाव, त्या गोल्ड म्युच्युअल फंडमधून आपल्याला मिळणाऱ्या परतव्यावर मोठ्या प्रमाणात पडतो. त्यामुळे प्रत्येक गोल्ड म्युच्युअल फ़ंड मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणार परतावा वेगवेगळा असतो.
जोखीम कमी करण्यासाठी…
प्रत्येक गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची जोखीमसुद्धा वेगवेगळी असते. आज एसबीआय डायरेक्ट प्लॅन ग्रोथ किंवा टाटा गोल्ड इटीएफ डायरेक्ट ग्रोथ या सारख्या गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणं हे मोतीलाल ओसवाल गोल्ड अॅण्ड सिल्व्हर पॅसिव्ह डायरेक्ट ग्रोथ किंवा ऍक्सिस गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह डायरेक्ट ग्रोथ या सारख्या गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा कमी जोखिमेचं असत. म्हणूनच गोल्ड म्युच्युअल फंडामधील आपल्या गुंतवणुकीची जोखीम कमी करून त्या गुंतवणुकीपासून जास्तीतजास्त परतावा मिळवायचा असेल तर गुंतवणूक करण्यापूर्वी त्या म्युच्युअल फंडाची कार्यपद्धती आणि गेल्या काही काळामधील त्याची कामगिरी याचा अभ्यास करणं आवश्यक आहे.
२. गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काय तपासावे?
अ . गुंतवणुकीचा उद्देश: सर्वप्रथम गुंतवणूकदराने आपण ही गुंतवणूक नेमकी कशासाठी करतो आहोत ते निश्चित करावे. आपल्या एकूण गुंतवणुकीला आणखी एक क्षेत्र मिळावे म्हणून आपण गुंतवणूक करतो आहोत का? की, सतत होणाऱ्या चलनवाढीपासून संरक्षण मिळावं म्हणून सोन्यासारख्या , बहुतांशी सातत्याने मूल्य वाढत जाणाऱ्या साधनामध्ये आपण पैसे गुंतवत आहोत? की, आपली एकूण मालमत्ता वाढावी हा आपला उद्देश आहे, हे नेमके ठरवावे. त्या उद्देशासाठी कोणता गोल्ड म्युच्यअल फंड योग्य आहे त्याचा अभ्यास करावा.
ब. गुंतवणुकीचा कालावधी : सोन्यामधील गुंतवणूक मध्यम किंवा दीर्घ कालावधीसाठी केल्यास जास्त फायदेशीर ठरते. त्यामुळे आपण जास्तीतजास्त किती काळासाठी पैसे गुंतवून ठेवू शकतो त्याचा विचार करावा.
क. जोखीम घेण्याची क्षमता : सोन्यामधील गुंतवणूक सुरक्षित मानली जात असली तरीही गोल्ड म्युच्युअल फंड स्पर्धा किंवा सोन्याच्या भावातील चढउतार या सारख्या कारणांमुळे अल्प काळासाठी तोट्यात जाऊ शकतो. तो काळ सहन करण्याची आपली क्षमता आहे का याचा विचार करावा.
ड. गोल्ड म्युच्यअल फंडाची कार्यक्षमता : गोल्ड म्युच्यअल फंडाच्या कर्मचाऱ्याची त्यांच्या कामातली व्यावसायिकता , त्या फंडाचं सर्वांगीण मार्केट रिसर्च करण्याच कौशल्य , आणि गुंतवणूकदारांना परतावा देण्याचा त्या फंडाची पद्धत याचा सखोल अभ्यास करावा.
बाजारात उपलब्ध असलेल्या गोल्ड म्युच्युअल फंडांचा वरील सर्व निकषांवर तौलनिक अभ्यास करून, आपल्या उद्दिष्टांसाठी सर्वात योग्य ठरेल असा फंड निवडून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला त्या गुंतवणुकी मधून सर्वात जास्त फायदा मिळू शकतो.
३. गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत :
गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी डिमॅट अकाऊंटचीसुद्धा गरज नसते. फक्त बँकेच्या किंवा गोल्ड म्युच्युअल फंडाच्या KYC सारख्या सोप्या अटींची पूर्तता करून आपण गुंतवणूक करू शकतो. ही गुंतवणूक एक रकमी करता येते किंवा म्युच्युअल फंडाबरोबर सिस्टिमॅटिक इन्व्हवेस्टमेंट प्लॅन (SIP) ठरवून घेऊन , आपल्या सोयीप्रमाणे, हप्त्यांमध्ये पैसे गुंतवता येतात. गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये अत्यंत कमी पैसे भरून गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मोतीलाल ओसवाल गोल्ड अॅण्ड सिल्व्हर डायरेक्ट ग्रोथ या फंडामध्ये पाचशे रुपये गुंतवणूक करता येते तर ऍक्सिस गोल्ड अॅण्ड सिल्व्हर पॅसिव्ह डायरेक्ट ग्रोथ या फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी केवळ शंभर रुपये सुद्धा पुरेसे आहेत.
४. गोल्ड म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीचा आढावा :
गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये केलेल्या आपल्या गुंतवणुकीचा सातत्याने आणि सतर्कतेने नियमित आढावा घेत राहणे अनिवार्य आहे. हा आढावा मुख्यतः पुढील बाबीवर आधारित असावा :
अ . बाजारपेठेतील बदल : सोन्यामधील गुंतवणूक स्थिर मानली जात असली तरीही अनेक घटनांचा परिणाम सोन्याच्या मूल्यावर सतत आणि कमी- जास्त काळासाठी होत राहतो. जागतिक राजकीय आणि आर्थिक परिस्थिती , जगातल्या प्रमुख शेअर बाजारातील चढ -उतार , अर्थव्यवस्थेमधील बदल किंवा देशातील कायदे किंवा करप्रणाली मध्ये झालेले फेरफार सोन्याच्या मूल्यावर परिणाम करतात. त्यामुळं या सर्व गोष्टींची माहिती घेऊन त्यानुरूप आपल्या गुंतवणुकीमध्ये आवश्यक ते बदल करत राहावं.
ब. सतत सुधारणा : जागतिक घडामोडींवरून सोन्याच्या भावात होणाऱ्या संभाव्य बदलांचा अंदाज बांधून त्यानुसार आपल्या गोल्ड म्युचुअल फंडातील गुंतवणुकीमध्ये सुधारणा करावी. उदाहरणार्थ, सामान्यतः जेव्हा जागतिक शेअर बाजारात घसरण होऊ लागते तेव्हा सोन्याचा भाव वधारतो. अशा वेळेस आपण गोल्ड म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक वाढवू शकतो.
क. कालावधीचा विचार : आपण किती कालावधीसाठी गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली आहे हे लक्षात ठेऊन ज्यावेळी आपल्याला त्या गुंतणुकीतून बाहेर पडायचे असेल त्यावेळी किती परतावा मिळेल याचा अंदाज बांधून ठेवावा. म्हणजे आवश्यकता वाटल्यास आणि शक्य असल्यास गुंतवणुकीचा कालावधी थोडा कमी-जास्त करून गुंतवणुकीमधून आपण जास्तीतजास्त फायदा मिळवू शकतो.
ड . तज्ज्ञांचा सल्ला : सोन्याचे मूल्य अनेक जागतिक, आर्थिक, आणि राजकीय घडामोडींवर अवलंबून असते. त्या सर्वांची माहिती आपल्याला असतेच असे नाही. तसेच बऱ्याचवेळा त्या सर्वांचा आपल्या गुंतवणुकीवर होणाऱ्या परिणामांचा अचूक अंदाज आपल्याला बांधता येत नाही. त्यामुळे आवश्यकता वाटल्यास त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून आपल्या गुंतवणुकीचे पुढील नियोजन करावे.
इ. पुनर्रचना : केवळ गोल्ड म्युच्यअल फंडामधीलच नव्हे तर सगळ्याच गुंतवणुकीचा , एक महिना किंवा तीन महिने अशा निश्चित कालावधी नंतर आढावा घ्यावा. बाजारपेठेतील कलानुसार आपल्या गुंतवणुकीमध्ये आवश्यक ते फेरफार करावेत.
ई. दीर्घकालीन गुंतवणूक : सोन्यामधील गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक असते. योग्य तो कालावधी गेल्यानंतर त्या गुंतवणुकीपासून सर्वात जास्त परतावा मिळतो. त्यामुळे अल्प कालावधीत मिळत असलेला फायदा घेऊन त्या गुंतवणुकीतून दूर होण्याचा मोह टाळावा.
५. गोल्ड म्युच्युअल फंडाची करप्रणाली :
गोल्ड म्युच्यअल फंडांना कराच्या दृष्टीने नॉन इक्विटी फ़ंड मानलं जात. यामध्ये मिळालेल्या अल्पकालीन नफ्यावर आणि दीर्घकालीन नफ्यावर वेगळ्या प्रकारे कर आकारला जातो.
अ. अल्पकालीन भांडवली नफा :गुंतवणुकीतून तीन वर्षांच्या आत बाहेर पडल्यास त्या मध्ये मिळालेला नफा अल्पकालीन भांडवली नफा मानला जातो. तो नफा आपल्या एकूण करपात्र उत्पन्नात जोडला जातो आणि आपल्या आयकर स्लॅब नुसार त्यावर कर आकारणी होते.
ब. दीर्घकालीन भांडवली नफा : गुंतवणूक तीन वर्षांनंतर काढल्यास तो दीर्घकालीन नफा मानला जातो. त्या नफ्यावर २०%दराने कर आकारला जातो.
एखाद्या वेळी अस्थिर आर्थिक परिस्थितीमुळे सोन्यात गुंतवणूक करण्यावर काही अनौपचारिक मर्यादा घातल्या गेल्या तरी , बहुतेक वेळेस ,त्या अल्पकालीन ठरतात. उलटपक्षी, अस्थिर राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत सोने हे गुंतवणुकीचं सर्वोत्तम साधन असतं आणि गोल्ड म्युच्युअल फंड हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा नेहमीच एक सुरक्षित मार्ग असतो.
